Sunday, October 30, 2016

कथा 'हमिदाबाईच्या कोठी'ची .......

 हमिदाबाईची कोठी ...

मराठी नाटकांत 'हमिदाबाईची कोठी' आजही एक आव्हानात्मक नाट्यप्रयोग आहे. समाजाने नाकारलेल्या, तिरस्करणीय ठरवलेल्या विषयावरील या नाटकाची कथासंहिता अनिल बर्वेंना कशी सुचली इथपासून ते नाना पाटेकर, नीना कुलकर्णी यांच्या नाट्यसंचात हे नाटक कसे सजले इथपर्यंतची सर्व नोंद नाट्यदिगार्शिका विजयाबाई मेहता यांनी त्यांच्या 'झिम्मा' या आत्मचरित्रात घेतली आहे. 'झिम्मा' हे केवळ त्यांचे आत्मचरित्र नसून मराठी नाटकांच्या जडणघडणीचे दार्शनिक असणारा महत्वाचा ऐतिहासिक मुल्यांचा दस्तऐवज आहे. या पुस्तकातील 'हमिदाबाईची कोठी'बद्दलचे प्रकरण विजयाबाईंच्याच शब्दात ....   

"हमिदाबाईचा लेखक अनिल एक अनोखं व्यक्तिमत्त्व. त्याची ‘थँक्यू मिस्टर ग्लाड’, ‘डोंगर म्हातारा झाला’ ही पुस्तकं साहित्यक्षेत्रात गाजत होती. खरंतर पिंडानं अनिल विमुक्त भटक्या; सतत वेगवेगळी माणसं हुडकत फिरणारा. पुण्याला जात असताना आगगाडीत त्याला एक मुलगी भेटली, पुण्याच्या हॉस्टेलमध्ये राहून शिकणारी. दिसण्यात, वागण्यात मध्यमवर्गीय पुणेरी, पण होती मुस्लीम. तिची आई गझल-गायिका. मुंबईत तिची स्वत:ची कोठी होती. मुलीला भेटायला मधून-मधून पुण्याला यायची, पण हॉस्टेलपासून दूर असलेल्या हॉटेलमध्ये उतरायची. मुलीच्या मैत्रिणींना आपला व्यवसाय कळू नये, ही इच्छा. मुंबईत, कोठीच्या आसपासचं वातावरण बिघडतंय, त्याची झळ मुलीला लागू नये म्हणून पुण्याला शिक्षण. एवढा नाटय़बिंदू अनिलला पुरेसा होता. त्याचा शोध सुरू झाला. ‘कोठय़ा’ असलेल्या वस्तींतून खूप हिंडला. त्याच्या खास पद्धतीनं सगळ्यांच्यात मिसळून गप्पा केल्या. कोठीमधल्या नाचगाणं करणाऱ्या बायका, रस्त्यावरील दादा लोक, धंदा मिळवणारे एजंट (भडवे-दलाल), त्यातून त्याला भन्नाट व्यक्तिचित्रं गवसली. लुक्का दादा आणि त्याचा पंटर, सत्तार दलाल, गाणारी सईदा, हमिदाचा नोकर ‘बाहरवाला’. ‘हमिदाबाईची कोठी’मध्ये त्याने ती एकत्र आणली. त्यांचे परस्पर संबंध फारसे हुडकले नाहीत किंवा प्रवेश आणि अंक उभे करायचाही फारसा प्रयत्न केला नाही. सर्व व्यक्तिरेखा मात्र अनोख्या आणि जिवंत. हमिदाबाईची भूमिका मी करायचं ठरवलं आणि आम्ही दोघांनी मिळून काम सुरू केलं.

