Thursday, September 22, 2016

एका इमानी कुत्र्याची सत्यकथा ....

काही वर्षांपूर्वी चेन्नैत राहणारया भास्कर श्रीने रस्त्यावरचेच एक करड्या रंगाचे कुत्रे सांभाळले. भास्कर हा एक गरीब तरुण, बांधकाम मजूर ! त्याचे उत्पन्न ते किती असेल ? तरीही त्याने ते कुत्रे जीव लावून सांभाळले.त्याना एकमेकाचा इतका लळा लागला की ते कुत्रे घरात आणल्यापासून ते दोघे कधीही विभक्त झाले नाहीत. त्याने त्याचे नाव टॉमी ठेवले. टॉमीचा त्याच्यावर इतका जीव होता की तो भास्करच्या पाठोपाठ तो जिथल्या बांधकामाच्या साईटवर जाईल तिथे दिवसभर त्याच्याबरोबर  असायचा. २ ऑगस्टला अठरा वर्षे वयाच्या कोवळ्या भास्करचा कार अपघातात रस्त्यावरच जागीच दुदैवी मृत्यू झाला. मोठ्या दुःखाने भास्करच्या कुटुंबीयांनी त्याचा दफनविधी केला, तेथून त्याचे सर्व नातेवाईक  आपआपल्या घरी निघून गेले. त्यात त्याची आई सुंदरी श्री यांचाही समावेश होता.सर्व जण एक-एक करून निघून गेले पण टॉमी काही त्या कबरीपासून हलला नाही. तो तिथेच बसून राहिला.

चारएक दिवसानंतर ब्लू क्रॉस ऑफ इंडीया या पाळीव प्राण्यांच्या साठी काम करणारया संस्थेचे डॉन विलियम्स त्या कबरस्थान जवळून जात असताना त्यांची नजर त्या कबरीजवळ दीनवाण्या चेहरयाने बसलेल्या टॉमीकडे गेले. पण तेंव्हा त्याना त्यात फारसे काही विशेष वाटले नाही, त्याची एक छबी मात्र त्यांनी उतरवून घेतली. नंतर एका बचाव कार्यासाठी जात असताना १३ ऑगस्टला ते परत त्या भागात आले आणि त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. तो कुत्रा तिथेच रडवेल्या चेह रयाने कबरीपाशी बसून होता.त्याची शारीरिक अवस्था अत्यंत वाईट झाली होती, त्याच्या डोळ्यात अजूनही पाणी होते !  डॉन विलियम्सना राहवले नाही,त्यांनी त्याला पाणी आणि बिस्किटे दिली पण तो जागचा हलला नाही. मग आपल्या सहकारयाना सोबत घेऊन त्यांनी तत्काळ त्या परिसरात चौकशी केली तेंव्हा त्यांचे मन हेलावून गेले.  
"तो कुत्रा त्याच्या मालकाचा दफनविधी झाल्यापासूनच्या दिवसांपासून तिथेच शोकमग्न अवस्थेत बसून आहे, तो तेथून अजिबात उठला नाही, थंडी- ऊन ; रात्र -दिवस कशाचीही तमा न  करता तो तिथेच बसून आहे" हे ऐकताच त्याना फार वाईट वाटले. त्याचे नाव टॉमी आहे आणि त्याच्या दिवंगत मालकाचे नाव भास्कर आहे ही जास्तीची माहिती त्यांनी मिळवली…

डॉन विलियम्सनी भास्करचे घर शोधून काढले अन ते तिथे गेले. त्यांनी भास्करच्या आईला म्हणजेच श्रीमती सुंदरी श्री याना सर्व हकीकत सांगितली. त्यांच्या देखील डोळ्यात पाणी आले. त्या तडक डॉन विलियम्स सोबत त्यांच्या मुलाच्या कबरीकडे निघाल्या. कबरीजवळ त्या पोहोचता क्षणी त्याना पाहून टॉमीने त्यांच्या कडे झेप घेतली. त्यांच्या अंगाला तो चाटू लागला आणि काही क्षणानंतर त्याने आपले मस्तक त्या माऊलीच्या चरणी विसावले. तो शांतपणे त्यांच्या पायावर डोके ठेवून बसून राहिला, त्या देखील थोडा वेळ आपल्या प्रिय मुलाच्या कबरीपाशी बसून राहिल्या. खरे तर त्यांचा असा समज झाला होता की भास्करच्या मृत्यूनंतर टॉमी आपले घर सोडून दुसरीकडे कुठेतरी नव्या घरात गेला असावा, त्यामुळे त्यांनी त्याची फारशी शोधाशोध केली नाही ; पण आता आपल्या मुलाच्या कबरीपाशी अन्न पाण्या विना शोक करत बसलेल्या लाडक्या टॉमीला बघून त्यांना गहिवरून आले.

डॉन विलियम्सनी या दोघांना परत एकत्र आणले खरे पण त्यांना मनोमन याची खात्री देखील वाटते की श्रीमती सुंदरीजींच्या या अत्यंत दुखद आणि हळुवार क्षणात टॉमीची साथसंगत त्यांच्या मनावरचा भार निश्चित हलका करेल….

आजकाल आपली रक्ताची- माणुसकीची नाती विसरून माणसे जिथे पशुपेक्षाही घृणास्पद व्यवहार करू लागली आहेत तेंव्हा या मुक्या प्राण्यांचे असे सच्चे प्रेम आणि ईमानी वृत्ती आपल्याला विचार करायला भाग पाडते. कधी कधी प्रश्न पडतो की प्राणी-पशु कोण आहे आपण की हे मुके जीव ?

- समीर गायकवाड .