Monday, September 19, 2016

सुशीला आणि अनंत माने ...एक आठवण ...एक मराठी सिनेमा येऊन गेला होता, ज्यात एका उद्ध्वस्त झालेल्या तरुणीची कथा होती. जेंव्हा चित्रपट रिलीज झाला तेंव्हा जिच्यावर चित्रपट बनवला होता ती स्वतः कोल्हापुरातल्या पद्मा टॉकीजच्या बाहेर याच चित्रपटाची तिकिटे ब्लॅकमध्ये विकत उभी होती ! खोटं वाटतंय ना ! पण हे सत्य होते ...साल होते १९७८ आणि रंजनाची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट होता 'सुशीला'...  त्या काळात कोल्हापुरात पद्मा, रॉयल, प्रभात, शाहू या चित्रपटगृहांच्या परिसरात तिकिटांचा काळाबाजार करणारी एक तरुणी दिसायची. तिची कथाच आपल्या चित्रपटाची कथा बनवून प्रसिद्ध दिग्दर्शक अनंत मानेंनी हा चित्रपट पडद्यावर आणला होता. 


अनंत माने यांनी "पिंजरा' चित्रपटात दाखविलेली एका मास्तराची शोकांतिका आजही मराठी चित्रपटसृष्टीत "माईलस्टोन' मानली जाते. या कलाकृतीशी स्पर्धा करील असा एक सत्यकथेवर आधारित चित्रपट माने यांनीच त्यानंतर काही वर्षांनी बनविला. त्याचं नाव होतं, "सुशीला'. "पिंजरा'मध्ये एका मास्तराची झालेली वाताहत प्रेक्षकांना पाहायला मिळाली. "सुशीला'मध्ये एका मास्तरिणीचं आयुष्य उद्‌ध्वस्त होतं. एक वेगळ्या वाटेचा चित्रपट म्हणून "सुशीला'ची नक्कीच दखल घेतली गेली. माने यांचं कसबी दिग्दर्शन, शंकर पाटील यांचे संवाद, रंजना-अशोक सराफ या जोडीनं अभिनयात मारलेली उत्तुंग मजल आणि राम कदम यांच्या अविस्मरणीय संगीतामुळे "सुशीला' चित्रपट लक्षणीय ठरला.

"सुशीला'चा प्रारंभ "फ्लॅशबॅक'द्वारे होतो. जन्मठेपेची शिक्षा भोगून सुशीलाची (रंजना) तुरुंगाबाहेर पडण्याची तयारी सुरू असते, परंतु मनानं तिला अजूनही तुरुंगातच राहावं वाटतं. त्यामागचं कारणही तसंच असतं. ते उलगडतं तिच्या गतआयुष्यातील घडलेल्या "ट्रॅजेडी'मुळं. सुशीला ही खरं तर सुशिक्षित शिक्षिका. एका गावातील शाळेत ती शिक्षिकेची नोकरी करीत असते. सुखी संसाराची तिनंही स्वप्नं पाहिलेली असतात. तिच्यातील चांगली शिक्षिका पाहायला मिळते ती "सत्यम शिवम सुंदरा...' या गाण्यातून; परंतु तिच्या स्वप्नांना दृष्ट लागते ती गावच्या सभापतीचा मुलगा शेखर देशमुखमुळे. शेखरच्या लहानग्या भावानं वर्गात सिनेमातील नट्यांची छायाचित्रं आणल्यामुळे सुशीला त्याला छड्या देते. वकिलीचं शिक्षण घेतलेला शेखर याबद्दल जाब विचारायला गेला असता ती त्याचीही चांगलीच कानउघाडणी करते. हे प्रकरण एवढ्यावरच संपत नाही. त्यानंतरही एक-दोन प्रसंगांमध्ये शेखरची भेट झाल्यावर ती त्याचा पाणउतारा करते आणि त्याला बेशरम म्हणते. सुशीलाच्या तोंडून झालेला हा अवमान शेखरला सहन होत नाही आणि तो तिच्यावर अतिप्रसंग करतो. आपल्यावरील अत्याचाराची माहिती देण्यासाठी सुशीला पंचायतीत पोचते; परंतु पंचायतीचे सदस्य तिला मदत करण्याऐवजी तिचं शीलहरण करतात. "पिसाट वारा मदनाचा आणि पिसाद झाली घडी लागली लाज देशोधडी...' अशी पाटी या वेळी पाहायला मिळते आणि चित्रपटातील कलाकारांची श्रेयनामावली सुरू होते.

