Friday, September 16, 2016

पाऊसगाणी ....

राजकपूर आणि नर्गिसचे हे दृश्य म्युट करून बघायचे आणि तिथे 'इंतजार'मधले 'छोटी सी कहानी से, बारिशों की पानी से..'हे गाणं ऐकायचे काय वाटते बघा... हिंदी-मराठी चित्रपट आणि पाऊसगाणी यांचे दिलखुलास नाते आहे. या पाऊसगाण्यांची एक अनोखी नशा आहे, त्यातली लज्जत काही और आहे, खऱ्याखुऱ्या पावसात भिजता आले नाही तरी या पाऊसगाण्यात जरी आपण चिंब भिजलो तरी अनेक छोट्याछोट्या गोष्टीतला अर्थ आपल्याला कळू शकतो. आपण मात्र आपल्या जगण्याच्या रटाळ रुटीनमध्ये आनंदाचा झरा असणारा पाऊस हरवून बसलोत आणि पावसात भिजणं किंवा त्याचा मनसोक्त आनंद घेणं तर जणू विसरूनच गेलोत ! चला तर मग माझ्याबरोबर या पाऊसगाण्यांत चिंब भिजायला ....

पाऊस आणि गाणी या नात्यातच मिठास आहे. गाण्यातला पाऊस सातत्याने मनाच्या कोपऱ्यात झिरपत राहणारा. तसा मान्सूनचा पाऊस लहरी. कधी अवचित भेटीला येणारा, कधी दडी मारून बसणारा. मात्र सर्वांनाच हवाहवासा. गाण्यातला पाऊस मात्र आपला, हक्काचा. आपल्याला हवा तेव्हा ट्यून करावा, मनसोक्त ऐकावा. आठवणीची सुई त्या मनातल्या एलपी रेकॉर्डवर ठेवली की, गाण्यातला पाऊस सुरू… आर्द्र आठवणीने मन चिंब करणारी पाऊसगाणी, हा आपला स्वामीत्व हक्क असलेला प्रांत. या प्रांतात मुशाफिरी चालते ती गाण्यातल्या पावसाची. मनाचे भावविश्व आपल्या इंद्रधनुरूपी विविध रंगांनी फुलवणारा पाऊस, म्हणजे कानसेनांसाठी जणू मेजवानीच. हिंदी चित्रपट आणि पाऊस हे समीकरण तसे जुनेच. चित्रपटांना वेगळे आयाम देण्यात पावसाने अनेकदा महत्त्वाची भूमिका वठवली आहे. रुपेरी पडद्यावरच्या प्रेमाला बहर आणणारा नायक म्हणजे पाऊस, ‘तो’ आणि ‘ती’च्या प्रेमातली हिरवळ फुलते तीच मुळी पाऊसधारांनी. गाण्यातला पाऊसही मान्सूनप्रमाणे लहरी. गाण्यातून पाऊस नेहमी वेगवेगळ्या रूपात दिसतो. गाण्यातून पाऊस कसाही बरसला तरी तो रसिकांना मात्र चिंब करतो, तृप्त करतो, चित्तवृत्ती प्रसन्न करतो. गीतकारांच्या लेखणीतून उतरलेला काव्यरूपी पाऊस, संगीतकारांच्या अनवट लयीतून संगीताचे लेणे लेवून आपल्या मनात बसरत राहतो… मनातली हिरवळ सातत्याने हिरवीगार ठेवणारा गाण्यातला पाऊस म्हणूनच सर्वांना हवाहवासा.

हिंदी चित्रपटात पावसाला एक वेगळे स्थान आहे. विशेषत: गाण्यात. हा पाऊस कधी प्रेमाचा वर्षाव करणारा, तर कधी विरहाच्या धारा आणणारा. कधी समाजाचे दुख मांडणारा, तर कधी उत्सव साजरा करणारा. इंद्रधनुष्यातील सप्तरंगाप्रमाणे गाण्यातल्या पावसाची रूपे अनेक, छटा अनेक, भाव अनेक; मात्र रसिक मनाचे समाधान करणारा ओलावा मात्र एकच. पडद्यावर त्याचे व तिचे प्रेम बहरते ते मुळी पावसाच्या धारांनी. राज कपूरच्या ‘बरसात’मधल्या ‘बरसात मे हमसे मिले तुम…’ मधला मधाळ गोडवा कित्येक पिढ्यांचा साक्षीदार आहे. चैतन्य जागवणारा हा पाऊस आपल्याला अनेक गाण्यांतून असाच भेटत राहतो. पावसाच्या नुसत्या जाणिवेने तिची मनोवस्था गीतकार योगेश यांनी ‘मंझिल’मध्ये काय खुबीने मांडली आहे… 'रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाए मन, भीगे आज इस मौसम में लगी कैसी ए अगन…' राहुल देव बर्मनच्या संगीतात नटलेले हे गाणे आपली मनोवृत्ती प्रसन्न करून जाते. रिमझिम पावसातली ती पहिली भेट…आपल्याला आयुष्यभर साथ देत असते… 

