Wednesday, August 10, 2016

आम्ही ......

गावाच्या वेशीपासून कोसो दूर असणाऱ्या शेताजवळील वस्तीत राहणाऱ्या हरिबाला एकशे चाळीस रुपयाची जाडजूड ढवळपुरी चप्पल घ्यायचीय. एक महिन्यापासून तो तळपायाला चुका ठोकलेल्या, चार ठिकाणी शिवलेल्या चपला घालतोय. अजून पैसे बाजूला काढणे त्याला शक्य झालेले नाही.
सायकल पंक्चर काढण्याच्या सामानाची ट्रंक घेऊन पिंपळाखाली बसणाऱ्या कवड्याच्या पोराला सावकारीच्या व्याजाचे हप्ते जड झालेत.
हुतात्मा बागेबाहेरील गजरे विकणाऱ्या उस्मानची मुलगी दोनशे रुपयांचे टॉप दोन महिन्यापासून मागते आहे.
धुणेभांडी करणाऱ्या विमलबाईंचा रात्र शाळेत शिकणारा मुलगा शिकवणी लावायची म्हणून जून महिन्यापासून अडून बसला आहे.

रोजंदारीवर रंगकाम करायला जाणाऱ्या माणिकचे आता पाय लटपटतात, रात्री घरी आल्यावर रंगाच्या ऍलर्जीने अंगावर पुरळ येतेय. बायकोला नवी साडी घ्यावी असं त्याला मनोमन वाटते घरच्या टेन्शनने त्याचे बरेच पैसे व्यसनात खर्च होतात.
एसटी स्टॅन्डवर हमाली करणाऱ्या दत्तूच्या वडिलांचे ऑपरेशन दोन वर्षापासून रखडलेले आहे.
रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर पाण्याच्या बाटल्या विकणाऱ्या अझरच्या पायाला चिखल्या झाल्यात अन त्यांचे कपडे जागोजागी फाटलेले आहेत.
पार्क चौपाटीवर चार तास उभं राहून रोज शंभर रुपयांचे खारे चणे फुटाणे विकणारया रास्तेकाकांचे तीन महिन्यापासून घरभाडे थकलेले आहे.
रिक्षा चालवणारया रामभाऊंच्या मुलीला स्थळ येताहेत पण हुंड्यावर गाडी अडकली आहे.
गँरेजमध्ये काम करणारया इस्माईलला स्वतःला सेकंड हॅन्ड गाडी घ्यायचे स्वप्न खूप महिन्यांपासून त्रास देतंय.
भागवत थियेटर बाहेर काकडी कणिस विकणारया ज्योतीला फेअरनेस क्रीम लावावे असे मनापासून वाटते पण त्या साठी पैसे खर्च करण्याची तिची हिंमत होत नाहीये.
सिग्नलवर तान्हुल्यासह भीक मागणारया आशाला रोजच्या जेवणाची अन निवारयाची भ्रांत आहे.
फुटपाथवर झोपणारया कोमूला थंडी ताप आहे, सरकारी दवाखान्याचा त्याला गुण येत नाहीये अन खाजगी दवाखान्यासाठी तोंडावर मारायला फुटकी कवडी देखील त्याच्या कडे नाहीये.
भाजी मंडईत बसणारया गोदामावशीला नवा चष्मा घ्यायचाय, त्यांचा नंबर क्रिटीकल सांगितलाय. जास्ती खर्चाची बाब आहे.
बांधकामावर सेंट्रिंगच्या कामावर जाणाऱ्या बज्जूला लग्न करायचेय, पण स्वतःचे घर नाही, नोकरी नाही, शेतीवाडी नाही, घरी सोन्याचा मणी नाही म्हणून त्याला कोण मुलगी देत नाही.
साड्याच्या दुकानात कामास असणारे काशीराम थकून गेले आहेत, सायकल चालवताना आता त्यांना धाप लागते पण घरातील उत्पन्न तुटपुंजे आहे.
एसटी बस स्थानकावर काम करणाऱ्या रामजीकाकांची पाठ मान दुखते आहे. त्यांना डॉक्टरांनी मोठी शस्त्रक्रिया करायला सांगितलीय पण रकमेची तजवीज होत नाहीये.
अकाली वडील वारलेल्या अब्दुल्लास पुढे शिकावेसे वाटतेय पण खाणारी तोंडे जास्त अन उत्पन्न कमी असल्याने तो हॉटेलात कपबशा विसळायला जातोय.
शेतात राबणाऱ्या कोंडीबाला मुलीची सोयरिक करायचीय पण त्याचं आधीचंच कर्ज फिटलेलं नाही त्यामुळे तो पुरता कासावीस झालाय.
विधवा आनंदीबाईंना आपली तरुण पोरगी समाजातील वाईट नजरांपासून वाचवायचीय, त्यासाठीची हिंमत त्यांच्या मनगटात यावी म्हणून त्या देवाची करुणा भाकतात.
मदनला त्याच्या मुलांची फी भरायची आहे म्हणून तो ओव्हरटाईम करतोय पण त्यासाठी त्याच्या तब्येतीकडे त्याची हेळसांड होतेय.
आरतीला नवे कपडे घ्यायचे आहेत पण आधी घरातील सर्व देणी द्यायची आहेत त्याशिवाय तिच्या अंगाला नवे कापड लागणे अशक्य आहे.                  

