Saturday, August 13, 2016

अघळपघळ ....बायडाअक्का


गावाकडची माणसं मोकळी ढाकळी असतात अन त्यांची मने देखील ऐन्यासारखी !
मी घेऊन जातोय तुम्हाला अशाच एका निर्मळ मनाच्या आजीकडे जी फटकळ आहे पण मायाळू आहे..
चला तर मग माझ्या बायडाअक्काला भेटायला ...  

गावाकडं कधी कधी अत्यंत इरसाल शब्दांत असे माप काढले जाते की समोरच्या माणसाची बोलती बंद व्हावी..
माझ्या नात्यातील पुण्यात स्थायिक झालेले एक नातलग सहकुटुंब गावी आले होते. गावात आल्यावर घरातल्या सर्वांच्या त्यांनी भेटी घेतल्या अन त्यांच्या घराकडे निघणार इतक्यात मंदिरात गेलेली आजी बायडाअक्का घरात आली. आत आल्याबरोबर तिने या पाहुण्यांना नखशिखांत न्याहळले. तिच्या 'तिरकस-चौकस' नजरेकडे पाहूनच मी ओळखले की आता कुठला तरी फटाका फुटणार अन झालेही तसेच...
पुण्याहून आलेल्या त्या कुटुंबीयात एक षोडशा होती जी आवळ टीशर्ट आणि त्याहून आवळ लेगीन्स घालून घरी आली होती. आजीने तिला अगदी खालपासून वरपर्यंत निरखून बघितले आणि तिच्या वडिलांकडे वळून तिने अत्यंत कुत्सित स्वरात पहिला प्रश्न केला -
"आरे ए गजा, हीच का तुजी पोरगी ?"
आजीच्या बोलण्याच्या स्वरावरून गजेंद्र उर्फ गजा पवार याला सुद्धा आता काहीतरी मुक्ताफळे आपल्याला ऐकावी लागणार हे लक्षात आले आणि गॅस संपल्यावर पाहुणे घरात आल्यावरचा दीनवाणा भाव आपल्या चेहऱ्यावर आणून अगदी जिकिरीने तो उत्तरला - "होय गं, बायडाअक्का ती माझीच मुलगी आहे .."
"तुजं डोळं तपासून किती वखत उलटलाय ?"तळ्यावर धुणं धुवायला बायका गेल्या की त्या एकेक कापड काढून त्याला साबण लावून बाजूला करतात तसं आजीने बहुतेक आता एकेक प्रश्न विचारून गजाची पिसे काढायचे नक्की केले असावे...'
"अक्का, सहा महिनेच झाले...पण का गं ?" गजूला हा 'गं' गिळावा लागला कारण बायडाअक्काने पुढे होत त्याच्या डोळ्याचा चष्मा झपकन काढून घेतला होता.
"काचेचाच दिसतोय नव्हं .." असं म्हणत म्हणत सहाणेवर बदाम घासावा तसे तिने चष्म्याच्या काचावर दाबून बोट फिरवले. ती काचेवर बोट फिरवत असताना गजाच्या गिळलेला आवंढा मला स्पष्ट जाणवला. 
"बायडाअक्का, अगं जरा जपून..." इत्यादीपैकी आपण काही बोललो तर आपल्या चष्म्याची काडीसुद्धा नीट हाती लागणार नाही हे त्याला चांगलेच ठावूक होते. 
"हिची आय कुठाय ?" पदर कमरेला खोचत खोचत बायडाअक्का आत डोकांवत विचारती झाली. वर्गात पोरांना प्रश्न विचारत असतानाच मास्तरांनी टेबलाच्या ड्रॉवरमधून पोरं बडवून काढायची जाड लाकडी पट्टी हातोहात ज्या सहजतेने बाहेर काढावी त्याहून अधिक सहजतेने बायडाअक्काने बोलत बोलत तिचा पदर आता कंबरेच्या कोपऱ्यात खोचला होता. 
म्हणजे एकवीस तोफांची सलामी झडणार हे स्पष्ट होते. 