'रिमझिम के तराने लेके आयी बरसात, याद आये किसी से वो पहली मुलाकात' (काला बाजार) या गाण्यातून पहिल्या भेटीची खास आठवण न आली तरच नवल. 'ओ घटा साँवरी, थोडी थोडी बावरी' (अभिनेत्री)मधून तिने पावसाशी साधलेला संवाद रोमांचित करणारा आहे. आकाशात काळ्याभोर ढगांची दाटी झाली की, प्रेमाचा ऋतू सुरू झाल्याची वर्दी आपल्याला मिळते ती, 'काली घटा छायी, प्रेम ऋत आयी' (काली घटा)मधून. तो कृष्णरंगी मेघ हा तर प्रेमाचा दूतच. म्हणूनच ती त्याला म्हणते… 'मेघा रे मेघा रे मत परदेस जा रे, आज तू प्रेम का संदेस बरसा रे' (प्यासा सावन). आकाशात ढगांची दाटी झाली की, तिच्या मनात आठवणींची दाटी होते. मग 'मेघा छाए आधी रात बैरन हो गयी निंदिया, बता दे मै क्या करुं?' (शर्मिली) हा सवाल आपल्यालाही निरुत्तर करणारा आहे. 'रिमझिम बरसे पानी आज मोरे अंगना' (परदेसी) मध्ये तिने केलेले पावसाचे स्वागत सर्वांनाच सुखावणारे आहे. ऐन पावसाळी रात्री झालेली तिची पहिली भेट, 'जिंदगीभर नही भुलेगी वो...' (बरसात की रात) मधून सातत्याने आपल्याला भेटत असतेच की. 'एक लडकी भिगी भागी सी…'(चलती का नाम गाडी)मध्ये साक्षात किशोरकुमारला भुरळ पडली आहे… तुम्ही-आम्ही त्यातून थोडेच सुटणार. जीवनातलं मजबूरीचे सत्य सांगणारी 'हाय हाय ये मजबूरी, ये मौसम और ये दूरी' (रोटी, कपडा और मकान') या गाण्यातलं वास्तव जरी भिडणारं असलं तरी त्यातलं पावसातलं चिंब होऊन जाणं त्या व्यथेपासून काही काळासाठी का होईना मुक्त करते !  

