Monday, October 10, 2016

'घनश्यामल रेखां'तले तरल बिंदू - तनुजा ढेरे यांच्या कवितांचे आकलन


मागील काही वर्षात सातत्याने एक ओरड कानी पडत असते की, 'आजकाल वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे' ; चांगलं लिहिलं जात नाही अन चांगलं वाचनात येत नाही असेही सुनावले जाते. पण बऱ्याचवेळा प्रत्यक्षात  मामला उलटा असतो. एखादया नवख्या लेखकाने काही उत्कट लेखन केलं तर पुष्कळदा ते वाचकांपर्यंत पोहोचत नाही, शिवाय त्याचं नावदेखील कुणाला ठाऊक नसतं. प्रस्थापित सारस्वतांना जी रसिकमान्यता मिळालेली असते त्या रसिकमान्यतेच्या लाटेवर स्वार होऊन बऱ्याचदा अनेक जण आपले हात त्यात धुवून घेतात. पण कसदार आणि प्रतिभासंपन्न काही लिहिलं गेलं असलं तरी त्याची दखल लवकर घेतली जात नाही हे नक्की. 
'ये रे घना, ये रे घना, न्हाउं घाल माझ्या मना ...'सारखी भावोत्कट कविता लिहिणारे कवी चि.त्र्यं. खानोलकर यांच्या सुरुवातीच्या कविता छापल्या जात नसत. त्यांना वाटलं की बहुधा आपल्या या आडवळणी नावामुळे आपल्या कवितांना प्रसिद्धी मिळत नसावी म्हणून त्यांनी चक्क एका काल्पनिक मुलीच्या नावाने आपल्या कविता प्रसिद्धीसाठी पाठवून द्यायला सुरुवात केली अन त्यांच्या कविता प्रकाशित होऊ लागल्या. त्यांनी पुढे अत्यंत अलौकिक प्रतिभेचं अद्भुत दर्शन घडवणाऱ्या कविता लिहिल्या, पण त्यांनी ते टोपणनाव तसंच ठेवलं. ते नाव होतं आरती प्रभू ! थोरामोठयांची ही कथा तिथं नवशिक्या लेखक - कवींची काय परवड होत असेल ? कुणाचं चांगलं काही वाचनात आलं की त्याच्या पाठीवर थाप देण्यासाठी अन त्याचा लेखनप्रपंच जगापुढे नेण्यासाठी माझी लेखणी झिजवण्यात एक वेगळाच आनंद मिळतो. 

हे सर्व लिहिण्यामागचे कारण म्हणजे सौ. तनुजा ढेरे यांचा 'घनश्यामल रेखा' हा काव्यसंग्रह होय. आजकाल लिहिणारे पायलीला पासरीभर झालेत असं बरेचजण अगदी सहज बोलून जातात मात्र त्या लेखनाकडे मुळातून बघण्याची तसदी घेताना फारसं कुणी दिसत नाही. मग या पासरीभर लेखकातच एखादा ग्रेस असतो किंवा एखादे सुरेश भट असतात. असो.. काव्यसंग्रहाचे शीर्षकच मन आकर्षित करणारे आहे.अर्पणपत्रिकेत त्यांनी लिहिले आहे की ' आयुष्याच्या वाटेवरती शब्द शब्द रेखाटताना एक रेखा अस्तंगत झाली अन त्याच क्षणी एक कुसुम देहाचे निर्माल्य वाहताना अम्लान गंध आयुष्यात पेरून गेली....त्या पवित्र स्मृतींना स्मरून ..' अत्यंत भावगर्भित अशी ही अर्पणपत्रिका कवयित्रीबद्दल आणि काव्यसंग्रहाबद्दल आपल्या अपेक्षा वाढवत जाते अन जसजसे आपण वाचत पुढे जात राहतो तसे एका कसदार काव्यवाचनाची तृप्तता लाभत जाते. तनुजा ढेरे यांच्या कनिष्ट भगिनी आणि सासूबाई या त्या दोन रेषा होत्या, ज्या नियतीने अकस्मात पुसल्या. त्या रेखांचा अम्लान गंध आयुष्यात पेरण्यावाचून नियतीला गत्यंतर नव्हते. या पंक्ती अगदी उत्कट आहेत.कवी प्रा.अशोक बागवे यांची नेटकी प्रस्तावना या पुस्तकास लाभली आहे. कवयित्रीने आपल्या मनोगतात एके ठिकाणी लिहिलं आहे - 'ऊन, वारा, पाऊस, पहाट, दुपार,सांज यांचे भान बदलताना मानवी मनाची उलगडणारी भावपर्णे उमटत जावीत तशी कविता फुलत गेली..' कवीला आपल्या कवितेचे प्रयोजन स्पष्ट असेल, त्याची शब्दसंपदा परिपूर्ण असेल अन त्याची अनुभूती अस्सल असेल तर त्या कवितेत एक सच्चेपणा आपसूक येतो जो वाचकाला भावतो. इथं तसंच काहीसं झालं आहे. तनुजांना त्यांचे काव्यस्त्रोत ज्ञात आहेत, त्यांचे अनुभव खरे आहेत अन त्यांची शैली लाघवी आहे, त्यामुळे त्यांच्या कविता मनाला स्पर्शून जाण्यात यशस्वी ठरतात. 

