Thursday, September 15, 2016

पेशवाईचा उदयास्त आणि राघोभरारी....

एका पराक्रमी माणसाची अतिमहत्वाकांक्षेने झालेली दुर्दशा अन बदनामी म्हणजे राघोभरारी. त्यांच्या जीवनाकडे बघितले की लक्षात येते की माणूस नुसताच पराक्रमी असून त्याचा काय फायदा होत नाही. हेतू, अवधान आणि विचार वर्तन या तिन्ही गोष्टीत कमी पडलेल्या या अल्पकालीन पेशव्यांचे आता कुणी स्मरण करत नाही. बाजीराव बल्लाळ, थोरले माधवराव, सदाशिवराव भाऊ आणि राघोबादादा या चार  माणसांनी पेशवाई खऱ्या अर्थाने गाजवली मात्र भाऊंच्या वाटयास उपेक्षा आली याचे कारण त्यांच्या व्यक्तिमत्वात आणि स्वभावगुणांत आहे. इतिहासातली काही माणसे खूप काही शिकवून जातात त्यातलेच एक व्यक्तिमत्व रघुनाथराव पेशवे यांचे आहे.  इतिहासाच्या पानात लुप्त झालेल्या या व्यक्तीने नेहमी आकर्षित केलेले आहे, त्यांच्यावरील इतिहास लेखनाचे पुनर्विलोकन व्हावयास हवे असे मला नेहमी वाटते. रघुनाथराव पेशवे आणि पेशवाईचा एक अत्यंत संकीर्ण ढोबळ आढावा इथे त्या अनुषंगाने घेतला आहे.

ढोबळ मानाने इतिहासाने आणि ऐतिहासिक साधनांनी त्यांना खलपुरुष का ठरवले आहे हे त्यांच्या एकूण कारकिर्दीकडे पहिले लक्षात येते. रघुनाथरावांचा इतिहास जेव्हढा वळणावळणाचा आहे तितकाच रोचक इतिहास एकंदर पेशवाईचाही आहे. पेशवाईचा संक्षेपित इतिहास याचे दार्शनिक आहे. छत्रपती राजारामांच्या नंतरच्या कालखंडात धनाजी जाधव, खंडो बल्लाळ, बाळाजी विश्वनाथ या सहकार्‍यांच्या मदतीने छत्रपती शाहू यांनी राज्यकारभारास सुरुवात केली. बाळाजी विश्वनाथांनी मराठा आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे यांस छत्रपती शाहूंच्या पक्षात आणले. दिनांक १६ नोव्हेंबर, १७१३ रोजी बाळाजी विश्वनाथ यांस छत्रपतींनी पेशवाईची वस्त्रे दिली. महाराणी ताराबाईंनी आपली सत्ता कोल्हापूरमध्ये प्रस्थापित केली. त्यामुळे मराठी राज्याचे दोन तुकडे झाले. सातारा आणि कोल्हापूर. १७१९ मध्ये बाळाजी विश्वनाथ दिल्लीला गेले. त्यांनी बादशहाकडून छत्रपतींच्या नावे स्वराज्य, चौथाई, सरदेशमुखीच्या सनदा मिळविल्या. पेशव्यांनी मुघलांच्या कैदेतून छत्रपतींच्या मातोश्री येसूबाईंची सुटका केली. या सनदांमुळे दक्षिणेतील सहा मुघल सुभ्यांमध्ये चौथाई व सरदेशमुखी वसूल करण्याचा अधिकार मराठ्यांना मिळाला. छत्रपतींचे पूर्वार्धातील आयुष्य मुघलांच्या कैदेत गेल्यामुळे त्यांनी आपणास जिवंत ठेवले व वेळ येताच सोडलेया गोष्टीचा छत्रपतींच्या मनावर परिणाम झाला असल्यामुळे त्यांनी ‘‘दिल्लीची पातशाही रक्षून राज्यविस्तार साधावा’’ असा सल्ला पेशव्यांना दिला.

बाळाजी विश्वनाथांची आणखी एक महत्त्वाची कामगिरी म्हणजे त्यांनी मराठा मंडळ अर्थात संयुक्त राज्यव्यवस्थेची निर्मिती केली. या योजनेनुसार मराठा सरदारांना त्यांच्या त्यांच्या प्रभावक्षेत्रात मर्यादित स्वायत्तता देण्यात आली व स्वराज्याचा चौफेर विस्तार करण्यास प्रवृत्त करण्यात आले. अशा या अतुल पराक्रमी सेवकाचा मृत्यू सासवडला दिनांक २ एप्रिल, १७२० रोजी झाला. त्यांच्यानंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र थोरले बाजीराव हे वंशपरंपरागत पद्धतीने पेशवे झाले. ते वडिलांच्या तालमीत तयार झाले होते. हे पेशवे आयुष्यात कधीही रणांगणावर पराभूत झाले नाहीत. त्या अर्थाने ते अजेय होते व मराठी सत्तेचे विस्तारक होते. थोरल्या बाजीराव पेशव्यांनी निजामाचा पराभव केला, छत्रसाल राजाची संकटातून मुक्तता केली. बंडखोर मराठे सरदारांचा बंदोबस्त केला. सिद्दी-पोर्तुगीजांचा नक्षा उतरविला. गुजरात, माळवा, बुंदेलखंड, दिल्ली भागात भीमथडीची तट्टे नेली. आकांक्षांपुढती गगन ठेंगणेअशी मराठी माणसाला अनुभूती दिली. गतिरुद्ध समाज आपसात संघर्ष करून संपतो, ही गोष्ट लक्षात घेऊन मराठी सरदारांच्या पराक्रमाला पेशव्यांनी आणि छत्रपतींनी नवे क्षितीज उपलब्ध करून दिले. या पेशव्यांच्या काळात दक्षिणाभिमुख असणारे मराठे उत्तराभिमुखझाले. त्यामुळेच शनिवारवाड्याचे तोंड उत्तराभिमुख आहे. औरंगजेबाच्या मृत्यूने भारताच्या राजकारणात जी पोकळी निर्माण झाली होती, ती मराठ्यांनी भरून काढली. अशा या पराक्रमी पेशव्याचा मृत्यू १७४० मध्ये झाला.