कधी प्रेम, कधी विरह, कधी ओढ, कधी अस्वस्थता, सातत्याने आर्जव, मध्येच मार्दव अशा नानाविध रूपाने गाण्यातला पाऊस मनात सारखा बरसत असतो. 'परबत से काली घटा टकरायी...' (चाँदणी) मधला पाऊस मनात आग लावणारा आहे. 'ओ सजना बरखा बहार आयी…' (परख) मधला पाऊस एक अनामिक ओढ लावणारा आहे… 'सावन बरसे तरसे दिल' (दाहक)मधले त्याचे त्रासिक रूप मन कोरडे करणारे आहे… 'लगी आज सावन की' (चाँदनी) मधला पाऊस तुटलेल्या हृदयाचे मनोगत सांगणारा आहे… 'आज रपट जाए तो' (नमक हलाल) मधले त्याचे खट्याळ रूप सुखावणारे आहे… 'टिप टिप बरसा पानी' (मोहरा) मधले त्याचे शृंगारिक रूप मोहित करणारे… तर 'रिमझिम रिमझिम, रुणझुण रुणझुण' (१९४२-ए लव्ह स्टोरी) मधले त्याचे हळुवार बरसणे अलगद मनावर उतरणारे आहे. 'सावन का महिना' (मिलन) मधला पाऊस मनमोराचा पिसारा फुलवणारा असला तरी 'सावन के झुले पडे' (जुर्माना) मधले त्याचे रूप प्रतीक्षा करायला लावणारे आहे. 'छोटी सी कहानी से' (इजाजत) मधला पाऊस अनेक प्रश्न पाडणारा आहे. तर 'भिगी भिगी रातों मे'(अजनबी)मधून त्याला मिळालेले उत्तर सुखावणारे आहे. 'कोई लडकी है' (दिल तो पागल है) मधला पाऊस गाणारा, तर 'बुँदो से बाते' (तक्षक) मधला संवादक. 'कभी नीम नीम...' (युवा) मधला मधाळ पावसाचा गोडवा काही औरच. रिमझिम के ये प्यारे गीत...(उसने कहा था) मधला पाऊस जवळीक साधणारा, हरयाला लावन ढोल बजाता आया...(दो बिघा जमीन) मधला पाऊस संस्कृती दर्शवणारा, तर उमड घुमड के आयी रे घटा...मधला पाऊस उत्सव साजरा करणारा आहे. सनी देओल आणि अमृतासिंहचा फ्रेश एक्स्पोजर असणारे आणि निसर्गरम्य वातावरणातले  'बादल यूं गरजता है ' हे (बेताब) गाणं कोण विसरेल बरे ? ... 'घोडे जैसी चाल, हाथी जैसी दूम, ओ सावन राजा कहां से आये तुम?; या गाण्यातले माधुर्य आणि पावसात चिंब झालेले आपले मन पण शाहरुख आणि माधुरी प्रमाणे 'दिल तो पागल है'च्या काहीशा पागल अवस्थेत लीन होऊन जाते. 'चालबाज'मधला श्रीदेवीसोबत कोसळणारा पाऊसदेखील ताल्बाज आहे !  'ना जाने कहा से आई है, ना जाने कहा को जायेगी..' असं गाताना  ती लडिवाळ हावभाव करून नाचत बागडत असते अन आपण थक्क होऊन तिच्या सौंदर्याकडे पाहत राहतो. हिंदी चित्रपटातली ही पाऊसगाणी म्हणजे मनाला शांती देणारा एक अद्भुत खजिनाच आहे... 
   
हिंदी चित्रपटगीतांप्रमाणे मराठी कविता आणि मराठी चित्रपटगीतात बरसणारा पाऊस हाही एक जिव्हाळ्याचा विषय. मराठी पाऊसगाणी तर अंतरंगातली ठेवच जणू ! काही पाऊसगाणी बालवयापासून मनावर कोरली आहेत ती पुसणं कदापिही शक्य नाही. 'ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा.' हे गाणं कोणी आणि कधी लिहिलंय कोणास ठाऊक? लहानपणी ज्यानं हे पाऊसगाणं म्हटलं नसेल तो लहानच नसावा कधी. एक `पैसा’ हे नाणं चलनातून कधीच बाद झालंय. पण आजची कॉन्व्हेंटमधली मुलंही हे गाणं म्हणत पहिल्या पावसात भिजतात. गुगलवर सर्च मारला तरी हे गाणं वाचायला मिळतं. गाणं एवढं साधं, सरळ सोपं, की भर्रकन् पाठ व्हावं. एकही जोडशब्द नाही की बोजड शब्द नाही. लहानपणच्या पावसाचं दुसरं एक गाणं… 'नाच रे मोरा, आंब्याच्या बनात, नाच रे मोरा नाच…' हे तर कविता म्हणून बालभारतीच्या पुस्तकातही होतं. बाहेर पाऊस सुरू झाला की त्याच्या लयीत सगळ्या वर्गानं हे गाणं एका सुरात म्हणायचं. मोराचं पहिलं दर्शन झालं होतं ते बालभारतीच्या पुस्तकातच. भरपूर पाऊस यावा अन् शाळेला सुट्टी मिळावी. रेडिओ बहुदा बालगोपाळांच्या मनातली ही भावना नेमकी ओळखायचा. अगदी शाळेत जातानाच रेडिओवर.... 'सांग सांग भोलानाथ, सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय शाळेभोवती तळे साचून, सुट्टी मिळेल काय ...' हे गाणं लागायचं.