या प्रश्नामुळे उंचावरून जमिनीवर पडलेले मांजर टुणकन सावध होऊन ताठ बसते तशी अवस्था गजाची झाली.  गजाने ओळखले की आपली काही धडगत नाही. कारण बायडाअक्का म्हणजे कुणाची भीडभाड न ठेवता मनात काय आहे ते बोलणारी. समोरच्याला काय वाटेल हा विचार तिच्या गावी नसायचा. पहिल्या फलंदाजाने मागचे काय दिवा लावतील याचा फारसा विचार न करता आपल्या लयीत खेळावं तसं बायडाअक्काचा सवालजवाब चाले. तिच्या खौट खडूस रग्गील लयीत !
काही तरी वेळ मारून देणारे उत्तर देण्यासाठी गजा तोंड उघडणार इतक्यात त्याचा नोबॉल पडला !
शेजारच्या घरी हळदी कुंकवासाठी गेलेल्या सुमनवाहिनी अचानक घरात आल्या, बकऱ्याने येऊन सुरी चाटावी तशा त्या आजीच्या पाया पडायला वाकल्या. आजीने तिच्या पाठीवर हात ठेवला मात्र तोंडात तिची 'जपमाळ' सुरु झाली होती. 
"इतकी नटून थटून कुटं गेल्तीस ?" हा प्रश्न विचारताना बायडाअक्काने तिच्या ओठापर्यंत आलेलं "नाचणगौरी" हे शेलकं विश्लेषण कसंबसं परतावून लावल्याचं मला जाणवलं.  
विदयार्थ्याने अदबीने जवळ यावे अन मास्तरांनी "गधडया, परमेश्वर अक्कल वाटताना कुठे गेला होतास ?"असं विचारत त्याचा कोवळा कान दात खाऊन लालबुंद होईस्तोवर पिळल्यावर त्या विद्यर्थ्याचा जसा चेहरा होतो तसा सुमनवहिनींचा चेहरा झाला होता.

आता बायडाअक्काचा हा रागदारीचा कार्यक्रम आणखी रंगतदार होऊ नये म्हणून मी जरा घसा खाकरला. 
आजीच्या बेरकी नजरेतून माझं खाकरणं सुटलं नाही. तिनं माजघरात डोकावत हाळीच दिली - "सविता, आगं ये बाई ! तुज्या नवऱ्याला जरा सुंठसाखर देशीक त्याला लई खवखवायला लागलंय. अन त्येनं बी थांबलं न्हाई तर कडूलिंबाचा काढा दे, त्येच्या तोंडाला उलशिक चव तर यील."
माझ्या खाकरण्याच्या तिने चिरफाळ्या उडवल्या आणि पुन्हा सुमनवहिनीकडे आपला मोर्चा नेत तिने विचारले - " पोरीला कपाळ हाय जणू !"
वहिनींची पाचावर नव्हे थेट पन्नासावर धारण बसली. काहीजरी बोललो तरी समोरून चाबकाचा वार येणार हे त्यांनी ओळखले असावे. त्या मिनिटभर गप्प राहिल्या. 
एव्हाना माझी सौभाग्यवती बाहेर आली होती. ती बायको असल्याने अर्थातच माझ्यापेक्षा हुशार होती. तिने बाहेर येतच इथं पानपताचा अंक रंगतोय हे ताडले होते. त्यामुळे पदर सावरत ती आजीपुढे आली नि म्हणाली "आत्याबाई, त्यांना आजच परत जायचेय. अजून दोन घरं राहिलीत. त्यांची गाडी चुकंल !"
"तू बी लई गं काळजीची ! सारओढी कुठली...( सारओढी हा शब्द इतक्या ढंगदार पद्धतीने म्हणायची की तो ऐकणारयाला गोड वाटावा. पण सदर प्रसंग हा हातघाईचा असल्याने मी कुणाची जरी सार ओढली तर बायडाअक्का माझा दत्ताजी शिंदे करणार हे मला ठावूक असल्याने तिच्या या शब्दावर कर्णबधीर असल्याचा आव आणला होता) त्येची काळजी तू करु नगंस गं माजी माय ! त्येची गाडी चुकली तर चुकली मी पाठीवर घेऊन जाते त्यांना. कारण मी इच्चू हाये ना ! माझं बोलणं टोचतं समद्यास्नि. म्हणूनशान तू लगी लागलीस कड घायला. जा आत ! अन आतून कुकू घेऊन ये, पोरीचं कपाळ पार भुंडं ठेवलंय."
दरम्यान गजूच्या मुलीची चुळबूळ सुरु झाली होती. आजीने कुंकू म्हणताच तिने डोळे विस्फारले. 
आजीच्या ऐरणीवर धार लावलेल्या नजरेतून हे कसे सुटेल बरे !
तिने तिच्या लॅक्मे लॉरियल निव्हिया मिश्रित मुलायम गालावरून आपला खडबडीत हात फिरवत अत्यंत नाटकी आवाजात आपला शब्दसुरा फिरवला - " आगों आगं आगं माझी बाय गं ती ! मी काय तुला इख दिऊन मारत न्हाय गं बाय ! इत्कं घाबराया काय झालंय ?"
मग अचानक आपला मोर्चा गजूकडे वळत ती म्हणाली. अडकित्त्यात कातरण्यासाठी सुपारी दोन दांडयामध्ये धरावी तसे ती गजेंद्र या गर्भगळीत झालेल्या भाकड बैलाच्या समोर येऊन म्हणाली, "तुझी आई वैजंता कशी हाये रे ? म्हथारी काय करती दिवसभर घरात बसून ?" ( बायडाअक्काचे एक लई भारी असते, ती सर्व वृद्धांना म्हातारा नाहीतर म्हातारी असं विशेषण लावत असते. अन तिची वेळ आली की म्हणत असते, 'मी काय म्हतारी जाली न्हाई आजूक, तुज्या गवऱ्या मसणात लोटूनच मी वर जाणार हाये !'. तिचं हे वाक्य अन ते उच्चारण्याची ढब पाहून यमदूतदेखील उलटया पावली मागे फिरले असते तिथे तिच्या समोरच्याचा पार पाला पाचोळा उडालेला असे. ) 