मी प्रवेशांची, अंकाची रचना करायची, अनिलशी चर्चा करून ती पक्की करायची. महिनाभरात पहिला कच्चा खर्डा तयार झाला. त्यात रंग भरण्यासाठी अनिलला भेटलेली मंडळी मीही जवळून पाहणं आवश्यक होतं. पण मी ‘बाई’ जात! त्यांच्या धंद्याच्या वेळी त्यांच्या मोहल्ल्यात फिरणं गैर वाटलं असतं. शिवाय माणसंही मोकळेपणानं माझ्याशी बोलली नसती. म्हणून, वेळ ठरवून दुपारच्या वेळी मी केनडी ब्रिज, फोरास रोड येथील कोठीवाल्या मुलींना भेटायला सुरुवात केली. पण ‘हमिदाबाई’ मात्र काही भेटेना. ‘आवाज अल्लाह की देन है, उसकी बेजान रिकॉर्ड बनाना यह कुदरत से, अल्लाह से बेईमानी करना है,’ असं म्हणणारी कणखर, वयस्कर गायिका कुठेही कोठीवर दिसेना. ती सापडली दुर्गाबाईंमुळे; माझ्या सासूबाईंच्या ओळखीनं. त्या स्वत: सिनेसृष्टीत गेल्या, त्या सुमारास नीलमबाई म्हणून एक खानदानी तवायफ कलकत्त्याहून मुंबईला स्थायिक होण्यासाठी आली होती. बेगम अख्तरची मैत्रीण. तिचं घर शोधून काढण्याची जबाबदारी तेवढी माझी. मला पत्ता मिळाला. कुणी दिला, ते आठवत नाही. नीलमबाईंची तीन मजली इमारत ‘नीलम मंझिल’ लॅमिंग्टन रोडवर होती. गोवा हिंदू असोसिएशनच्या गोमंतक धामजवळ. म्हणजे ‘काखेत कळसा आणि गावाला वळसा,’ असंच झालं.

माझं आणि दुर्गाबाईंचं नातं, तसंच भेटण्याचं कारण मी चिठ्ठीत लिहून नीलमबाईंना कळवलं. ती लागलीच भेटायला तयार झाली. आणि मी ‘नीलम-मंझिल’च्या तिसऱ्या मजल्यावर तिच्या घरी जाऊ लागले. गव्हाळ वर्णाची, वयपरत्वे स्थूलपणाकडे झुकणारी, पण पाठीचा कणा ताठ, उंच भारदस्त, सोफ्यावर मांडा ठोकून बसण्याची सवय, किंचित घोगरा आवाज, मोकळं हसणं, प्रेमळ डोळे. मी तिच्या प्रेमातच पडले. दुर्गाबाईंविषयी बोलताना ती त्यांचा उल्लेख ‘बानू’ या त्यांच्या तरुणपणातील नावानं करायची. नर्गिसची आई आपल्यामुळेच सिनेसृष्टीत आली, म्हणाली. नीलमबाईकडून मला भरभरून मिळालं आणि ‘हमिदाबाई’ची भूमिका माझ्या मनात हळूहळू साकार होऊ लागली. कोठीची खानदानी परंपरा, रिवाझ, त्यात राहणाऱ्या मंडळींची नाती यांविषयी माहिती पदरी पडली. ‘तवायफ हा किताब-पदवी आहे, स्वत:च्या कोठीवर ‘तवायफ’ची राणीसारखी बडदास्त ठेवली जाते. आपली स्वत:ची गायकी ती आपल्या मुलीला आणि आवडत्या शिष्येलाच फक्त शिकवते. आपली कारकीर्द संपत आलीय, असं वाटताच ‘तवायफ’ हा किताब दोघींपैकी कुणाला तरी बहाल करते. त्याचा समारंभ मोठय़ा प्रमाणात निमंत्रितांसमोर पेश केला जातो. ‘तवायफ’चा वंशपरंपरागत चालत आलेल्या दागिन्यांचा साज आणि पेहराव त्या वेळी नव्या तवायफच्या अंगावर चढवण्यात येतो. यातलं सर्व काही जसंच्या तसं मी ‘हमिदाबाई’मध्ये वापरलं.

