Friday, September 30, 2016

माणसातला 'देव' ...

चेहऱ्यावर सुरकुत्या नक्षी काढायला स्रुरुवात करतात तेंव्हा भक्ती भाव अधिक तीव्र होतो. पैलतीरीचा तट जेंव्हा खुणवू लागतो तंव्हा देव -देवत्व याविषयी अधिक ओढ लागते.अंगावरची कातडी जसजशी ढिली होत जाते तसतशी ती अधिक नरम पडते अन मनातला ताठा देखील तोवर गळून पडलेला असतो, उरते ती काळजी,भीती अन श्रद्धा. काळजी राहिलेल्या आयुष्याची असते तर भीती मरणाची असते अन श्रद्धा देवावरची !

श्रद्धा जेव्हढी उत्कट आणि प्रामाणिक असते तितकी काळजी आपसूक कमी होते अन काळजी कमी झाली की मरणाची भीतीही कमी होते म्हणून उतारवयात माणसे परमार्थाकडे सहजच झुकतात. शेवटचा दिस सुखाचा व्हावा हा स्वार्थही त्यात असतो. आयुष्यभर केलेल्या चांगल्या वाईट कर्मांनी ज्याची त्याची श्रद्धेची शिदोरी तयार होते, कधी आयुष्यात आई वडिलांची सेवा केलेली नसेल अन त्यांच्या पश्चात कोणी काशीत उंबरठे झिझवत असेल तर त्याला आईबापही कळले नाहीत अन देव तर नाहीच नाही.

कधी कोणाला मदत केलेली नाही,चार चांगले कामे केली नाहीत,कोणती नाती जोपासली नाहीत,कर्तव्ये पार पाडली नाहीत असा चढता पाढा ज्यांचा असतो त्यांना उतारवय जड जाते. कारण 'फेड' बाकी असते. मग आठवते देहू आळंदी. आठवतो पांडुरंग अन आई तुळजाई. आयुष्यभर दुष्कर्मे करून शेवटी तीर्थक्षेत्रे करून देव भेटणार आहे का ? आई वडिलांची सेवा, गोर गरिबाना मदत, नात्यांची जोपासना, मुक्या प्राण्यांवर माया अन पाना फुलांवर जीव लावला तर जळी स्थळी काष्टी पाषाणी असलेला देव आपोआप जाणवतो. ते न करता नुसते तीर्थक्षेत्री जाणे म्हणजे केवळ पर्यटन असते.

हरिद्वार प्रयाग येथे जशा वृद्ध अनाथ व्यक्ती आपल्याला आढळतात तशी आता आपल्या पंढरीत, देहू आळंदीत अन पैठणला देखील अशी माणसे आढळतात. कोठून येतात ही ? का येथे राहतात ? काय शोधत असतात ही माणसे ? यांना देव भेटतो का ? यांचा शेवट काय असेल ? कशी जगत असतील ही माणसे ? कोण यांची काळजी घेईल ? याना पाहून अशा एक ना अनेक प्रश्नांचे अनुत्तरीत काहूर मनात उठते. कधी कधी असेही घडते की, या दुर्दैवी लोकांचे नातेवाईक आप्तच त्यांना तिथे आणून सोडतात अन कधी सांगून तर कधी नकळत निघून जातात. अशा वेळी या लोकांच्या मनात त्यांच्या विषयी अन तिथल्या परमेश्वराविषयी काय भावना येत असतील ? असे भोग त्यांच्या वाटयास का आले असतील ? 

आधुनिक समाजात झपाट्याने होत असलेले नागरीकरण, व्यवसायप्रधान जीवनपद्धती व त्यांतून उद्‌भवलेली गतिशीलता, तरुण पिढीची व्यवसायाभिमुखता व आधुनिक अर्थव्यवस्थेत त्यांना प्राप्त झालेले महत्त्वपूर्ण स्थान इ. घटकांमुळे आधुनिक उद्योगप्रधान समाजजीवनात वृद्ध पिढीला गौण व दुय्यम स्थान पत्करावे लागते आहे. वाढत्या वयाबरोबर उद्‌भवणारया वृद्धांच्या शारीरिक-मानसिक व्याधी व तदनुषंगिक समस्या यांत लक्षणीय वाढ होते आहे, त्यांची उग्रता व गांभीर्य भेडसावणारे आहे.  कौटुंबिक आधार गमावलेल्या वृद्धांच्या निवाऱ्याचा प्रश्नही बिकट आहे. सामाजिक व आर्थिक बदलत्या परिस्थितीला तोंड द्यावे लागल्याने वृद्धांपुढे अनेक प्रकारच्या समस्या उभ्या राहत आहेत. विशेषतः आर्थिक दृष्ट्या दुर्बल व परावलंबी असलेल्या वृद्धांचे पालनपोषण, उदरनिर्वाह, वैद्यकीय उपचारार्थ करावा लागणारा खर्च इ. आर्थिक बाबी त्या व्यक्तीपुढे व समाजापुढे गंभीर प्रश्न उभे करतात. 

एकत्र कुटुंबपद्धतीमध्ये वृद्धांना अन्न, वस्त्र व निवारा मिळण्याची पूर्वी शाश्वती होती. सांप्रत एकत्र कुटुंबे विघटित होत आहेत. या विघटन-प्रक्रियेमुळे वृध्दांच्या समस्या वाढत आहेत. चंगळवादी संस्कृतीच्या वाढत्या प्रभावामुळेही वृद्धत्वाची समस्या बिकट होत आहे. चंगळवादी संस्कृतीत साहजिकच उपभोगाला अधिक प्राधान्य असते. त्यामुळे अशा समाजव्यवस्थेत वृद्धांना अडगळीचे स्वरुप प्राप्त होण्याची शक्यता वाढली आहे. त्याचप्रमाणे अतिशय वेगाने वाढत चाललेल्या ज्ञानविज्ञानामुळे दोन पिढ्यांच्या आचारविचारांत मोठीच दरी निर्माण होत आहे. यापुढे ही दरी अधिकच रुंदावत जाण्याची शक्यता आहे. अशा काळात वृद्ध व्यक्तींच्या मनात मानसिक आधार म्हणून देवत्वाकडे पाहण्याची वृत्ती वाढते. मात्र जर त्या व्याक्तिने आधी कधी सदकर्में केली नसतील तर त्याला मनःशांती लाभत असेल का ? वृद्धत्व कुणीच टाळू शकत नाही पण ते सुखद व्हावे म्हणून खरी माणसे अन खरा देव जे लोक ओळखतात त्यांचे वार्धक्य निश्चित सुखाचे जाते...   

चांगली कर्मे करणे, कर्तव्ये पालन करणे अन नीतीने जगणे हाच खरा कर्म धर्म होय. हा ज्याला जमला त्याला त्याच्यातला देव आधी भेटतो अन मग जगातला देव तो जागवतो. मग  त्याचे वार्धक्य सुख समाधानाचे आनंदवन होऊन जाते ... 

- समीर गायकवाड.