Sunday, October 16, 2016

जगप्रसिद्ध 'आई' कादंबरी आणि तिचा लढाऊ लेखक मॅक्झिम गॉर्की ........

गॉर्की
मराठी साहित्यात जे स्थान साने गुरुजींच्या 'शामची आई'चे आहे तेच स्थान जागतिक साहित्यात जगप्रसिध्द रशियन लेखक मॅक्झिम गॉर्की यांच्या 'द मद'चे (रशियन - Мать)आहे. प्रभाकर ऊर्ध्वरेषे यांची 'आई' या नावाची याची मराठी अनुवादित आवृत्ती सध्या उपलब्ध आहे. १९४५ मध्ये विनायक महादेव भुस्कुटे यांनी तिचा पहिला मराठी अनुवाद प्रसिद्ध केला होता. मात्र याची जुनी आवृत्ती मुद्रणसुलभ नाही. वयाच्या एका विशिष्ट वळणावर असताना हे पुस्तक हाती लागले तर आपल्यातल्या मातृभावना अधिक गहिऱ्या होत जातात. गॉर्कीच्या पुस्तकातील ग्रामीण व निमशहरी वर्णन आपल्याकडील ग्रामजीवनाशी साम्य दाखवणारे असल्याने आपण आपल्या भूमीवर घडणारे एखादे नाट्य अनुभवत असल्याचा 'फिल' येत राहतो. गॉर्कीचे साहित्य वाचून वयाच्या १९व्या वर्षी त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता यावर विश्वास ठेवणे कठीण जाते. गॉर्की आणि त्याचा मुलगा दोघेही संशयास्पद परिस्थितीत मृत्युमुखी पडले पण त्यांची हत्त्या झाल्याचे कधी सिद्ध होऊ शकले नाही. गॉर्कीच्या मृत्यूनंतर त्याची शवपेटी सलग २४ वर्षे रशियाचे सर्वेसर्वा असणारे जोसेफ स्टॅलिन यांनी स्वतः वाहून नेली होती. यावरून मॅक्झिम गॉर्कीच्या महानतेची कल्पना यावी


मॅक्झिम गॉर्कीची आई हीच त्याच्या महान कादंबरीची महान नायिका होती. पावेल हा कादंबरीनायक असून त्या महान आईचा सुपुत्र आहे. कादंबरीच्या सुरूवातीलाच मॅक्झिमने कारखाना व सभोवतालच्या कामगार वस्तीचं अत्यंत साधं व हलक्या प्रतींचं जीवन आपल्या शब्दांतून चित्रीत केलं आहे. अशाच एका कामगार वस्तीत व्लासोव कुटूंब राहात होतं. मेकॅनिक मिखाईल व्लासोव (पावेलचा बाप) हा त्या घरातील कर्ता पुरूष होता. तो सतत इतरांना तुच्छतेने बघायचा व वरिष्ठांशी उद्धटपणे वागण्याच्या त्याच्या सवयीमुळे त्याची मिळकतही बेताचीच असायची. त्याचे ताकदवान शरीर, उग्र चेहरा व डोळे पाहून लोकांना त्याची भीतीच वाटत असे. अशा या माणसाची ‘कुत्तेकी अवलाद’ ही आवडती शिवी होती. संध्याकाळी व्लासोव दारुने तर्र होऊन घरी येई. संध्याकाळी बायकोने पटापट भांडी आवरली नाहीत तर तो तिला जमिनीवर भिरकावून देई व वोडकाची बाटली समोर ठेवी. एकदा पावेल चॊदा वर्षांचा असताना त्याने त्याच्या झिंज्या ओढण्याचा प्रयत्न केला, तेंव्हा पावलने एक जड हातोडा उचलून ‘अंगाला हात लावू नका’ म्हणून बापाला बजावले. त्या दिवसापासून दोन वर्षांनी त्याचा मृत्यू होईपर्यंत त्याने पावेलकडे मुळीच लक्ष दिले नाही व तो त्याच्याशी चकार शब्दाने बोलला देखील नाही.