‘तवायफ’चे दागिने मला पाहता येतील का, असं विचारलं तर खळखळून हसली, म्हणाली, ‘खलबत्त्यात घालून सगळे दागिने कुटले आणि त्यातले माणिक, पाचू, हिरे सगळं विकून पैसे मुलीच्या बँक अकाऊंटमध्ये टाकले.’ आश्चर्यानं माझा ‘आऽऽ ’ झाला असावा. तो पाहून उत्तरादाखल म्हणाली, ‘मला मुलगी आहे, पण ती गात नाही. मी तिला गाणं शिकवलंच नाही. इथेच ‘नीलम मंझिल’मध्ये पहिल्या मजल्यावर नर्सरी चालवते. आणि त्याच मजल्यावर फ्लॅटमध्ये आपल्या नवऱ्याबरोबर राहते. त्याचं फर्निचरचं दुकान आहे. ‘तवायफ’च्या किताबाची शान कुठे राहिलीय आता? आणि तवायफची इज्जत? म्हणून दागिने मोडून टाकले. उगीच चुकीच्या हाती पडायला नको.’ दिवाणखान्यात एक फोटो लावला होता. त्याच्याकडे बोट करून म्हणाली, ‘हे खाँसाहेब. जबरदस्त फनकार, माझे गुरू. माझ्या मुलीचे पिता. माझ्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च त्यांनीच केला. तिचं लग्नही त्यांच्याच ओळखीमुळे झालं. आता ते हयात नाहीत.’ मी थक्क झाले. ‘हमिदाबाईच्या कोठी’मधली हमिदा आणि तिची मुलगी शब्बो यांची कहाणी नीलमबाईच्या आयुष्याशी किती मिळतीजुळती!

बेगम अख्तरविषयी नीलमबाईला विचारलं तर दिलखुलास हसली. अचानक हात माझ्यासमोर धरले. दोन्ही मनगटांवर डझनाहून अधिक सोन्याच्या बांगडय़ा होत्या. ‘ती माझी मैत्रीण. मुंबईला आली की, माझ्याकडेच उतरायची. या सोन्याच्या बांगडय़ा चढवल्या बेगम अख्तरमुळेच. मी आधी हिऱ्याच्या बांगडय़ा वापरत असे. पण मुंबईला बेगमचं गाणं ऐकलं. काय गायिका! काय आवाज! ऐकून खूप अस्वस्थ झाले आणि दग्र्यावर जाऊन वलीबाबाला वचन दिलं की, जोवर माझं गाणं बेगमच्या गायकीच्या जवळपास पोचत नाही, तोवर मी हिऱ्याच्या बांगडय़ा उतरवून ठेवणार. त्या अजूनही उतरवलेल्याच आहेत. पुन्हा त्या वापरायची संधी मला बेगमनं दिलीच नाही.’ किस्सा सांगताना नीलमबाई ३० वर्षांची दिसत होती.

माझा नीलमबाईंशी झालेला परिचय ऐकून भास्कर आणि गोडसे खूश. ‘मुद्राराक्षस’नंतर आमची तिघांची टीमच बनली होती. सतत नवीन नाटय़विषयक चर्चा. त्यातला एक नेहमीचा विषय : ‘दृश्य, श्राव्य आणि अभिनय यांची एकत्रित लय आणि स्पंदनं रंगमंचावर उभं करायचं असेल तर संहिता कशी फुलवायची? नेपथ्य, नटांच्या हालचाली या ठोसपणे उभ्या असतात. त्यांना तरल, अमूर्त बनवायचं असेल तर संगीताची कितपत मदत होऊ शकते?’ ‘हमिदाबाईची कोठी’वर काम करताना याची उत्तरं आम्हांला पुढे मिळणार होती.