बाजीराव पेशव्यांचे ज्येष्ठ पुत्र बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे वंशपरंपरागत पद्धतीने पेशवे झाले. दुर्दैवाने या पेशव्यांनी मराठ्यांच्या साम्राज्याचा विनाशाची अकाली बीजे पेरली. इंग्रजांच्या मदतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या आरमाराचा त्यांनी इंग्रजांच्या मदतीने पूर्ण नाश केला. माळवा, राजपुताना भागातील हिंदू राज्यकर्त्यांना अकारण दुखविले. नागपूरकर भोसल्यांशी तंटा केला. पानिपतच्या स्वारीवर स्वत: जाऊन नेतृत्व करण्याऐवजी विश्वासराव, सदाशिवराव पेशव्यांना पाठवून स्वत:चा पराभव ओढवून आणला. अहमदशाह अब्दाली याने दिल्लीवर स्वारी केली असता, ‘हिंदुस्थान आमचा आहे आणि आम्ही तो सांभाळणारचया एकमेव उद्देशाने भारतातील एकमेव सत्ता लढली ती म्हणजे मराठ्यांची! पानिपतावरील पराभवाचा आघात नानासाहेब सोसू शकले नाहीत, त्यांचा अकाली मृत्यू झाला. त्यांचे द्वितीय चिरंजीव थोरले माधवराव पेशवे सत्तेवर आले. १७६१ ते १७७२ इतकाच कालखंड या पेशव्याच्या वाट्याला आला. या पेशव्यांनी पानिपतच्या आघाताने मोडून पडलेली मराठी सत्ता सावरून धरली. शिंदे-होळकरांच्या कर्तृत्वास वाव दिला. काका रघुनाथराव पेशवे व जानोजी भोसले, हैदर आणि निजाम यांच्या महत्त्वाकांक्षेला त्यांनी लगाम घातला. १७७२ मध्ये त्यांचा मृत्यू झाल्यावर त्यांना मूल नसल्याने त्यांचे धाकटे बंधू नारायणराव गादीवर बसले. त्यांच्या निमित्ताने मराठ्यांचे सत्ताकारण ज्या गोष्टीपासून मुक्त होते त्या गोष्टी - म्हणजे खून व रक्तपात - घडण्यास सुरुवात झाली. इथूनच राघोबादादांच्या आयुष्याला उतरतीची कळा लागली.

रघुनाथराव पेशवे हे उत्तर पेशवाईतील अल्पकाळ सत्तेवर (१७७३) असलेले एक पराक्रमी पण आपल्या कर्तव्य गुणांमुळे उपेक्षित राहिलेले पेशवे होत. पहिले बाजीराव व काशीबाई यांचे हे दुसरे पुत्र होत. म्हणजे नानासाहेब पेशव्यांचे ते कनिष्ट बंधू आणि सवाई माधवरावांचे काका ! इतिहासात ते राघो भरारी, रघुनाथराव पेशवेरघुनाथराव पेशवेराघोबा, दादासाहेब इ. नावांनीही ओळखले जातात. त्यांचा  जन्म माहुली (सातारा) येथे झाला. बालपण छत्रपती शाहूंजवळ गेले. लहानपणी इतर मुलांप्रमाणे ते हूड होते. १७५३ पासून ते स्वतंत्रतेने स्वाऱ्या काढू लागले. त्यांची पहिली स्वारी १७५३ ते १७५५ पर्यंत चालली. त्यात ते दिल्लीस गेले होते. या स्वारीत राजस्थानातून त्यांनी खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न केला. त्यांची दुसरी स्वारीही दिल्लीवरतीच झाली; पण १७५७ मध्ये अब्दाली दिल्लीहून अफगाणिस्तानात परत गेल्यावर मग हे दिल्लीस पोहोचले. तेथून ते दिल्लीच्या उत्तरेकडील प्रदेश ताब्यात घेत घेत अटकपर्यंत पोहोचले. या काळात  काही मराठे घोडदळाच्या तुकड्या तर पेशावरला जाऊन राहिल्या होत्या; पण १७५८ मध्ये हे पुण्यास परत आले. १७६० मध्ये भाऊसाहेब पानिपतमध्ये अडकले असता त्यांना साह्य करण्यासाठी बाळाजी बाजीराव राघोबास घेऊन उत्तरेत जात होते ; तेव्हा राघोबास निजामाला मदतीस आणण्यासाठी दक्षिणेत पाठविले; पण निजामाचे मन वळविण्याचा कोणताच प्रयत्न न करता हे दक्षिणेत स्वस्थ बसून राहिले.

थोरले माधवराव गादीवर आल्यावर (१७६१) राघोबांनी  पेशवेपद बळकाविण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना यश आले नाही; पण थोरल्या माधवरावाना हयातभर यांनी एक प्रकारचा त्रासच दिला. परिणामतः त्यांनी राघोबांना शनिवारवाड्यात बदामी महालात नजरकैदेत ठेवले. माधवराव पेशवे यांच्या २७ व्या वर्षी क्षयरोगाने १७७२ ला झालेल्या अकाली निधनानंतर त्यांचे लहान भाऊ नारायणराव यांना पेशवेपदी बसवले गेले. माधवराव पेशवे यांच्या मृत्यूने रघुनाथरावांची सत्तालालसा वाढली व नारायणराव पेशव्यांच्या विरोधात त्यांनी बंड करण्याचे ठरवले. शनिवार वाड्याचे असणारया सुरक्षारक्षक गारद्यांना फितवून त्यांनी नारायणराव पेशव्यांना कैद करायचा कट आखला. पण रघुनाथरावाच्या पत्नी आनंदीबाई यांनी गारद्यांना पाठवलेल्या चिठ्ठीतला मजकूर "नारायण रावांस धरावे" ऐवजी " नारायण रावांस "मारावे" असा केला. मराठीतील ध चा मा करणे ही म्हण याच प्रसंगावरुन पडली.