गजाला तिने आता चरकात ऊस पिळावा तसे पिळून काढायला सुरुवात केली होती, "अजून तुझा बा जित्ता हाय न्हवं... तवा तिच्या कपाळाला कुकू आसल जणू ...का इसरली पुण्यात जाऊन ? ...तुझी बायको तर टिकली लावती जणू. ती बी येव्हढूढी, डोक्यातल्या वा येव्हढी !"
आजीने कुंकवाच्या आकाराची तुलना डोक्यातल्या ऊवांशी करूनही ऐकणाऱ्यापैकी कोणीही झीट येऊन पडले नाही याबद्दल मी तिथल्या तिथं मनातल्या मनात परमेश्वराचे आभार मानून टाकले. 
आता विषय आणखी वाढू नये याची काळजी घेत गजेंद्रने अत्यंत हुशारी केली. तो सविताला म्हणाला, "वहिनी इशिकाला लावायला कुंकू आणा पटकन आम्हाला जायचंय. बराच उशीर होतोय, शिवाय बायडाअक्का घरात आल्यापासून आमच्यामुळे उभ्याच आहेत.." नळाच्या तोटीतून हवा गेल्यानंतर एकदम पूर्ण दाबाने सणकून धडाडा पाणी पडावं तसं तो एका श्वासात बोलला. 
"असलं कसलं रे पोरीचं नाव ?" आजीच्या या चेंडूवर गजूचा स्टंप उडून थेट स्टेडीयमबाहेर पडला. 
"जसं नाव तसं ध्यान !" आजीची वाटचाल हॅटट्रीकच्या दिशेने सुरु होती. 
"नावं कशी पाहिजेत ? आं ती बी इसरलास ? सरस्पती, काविरा, मंजुळा, यश्वदा, भामा अशी कित्ती नावं तुला सांगू रं ?" ( 'आता ही नावं चालत नाहीत', असं जर तिला कुणी म्हटलं असतं तर तिनं त्याला 'चालण्याजोगा' देखील ठेवला नसता. कारण वेळप्रसंगी ती चुलीतल्या लाकडाचा हत्यार म्हणून दणकून वापर करत असे)
नावांच्या या सरबत्तीने चिरंजीव गजूचा चेहरा एरंडेल प्यायल्यासारखा झाला होता. 
पण एव्हढयावर गप बसल ती बायडाअक्का कसली ? लोहाराने भाता फुलवत राहावं तसे तिने आपले प्रश्न फुलवतच ठेवले होते. 
"आरे एक टैम चंद्रिका म्हण... पण असलं कसलं रे नाव ? यास्श्हीका का शूर्पनका ?"
आजीने परजलेल्या या शब्दवज्रामुळे गजूकडे आणि त्या निष्पाप मुलीकडे पाहण्याचे माझे धाडस झाले नाही. पण त्या मुलीला बहुतेक शूर्पनखा ज्ञात नसावी कारण आजीने इतका उदात्त उद्धार करूनही तिच्या चेहऱ्यावर कुठलेच भाव प्रकटले नव्हते. गजू आणि सुमनवहिनी मात्र आता पुरते निरुत्तर झाले होते. 
माझ्याकडे पाहत तिने पुढचा चेंडू गजेंद्रकडे भिरकावला, "पुण्यात कापडाची दुकानं जळाली जणू ! व्हय ना रे बाप्पू ?" या चेंडूवर ती गजालाच बाहेर भिरकावून देते की काय या भीतीने माझ्या पोटात वायगोळा गरागरा फिरला !