पंचायत सदस्यांकडून शीलहरण झालेल्या सुशीलेला रेल्वे स्टेशनवर तिकीट तपासनीस पकडतात. त्या वेळी एक बाई तिची सुटका करते; मात्र एवढ्यावरच सुशीलाच्या दुर्दैवाचे दशावतार थांबत नाहीत. ही महिला तिला कुंटणखान्यात घेऊन जाते. सुशीलाला आपल्यावर काय परिस्थिती ओढवलेली आहे हे समजताच ती तिथून पळ काढते; मात्र पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी ती एका घराचा आश्रय घेते. या घरात राहत असतो तो म्हमदू (अशोक सराफ). सुशीला आणि म्हमदू एकाच नावेतले प्रवासी असतात. कारखान्यात यंत्रावर काम करत असताना म्हमदूचा अचानक हात तुटतो आणि कालांतरानं त्याचा संसारही उधळला जातो. पुढे हातभट्टीचा व्यवसाय करण्याची त्याच्यावर वेळ येते, पण मनानं तो चांगला असतो. सुशीलाला म्हमदू आपली बहीण मानतो; मात्र नियती याच वेळी आणखी एक खेळ खेळते. शेखरचा अंश सुशीलाच्या पोटात वाढत असतो. यथावकाश सुशीला एका अपत्याला जन्म देते. याच वेळी पोलिसांची म्हमदूच्या घरावर धाड पडते आणि आपल्या बाळाचं रडणं पोलिसांच्या कानावर पडू नये म्हणून ती त्याच्या तोंडावर हात ठेवते. घडू नये ते घडते. पोलिस घरातून जाईपर्यंत सुशीलाचा हात बाळाच्या तोंडावर तसाच राहतो आणि गुदमरून या बाळाचा मृत्यू होतो. हा धक्का सुशीलाला सहन होत नाही.

इकडे शेखरची वकिली चांगली सुरू असते. शैला (उषा नाईक) त्याची पत्नी असते. लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी हे दोघे चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात जातात. चित्रपट हाऊसफुल्ल असतो. याच वेळी त्यांच्यासमोर "ब्लॅक'नं तिकीट विकणारी एक मुलगी येते. ती असते सुशीला. एका चांगल्या शिक्षिकेची वाताहत होण्याची ती सुरवात असते. तिला पाहिल्यानंतर शेखर सैरभैर होतो. पण तो आपल्या पत्नीला खरं काही सांगू शकत नाही.

सुशीलाचं वास्तव आयुष्यातलं भरकटणं असंच सुरू राहतं. चोऱ्यामाऱ्या, पाकिटमारीतही ती सरावते. मद्याचा पेलाही तिला वर्ज्य राहत नाही. तिच्या या अधःपतनाचा शेखरला विलक्षण धक्का बसतो. तो सतत तिच्या पाळतीवर राहतो. एकदा चित्रपटगृहाजवळ शेखर जातो. या वेळी तिकिटांच्या रांगेत उभे असणाऱ्या एकाचं सुशीला पाकीट मारते, मात्र पोलिसांकडून ती पकडली जाते. या वेळी शेखर पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तिला जामीन मिळवून देतो. सुशीलाची भेट घेऊन तो तिला काहीतरी आपल्याला बोलायचं आहे असं म्हणतो, पण ती त्याकडे दुर्लक्ष करते. चित्रपटगृहाच्या बाहेरच्या फुटपाथवर सुशीलाचा संसार असतो; मात्र पोलिसांनी पकडल्यावर तिचा हा संसारही उद्‌ध्वस्त होतो. तेव्हा सुशीला आणि म्हमदूचं पुन्हा भरकटणं सुरू होतं. असंच फिरता फिरता त्यांचं जाणं होतं ते एका तमासगिरीणीच्या फडाला. तमाशात बायकांना प्रवेश नसल्यामुळे सुशीलाला प्रवेश दिला जात नाही. मात्र "कौन बोलता है अपुन औरत है।' असं म्हणत सुशीला विंगेत बसून हा तमाशा बघते. गाणं असतं....
..कुण्या गावाचं आलं पाखरू, बसलंय डौलात
न खुदूखुदू हसतंय गालात...