नारायणरावांच्या हत्येनंतर रघुनाथरावाना अल्पकालीन पेशवेपद मिळाले. पण बऱ्याच जणांना ते रुचले नाही. नाना फडणवीसांच्या नेतृत्वाखाली त्यांनी विरोध केला. नारायणराव पेशव्यांच्या पत्नी गंगाबाई या नारायणरावांच्या खूनावेळी गर्भार होत्या. त्यांना नंतर पुरंदर किल्ल्यावर हलवले गेले. यथावकाश त्यांना ही मुलगाच झाला. त्याचे नामकरण सवाई माधवराव असे केले गेले. सवाई माधवराव पेशवे यांस वयाच्या ४० व्या दिवशी पेशवेपदाची वस्त्रे देण्यात आली. छत्रपतींनीसुद्धा त्यांनाच पेशवे पदासाठी मान्यता दिली. (१७९६ पर्यंत या पेशव्यांनी गादी चालवली). सवाई माधवरावांच्या नावाने बारभाईंनी (नाना फडणवीस, हरिपंत फडके, सखरामबापू बोकील, त्रंबकराव पेठे, मोरोबा फडणीस, बापूजी नाईक, मालोजी घोरपडे, भवानराव प्रतिनिधी, रास्ते, पटवर्धन, महादजी शिंदे, तुकोजी होळकर) कारभार पाहण्यास सुरुवात केली. मात्र पेशवेपदावरचा आपला हक्क सोडण्यास रघुनाथराव तयार नव्हते. या उलट नारायणरावांच्या खुनाच्या आरोपाचा ससेमिरा चुकवण्यासाठी निजामावर मोहिमेची आखणी केली. रघुनाथराव हे परमप्रतापी असल्याने (१७५० च्या दशकात त्यांनीच अटकेपार सैन्य नेत मराठ्यांचा वरचष्मा उत्तर भारतात पुन्हा स्थापन केला होता.) कोणी उघड विरोध केला नाही. पण मुळात निजामाला न दुखावता त्यांनी मोहीम अर्थहीन ठेवली. त्याचाच फायदा घेत बरेच जण साथ सोडून गेले. कालांतराने नाना फडणवीस, सखाराम बापू, हरिपंत खुबीने पुण्यास परत आले. नारायणरावाच्या कारकीर्दीत राघोबांच्या पेशवेपद मिळविण्याच्या आकांक्षेने मोठीच उचल खाल्ली असल्याने नारायणरावाचा खून होण्यात त्याचे अंग होतेच. त्यामुळेच न्यायमूर्तीं रामशास्त्री प्रभूणेंनी   नारायणरावांच्या मृत्यूची चौकशी करून न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे यांनी नारायणरावाच्या खूनाचा ठपका राघोबादादांवर ठेवला, त्यांनी खुद्द रघुनाथरावांना या खुनासाठी दोषी धरत देहांत प्रायश्चिताची शिक्षा दिली. ही शिक्षा रघुनाथराव मान्य करणे शक्यच नव्हते. मात्र राघोबांना निमूटपणे पेशवेपदाचा राजीनामा द्यावा लागला.

सवाई माधवरावांच्या काळात मराठ्यांनी परत दिल्लीवर जरब बसवली. नाना फडणवीसांनी दक्षिण तर महादजींनी उत्तर सांभाळण्याचे ठरले. खुद्द महादजी शिंदे दिल्लीत तळ ठोकून राहिले, बादशहाने त्यांना वजीर म्हणून नेमणूक करायचा प्रस्ताव दिला, पण अतिशय नम्रपणे महादजी शिंदे यांनी त्याला नकार देऊन ती वस्त्रे पुण्यास पाठवून पेशव्यांना वजीर नेमले. दिल्लीच्या नाड्या पुन: पुण्याच्या हातात आल्या याचेच हे पुरावे होते. इथे नाना फडणवीसांनी इंग्रजांची २-३ राजकीय व लष्करी आक्रमणे परतवून लावली. यामुळे "जबतक नाना तबतक पुना" असे भारतभर म्हंटले जाऊ लागले. अशा प्रकारे सवाई माधवरावांच्या नावाने बारभाईच पेशव्यांचा कारभार पाहू लागल्याने राघोबा अस्वस्थ होत गेले. याकाळात रघुनाथरावापाशी जास्त सैन्य न उरल्याने सरळ पुण्यावर चालून न येता, त्यांनी शिंदे , होळकरांसोबत बोलणी केली. पण रघुनाथरावांच्या दबावामुळे शिंदे , होळकरांनी त्यांनी सरळ नकार न देता झुलवत ठेवले. अखेर त्यांनी इंग्रजांकडून मदत मिळवण्यासाठी पुण्यातील वकील माष्टीनशी बोलणी केली. पण रघुनाथरावांच्या पैशांच्या मागणीवरून आणि इंग्रजांच्या मुलुखाच्या आणि महसुलाच्या मागण्यांवरून करार पूर्ण होण्यात अडचणी येत होत्या. अखेर रघुनाथरावांनी गुजराथेतून आपल्या मित्रफौजेसोबत नर्मदा ओलांडून मराठ्यांवर चढाई केली. पण हरिपंत तात्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी त्यांचा पराभव केला. कसेबसे तुटपुंज्या सैन्यासह रघुनाथराव सुरतेच्या इंग्रजांकडे पोहोचले. अखेर धर्मबंधन झुगारून त्यांनी समुद्र प्रवास करत मुंबई गाठली. वसई व सालशेत बेटे व गुजराथेतून सुरत ,भडोचचा महसुल इंग्रजांना द्यायचे मान्य करून, बदल्यात इंग्रजांकडून आगाऊ पैसे सैन्य खर्चासाठी घेत करार झाला.