गोडसे तडक कामाला लागले. माहीम दर्ग्याजवळच्या मुस्लीम वस्तीतून फिरू लागले. तिथून जवळच उस्ताद हलीम जाफर यांच्या समुद्रकिनारी असलेल्या घरी चारपाचदा जाऊन आले. कोठीचं नेपथ्य, रंगीबेरंगी काचांची तावदानं, भिंतीवर फ्रेममध्ये लावलेले कुराणातील उर्दू उतारे आणि मुख्य म्हणजे रोजच्या वापरातील खास वस्तू. त्याही जुन्या दिसतील अशा. प्रत्येक वस्तूला इतिहास आणि स्वत:चं अस्तित्व (बायोग्राफी) असतं, असं गोडसेंचं ठाम मत.

‘हमिदाबाई’मुळे मुस्लीम मोहोल्ला अन् त्यातील कोठी-संस्कृती हे मराठी रंगभूमीवर प्रथमच आलं. त्यात केवळ वातावरणनिर्मिती अभिप्रेत नव्हती तर एक जीवनपद्धती आणि मूल्य उमटणं महत्त्वाचं होतं. गोडसेंनी १९४५-५० च्या सुमाराचे पोट्र्रेट्स, त्या काळातील सिनेमाची पोस्टर्सही पाहिली आणि त्या सगळ्यांचा अभ्यास करून कपडेपट ठरवला. सईदाला गरारा-कुडता, त्यावर किनार लावलेली तलम ओढणी. ‘हमिदाबाई’साठी सुती-चीटचा घागरा आणि अध्र्या बाह्य़ाचं पोलकं, अंगभर एकरंगी ओढणी बिनकिनारीची. सर्व कपडय़ांचे रंग, चीटच्या कपडय़ावरील प्रिंट सगळं काही मुस्लीम स्त्रिया वापरतात, तसंच. रीतिरिवाज सांगायला नीलमबाई होतीच. तवायफ संस्कृतीचे प्रघात तिच्याकडूनच आम्हाला कळले. एकत्र बसून एकाच भल्या मोठय़ा थाळीतून जेवणाची पद्धतही तिनंच सांगितली. नमाज कसा आणि का अदा करायचा, हेही मला शिकवलं. प्रयोगात हे सर्व येत असे.

‘कोठी’ हे नाटकातलं प्रमुख पात्र. वातावरण संगीतानं भारलेलं. नाटकातले सर्व प्रवेश कोठी संगीतानंच सुरू व्हावेत आणि संपावेत, असं ठरवलं. भास्कर १९४५ ते ५० च्या गझल शोधू लागला. चालींसाठी नव्हे तर त्यातील शब्दांसाठी. त्या सर्व रेकॉर्ड करून ध्वनिफितीवर वाजवायच्या. रंगमंचावरही गायन हवं. म्हणून एक तरी गायक कलावंत घ्यावा, असं ठरलं. हमिदाबाईचा वयपरत्वे आवाज गेलेला आहे, म्हणून तिच्याऐवजी तिची शिष्या सईदा गाणारी ठेवायची, असं नक्की केलं.

हळूहळू नटसंच जमा होऊ लागला. सईदाच्या भूमिकेसाठी भारती आचरेकर आली. नाना पाटेकरनं तेंडुलकरांच्या ‘पाहिजे जातीचे’मध्ये केलेलं दांडग्या मुलाचं काम मला आवडलं होतं. त्याला सत्तार दलालाच्या भूमिकेसाठी घेतलं. हमिदाबाईची पुण्याला शिकणारी मुलगी शब्बो झाली नीना जोशी (आता कुलकर्णी). ती माझ्या सरकारी शिबिरातली विद्यार्थिनी. लुक्कादादाच्या भूमिकेसाठी अशोक सराफला पक्का केला. त्याची दादा कोंडकेच्या सिनेमातील ‘ममद्या’ची भूमिका त्या वेळी गाजत होती. तद्दन विनोदी नट असा शिक्का प्रेक्षकांनी त्याच्यावर मारला होता. अशोकला तो पुसून टाकायचा होता. नट म्हणून माझाही त्याच्यावर संपूर्ण विश्वास होता. ‘हमिदाबाई’ आणि त्याच्या आधी ‘जास्वंदी’मध्ये बरीच नवीन मंडळी माझ्याबरोबर काम करायला आली आणि लोकमान्य रंगभूमीवर मी कार्यरत होते, तोवर माझ्याबरोबर राहिली. थोडक्यात, आमची गँग तयार झाली.