'घनश्यामल रेखा'सह एकूण ७८ कविता या काव्यसंग्रहात आहेत. तनुजांनी त्यांची पाच तत्वात वर्गवारी केली आहे. रुणझुण, ऋतूगंध, मनगंध,मनझुला आणि हिंदोळा हे ते पाच भाग आहेत. कवितेच्या जन्माची कथा सांगणारी घनश्यामल रेखा ही कविता खूप बोलकी आहे. यातील काही कविता संवादी शैलीतल्या आहेत. 'आज तो परत वाटेवरती भेटला', 'पाऊस अलवार आठवणीतला','सर्वांना हवा हवासा असा तू' अशा कवितातून त्या वाचकांशी संवाद करतात.
'रोज मी तुझी खिडकीत
तासन तास ...
उभी राहून वाट पहायचे,
अन ढगांशी बोलायचे,
पण तुझी चाहूल लागताच,
तू घरात शिरू नये म्हणून 
खिडक्या हळूच बंद करायचे..'   
अशा लडिवाळ पंक्तींनी या कविता सजल्या आहेत.
'आवडेल मला तुझ्या नाजुक पायातले पैंजण बनायला,
तुझ्याबरोबर अंगणात आनंदात नाचायला..'
अशा मोहक शब्दरचनेमुळे कवितांना विलाक्षण गोडवा प्राप्त झाला आहे. 

या कविता केवळ देखण्या शब्दांनी डवरल्या आहेत असेही नाही. त्यांत जो आशय आहे तो मनाला उमगणारा आहे. उगाच शब्दबंबाळ होऊन प्रकांडपांडित्याचा आव ही कविता आणत नाही. तिला पक्के ठाऊक आहे की आपल्याला कोणते भाव व्यक्त करायचे आहेत.
'...हात हाती सख्या माझा
डोळ्यात तळी पावसाची 
पाहताना मनी भरलेली
गाणी तव हिरव्या रानाची !...'
या पंक्तीना स्पष्टीकरणाची गरज पडत नाही. त्या स्वयंभू आहेत. 
'आज कसा कंठ आभाळाला फुटला 
काळोख देहाला पाझर फुटला ...' 
अशा वेदना मांडणारया तनुजांना निसर्गाच्या विविध रूपांचे नेमके आकलन होते, त्याचे त्यांना आकर्षण आहे. या शिवाय आपल्याला जाणवलेले निसर्गानुभव कसे व्यक्त करायचे याचे त्यांना भानही आहे. 