त्यावेळी भारतात ईस्ट इंडिया कंपनीचे तीन विभाग होते. मुंबई , कलकत्ता, मद्रास. यातले कलकत्ता, मद्रास भाग सत्ता काबीज करण्यात यशस्वी ठरले होते. तुलनेने मुंबई विभाग उत्पन्नात मागेच होता. त्यामुळे मुंबई विभाग दडपणात आणि मराठी साम्राज्याच्या राजकारणाच्या हस्तक्षेपाच्या संधी शोधत होता. मराठी साम्राज्याच्या नारायणराव पेशव्यांच्या खुनानंतरच्या परिस्थितीचा फायदा उचलत त्यांनी सालशेत, साष्टी पूर्वीच ताब्यात घेतले. रघुनाथरावांनी आयती संधी दिली. याचकाळात इंग्लंडमध्ये कंपनीच्या विभागात मध्यवर्ती निर्णय अधिकार कलकत्याच्या प्रमुखाकडे दिले. मुंबई विभागाने तरीही तांत्रिक बाबींचा फायदा उचलत रघुनाथरावांना साथ देण्याचा निर्णय घेतला. नाना फडणवीसांनी याविरुद्ध कलकत्याच्या कंपनीला तक्रार केली. कलकत्त्याने सुरतेच्या कराराला नामंजूर करत आपला स्वतःचा वकील आप्टन पुणे दरबारी/पुरंदर वर पाठवला. नाना फडणवीसांनी त्याचे खास जंगी स्वागत करून पुरंदरचा तह (१ मार्च १७७६) केला. यानुसार रघुनाथराव आणि पेशव्यांच्या खुनाचा आरोप असलेले रघुनाथराव यांना पुणे दरबारी हवाली करायचे होते. तर मुंबई विभागाने बळकावलेले काही भागही परत करायचे होते. मराठ्यांनी सालशेत अन वसई वरचा दावा बाजूला ठेवला.

पण मुंबई विभागाने साहजिकच हा करार मानायला नकार देत रघुनाथराव व पेशव्यांच्या खुनाचा आरोप असलेल्यांना हवाली केले नाही आणि प्रदेश परत देण्यासही टाळाटाळ केली. कलकत्ता कंपनीनेही प्रतिसादात टाळाटाळ केली. अखेर नाना फडणवीसानी कलकत्ताला जरब म्हणून फ्रेंचाना सुरतेत जागा दिली आणि त्यांचे पुण्यात जंगी स्वागत केले. यावर कलकत्ता कंपनीने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. उलट, उत्तर भारतातून आपले सैन्य मदतीसाठी पाठवले. यात अयोध्येच्या नबाबाकडून मिळालेली कंदाहारी फौजही होती. पुरंदरच्या तहानंतर राघोबादादांना आपले उर्वरित जीवन कोपरगाव, आनंदवल्ली वगैरे ठिकाणी आणि इंग्रजांच्या आश्रयाखाली सुरत, मुंबई, भावनगर इ. ठिकाणी व्यतीत करावे लागले. १७८२ मध्ये कचेश्वर (कोपरगावजवळ) येथे किरकोळ आजाराने तो मरण पावले. रघुनाथरावांनी एकूण तीन लग्ने केली. जानकीबाई (१७४२), आनंदीबाई (१७५५) आणि मथुराबाई (१७७९). या तिघींपैकी आनंदीबाई देखण्या व महत्त्वाकांक्षी होत्या. जानकीबाई १७५५ मध्ये मरण पावली. आनंदीबाई १७९४ मध्ये मरण पावली. आनंदीबाईपासून दोन मुली व भास्कर, बाजीराव आणि चिमणाजी असे तीन मुलगे झाले. पण पहिला भास्कर हा लहानपणीच मरण पावल्याने त्याने अमृतराव नावाच्या एका मुलास दत्तक घेतले होते. बाजीराव व चिमणाजी हे त्यास नंतर झालेले मुलगे. त्याच्या बऱ्याच नाटकशाळा होत्या. रघुनाथरावांच्या ठिकाणी कर्तबगारी इतकीच कपटनीती होती.  जोडीला जबरदस्त महत्त्वाकांक्षा असल्यामुळे त्यांचे पेशवाईत कोणाशीच पटले नाही. महत्त्वाकांक्षेच्या पायी त्यांनी इंग्रजांचीसुद्धा मदत घेतली, पण त्यांच्या संशयी वृत्तीमुळे व नाकर्तेपणामुळे त्यांचा कोठेच जम बसला नाही. मराठी इतिहासात त्यांना कलिपुरुषहे नाव त्यांच्या वादग्रस्त व्यक्तिमत्त्वामुळे प्राप्त झाले.