हिंदी गीतांप्रमाणेच या अवखळ प्रेमळ पावसासाठी मराठी गीतांत `रिमझिम’ हा शब्द वापरला गेलाय. कित्येक मराठी गाण्यांतून ही 'रिमझिम’ झरताना दिसते. पाऊस म्हटलं की यमुना नदीच्या किनाऱ्यावर हिरवळीवर खेळणारा बाळकृष्ण आणि त्याचे सवंगडी आठवतातच. नदीला पूर आल्यानंतर या कान्हाला शोधणारी यशोदा गाण्यातून दिसते. 'रिमझिम पाऊस पडे सारखा, यमुनेलाही पूर चढे, पाणीच पाणी चहूकडे, ग बाई, गेला मोहन कुणीकडे’ पूर्वी रेडिओवर हे गाणं हमखास लागायचं. गीतकार पी. सावळाराम, संगीतकार वसंत प्रभू आणि लता मंगेशकर ही नावं या गाण्याला चिटकूनच यायची. हिरवा श्रावण आणि रिमझिम बरसणारा पाऊस हा प्रेमीजनांना साद घालतो. अनामिक हुरहूर लावतो. झिमझिम झरती श्रावणधारा धरतीच्या कलशा प्रियाविण उदास वाटे रात. कवी मधुकर जोशींनी `रिमझिम’ या नेहमीच्या शब्दाऐवजी `झिमझिम’ असा शब्द वापरला आहे. तो वेगळाच नाद उत्पन्न करतो. पाऊस आणि व्याकुळता हा संबंध फार प्राचीन काळापासून आहे. शंभराहून जास्त वर्षांपूर्वी नाट्य़ाचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी संगीत सौभद्र नाटकासाठी लिहिलेलं हे गीत अजूनही लोकप्रिय आहे. 'नभ मेघांनीं आक्रमिलें, तारांगण सर्वहि झांकुनि गेले कड कड कड कड शब्द करोनी लखलखतां सौदामिनी जातातचि हे नेत्र दिपोनी अति विरही जन ते व्याकुळ झाले’

नवकवितेच्या आधुनिक काळातले कवी ग्रेस म्हणजे ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या परीने समजून घ्यावेत. बाकी काही असो, 'पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने हलकेच जाग मज आली, दुःखाच्या मंद सुराने पेटून कशी उजळेना, ही शुभ्र फुलांची ज्वाला ताऱ्यांच्या प्रहरापाशी, पाऊस असा कोसळला‘ किंवा 'ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता मेघांत अडकली किरणे हा सूर्य सोडवित होता ..' ही ग्रेसगाणी कोणालाही व्याकूळ करतात. आषाढ संपून श्रावणमास सुरू होईपर्यंत पावसाचा जोर जरा ओसरू लागलेला असतो. पण त्यानं निसर्गावर हिरवी पोपटी जादू केलेली असते.  श्रावण महिना आणि बालकवींची कविता यांचं युगानुयुगांचं नातं जुळलेलं आहे. श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे…' बालभारतीच्या पुस्तकात हे गाणं चिरंजीव झालं आहे. प्रत्येक पिढीचं हे गाणं तोंडपाठ आहे.

सिनेमा आणि पावसाची गाणी ही तर एकमेकांच्या हातात हात गुंफूनच येतात. पावसाची आठवण निघालीय आणि कविवर्य भा. रा. तांबे आठवत नाहीत, असं होतच नाही. त्यांची 'पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर ओढा नेई सोने वाटे वाहूनिया दूर झाडांनी किती मुकुट घातले डोकीस सोनेरी कुरणांवर शेतात पसरला गुलाल चौफेरी हिरवे हिरवे गार शेत हे सुदंर साळीचे झोके घेती कसे चहुकडे हिरवे गालिचे..’ ही कविता ओठ गुणगुणू लागतातच. आभाळ भरून कोसळू लागलं की ग. दि. माडगूळकरांनी `वरदक्षिणा’ सिनेमासाठी लिहिलेलं गाणं मनात वाजू लागतं.  'घन घन माला नभी दाटल्या, कोसळती धारा केकारव करी मोर काननी उभवून उंच पिसारा’ मल्हार रागात बांधलेलं हे गाणं ऐकूनच जणू मेघांमधला पाऊस धरतीवर बरसत असावा. यौवनसुलभ भावना व्यक्त करण्यासाठी एखाद्या मुलीनं आधार घ्यावा तो पावसाचाच.  आशा भोसलेंनी गायलेल्या आज कुणीतरी यावे, ओळखिचे व्हावे जशी अचानक या धरणीवर गर्जत आली वळवाची सर, तसे तयाने गावे ' या गाण्यानं कित्येक नवपरिणीतांना हुरहूर लावली.

