Sunday, October 16, 2016

औरंगजेब ते लियाकत अली खान .....


मुघल सम्राट शहाजहान १६५९ मध्ये आपल्या मुलाकडून औरंगजेबाकडून कैदेत बंदिस्त झाला, औरंगजेबाने आपल्या सख्ख्या भावाचा मुडदा पाडला आणि मुघल सम्राटाची गादी कब्जा केली. जवळपास ३०० वर्षांनी हाच इतिहास पाकिस्तानात थोड्याफार फरकाने पुन्हा घडला. पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्नाह यांनी अट्टाहास करून अखंड भारताची फाळणी करून १४ ऑगस्ट १९४७ला  पाकिस्तान पदरात पाडून घेतला पण ११ सप्टेबर १९४८ ला त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला. पुढे त्यावरून अनेक तर्क वितर्क लढवले गेले...


मुहम्मद अली जिन्ना यांचा मृत्यू नैसर्गिक होता, की त्यामागे पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांचे काही कटकारस्थान होते ? या मृत्यूची संशयाची सुई लियाकत अली खानयांच्याकडे निर्देश करत होती. लियाकत अलींनी यावर स्पष्टीकरण देत देत कसातरी बचाव केला. पण लियाकत यांचीही एका अज्ञात इसमाने गोळ्या झाडून हत्या केली. लियाकत खान यांची हत्या करणारा कोण होता, त्याचे नाव इतक्या वर्षांनंतरही पाकिस्तानच्या संसदेच्या पटलावर कधीही आले नाही. जिन्नांची बहीण फातिमा जिन्नाने आपल्या आत्मचरित्रात म्हटले आहे की, माझ्या भावाची हत्या लियाकत अली खान यांनीच केली आहे. त्यांना औषधोपचार तर दूर, त्यांना प्राणवायूसुद्धा पुरविला गेला नाही. जिन्नाचे खाजगी डॉक्टर वेळोवेळी सांगत होते की, काही औषधी या विदेशातून मागवाव्या लागतील. पण, लियाकतने त्या मागविल्या नाहीत.

बलुचिस्तानच्या क्वेटा शहरानजीक असलेल्या जियारत हिल स्टेशनवरून जिन्ना यांना जेव्हा रुग्णवाहिकेतून कराचीत आणण्यात येत होते, ती रुग्णवाहिका मध्येच बंद पडली. जिन्ना आणि फातिमा एका झाडाखाली बसून तीन तासपर्यंत वाट बघत राहिले. त्यानंतर एक कार पाठविली गेली. त्यातून जिन्नांना जेव्हा गव्हर्नर हाऊसमध्ये आणले गेले, तोपर्यंत सायंकाळ झाली होती आणि त्यांनतर काही क्षणातच मोहम्मद अली जिन्ना यांचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर तीनेक वर्षांनी लियाकत अली खान हे रावळपिंडी येथे १६ ऑक्टोबर १९५१ च्या दिवशी एका रॅलीत सहभागी होण्यासाठी आले असता, त्यांची अज्ञात इसमाने गोळ्या झाडून हत्या केली.

मुघलांचे अपूर्ण राहिलेले वर्तुळ लियाकत अलींच्या रूपाने पाकिस्तानात सुरु झाले. लियाकत अली नंतर अशीच घटना पंतप्रधान हुसैन शहीद यांच्याबाबतीत घडली. बेरूतमध्ये त्यांचा अतिशय रहस्यमय स्थितीत मृत्यू झाला. त्यानंतर जनरल जिया उल हकने पाकिस्तानवर ११ वर्षे सत्ता गाजविली आणि जुल्फिकार अली भुत्तो यांना मृत्युदंडाची शिक्षा दिली. पण, जनरल जियाचा मृत्यू अजूनही शंकेच्या वावटळीतच फिरत आहे. असे म्हटले जाते की, त्यांच्या विमानात जी आंब्याची टोपली ठेवण्यात आली होती, त्यात स्फोटके दडवून ठेवण्यात आली होती. त्यांचे विमान उडताच त्यात स्फोट झाला आणि जिया उल हक जागीच ठार झाले. २७ डिसेंबर २००७ रोजी बेनजीर भुत्तो यांचा मृत्यू झाला. पण, त्यामागे कोण होते हे अजूनही गुलदस्त्यातच आहे. या संशयावरुनच जनरल परवेझ मुशर्रफ यांची संशयावरून चौकशी सुरू झाली आहे. पण यातून सत्य बाहेर येईल का हे मात्र सांगता येत नाही. पण मुघलांचा सत्तेसाठी गळे घोटण्याचा वारसा यशस्वी रित्या चालवला अन लियाकत अली खान हे या वर्तुळाचे शीर्षबिंदू ठरले. येणारया काळात सत्तातुर मृत्यूचे वर्तुळ कधी आणि कसे पूर्ण होईल हे माहिती नाही..

आज लियाकत अलींच्या खूनाला ६५ वर्षे पूर्ण होतायत त्या निमित्ताने इतिहासाला दिलेला हा उजाळा ....

- समीर गायकवाड .