तमासगिरीणीच्या नृत्यकौशल्यावर आणि तिच्या अदांवर सुशीला फिदा होते. "माझ्यासारखी बाई तुमच्यावर फिदा झाली, पब्लिकचं काय झालं असेल?' असा प्रतिप्रश्‍न करीत ती तमासगिरीणीला आपल्याला या कलेत पारंगत व्हायचंय असं सांगते. तेव्हा धोक्‍याचा इशारा म्हणून सुशीलाला या क्षेत्रातील वाईट गोष्टींची कल्पना दिली जाते. यावर सुशीलाचं उत्तर असतं, "गटारात पडलेल्याला चिखलाची काय भीती !' खूप कमी कालावधीत सुशीला नृत्यामध्ये पारंगत होते आणि सुशीला कोल्हापूरकरीण नावानं ती आपले कार्यक्रम सुरू करते. हे नाव वाचून शेखर तिच्या तमाशाला येतो. या वेळी सुशीलाचं गाणं असतं...
"..नवरीवाणी नटूनथटून मी तुम्हांपुढे बसते
अन सांगा राया सांगा मी कशी दिसते..."

तमाशा संपतो. शेखर तिचा रिक्षातून पाठलाग करीत तिच्या घरी पोचतो. आपल्या हातून झालेल्या कृत्याबद्दल पश्‍चात्ताप व्यक्त करीत तो तिची माफी मागतो; मात्र आपल्याशी लग्न कराल तरच या कृत्याला माफी, असा पवित्रा सुशीला घेते. म्हमदूला ते पटत नाही; परंतु सुशीलाच्या डोक्‍यात वेगळीच चक्रं फिरत असतात. सुशीलावरील अन्याय दूर करण्यासाठी शेखर तिला आपल्या घरी घेऊन येतो; परंतु त्याची पत्नी शैला त्यांना घरात घेण्यास नकार देते; मात्र लग्नाच्या वेळी पापपुण्यात सहभागी होण्याच्या वचनाची आठवण शैलाला शेखरकडून करून दिली जाते. तेव्हा सुशीलाला घरात घेण्याशिवाय शैलापुढे दुसरा पर्याय उरत नाही. आपल्यावरील अन्यायाचं परिमार्जन म्हणून शैलाच्या गळ्यातील मंगळसूत्र आपल्याकडे घेण्यात सुशीला यशस्वी होते. याच वेळी म्हमदू शेखरच्या घरी पोचतो. शेखरच्या पत्नीला पाहताच त्याचं डोकं हलतं. त्यानं काही काळापूर्वी एक प्रतिज्ञा घेतलेली असते. शेखरच्या संसाराची राखरांगोळी केल्यानंतरच तो सुशीलाकडून राखी बांधून घेणार असतो. तो क्षण आता जवळ आलेला असतो. सूडानं पेटलेल्या म्हमदूची शैलावर अतिप्रसंग करण्यापर्यंत मजल जाते. तेव्हा सुशीला पुढचा-मागचा विचार न करता घरातील सुरा म्हमदूच्या पाठीत खुपसते. यात त्याचा मृत्यू होतो आणि सुशीलावर खुनाचा खटला न्यायालयात सुरू होतो. शेखर तिची न्यायालयात बाजू मांडतो; मात्र हा खटला सुशीला हरते आणि तिला जन्मठेपेची शिक्षा होते; मात्र तुरुंगात जाण्यापूर्वी ती शैलाला आपल्याकडचे मंगळसूत्र परत करते.