त्या वस्तीत दारू पिणे ही काही जगावेगळी गोष्ट नव्हती तर तरूण मुलं दारू पिणारच हे त्यांच्या आईवडीलांनी गृहीतच धरलेलं असायचं. कारण त्यांच्या तरूणपणी त्यांनीही तेच केलं होतं व ही प्रथा त्या कामगार वस्तीत अशीच चालत आली होती. दारू पिणे, मग मारामा-या करणे हा त्या कामगार वस्तीतील जीवनाचा रोजचा भाग होता. तिथल्या इतर तरूण मुलांप्रमाणे पावेलही दारू पिऊ लागला पण ते त्याच्या शरीराला सहन होत नसे. हळूहळू त्याने पार्ट्यांना जाणं कमी केलं व रविवारच्या सुटीदिवशीही तो बाहेर गेला तरी दारू न पिता परत येऊ लागला. तो घराचे सर्व दरवाजे बंद करून पुस्तंकं वाचू लागला. हळूहळू त्यामध्ये होणारा हा बदल मात्र आईच्या नजरेतून सुटला नाही व तिला कसलीतरी अनामिक भिती वाटू लागली. आपल्या मुलाच्या बोलण्यातील नवीन अनकलनीय शब्दांमुळे व शहरातील लोकांच्या त्याच्या सहवासामुळे तिला आपल्या मुलाबद्दल फार काळजी वाटू लागली.


मॅक्झिम गॉर्कीने कादंबरीचा हा सुरूवातीचा भाग फारच सुंदरपणे रेखाटला आहे. अनेक लहान लहान प्रसंगातून त्याने आईचे मायाळू अन हळवे मन  नेमकेपणाने वाचकांच्या डोळ्यांसमोर उभे केले आहे. पण हे करत असतानाच त्याने कुठेही फार अलंकारीक वर्णन होऊ न देता एखाद्या व्यक्तिच्या मनात सहज येणारे अतिशय छोटे छोटे व वा-याप्रमाणे अतिशय चंचल असणारे विचार मांडले आहेत. त्यातूनच मानवी जीवनाचे रंग त्यांनी उलगडले आहेत.


नव-याच्या मृत्यूनंतर तिचा मुलगा पावेल हेच विश्व असणारी ‘आई’ आपल्या विश्वात नव्याने दिसणा-या गोष्टींनी गोंधळून गेली. तिचा मुलगा पावेल हा त्या वस्तीत आत्तापर्यंत कोणी केलं नव्हतं, असं काहीतरी करू लागला आहे, हे तिला आता कळून चुकलं होतं. आणि त्यामुळेच तिला भीतीही वाटू लागली होती. ती त्याबाबत त्याला सरळ सरळ विचारू शकत नव्हती, तेवढं तिच्यामध्ये धाडस नव्हतं. पण पावेलने तिच्या मनातील ही खळबळ जाणली होती.


एका प्रसंगात जेंव्हा पावेलने शहरातील काही लोक त्याला भेटायला येणार आहेत असं सांगितलं, तेंव्हा ती एकाएकी हुंदके देऊन रडू लागली. यावेळी पावेल तिच्यावर थोडासा चिडला पण त्याने तिची समजूत घातली. तरीही ती विलक्षण माणसं आपल्या घरी येणार ही कल्पना मनात येताच ती दचके व तिच्या अंतःकरणाचा थरकाप होई. जेंव्हा पावेलच्या घरात त्याची व त्याच्या सहका-यांची गुप्त बॆठक चालत असे, तेंव्हा आईला त्यांच्या बोलण्यातील अवघड शब्द काही कळत नसत. मग ती नुसतंच तिथे जमलेल्या लोकांच्या चेह-यांचे निरीक्षण करत असे. व प्रत्येकाच्या स्वभावाबद्दल आपल्या मनात काही समजूत करुन घेत असे.


पावेलचा जवळचा सहकारी असलेल्या आंद्रेईची पहिल्याच भेटीत आईवर चांगली छाप पडली. व नंतर ती स्वतःहून पावेलला एक दिवस म्हणाली,‘त्याला आपल्याच घरी राहायला सांगू या.’ आंद्रेई स्वभावाने प्रेमळ होता व तो आईशी पावेलपेक्षाही अधिक समजून घेऊन वागत असे. पण मे दिनी (may day- कामगार दिन) तिने आंद्रेईला सतत पावेलजवळ राहा म्हणून बजावलेलं असतं. त्याला सोबत बोलावण्यामागे तिच्या मनातील उद्देश हाच होता की, आपल्या मुलाबरोबर त्याला साथ देणारं, त्याची काळजी घेणारं कोणीतरी असावं असंच तिला वाटत होतं. क्रांतीकारी चळवळी व अशा चळवळी करणारे लोक...या सर्व गोष्टी आईला आधी फार दूर देशीच्या वाटत होत्या. तिच्या जुन्या जीवनाचा या नव्या जीवनाशी तिळमात्र संबंध नव्हता.