आपल्या सभोवताली असे लाखो लोक असतात की ज्यांच्या अगदी छोट्या छोट्या गरजा पूर्ण करणे त्यांना शक्य नसते. त्या गरजांची पूर्तता त्यांना जणू स्वप्नवत होऊन गेलेली असते. समाजाचा एक मोठा हिस्सा अर्धपोटी राहतो शिळेपाके खाऊन आपली गुजराण करतो, एक हिस्सा जुन्यापुरान्या वस्त्रांत आपलं आयुष्य काटतो. या गरजा आपल्यापैकी अनेकांना कस्पटासमान वाटत असतील. काहींनी पान खाऊन थुंकण्याइतपत त्यांचे मुल्य आहे तरीदेखील त्या अधुऱ्याच राहतात. या मनोकामना पुऱ्या व्हाव्यात म्हणून त्यांचा अव्याहत संघर्ष सुरु असतो.      
देशातील पन्नास टक्क्याहून अधिक लोकांच्या गरजा पूर्ण होण्यासाठी त्यांना रोज हात चालवावे लागतात. ...

तरीही आमच्या देशातील स्वतःला विद्वान आणि ज्ञानी म्हणवून घेणारे लोक ‘जात आणि धर्माच्या व्याख्या’ आणि त्यानुसारचे ‘आचरण’ या बद्दलच जास्त कंठशोष करत असतात. मूळ मुद्द्याला होता होईल तितकी बगल दिली जाते. याकरीता सर्वच राजकीय पक्षांबद्दल न बोललेले बरे अन अशा मुर्दाड लोकांना निवडून देणारया व्यवस्थेला कशी आणि कोणती नावे ठेवायची ?

याशिवाय देशभरातील अनेक लोक गाय, गोमांस, स्मारकं, पुतळे, जयंत्या, मयंत्या, पुण्यतिथ्या, फतवे, दुखवल्या जाणारया भावना, आहार, पोशाख, टोपी, गंध, अभिनिवेश, संस्कृती, वर्ण, संस्कार, धर्मग्रन्थ, धर्मस्थळे, डॉल्बी, स्पीकर, सार्वजनिक सर्वधर्मीय प्रार्थना, धर्मांतर , मिरवणूका, आरक्षण, नामबदल, नामविस्तार अशा एक ना अनेक लाखो गोष्टीवर तासंतास रक्त आटवत बसलेले दिसतात, आमचे प्राधान्य कशाला आहे याचे हे द्योतक आहे.

विकसित देश आणि आपल्यात जमीनअस्मानाची दरी का वाढते आहे याचा विचार करताना आम्ही या मुद्दयालाच फाट्यावर मारतो आणि आपला शहाजोगपणा चालू ठेवतो. कदाचित हीच आमची ओळख बनून गेलीय आणि आम्ही असेच आहोत याचे आम्हाला काही सोयरसुतक उरलेले नाही कारण आम्ही पुरते कोडगे आणि निलट झालेलो आहोत...

- समीर गायकवाड.