"सुशीला'च्या कथानकात बरंच नाट्य आहे आणि ते जिवंत करण्यात दिग्दर्शक माने यशस्वी ठरले आहेत. एका शिक्षिकेच्या जीवनाची झालेली वाताहत त्यांनी प्रेक्षकांच्या काळजाला भिडेल अशा पद्धतीनं दाखवली आहे. शंकर पाटील यांचे संवादही अतिशय टोकदार आहेत. हा चित्रपट लक्षात राहतो ते रंजना आणि अशोक सराफ यांच्या चौकटी तोडणाऱ्या भूमिकांमुळे. राम कदम यांचं संगीत तर या चित्रपटाचा प्राण आहे. याहूनही एक ठळक बाब म्हणजे 'सुशीला' हा टिपिकल अनंत माने टच असलेला सिनेमा होता. अनंत मानेंच्या विषयी थोडी माहिती दिली नाही तर त्यांच्यावर एक प्रकारे अन्यायच होईल ... 

मागचे वर्ष अनंत माने यांचे जन्मशताब्दी वर्ष. मराठी चित्रपटांच्या निर्मितीचा आकडा आज शंभरच्या घरात आहे, तेव्हाच मानेंची शंभरी साजरी होत आहे. हे पाहून मानेंचा तो काळ आठवला. सन १९६०-६१ चा तो काळ. त्या काळात अवघे ७ ते ८ मराठी चित्रपट निर्माण व्हायचे. ६०च्या दशकातला मानेंचा सांगते ऐकाहा चित्रपट पुण्याच्या विजयानंद चित्रपटगृहात सलग १३१ आठवडे चालला होता. तरीही त्यानंतर मराठी चित्रपटांच्या निर्मितीचा आकडा अनेक वर्षे १०-११च्या पुढे जात नव्हता. आज अनेक कलावंत एकेका चित्रपटासाठी १२ ते १५ लाख रुपये घेत आहेत. मानेंच्या काळात मराठी चित्रपटांच्या निर्मितीचा खर्चही लाखाच्या घरात जात नव्हता.

अगदी ६० हजार रुपयांत कोणताही मराठी चित्रपट तयार होत होता. त्या काळी दिलीपकुमार, राज कपूर, देव आनंद यांनी हिंदीत आपली क्रेझ निर्माण केली होती. त्यामुळे मराठी चित्रपटांचा प्रेक्षक मराठीपासून दूर चालला होता. तर अनेक दिग्दर्शकही मराठी चित्रपट निर्मितीपासून दूर जाऊन सरकारी नोकर्‍या करत होते आणि त्यामुळे मराठी चित्रपटाचे कोणतेही भविष्य दिसत नव्हते. अशा वेळी अवघ्या ६0 हजारांत चित्रपट निर्माण करून अनंत मानेंनी मराठी चित्रपट जगवला. याचे श्रेय त्यांच्या सांगते ऐकाया तमाशापटाला द्यावे लागेल. तमाशापट हा मराठी चित्रपटांचा नवा चेहरा होता. तो मानेंनी मराठी चित्रपटांना दिला. याचा अर्थ त्यांच्या आधी कोणी तमाशापट करत नव्हते असं नाही.

