Tuesday, August 30, 2016

झाड ....


गोळा करता, करता जळण,
देहाचेच की झाले सरपण.
डोई चढता लाकडाचा भार,
पाया येई काट्याचा बहार.
चाल्ताची पावले पेटतसे चूल,
माय वनामधी जीवालागे भूल.
माय रातंदीस कामाला जुपे,
जणू औताचा गं बैल रूपे.
घरादाराच्या सावलीसाठी,
मायच्या देहाची होई काठी. 
माय उपाशी भुकेलीच निजे,
न फिटतील उपकार तिजे.
चिंधूडके धडूते नेसून गावभर फिरे,
किस्नाच्या यादीत नाव तिचेच नुरे.
माय तोंडावरून हात फिरवे
तेंव्हा उरी गाती सहस्त्र रावे.
रात होताच तिच्या डोळा येई पाणी,
स्वप्नात वनातला देव येई अनवाणी...

एके दिवशी,
झाड खुडून मायने आपल्या डोईत रोवले
मायच्या जिंदगानीचे झाली हजार शकले !      

- समीर गायकवाड.