Tuesday, September 13, 2016

बदला ....

सादळल्या जीवाचा जड झाला भार, 

भादव्याची काहिली घामाचे येरझार,


थकल्या पायाला फुफुटयाचा आधार, 

बाभळीचा काटा कुठून शिरे आरपार ?


रांडाव आभाळाचा कसा नेभळा संसार, 

विझल्या चुलीत जळे सारे घरदार, 


धगाटल्या वारयाचा फणा शिवारभर, 

वसुंधरेच्या मस्तकी का पापाचा भार ?


पिसाळल्या मातीने गिळले जलशिवार, 

देहाच्या चकव्यास श्वासाचीच घरघर


डोळ्यातल्या उन्हाची भूल अश्रूंच्या पार, 

उघडणार कधी तुझ्या दयेचे दार ?


चिपाडल्या झाडांच्या पाना लागे कातर, 

फुलांच्या गावी आता कायेचे व्यापार,


थिजल्या काळजाला वाटे पैलतीराचा भार, 

कुण्या पापाचा बदला घेशी वारंवार ?


- समीर गायकवाड.