सन १९४८ला जय मल्हार, राम जोशी, पठ्ठे बापूराव या चित्रपटांतून मराठीत तमाशापटाची निर्मिती सुरू झालीच होती; पण सांगते ऐकाने ती अधिक वाढवली. तमाशापटातून मराठी चित्रपटांना त्यांनी एक नवा चेहरा दिला आणि त्यानंतर मराठीत खर्‍या अर्थाने तमाशा चित्रपटांचे युग सुरू झाले. या युगात त्यांनी केला इशारा जाता जाता’, ‘सवाल माझा ऐका’, ‘गण-गवळणयांसारखे अनेक तमाशापट दिले. सन १९९३चा लावण्यवतीहा त्यांचा शेवटचा चित्रपट एक तमाशापटच होता. परंतु, ५०च्या दशकातला अबोलीहा त्यांचा पहिला चित्रपट तमाशापट नव्हता. एका मुक्या मुलीची कथा सांगणारा तो सामाजिक चित्रपट होता. त्यानंतर अनेक सामाजिक चित्रपट त्यांनी दिले आणि त्याचबरोबर विनोदी चित्रपटही मानेंनी दिले. त्यांपैकी मानिनीचित्रपटाची कथा पंडित महादेवशास्त्री जोशी यांची होती. त्या काळात ते एक नामवंत साहित्यिक होते. त्यांच्यासारखेच पु. भा. भावे (सौभाग्य, माझा होशील का?) ते शंकर पाटील यांच्यासारखे अनेक साहित्यिक त्यांनी मराठी चित्रपटांना दिले. शंकर पाटलांच्या बरोबर अनेक चित्रपटांच्या पटकथा माने यांनी स्वत: लिहिल्या आणि हळदीकुंकूया चित्रपटासाठी पटकथालेखनाचे पारितोषिकही मिळवले. दिग्दर्शनात शाहीर परशुरामया चित्रपटाला शासनाचे पहिले मराठी चित्रपट महोत्सव पारितोषिक मिळाले. त्यानंतर अनेक चित्रपटांसाठी हे पारितोषिक त्यांनी पटकावले. लेखक म्हणून ते स्वत:च्या चित्रपटापुरते र्मयादित राहिले नाहीत. व्ही. शांताराम यांच्या पिंजराया चित्रपटाची पटकथा त्यांनी लिहिली, तर व्ही. रवींद्र यांच्याही अनेक चित्रपटांसाठी त्यांनी पटकथा लिहिल्या. कवी चंद्रशेखर यांच्या काय हो चमत्कारया खंडकाव्यावरही त्यांनी चित्रपट निर्माण केला.

आज राजकीय पार्श्‍वभूमीवर अनेक मराठी, हिंदी चित्रपट आपण पाहतो. या चित्रपटांची सुरुवातही त्यांनीच एक गाव बारा भानगडीया चित्रपटात प्रथम केली. निळू फुले या चित्रपटातून सर्वप्रथम चित्रपटात आले आणि पुढार्‍याच्या भूमिकेचा चेहरा या चित्रपटाने दिला. त्यानंतर गल्ली ते दिल्लीपर्यंत राजकीय पार्श्‍वभूमीवरील अनेक चित्रपट त्यांनी दिले. सत्यकथेवरील आधारित मराठी चित्रपटही माने यांनी दिले. चिमणी पाखरंची कथा ते राहत असलेल्या भगीरथ सदनमध्ये घडलेली कथा होती. ती त्यांनी धर्माधिकारी यांना सुचवली आणि त्यानंतर माने यांनी सत्यकथेवरील आधारित काही कथा चित्रपटात आणल्या. त्यांचा सुशीलाहा चित्रपटदेखील त्यापैकी एक. त्या काळात कोल्हापुरात पद्मा, रॉयल, प्रभात, शाहू या चित्रपटगृहांच्या परिसरात तिकिटांचा काळाबाजार करणारी एक तरुणी दिसायची. तिची कथाच आपल्या चित्रपटाची कथा बनवून मानेंनी तो चित्रपट पडद्यावर आणला. एक गाव बारा भानगडीहा त्यांचा चित्रपट राजकीय पार्श्‍वभूमीचा होता. याची कथा माझा मित्र अमृत गोरे याला वर्तमानपत्रातील एका बातमीतून सुचली होती. तीच त्याने चित्रपटात आणल्यानंतर वृत्तपत्रातील बातम्यांचा आधार घेऊन तयार होणार्‍या पेपर कटिंग चित्रपटांचा ट्रेंड मराठी व हिंदी चित्रपटात आला.