१७९३ मध्ये महादजी शिंदे निधन पावले. १७९५ मध्ये सवाई माधवराव पेशव्यांनी शनिवारवाड्यात आत्महत्या केली. सवाई माधवरावांच्या आत्महत्येनंतर त्यांना वारस नसल्यामुळे रघुनाथरावांचा मुलगा बाजीराव याचा पेशव्यांच्या गादीवर हक्क होता. पण असे झाले तर आपले राजकीय वर्चस्व धोक्यात येईल अशी भीती नाना फडणवीसांना होती. त्यामुळे त्यांनी बाजीरावचा धाकटा भाऊ चिमणाजी याला पेशव्यांच्या गादीवर बसवले. त्यासाठी त्यांनी सवाई माधवरावांच्या पत्नीस चिमणाजी याला दत्तक घ्यावयाचे सांगितले. सन १७९६ ला चिमणाजी पेशवेपदावर आले. परंतु पुन्हा काही दिवसांतच दौलतराव शिंदे आणि नाना फडणवीस यांनी छत्रपतींना सांगून बाजीरावास पेशव्यांची वस्त्रे दिली. १८०० साली नाना फडणवीसांच्या मृत्यूनंतर सुडाने पेटलेल्या यशवंतराव होळकरांनी पुण्यावर हल्ला चढवला. तेव्हा दौलतराव शिंदे आणि बाजीरावांनी होळकरांविरुद्ध लढा दिला. शेवटी पुण्याजवळील हडपसर येथे होळकरांचा विजय झाला. आणि बाजीरावांनी पुणे सोडून वसई येथे इंग्रजांचा आश्रय घेतला. २ मे १८०२ ला बाजीरावांचाच भाऊ अमृतराव पेशवेपदावर आला. डिसेंबर १८०२ ला बाजीरावाने इंग्रजांशी वसईचा तह केला. या तहानुसार इंग्रज बाजीरावाला त्याचे पेशवेपद परत मिळवून देणार होते, पण त्याबदल्यात इंग्रजांना त्यांचे सैन्य मराठा साम्राज्यात ठेवण्याची तसेच त्यांचे राजकीय कारभार पुण्यातून करण्याची परवानगी हवी होती. दुसरे बाजीराव पेशव्यांनी इंग्रजांबरोबर करार करून तैनाती फौजेची पद्धत स्वीकारली.१८०३ ला बाजीराव पेशवेपदावर आले खरे पण इथून प्रत्येक बाबतीत इंग्रज मराठी सत्तेत ढवळाढवळ करू लागले. होळकर आणि शिंदे यांना ब्रिटिशांची मराठ्यांच्या सत्तेत होणारी ढवळाढवळ मान्य नव्हती. यातूनच १८०३ ला दुसरे इंग्रज-मराठा युद्ध सुरू झाले. होळकर आणि शिंदे यांच्यातील गैरसमजुतींमुळे मराठे हे युद्ध हरले. १८१८ पर्यंत दुसरे बाजीराव पेशवेपदावर होते.

इंग्रजांनी आस्तेकदम दुसऱ्या बाजीरावाचे राज्य बळकावलेत्यांची सत्ता संपुष्टात आली. पेशवे मांडलिक बनले व कानपूरपासून २७ किमी अंतरावर असणारया बिठूर येथे जाऊन राज्य क‍रू लागले. पुढे काही काळानंतर त्यांनी झाशीच्या राणीच्या मदतीने बिठूर स्वंतत्र घोषित केले. अल्पशा आजाराने दुसऱ्या बाजीरावांचे निधन झाले व त्यांचे दत्तक पुत्र धोंडोपंत ऊर्फ नानासाहेब पेशवे झाले. नानासाहेब दत्तक पुत्र असल्याने ईस्ट इन्डिया कंपनीने त्यांचा स्वीकार केला नाही. बिठूर जरी स्वंतत्र असले तरी जो पर्यत ईस्ट इन्डिया कंपनीची परवानगी मिळत नाही तो पर्यत हिंदुस्थानातल्या कुठल्याही राजाला राजा म्हणून मान्यता मिळत नसे. तोच विरोध नानासाहेबांना झाला. पेशवेपद मिळविण्यासाठी त्यांना इंग्रज सेनापती मेन्सन ह्याच्याशी युद्ध करावे लागले. ह्या युद्धात नानासाहेबांचा पराजय झालाआपल्याला राजा म्हणून मान्यता मिळत नसेल तर प्रजेच्या मनात क्रांतीबीज रोवता येतात का याचाही अंदाज नानासाहेबांनी घेऊन बघितला. नानासाहेबांचा बिठूरच्या क्रांतिदलात सक्रिय सहभाग घेतला. पण इंग्रजांच्या सैन्याने हे ही बंड मोडायचा निश्चय केला. त्यांनी बिठूरवर अचानक हल्ला करून नानासाहेबांना झुकायला भाग पाडले. स्वतःचा जीव वाचावा म्हणून नानासाहेबांनी बिठूर फिरंगी सत्तेत विलीन केले ते कायमचेच. अशा प्रकारे पेशवाई आणि पेशव्यांचा अध्याय संपुष्टात आला. १८५७ च्या बंडानंतर नानासाहेब पेशव्यांचा मृत्यू उपेक्षित अवस्थेत झाला. त्याबद्दल विविध वदंता आणि सनावळी दिल्या जातात.....

इंग्रज-मराठे यांच्यात ३ युद्धे झाली, परंतु मराठ्यांच्या सत्तेचा नाश इंग्रजांनी घडवून आणला. मराठे हरले कारण ते प्रगत व विकसित होत चाललेल्या भौतिक संस्कृतीच्या प्रतिनिधींबरोबर १६-१७ व्या शतकात रेंगाळणार्‍या मनोवृत्तीने लढत होते. इंग्रज तोफा, बंदुका घेऊन लढत होते, तर मराठे ढाल-तलवार, भाले घेऊन लढत होते. इंग्रजांना औद्योगिक क्रांतीचे साहाय्य झाले. ज्याचे हत्यार श्रेष्ठ, त्याची संस्कृती श्रेष्ठहे मराठे विसरले. देशाभिमानाचा अभाव, ना धड उत्तर ताब्यात ना दक्षिण, प्रगत दळणवळण व्यवस्थेचा अभाव, सैन्यात शिस्त नाही, दिल्लीच्या गादीवर बसण्याची कुवत असूनही न दाखविलेली धमक, कार्यक्षम हेर यंत्रणेचा अभाव, कायमस्वरूपी कर्जे अशा अनेक कारणांमुळे मराठ्यांचा पराभव झाला. लुटालुटीने फार तर वेळा भागविल्या जातात, कायमची सोय होत नाही याचा मराठ्यांना विसर पडला म्हणून मराठे हरले. मराठ्यांनी  केलेल्या चुकांची संख्या जास्त असल्यामुळे त्यांना अंतिमत: पराभव स्वीकारावा लागला.