'श्वास तुझा ही माझा ही 
गुंतलेला लिहिताना 
ओल अजूनही मनात भरलेली 
मन पाने डबडबलेली
शब्दांनी ही बघ निळाई 
पांघरलेली...'
अबोल पत्रे या कवितेतल्या या पंक्ती कवितेस वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात. त्यात कृत्रिमतेचा लवलेश येऊ देत नाहीत. 
काही कवितातून आयुष्यावर सुंदर भाष्य केलंय. 
'कधी कधी काही पाने कोरीच ठेवावी लागतात
आयुष्याची..
एक दिवस मागे वळून परत 
एकदा राहिलेला पट जगता येईल...'
असं तत्वज्ञान त्या सहज मांडतात. त्यासाठी कुठलेही बोजड शब्द त्यांना लागत नाहीत. 'उत्तर शोधता कधी सापडलं तर हसायचं फक्त, नाहीतर निःशब्दपणे राहायचं पुढे पुढे जायचं' असा आनंदमार्गही त्यांच्या कविता दाखवतात. 'खूप सोपं असतं, तुझं सुख तेच माझं सुख म्हणणं ..' अशी सुखाची नवी परिभाषा त्यांची कविता मांडते. 

गावाकडील मंदिरांचे चपखल वर्णन करणारी 'देऊळ' ही कविता ग्रामीण जीवन जगलेल्यास पुनःप्रत्ययाचा लोभस आनंद देते. 'भर दुपार रखरखीत' या कवितेत गावाकडील स्त्रीचं रुक्ष जीवन सार्थ शब्दात व्यक्त झालंय. 'हे गीत जीवनाचे नाही खेळ भावनांचा, सुंदर आयुष्य माझे नाही खेळ सावल्यांचा' असं स्वतःच्या जीवनाचं रहस्य त्यांची कविता अल्वार उलगडून दाखवते. त्यांच्या प्रेमकविता आभाळमायेचं चांदणं इवल्याशा डोहात विरघळत जावं तशा आपल्या तालात अवतीर्ण होत जातात अन कवयित्रीच्या हळुवार मनाचा एक कप्पा अलगद उघडून दाखवतात !

'आज न्हाऊन चिंब ओली रात 
सळसळ ओल्या केसात ...
सुगंधी अत्तर दर्प देहात,
करुनी शिनगार उभी नदी काठावर....'

'घे मिठीत पहाटेला प्रीत चंद्रमा
मेघसावळा वाजवतो पावा
रंग प्रीतीचे गुलाबी अंतरंगी 
श्वास पहाट फुलताना गावा..'  

'तुझं असं सांजवेळी रोज परत जाणं ..
मी मात्र काठावरती उभी 
तुझी क्षितिजावर वाट पाहत राहणं ..'
अशा नाजूक भावबंधात त्यांच्या प्रेम कविता गुंफलेल्या आहेत. 'सोनपाखरे','चंद्र रुपेरी','चंद्रबनात','सांजनिळाई','रात','सावल्या','मेघसागर',संध्यासमयी',
'सांजवेळ', 'निळाई','कृष्णधवल चित्र' या सर्व कावितातून वेधक निसर्गवर्णन सामावलं आहे.

'कळ्या रेशमी धाग्यात ओवशील का
गंध मोगऱ्याचा फुलात ..
केसात गजरा माझ्या माळशील का 
पाहून गोड खळी गालात ?...' 
असा लाडिक मधाळ प्रश्न विचारणारया तनुजा ढेरे यांच्या कवितांवर कवी ग्रेस यांच्या शब्दरचनांचा उस्फुर्त प्रभाव जाणवतो. त्यामुळे कविता मुक्त असूनही बांधेसूद आणि आशयाशी आपली नाळ घट्ट ठेवणाऱ्या झाल्या आहेत हे त्यांच्या कवितांचे ठळक वैशिष्ट्य म्हणावे लागेल. 

'उभा पिंपळ डौलदार अंगणी 
हिरवा तांबूस सळसळला,
वारा खेळता अंगी जणू 
अंगणात सख्याचा खेळ रंगला...'
अशी लाघवी शब्दरचना असणारा हा काव्यगुलमोहोर आपल्या मनातील घनश्यामल रेखांना जागृत करून जातो हे या काव्यसंग्रहाचे यश म्हणावे लागेल. पहिल्याच प्रयत्नात इतकं मनस्वी देखणं उत्कट काव्य प्रसवणारया तनुजा ढेरे यांच्याकडून भविष्यात अशीच कसदार काव्यनिर्मिती होईल अशी अपेक्षा करायला काही हरकत नाही. त्यांच्या काव्यलेखनास मनापासून शुभेच्छा ...

- समीर गायकवाड.