तालमीची पद्धतही आता ठरून गेली होती. एकूण ३५ दिवस. पैकी पहिले २१ फक्त नटांसाठी. त्यांना लक्ष केंद्रित करता यावं, म्हणून लहानशा खोलीत तालमी होत. या तालमीत त्यांना स्वत:ची भूमिका, इतर पात्रांशी असलेली नाती समजत. बरेचदा कथानकाला सोडून बाहेरच्या काल्पनिक घटनांची इम्प्रोव्हायझेशन्स कलाकारांना करावी लागत. नटांसाठी ठेवलेले तीन आठवडे संपले की, चौथ्या आठवडय़ात छोटेखानी स्टेजवर संगीत, नेपथ्य, प्रकाशयोजना याचा साज तालमीवर चढवला जाई. शेवटच्या आठवडय़ात फक्त रंगीत तालमी. मित्रमंडळींना बोलावून त्यांचा सल्ला घेण्यासाठी.


‘हमिदाबाई’च्या वेळी लहान खोलीत मी नाना पाटेकरच्या घेतलेल्या तालमीतला मजेशीरपणा अजूनही आठवतो. नानाचा चेहरा, शरीरयष्टी, अभिनय सगळं आक्रमक. त्याला भूमिका करायची होती सत्तार या दलालाची. हमिदाबाईनं आधार दिलेला पोरका मुलगा, तिच्या कोठीच्या जिन्याखाली राहणारा, प्रेमळ पण घाबरट. भांडणं, मारामारी सुरू झाली की, तिथून पळ काढणारा. नानाला सत्तारची बॉडी इमेज मिळायला त्रास होत होता (म्हणजे सत्तार म्हणून आपण कसे दिसतो, हे त्याच्या मनातलं स्वत:चं चित्र तयार होत नव्हतं.) काल्पनिक प्रसंग उभे करून त्यात हात, पाठीचा कणा, मान, आवाजाची पट्टी यांचे वेगवेगळे वापर करता करता नानाला ब्रेक-थ्रू मिळाला. त्यानं भूमिकेचा ताबा घेतला आणि अप्रतिम सत्तार उभा राहिला. अनिलनं सर्व भूमिकांसाठी निवडलेल्या भाषा मजेशीर - हमिदाबाईंची उर्दूमिश्रित हिंदी. सईदा आणि सत्तारची बम्बैया, हैदराबादी. लुक्का, त्याचा पंटर आणि बाहरवाला यांची घाटी हिंदी आणि शब्बोची, तिच्या मित्राची शुद्ध मराठी. प्रयोग करताना कलावंतांना आणि पाहताना प्रेक्षकांना खूप मजा वाटे...."

आताच्या घडीला हे नाटक पुनरुज्जीवित होऊन नव्या संचात रंगमचावर दाखल झाले आहे. त्यात नीना कुलकर्णी, जितेंद्र जोशी, स्मिता तांबे, मंगेश सातपुते, मनवा नाईक, विकास पाटील आदी अभिनेते आहेत. एका अनोख्या आशयसंपन्न नाट्यसंहितेवर आधारित हे देखणं नाटक बघण्याची संधी तुम्हाला मिळाली तर नाट्यगृहात जाऊन नाटक बघा. तुम्हाला ते नक्की भावेल. नाटक यु ट्यूबवर बघायचं नसतं, ते नाट्यगृहात पाहिलं तरच त्यातला फिल काळजापर्यंत पोहोचतो. आपले विचार आणि विचार करण्याची प्रवृत्ती समृद्ध करण्यात अशा विविधांगी साहित्यकृती आपल्या नकळत मोलाचा हातभार लावत असतात व त्यातूनच आपला दृष्टीकोन निर्दोष होऊन समृद्धतेकडे वाटचाल करू लागतो.

- समीर गायकवाड.