हिंदी चित्रपटात फ्लॅशबॅकने सुरुवात होणारे अनेक चित्रपट आपण पाहतो. नंतर सेमी फ्लॅशबॅक कथांवरील चित्रपटांचा नवा ट्रेंड चित्रपटात आला. गुलजार यांच्या कोशिशया चित्रपटाच्या सेमी फ्लॅशबॅकसाठीच अनेकांनी कौतुक केले होते. परंतु गुलजार यांचा उदयही चित्रपटात झाला नव्हता, तेव्हा अनंत मानेंनी ५0 च्या दशकात आपल्या पुनवेची रातया चित्रपटात सेमी फ्लॅशबॅकचा प्रयोग सर्वप्रथम केला. एक गाव बारा भानगडीमधून मानेंनी निळू फुले यांना चित्रपटात पहिला ब्रेक दिलाच; पण अशा कित्येक कलावंतांना त्यांनी चित्रपटात पहिला ब्रेक दिला. राजा गोसावी, राजा परांजपे यांच्या लाखाची गोष्टया चित्रपटापासून लोकांना माहीत झाला असला, तरी त्याआधी दत्ता धर्माधिकारी यांच्या अखेर जमलंया चित्रपटात सर्वप्रथम दिसला. या चित्रपटासाठी मानेंनीच त्यांना हेरलं होतं. त्यांच्याबरोबर शरद तळवळकरांच्या रुपेरी जीवनाची सुरुवातही या चित्रपटातून झाली. मराठीत राजा गोसावी व शरद तळवळकर यांची जोडी जमली होती. ही जोडी मानेंनी त्यांच्या दोन घडीचा डावया चित्रपटातच सर्वप्रथम जमवलेली. जयश्री गडकर या दिसतं तसं नसतंचित्रपटापासून दिसत असल्या तरी त्यांचं युग खर्‍या अर्थाने मानेंच्या सांगते ऐकाचित्रपटापासून सुरू झाले. सांगते ऐकाआणि मानिनीम्हणजे जयश्रीबाईंच्या रुपेरी जीवनाची हाईट होती. या हाईटला अनंत मानेंनीच त्यांना पोचवले. लीला गांधी (प्रीतीसंगम), उषा चव्हाण (केला इशारा जाता जाता), उषा नाईक (पाच रंगाची पाच पाखरं) यांसारख्या अनेक नायिका त्यांनी मराठी चित्रपटाला दिल्या.

 डॉ. श्रीराम लागू हे अनंत मानेंनी लिहिलेल्या व्ही. शांताराम यांच्या पिंजराया चित्रपटाकरिता नाटकातून सर्वप्रथम चित्रपटात आले. या चित्रपटावेळी मराठीत त्यांनी एक मान्यवर दिग्दर्शक असं नाव मिळवलं होतं तरीही व्ही. शांताराम यांच्याबरोबर आपण काम केलं पाहिजे म्हणून पिंजराच्या वेळी ते त्यांचे सहायक बनले होते. या चित्रपटाच्या यशात त्यांचा सिंहाचा वाटा होता. तरीही चित्रपटाच्या यशाचे श्रेय त्यांनी स्वत:कडे घेतले नाही. त्यामुळेच व्ही. शांताराम यांनी अनंत मानेंना त्यानंतरच्या आपल्या असला नवरा नको गं बाईया चित्रपटाच्या दिग्दर्शनाची संधी दिली. व्ही. शांताराम हे प्रभातच्या पाच मालकांपैकी एक मालक होते. तेव्हा एक्स्ट्रा म्हणून चित्रपटातून आपल्या रुपेरी जीवनाची सुरुवात त्यांनी केली आणि एक्स्ट्राच्या गर्दीतून बाहेर पडल्यावर शांतारामबापूंच्या चित्रपटापर्यंत दिग्दर्शक म्हणून त्यांनी झेप घेतली. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांना एकदा मरणोत्तर सन्मान देऊन त्यांचा गौरव करायला हवा होता पण तसे काही घडले नाही..


- समीर गायकवाड.