श्रीमंतीत वाढलेली असूनही रात्री-अपरात्री मोठे कष्ट घेऊन गुप्त कार्य करणारी साशा ही तरुण मुलगी गॉर्कीमुळे प्रभावित झालेली असते... गॉर्कीच्या आईला अशा तरुण मुलींकडे पाहून वाटत असतं की, 'आपण आपलं आत्तापर्यंतचं सर्व जीवन उगाच निरुद्देश व्यतीत केलं'. आईला माहित असतं की साशा व पावेलचं एकमेकांवर प्रेम आहे व तिलाही त्या दोघांचं लग्न व्हावं असंच वाटत असतं...पण पावेलला आपले कार्य करता यावे म्हणून संसारात पडायचं नसतं. शिवाय साशा अटकेत असताना पावेल बाहेर असायचा तर जेंव्हा पावेलला अटक झाली तेंव्हा नुकतीच साशा सुटून आलेली असायची.


कधी रात्री अचानक घरांची घेतली जाणारी झडती... अखंड बडबड करणारी आईची शेजारीण... पावेलला व आंद्रेईला ‘मे’ दिनादिवशी झालेली अटक. त्यानंतर स्वतः कारखाण्यात गुप्तपणे पत्रके वाटणारी आई... आणि आपल्या मुलाच्या कार्यात आपण त्याला मदत केली म्हणून स्वतःहाचे कौतुक वाटणारी आई... यामुळे पावेलला मिळणा-या आनंदातच आपला आनंद मानणारी आई... इथपर्यंतचा पुस्तकातील सर्वच भाग हा फारच वाचनीय आहे, लेखकाच्या लेखनकौशल्यातून प्रेरणा घेण्यासारखा आहे.


कादंबरीच्या दुस-या भागात आईचे कार्य व साम्यवादी विचारसरणींना महत्त्व दिले गेले आहे. उत्तरार्धात तोच तोच पणा जाणवू लागतो. काही ठराविक विचार, तिच वाक्यं केवळ शब्दरचना बदलून वेगवेगळ्या व्यक्तिंनी , वेगवेगळ्या प्रसंगी उच्चारलेली आहेत. क्रांतीनंतर पुढील जीवन ‘भव्य असेल, दिव्य असेल, समानतेचे असेल’ असे त्यातील पात्र असंख्य वेळा म्हणतात. पण तेंव्हा नेमकी शासनप्रणाली कशी असेल ? हे त्यांनी सांगितलेले नाही. वास्तविक एखाद्या पात्राच्या तोंडून गॉर्की अगदी थोडक्यात ते सहज सांगू शकला असता.


आपल्या कल्पनेपलीकडच्या जगात अशाही काही वेदना आहेत ज्याचा आपण विचार करू शकत नाही ही गोष्ट मनाला अस्वस्थ करून जाते. गॉर्कीच्या कादंबरीत पॉवेल, आंद्रेई आणि साशा पेक्षा पॉवेलची आई जास्त ठळकपणे समोर येत राहते अन मनात घर करून राहते. काही ठिकाणी लावलेला पाल्हाळ आणि वाक्यांची पुनरावृत्ती ही तत्कालीन शैलीनुसार योग्य वाटते. आजच्या काळात या पुस्तकातील उत्तरार्ध बराचसा नीरस वाटू शकतो हा पुस्तकाचा दोष नसून आजच्या काळातील बदलत्या जागतिक विचारधारणा व जीवनशैलीचा प्रभाव आहे. आपल्याकडे 'आई' या विषयाला वाहिलेल्या कविता  व साहित्य रसिकप्रिय आहे, तसे जागतिक पातळीवर 'आई' ह्या विषयाला वाहिलेल्या श्रेष्ठ साहित्यात गॉर्कीच्या या कादंबरीचा समावेश होतो ही त्याच्यासाठी गौरवाची बाब म्हणायला पाहिजे. 