संदर्भ : १. Mujumdar, R. C. Ed. The Marathas Supremacy, Bombay, १९७७.
२. सरदेसाई, गो. स. मराठी रियासत, मध्य विभाग-१-४, पुणे, १९२५.
३. ओक, प्र. ग. संपा. पेशवे घराण्याचा इतिहास, पुणे, १९८५.

 ......   ....  . . . . . . . . . . . . ...... .......  .... .........   ......   ....  . . . . . . . . . . . . ...... .......  .... .........   ......   ....  . .


वरील लेख हा पेशवाईकडे ऐतिहासिक साधनाद्वारे बघण्याचा दृष्टीकोन आहे. मात्र त्याकाळात घडत असणाऱ्या सामाजिक स्थित्यंतराच्या नोंदींच्या आधारे जर पेशवाईकडे बघायचे ठरवले तर चित्र काहीसे वेगळे दिसते. त्याचाही उल्लेख केला नाही तर लेखन एककल्ली होईल, अभिनिवेश टाळून दुसरी बाजू मांडण्यसाठी खालील प्रकरण दिले आहे.  पेशवाईचा अस्त हे या लेखाचा दुसरा भाग असून हे प्रकरण नंदा खरे यांच्या 'बखर अंतकाळाची' या पुस्तकावर बेतलेले आहे ...

जॉर्ज ऑर्वेल हा अगदी साम्राज्यविरोधी माणूस. ब्रिटिशांच्या सत्तेविरोधात सतत झोड उठवायचा. दुसऱ्या महायुद्धाचा काळ. ऑर्वेल लिहितो, ‘ब्रिटन हे चुकीच्या व्यक्ती केंद्रस्थानी असलेल्या कुटुंबासारखं आहे!म्हणजे काही कुटुंबीयांना, समाज घटकांना जरी आपल्या राज्यकर्त्यांचे सगळेच हेतू, त्यांची उद्दिष्टे, मनसुबे मान्य नाहीत, तरी ढोबळमानानं राज्यकर्ते आणि समाज यांची ध्येय, उद्दिष्ट, हेतू यांच्यात घोर विसंगती नाही. मुद्दा असा- महासत्ता वाढतात, टिकतात, जगज्जेत्या होतात, कारण राज्यकर्ते आणि समाज यांची स्वप्नं एक असतात. जिथं याबाबत विसंगती असते त्या सत्ता, ती तख्तं बुडतात. ऑर्वेलच्या विचारांची बॅटरी पेशवाईवर धरली तर काय दिसतं? पेशवाईच्या बुडिताचं गुपितच ऑर्वेल सांगून जातो. असंच पेशवाईच्या बुडिताची खबरबात सांगणारं पुस्तक म्हणजे बखर अंतकाळाची’.

नागपूरकर नंदा खरे यांनी हे पुस्तक लिहिलंय. या बखरवजा पुस्तकाचा नायक आहे अंताजी. तोच निवेदकही आहे. त्याचा काळ अठराव्या शतकातला. १७२६ साली तो जन्मला. स्थळ- भारत. हा माणूस योगायोगानं स्वत:च्या वर्णापासून, वर्गापासून तुटलेला. नास्तिक, टवाळ, शिपाईपेशा, खबरेगिरी, दुभाषीगिरी करत भारतभर भटकंती केलेला. माणसं न्याहाळणं, समूह, समाज धुंडाळणं; त्यांच्या भाषा, बोलीभाषा, लकबी, सवयी, आचारविचार, धारणा असं सारं तपासणं असा छंद जडलेला प्रत्येक गोष्टीकडे तुलनात्मक बघणारा. हा अंताजी आपल्याला बखर अंतकाळाची सांगतो.

पेशवाई कशाने बुडाली याचं निदान करू पाहतो. स्वानुभवाच्या भांडाराला साक्षी ठेवून तो या बुडिताची कथा सांगतोय. स्वत:च्या आयुष्याची कहाणी सांगत अंताजी आपल्याला वेगवेगळ्या मुलखातून फिरवतो. नागपूरच्या चिमणाजी भोसल्यांचा तो शिलेदार म्हणून काम करतो. खबऱ्या म्हणून वावरतो. भोसले, पेशवे, होळकर, शिंदे यांच्या संबंधावर प्रकाश टाकतो.

नागपूरजवळचं अंबिवडे हे अंताजीचं गाव. या गावातून त्याची कथा सुरू होते. या कथेत तो अंबिवडय़ाची लूट नंतर राक्षसभवनची लढाई (१७६३) सांगतो. अंताजीचा ३९ व्या वर्षी सतरा वर्षांच्या काशीशी विवाह झाला. साल १७६५. थोरले माधवराव पेशवे, जानोजी भोसले यांचे मृत्यू (१७७२) त्याने पाहिले. नारायणराव पेशव्यांचा खून (१७७३) झाला तेव्हा अंताजी शनिवरवाडय़ात होता. स्वत:च्या डोळ्यांनी त्याने हा खूनखराबा पाहिला. अनुभवला. दुसऱ्या बाजीरावाचा, सवाई माधवरावाचा जन्म, बदामीचा वेढा, चिमणाबापूचा मृत्यू, त्याआधी चिमणाबापूला आवडलेल्या देवदासीला (राधा) पटवून लग्नासाठी तयार करण्याचा उद्योग, खडर्य़ाची लढाई, सवाई माधवरावाचा मृत्यू, दुसरा बाजीराव पेशवा होणे (१७९६), असईची लढाई, खडकी, येरवडा या इंग्रजांविरोधातल्या लढाया (१८१७) याचा आँखो देखा हाल अंताजीने मांडतो. या घटना एखादी डॉक्युमेंटरी बघतोय अशा डोळ्यासमोरून पुस्तक वाचताना तरळत जातात. एवढं हे पुस्तक जिवंत झालंय.

