Thursday, September 22, 2016

चव .....


तलम त्वचेवर व्रण पडावे तशी माळरानात पालं पडतात ..
आभाळाला भळभळून खोक पडाव्या तशा मातीच्या डोक्यावर चुली मांडतात.
खुरपल्या हातानी घट्ट मरणमेखा ठोकल्या तरी कधी तरीच पालं टिकतात नाही तर
वर्णभेदी वादळाच्या विकट तडाख्यात उन्मळून पडतात !
रणरणत्या दिर्घउन्हात जायबंदी हरणासारखी पालं दिवसभर बसून कण्हत असतात.

ढगांच्या पोटात अंधारगर्भ वाढला की खोल गेलेल्या पोटांना धगधगत्या चुलीची स्वप्ने पडतात.
ओल्यासुक्या सरपणाबरोबर पालातली माणसंही जळत राहतात,
सरपण चुलीत जळत राहतं आणि माणसं चुलीबाहेर !
पोरावांना फाटक्या छातीशी धरून त्यांचे ओठ ओले करणाऱ्या पालातल्या जीवांचे ओठ भेगाळून जात राहतात. 
दिवसभर फिरूनही हाती काही लागलं नाही तर जळणातलं एखादं लाकूड त्या जीवाच्या पाठीवर बसतं.
अश्राप जीव कळवळून उठतो, छातीला बिलगलेलं पोर खाली पडतं.
कुणी कंबरेत वाकलेली जीर्ण काठी असली तर ती मध्ये पडते.
रात्री भेगाळलेले ओठ पुन्हा कुस्करले जातात.
किरकिरणाऱ्या रात्रकिडयाच्या आवाजात तिचे आवाज मिसळून जातात,
फिकट झालेल्या कंदिलाच्या उष्णतेने तिचे भाकड अश्रू सुकून जातात.
रात्र बोडखी झाली की गाव साखरझोपेच्या रेशीमरजईत गुरफटून गेलेलं असतं तेंव्हा
माळावरची पालं आपल्या प्रारब्धाचा गळा घोटून कुत्र्यांच्या स्वरात स्वर मिसळून रडत असतात !
दिवसामागून दिवस जातात, पालं थकून जातात.
दगडधोंड्याच्या मातीत खेळून पोरवांचे गुडघे फुटून निघतात,
चुलीतली लाकडे पेटीनाशी झाली की खोल गेलेल्या डोळ्याची पालकरी आपला मुक्काम हलवतात.  
जखमेवरच्या खपल्या निघाव्या तशी पालं निघतात, मुळासकट उठतात !
पालं उठताना पाखरं चोच वेळावून बसतात आणि झाडं आपल्या अचलतेवर टाहो फोडत राहतात.
पालातले खंगलेले जीव नशिबाचा तमाशा घेऊन रित्या हाती सैरभैर फिरत राहतात. 
पालं जिथून जातात आणि तिथं उमटतात त्यांच्या दग्ध स्वप्नांच्या भग्न पाऊलखुणा.
ज्यात चिमुरडयाच्या ओठावरून ओघळलेले, आईच्या न गवसलेल्या दुधाचे दोन थेंब मिसळलेले असतात.
ही माती त्या विश्वनिहंत्याच्या तोंडात घालून मी त्याला तिची चव विचारणार आहे ....   


- समीर गायकवाड.