अँना किरिलोवना व त्यांचा मुलगा प्योत्र झलोमोव ह्या ख-या जीवनातील व्यक्तिरेखांना आपल्या नजरेसमोर ठेवून लेखक मॅक्झिम गॉर्कीने त्याची ‘आई’ ही कादंबरी लिहीली आहे. ही कादंबरी इ.स.१९०७ साली म्हणजेच आजपासून शंभराहून अधिक वर्षांपूर्वी रशियात झालेल्या क्रांतीच्या पार्श्वभूमीवर लिहीली गेली आहे.  मॅक्झिम स्वतः त्या चळवळीचे सभासद होता. प्योत्र झलोमोव याला त्याने  त्यांच्या कादंबरीत पावेल असं नाव दिलं आहे तर मुख्य व्यक्तिरेखा म्हणजेच पावेलची ‘आई’ निलोवना ही या कादंबरीच्या केंद्रस्थानी आहे.


मॅक्झिम हा आंतरराष्ट्रीय कीर्तीचा रशियन लेखक म्हणून आजही जगभरात प्रसिद्ध आहे. त्याचे मूळ नाव अलेक्झेई मॅक्झिमोव्हिच   पेश्कॉव्ह. मॅक्झिमचा जन्म छोट्याशा रशियन खेड्यात झाला. त्याच्या बालपणीच त्याचे जन्मदाते मातापिता वारल्यामुळे वयाच्या आठव्या वर्षापासून स्वतःचे पोट भरण्यासाठी त्याला धडपड करावी लागली. या कष्टातून तो जगाच्या शाळेत शिकत गेला. मिळतील ती कष्टाची कामे करीत तो रशियाभर हिंडला आणि त्यामुळे रशियातील श्रमिकांच्या दुःखांचा त्याला जवळून परिचय झाला. त्याने नोकरीत मारपीट आणि मानहानीही सोसली. १८९२ मध्ये तिफ्लिसमध्ये "द कॉकेशस" या वृत्तपत्रात काम करत असताना त्याने "गॉर्की" (रशियन शब्दार्थ : कडवट) हे टोपणनाव वापरण्यास सुरुवात केली. पूर्ववयातील कडवट अनुभवांमुळेच त्याने टोपण नाव घेतले.


त्याचे नियमित शालेय शिक्षण थोडेच झाले; पण त्याचे वाचन मात्र अफाट होते. शिकण्याचा तेवढा एकच मार्ग त्याला उपलब्ध होता. राजकारणात तो जहालमतवादी होता. क्रांतीच्या कार्याला त्याने स्वतःला जुंपून घेतले. त्यामुळे त्याला पोलिसांच्या दडपशाहीला तोंड द्यावे लागले. गॉर्कीला झारच्या (रशियन त्सार) सत्तेला खुला विरोध दर्शविण्यामुळे बऱ्याच वेळा अटक देखील झाली. गॉर्कीचे बऱ्याच क्रांतिकारकांशी देखील संबंध होते. १९०२ साली त्याची लेनिनशी भेट झाली व ते दोघेही चांगले मित्र बनले. गॉर्कीने वृत्तपत्रांवरील सरकारी पकड दाखवून दिली व तिचा निषेधही केला. क्रांतिकारक जहाल विचारांना वाहिलेल्या 'रशियन वेल्थ' (Russkoe Bogatstvo)  ह्या मासिकातही त्याने काम केले. रशियातील ‘सोशल डेमोक्रॅटिक पक्षां’चे सदस्यत्व त्याने स्वीकारले होते. याच वर्षी गॉर्कीची रशियन साहित्य - शास्त्र अकादमीवर सन्माननीय सदस्य म्हणून निवड झाली, परंतु झार निकोलस दुसरा याने ही निवड रद्द करण्यास अकादमीस भाग पाडले. या कृत्याच्या विरोधात आंतोन चेखव व व्लादमीर कोरोलेंको यांनी अकादमी सोडली. नंतर तो क्रांतीच्या चळवळीसाठी निधी गोळा करायला परदेशात गेला. एकोणीसशे पाचमध्ये रशियात क्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न फसल्यानंतर त्याला इटलीत काप्रीला रहावे लागले. एकोणीसशे तेरा मध्ये तो रशियाला परतला.