पेशवाईच्या बुडिताचं गुपित सांगताना पुस्तकभर अंताजी आपणास उघडेवाघडे, नागडे, कडवट अनुभव सांगतो. पेशवाई गलत धारणांनी कशी पोखरली होती. त्या वेळचा समाज जातींच्या भेगांनी कसा तुटलेला, विखुरला होता. राज्यकर्ता वर्ग म्हणजे पेशवे, सरदार, कारभारी, त्यांचे बगलबच्चे जनतेपासून कसे तुटलेले होते. वारंवार कोसळणारे दुष्काळ, अवकाळ यांनी प्रजा कशी पिडलेली होती, याची हृदयद्रावक वर्णनं अंताजी करतो.

१७९६ ते १८१८ पर्यंत बाजीरावाच्या कारकीर्दीत दंगेधोपे, परस्पर मत्सर, देशद्रोह, यादवी भ्रष्टाचार यांचा सुकाळ झाला. पेशवाई नष्ट होण्याची वेळ होती. दुष्ट, भ्रष्ट, भेकड, अविश्वासी, कर्तृत्वशून्य असा बाजीराव मात्र सुखात नांदत होता. शनिवारवाडय़ावर मजा चाखत असायचा. शिंदे, होळकर, गायकवाड, भोसले, पटवर्धन हे सरदारही आपापली घोडी दामटण्यात मग्न. त्या वेळी महाराष्ट्रात शिलेदार सुखवस्तू लोक, साधुसंत, भिक्षुक, शास्त्री बख्खळ होते. उघडय़ा डोळ्यांनी बुडित बघत होते. कुणबी शेतीत अडलेले. आलुतेदार- बलुतेदार, नाडलेले महार-मांग, इतर जाती गावकुसाबाहेर फेकलेल्या.

 एकदिली आणि देशाभिमान यांचा दुष्काळ होता. सरदार- शिलेदार आणि भिक्षुक-शास्त्री, साधुसंतांचेही डोळे उघडले नव्हते. ते पेशव्यांकडून मिळणाऱ्या लाभाकडे डोळे लावून बसलेले. अशा वेळी शाहीर- तमासगीर पुढे आले. त्यांना पेशवाईत प्रजेकडं दुर्लक्ष होतंय हे जाणवत होतं. अनंत फंदी यांनी याच काळात श्री माधवग्रंथआणि राम जोशी यांनी उगा भ्रमसि वाऊगा कशाला?’ हा पोवाडा लिहून प्रजेची हलाखी नोंदवली. ही हलाखी हृदयद्रावक आहे. या शाहिरांच्या हिमतीला दाद दिली पाहिजे. अनंत फंदींवर तर पेशवाईवर टीका करतो म्हणून पुणे सोडायची वेळ आली. तरी हा कलाकार बधला नाही. त्याने लोकांची बाजू घेतली. अनंत फंदी त्या काळातला सर्वात मोठा परफॉर्मर. सर्व लोक त्यांना फंदीबुवा म्हणत. त्यांनी लावणीचं फटक्यात अन् तमाशाचं कीर्तनात रूपांतर केलं. लावणी, फटके, तमाशे अन् कीर्तन या कलांत ते तरबेज. त्यांच्या फडाचा कार्यक्रम ज्या गावात असे तिथं दरोडे टाकायला आलेले दरोडेखोर म्हणत, गडय़ा आज चोरी-दरोडा नको. फंदीबुवाची कला बघू. मनोरंजन करून घेऊ. फंदीबुवांचे गाव संगमनेर. आडनाव घोलप. यजुर्वेदी ब्राह्मणांतील. कौण्डिण्य गोत्र. घराणे सराफी, शेतकरी, सधन. त्यांच्या बोलण्यात खटका, कवनांत हजरजबाबीपणा. बोलणे चतुर. बिकटवाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडू नकोहा त्यांचा फटका त्या वेळी सामान्य माणसांच्या ओठावर असे. ते होळकरांच्या पदरी होते. अहिल्याबाईंच्या सांगण्यावरून त्यांनी तमाशा सोडला. असा हा मोठा कलाकार पेशवाईत माजलेल्या जातिभेद अन् राज्यकर्त्यां वर्गाची बेफिकिरी, भ्रष्टाचार यांच्या विरोधी उभा ठाकला. असे कलाकार लोकोत्तर ठरतात ते उगाच नव्हे. आजही मराठी खेडय़ांत फंदीबुवाचे फटके लोकांना तोंडपाठ आहेत. फंदीबुवांच्या कलेची वर्णने मुळातून वाचावी इतकी सुंदर, रसाळ आहेत. सांगायचा मुद्दा असा- शाहीर, तमासगीर सोडले तर कुणीही पेशवाईत लोकांसंगे नव्हते. अंताजी ही कहाणी सांगतोय ते सगळं आताच्या काळाची कथाच तर आहे असं वारंवार वाटत राहतं.