रानकवी ना. धों. महानोरांनी लिहिलेली पाऊसगाणी तर अजरामर झालीत. `जैत रे जैत’ सिनेमासाठी त्यांनी लिहिलेलं  नभं उतरू आलं, चिंब थरथर वलं, अंग झिम्माड झालं, हिरव्या बहरात’ परदेशस्थ मराठी माणसं हे गाणं आयपॉडवर ऐकत आपलं मराठीपण जागवत असतात. पावसाच्या सोबतीनं ताल धरणारी धम्माल कोळीगीतं तर इतर भाषिकांनाही ताल धरायला लावतायत. कवयित्री शांता शेळकेंनी लिहिलेलं  'वादलवारं सुटलं गो, वाऱ्यानं तुफान उठलं गो भिरभिर वाऱ्यात, पावसाच्या माऱ्यात सजनानं होडीला पान्यात लोटलंय वादलवारं सुटलं गो…' हे गाणं अजूनही कोणालाही रोमांचीत करतं. शांताबाईंच्या सुंदर गीतांना सुधीर फडकेंनी अप्रतिम चाली लावल्या. त्यांचे सुपुत्र श्रीधर फडके यांनीही नव्याकोऱ्या पध्दतीच्या संगीतरचना करून शांताबाईंची गाणी बसवली. त्यातलं श्रावण महिमा सांगणारं हे गाणं – 'ऋतु हिरवा, ऋतु बरवा, पाचूचा वनि रुजवा युग विरही हृदयांवर सरसरतो मधु शिरवा, ऋतु हिरवा’ शांता शेळकेंनी पावसावर प्रेमगीतं लिहिली, कोळीगीतं लिहिली, तशीच बालगीतंही लिहिली.  असंच एक गोड गाणं त्या काळातल्या बालगायिका सुषमा श्रेष्ठ हिच्या आवाजात संगीतकार श्रीनिवास खळे यांनी संगीतबध्द केलंय. 'पाऊस आला, वारा आला, पान लागले नाचूथेंब टपोरे गोरे गोरे, भर भर गारा वेचू’..

आपल्या पिढीला मंगेश पाडगांवकरांच्या गीतांनी भुरळ घातली. नुसतीच भुरळ घातली नाही तर जीवनाचा आस्वाद घेण्याची दृष्टीही दिली. त्याचं अरुण दातेंनी गायलेलं , 'भेट तुझी माझी स्मरते अजून त्या दिसाची धुंद वादळाची होती रात्र पावसाची'  हे गाणं पाऊस आला की अजूनही आपोआप ओठांवर येतं. रोजच्या भाऊगर्दीत अन् आयुष्याच्या खडखडाटात कसला आलाय पाऊस , असं तुम्ही म्हणाल. पण पाडगावकर तुमची विकेट घेतील. 'श्रावणात घन निळा बरसला रिमझिम रेशिमधारा उलगडला झाडांतुन अवचित हिरवा मोरपिसारा .. ' हे अतिव सुंदर गीत त्यांनी याच धावपळीत लोकलमध्ये जाता येता लिहिलंय. कॉलेजवयात आरती प्रभूंचं आकर्षण वाटू लागलं ते त्यांच्या पाऊसगाण्यांमुळंच. 'ये रे घना, ये रे घना, न्हाऊ घाल माझ्या मना’

पावसाचा अन् मनभावन श्रावणाचा हा गंध मनात असाच दरवळत राहावा. त्याच्या पोपटी कोवळ्या रुपाचा तजेला तनमनाला उल्हसित करीत राहावा. बस्स!
सर्वांना पाऊस आवडतोच; मात्र सप्तसुरांचे लेणे लेवून आलेल्या गाण्यातल्या पावसाची मजा काही औरच. मान्सूनचा पाऊस लहरी असला तरी गाण्यातला पाऊस मात्र लाडिक आहे. दर वेळी वेगळ्या आनंदाची बरसात करणारी पाऊसगाणी म्हणूनच तर पुन:पुन्हा ऐकावीशी वाटतात… आणि बाहेर पाऊस पडत असताना ही पाऊसगाणी ऐकणे ही तर कानसेनांसाठी सप्तरंगी प्रसन्नतेची बरसातच की... चिरतरुण ठेवणारी.

- समीर गायकवाड. 

( लेखातील गीतांची माहिती जालावरून साभार )