पहिल्या महायुद्धाच्या काळात गॉर्कीचे पेट्रोग्राड (रशियन पेत्रोग्राद) येथील घर बोल्शेविक पक्षाचे कार्यालय म्हणून वापरण्यात आले. परंतु या काळात त्याचे साम्यवाद्यांबरोबरचे संबंध हळूहळू बिघडू लागले. १९१७ सालच्या ऑक्टोबर क्रांतीनंतर त्याने लिहिले "लेनिन व ट्रॉट्स्की यांना स्वातंत्र्य व मानवाधिकार याची कल्पनादेखील नाही. सत्तेच्या जहाल विषाने त्यांना कधीच भ्रष्ट करून टाकले आहे. ज्या लाजिरवाण्या रितीने त्यांनी भाषणस्वातंत्र्य व लोकशाहीला प्रिय असणाऱ्या इतर सर्व नागरी स्वातंत्र्यांचा निरादर केला आहे त्यावरून हे स्पष्ट दिसते." याच वर्षी जागतिक साहित्यातील नामवंत साहित्यकृतींचे रशियन भाषेत अनुवाद करण्यासाठी ‘Mirovaya literatura’ (
इंग्लिशमध्ये मध्ये - वर्ल्ड लिटरेचर) ही संस्था त्याने स्थापन केली. लेनिनने १९१९ मध्ये गॉर्कीला लिहिलेल्या पत्रांमध्ये काही धमक्या आहेत: "माझा तुला सल्ला - तुझी परिस्थिती, तुझी मते, तुझी कृत्ये बदल नाहीतर आयुष्य तुझ्यापासून दूर जाईल."

१९२१ च्या ऑगस्टमध्ये गॉर्कीचा मित्र व लेखक निकोलाय गुमिल्योव याला पेट्रोग्राडमध्ये गुप्त पोलिसांनी त्याच्या राजसत्तेला असलेल्या पाठिंब्यामुळे अटक केली. गॉर्कीने स्वतः घाईने मॉस्कोला जाऊन त्याच्या सुटकेसाठीचे पत्र स्वतः लेनिनकडून मिळवले. परंतु पेट्रोग्राडला परतल्यावर त्याला समजले की गुमिल्योवला अगोदरच गोळ्या घालून ठार करण्यात आले आहे. या घटनेनंतर १९२१ मध्ये इटलीतील सॉररेंतॉ येथे तो प्रकृतिस्वास्थासाठी जाऊन राहिला. तेंव्हा त्याला क्षयरोग झाल्याचे निदान झाले होते. सोव्हिएट रशियात तो १९२८ मध्ये परतला. १९२९ नंतर त्याने सोवियत संघाच्या अनेक वाऱ्या केल्या. १९२९ मध्ये त्याने सोलोव्स्की बेटावरील श्रमतुरुंगास भेट दिली व श्रमतुरुंगांच्या पद्धतीबद्दल स्तुतीपर लेख लिहिला. एव्हाना श्रमतुरुंगांच्या पद्धतीस पाश्चिमात्य देशांमध्ये अगोदरच वाईट नाव मिळाले होते. अखेर १९३२मध्ये जोसेफ
स्टॅलिन
ने गॉर्कीला स्वतः सोवियत संघात परतण्याचे निमंत्रण दिले. त्याच वर्षी त्याचा साठावा वाढदिवस देशात थाटामाटाने साजरा करण्यात आला. याच वर्षी सोव्हिएट साहित्यिकांच्या संघटनेचा पहिला अध्यक्ष म्हणून त्याची नियुक्ती झाली. ह्याच सुमारास त्याने साहित्यातील ‘समाजवादी वास्तववादा’ची घोषणा केली. समाजवादी वास्तववाद हे सोविएट साहित्यिकांचे वाङ्‌मयीन तत्त्वज्ञान होऊन बसले. सोव्हिएट साहित्यावर त्याचा फार प्रभाव पडला.