अंताजी नोंदवतो- पेशवे ब्राह्मण. भोसले, शिंदे, होळकर, गायकवाड हे मराठा. त्यांच्यातली भांडणं म्हणजे ब्राह्मण विरुद्ध मराठा असा जाती झगडा सुरू झाला शेवटी. एवढी जाततेढ माजली. ब्राह्मण-मराठा या महाराष्ट्राच्या कुटुंबप्रमुख जाती. त्याच एकमेकांवर तुटून पडल्या. मग कुटुंबाचं भलं कसं व्हावं? अशात इंग्रज आलेले. त्यांनी ओळखलं यांच्यात एकदिली नाही. प्रजेला आपण एकसंध आहोतअसं वाटायला लावणारा कारभारी इथे कुणी नाही. प्रजेचा सांभाळ करण्याचं सर्वानी नाकारलं. शिवछत्रपतींच्या आज्ञापत्रात प्रजेबद्दल कळकळ दिसते. या कळकळीची परंपरा मागे तोडरमल, अशोक कौटिलीय अर्थशास्त्रापर्यंत नेता येते. सातारकर छत्रपती आणि पुणेकर पेशव्यांनी ती मोडली. यामुळेच घात झाला. हे ऱ्हासपर्व पुस्तकात वाचताना वेदना होतात. आजच्या राज्यकर्त्यांनी ते वाचायला हवं. इंग्रजांबरोबर पेशवे हरले याला इंग्रजांच्या लांब पल्ल्यांच्या तोफा- बंदुकाभारी भरल्या. त्यांची शस्त्रं प्रगत होती हे कारण अंताजीला तोकडं वाटतं. पेशवाईतल्या राज्यकर्त्यांवर्गाची धारणा बघा- पेशवाईत शहाणपणाच्या भाकरीचे चार चतकोर सांगितले जात. एक- अप्पलपोटेपणा, स्वार्थ. दोन- कोणतेही काम तडीस न नेणे. तीन- फंदफितुरी माजवणे. चार- नशिबावर भरोसा ठेवणे. असा सारा आत्मघाती विचार. तसे वर्तन. याउलट इंग्रजांची धारणा बघा- लढताना एकदिली महत्त्वाची आणि व्यक्तीचा स्वार्थ समूहाच्या मोठय़ा स्वार्थात विलीन करायचा. मराठी समाजात हे गुण पेशवाईत आटले होते. आजही काय परिस्थिती आहे? अंताजी आजच्या काळावर पुस्तकात टीका करतोय असं वाटत राहतं.

पेशवाई बुडतानाचा (१७७४-१८१८) चव्वेचाळीस वर्षांचा काळ. या काळात पेशवे अपयशी ठरले. मराठे सरदार निकामी ठरले. त्या वेळच्या मराठी धर्मसत्तेचं काय? तिनं प्रभूंवर ग्रामण्य मान्य केलं, निम्न जातींना तुच्छ लेखलं. समाजपुरुषाच्या चिंधडय़ा उडवायला सर्वच सज्ज होते. अखेर बुडीत झालेच. अंताजी दु:खी अंत:करणाने हे सर्व नोंदवतो. त्याचं वाचन करणं हा अस्वस्थ करणारा अनुभव आहे. आजचं वास्तव आपण अनुभवतोय असं वाचताना जाणवतं.

पेशवाईचा उदय सहज झाला नाही, तिचा विस्तार बाजीरावांनी आपल्या कर्तृत्वावर केला, तर नानासाहेब पेशव्यांच्या कचखाऊ वृत्तीमुळे पेशवाईची घौडदौड थांबली. तिला थोरल्या माधवरावांनी नवसंजीवनी दिली तर ज्या काळात तिला उभारी देण्याची गरज होती त्या काळात राघोबादादांनी तिच्याविरुद्धच दंड थोपटले. नारायणरावांचा खून झाला, सवाई माधवरावांच्या नावाने बारभाईंनी किल्ला लढवून पाहिला. शत्रू वरचढ होत गेला आणि पराक्रमी योद्धे काळाच्या पडद्याआड जात राहिले. सलग १५ वर्षे पेशवेपद मिळूनही दुसऱ्या बाजीरावांना काहीच करून दाखवता आले नाही. इथेच पेशवाईचा अस्त झाला. दुसऱ्या पेशवाईचा प्रारंभ आणि अंत या दोन्हीही घटना नाट्यमय नव्हत्या तर त्या कालमानानुसार मराठी माणसाच्या आणि तत्कालीन राज्यकर्त्यांच्या मनोवृत्तीचे निदर्शक होत्या असा निष्कर्ष मी यावरून काढतो. राघोबादादांची महत्वाकांक्षा आणि पानपतावरची हार या दोन गोष्टींमुळे ऐन भरात असणारी पेशवाई खचली. एका अर्थाने सूर्य माथ्यावर असताना अंधार पडतो असे म्हणतात तसेच हे झाले असे म्हणावे लागेल. अर्थातच प्रत्येकाचे यावर वेगळे मत असू शकते. वारंवार इतिहासाची नवनवी साधने हाती लागत जातात, त्यावर संशोधन होत जाते अन नव्याजुन्या तथ्यांचे पुन्हा पहिल्यापासून संदर्भ लावले जातात. त्यातूनच इतिहासाची नव्याने मांडणी होत जाते. दुर्दैवाने आपल्याकडे हा प्रकार कमी आहे. मी काही इतिहासकार नाही किंवा संशोधक नाही पण इतिहासाची आवड असलेला सामान्य माणूस आहे. त्यामुळे मला उमजलेला अर्थ वा माझे आकलन योग्यच असायला पाहिजे हा दुराग्रह मी इथे करत नाही. मात्र पुन्हापुन्हा सांगावेसे वाटते की काही दशकानंतर इतिहासाचे सातत्याने पुनर्लेखन होणे गरेजेचे आहे ....

- समीर गायकवाड.