अलेक्सांद्र सोल्झेनित्सिनच्या म्हणण्यानुसार गॉर्कीच्या सोवियत संघात परतण्याची कारणे भौतिक होती. इटलीमध्ये सोरेंटो येथे गॉर्कीला ना पैसा ना मान अशा परिस्थितीमध्ये रहावे लागत होते. फॅसिस्ट इटलीमधून गॉर्कीचे परतणे ही सोवियत संघाच्या दृष्टीने प्रचाराची मोठीच संधी होती. त्याला "ऑर्डर ऑफ लेनिन" या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याला राहण्यास घरे देण्यात आली व मॉस्कोमधील एका रस्त्यास त्याचे नाव देण्यात आले.

पुढे स्टॅलिनच्या अत्याचारांमध्ये झालेली वाढ व डिसेंबर १९३४ मधील सर्जेई किरोव्ह याची हत्या या पार्श्वभुमीवर गॉर्कीला त्याच्या घरी नजरकैदेमध्ये ठेवण्यात आले. त्याला प्रावदा वर्तमानपत्राची खास आवृत्ती देण्यात येत असे ज्यामध्ये अटक व राजकीय हत्या यांच्या बातम्या गाळलेल्या असत. १९३५ च्या मे महिन्यामध्ये गॉर्कीचा मुलगा मॅक्सिम पेश्कोव्ह याचा अचानक मृत्यु झाला. यानंतर जून १९३६ मध्ये गॉर्की एकाकी अवस्थेत मॉस्कोमध्ये मरण पावला. त्याला विषप्रयोग केल्याचा आरोप त्याच्या डॉक्टरांवर करण्यात आला आणि त्यांच्यावर खटले होऊन त्यांना फाशी देण्यात आली होती.

'आई' लिहिण्यापूर्वी १८९२ मध्ये मेकार शुद ‘Makar Chudra’ ही कथा लिहून त्याने लेखनक्षेत्रात पदार्पण केले. त्याच्या प्रारंभीच्या कथांत त्याने समाजाच्या खालच्या थरातील उनाड, भटके, गुन्हेगार आदींचे सहानुभूतिपूर्वक चित्रण केले. हे लोक शूर व ध्येयनिष्ठ असतात ही त्याची धारणा होती. समाजातील कनिष्ठ श्रेणीतल्या घटकांना तो ध्येयवादी रूप देत होता. त्यानंतरच्या काळातल्या त्याच्या कथा भौतिकवादी आहेत. अपवाद फक्त १८९९ मधील ‘Dvadtsat shest i odna’ आणि १९०२ मधील‘ट्‌वेंटीसिक्स मेन अँड अ गर्ल’, या सुप्रसिद्ध कथेचा आहे. या कथेत बेकरीवाल्या भटारी पुरुषांचा एक घोळका एका मुलीवर प्रेम करताना दाखविलेला आहे. ही मुलगी दररोज पाव खरीदण्यासाठी येते. एक सैनिक त्या भटाऱ्यांजवळ पैज मारतो, की मी तिला फसवून तिचा उपभोग घेईन. त्यात त्याला यश येते. फिरून जेव्हा ती मुलगी त्या भटाऱ्यांकडे पाव विकत घ्यायला जाते, तेव्हा ते तिला हाकलून देतात. या कथेतले कारुण्य चटका लावणारे आहे. मॅक्झिम गॉर्कीने 'आई'च्या प्रस्तावनेत एक अनुभव नमूद करुन ठेवला आहे. एकदा शेतक-यांच्या परिषदेत तो बोलत होता. शास्त्रांचा महिमा तो सांगत होता. नवीन नवीन शोध सांगत होता. उद्योगधंद्यातील चमत्कार सांगत होता. परंतु त्याचे व्याख्यान संपल्यावर एक शेतकरी म्हणाला, “पक्ष्यांप्रमाणे आपण उडायला शिकलो. माशांप्रमाणे पाण्यात तरायला शिकलो ; परंतु पृथ्वीवर कसे नीट नांदायचे ते मात्र आपण अद्याप शिकलो नाही.”१८९९ ते १९१० ह्या काळात गॉर्कीने कथांबरोबरच काही कादंबऱ्या आणि नाटके लिहिली. Na dne (१९०२, इंग्लिश - लोअर डेप्थ्‌स, १९१२) हे विख्यात नाटक त्याने याच काळात लिहिले. या नाटकाला आंतरराष्ट्रीय कीर्ती लाभली; याचे एक कारण त्याची पार्श्वभूमीच खळबळजनक होती. गलिच्छ, गैरवर्तनी भिकाऱ्यांची वस्ती असलेले घर  ही त्याची पार्श्वभूमी आहे.


१९१३ च्या सुरुवातीपासूनच गॉर्कीने आपले त्रिखंडात्मक आत्मचरित्र — Detstvo (१९१३, इंग्लिश अनुवाद - चाइल्डहूड, १९१५; म. भा. माझे बालपण, १९४६), V Iyudyakh (१९१५, इंग्लिश अनुवाद इन द वर्ल्ड, १९१७) आणि Moi Universitety (१९२३, इंग्लिश अनुवाद माय युनिव्हर्सिटीज, १९२४), — लिहिण्यास सुरुवात केली होती. या ग्रंथांनी त्याला फार मोठी मान्यता मिळवून दिली. गॉर्कीच्या लेखनात एरव्ही अनेकदा आढळून येणारी तत्त्वबोधाची आत्यंतिक प्रवृत्ती त्यांत नाही. त्याची सूक्ष्म निरीक्षणशक्ती आणि विविध व्यक्तींची त्याने काढलेली शब्दचित्रे मनाची पकड घेतात. Vospominaniya o Tolstom (१९१९, इंग्लिश अनुवाद रेमिनिसन्सेस ऑफ टॉलस्टॉय, चेकॉव्ह अँड आंद्रेयेव्ह, १९३४) ह्या आपल्या आठवणीदेखील त्याने लिहिल्या आहेत.


Zhizn Klima Samgina (लेखनकाल १९२७ ते १९३६ ) ही त्याची चार खंडात्मक कादंबरी विशेष उल्लेखनीय आहे. ह्या कादंबरीत झारच्या कारकीर्दीत वाढलेली जुनी पिढी आणि बोल्शेव्हिक विचारांनी भारलेली नवी पिढी ह्यांच्या संघर्षाचे चित्रण आहे. या कादंबरीचे चार खंड बायस्टँडर ( १९३० ), द मॅग्नेट (१९३१), अदर फायर्स (१९३३) आणि द स्पेक्टर (१९३८) ह्या नावांनी अनुवादित झालेले आहेत.


गॉर्कीच्या साहित्यात टीकाकारांना जाणवलेले काही दोष म्हणजे लेखन परिणामकारक करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न, त्यातूनच येणारी भावविवशता, कलात्मकतेशी एकजीव न होणारे भाष्य करण्याची प्रवृत्ती हे होत. तथापि सूक्ष्म निरीक्षण, जिवंत व्यक्तिरेखा, रशियातील श्रमिक आणि दरिद्री लोकांचे सूक्ष्म ज्ञान इ. गुण त्याच्या साहित्यकृतींतून प्रभावीपणे प्रत्ययास येतात. रशियाबाहेरचे टीकाकार गॉर्कीला एकोणिसाव्या शतकातील वास्तववादाचे शेवटचे प्रकरण म्हणून संबोधतात. कोणी काही म्हणो पण जगभरातील पुस्तकवेडया माणसांच्या बुकशेल्फमध्ये जाही गॉर्की कधी न कधी येऊन जातो हाच त्याला मिळालेला 'खरा लाल सलाम' होय !


- समीर गायकवाड.


संदर्भ :  १. Hare, Richard, Maxim Gorky : Romantic Realist and Conservative Revolutionary, London and New York, 1962.

            २. Kaun, A. Maxim Gorky and His Russia, New York, 1932.
            ३. Weil, Irwin, Gorky : His Literary development and Influence on Soviet Intellectual Life, New York, 1966.
            ४. मॅक्झिम गॉर्की  - रोहन जगताप.
            ५.सुकथनकर; एस. आर्. मॅक्झिम् गॉर्की, व्यक्ति व वाङ्‌मय, धारवाड, १९३७.

हे पुस्तक इंटरनेटवर ई आवृत्तीत खालील लिंकवर विनाशुल्क उलपब्ध आहे.  - https://archive.org/details/Aaimother-Marathi-MaximGorky