इतक्यात सविता कुंकू घेऊन बाहेर आली आणि स्कंधपुराणातील पुढील अध्याय 'वाचले' !
गजा आणि सुमनवाहिनींनी आपल्या मुलीला चि. इशिका या घट्टवस्त्रीय षोडशेला नेत्रपल्लवी करून खुणावले. तशी इशिका आजीच्या पुढे झाली अन तिच्या पायावर वाकली. 
"पोरीला वाकाया येतंय की ! म्हंजे आजून वाफशात धग हाय म्हणायची !"
गजूकडे वळत पोरीच्या पाठीवर आपला भेगाळलेला तळहात फिरवत बायडाअक्का नरम स्वरांत बोलली, "अरे तुला दिसत न्हाई का रे बाबा ? काय कापडं घातलीत रे बाबा तिनं ? पांडुरंगा बगतुयास नव्हं !" इशिकाचा चेहरा या वाक्याच्या थ्रो टाईमने  अंगावर पाल पडल्यासारखा झाला. 
"अगं पोरी आधी ह्या कपाळाला आधी आपली तरी वळख दे, कुकू लाव. कुकू आवडत नसंल तर एकादी टिकली लावावी गं चिमणे !"
आजीने सविताने आणलेल्या करंडयातील कुंकू घेऊन तिच्या कपाळावर मायेने वर्तुळले. 
या दरम्यान काही सेकंदासाठी का होईना बायडाअक्काकडून एकतर्फी युद्धबंदी लागू झाल्याने त्याचा फायदा घेत गजू आणि वाहिनींनी काही मिनिटात घरातून पाय काढता घेतला.....

ते गेल्यावर मी बायडाअक्काला म्हणालो," का गं चिडलीस त्या पोरीच्या कपड्यावर. तिथं पुण्यात नव्हे तर सगळीकडे अशीच कपडे घालायची फॅशन आहे. तुझे विचार बरोबर असतील पण नव्या काळाप्रमाणे तिथं राहावं लागतं. नाहीतर लोकं हसतात. तूच सांग ते कपडे तुला कसे वाटले ?"
"खरं सांगू का ?" असं म्हणत ती लगेच उत्तरली - 
"जवारीच्या ठिक्याला गंजीफरास आवळून घालावा तशी तिची कापडं. अन तू मला वर तोंड करून इचारतो की, 'कश्शे वाटले तिज्जे कपडे ?'
आजीच्या या अफाट कल्पनाशक्तीला मी मनोमन वंदन केले आणि आपली बत्तीशी आवळून ठेवली. कारण लेगीन्सची आणि टी शर्ट या वेशाच्या तिने केलेल्या चिंध्या माझ्या आकलना पलीकडच्या होत्या. 
ज्वारीच्या ठिक्याला बनियन कसा काय घालता येतो हा विचार घोळवत मी शांत बसलो कारण माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता.   
मला कधी कधी प्रश्न पडतो, 'तिच्यामध्ये हे सगळं येतं कुठून ?'

कंबरेत किंचित वाकलेली, अजूनही रानात चालत जाणारी, खुरपं चालवण्यापासून ते केळीचे खुंट कापणारी अन चातुर्मासात काकडयाला जाणारी, पांडुरंगाला रोज खडीसाखर चिरमुरे वाहणारी, भोकं पडेपर्यंत त्याच त्या इरकली लुगडयाशिवाय साड्या न बदलणारी, नवरा गेला तरी छाताडाचे पहाड करून जगणारी, डोईवरच्या चांदीवरून पदर घेणारी, सुरकुतलेल्या कपाळावर बुक्क्याला मिरवणारी, गळ्यातल्या तुळशीच्या माळेला कुरवाळणारी, काष्टा मारलेलं लुगडं नेसून फिरताना पाठपोट झाकलं जातंय का नाही याची काळजी घेणारी, स्वच्छता आणि टापटीप अंगात भिनलेली,  सुकल्या ओठानी जप करणारी, अंगावर दागिना न घालणारी, निम्मी बत्तीशी गायब होऊनही डोळ्यात चमक असणारी, गुराढोरावर प्रेम करणारी, वेळप्रसंगी हाती कासरा धरणारी, पाण्याने भरलेली कळशी उचलणारी अन वटपौर्णिमेला हळवी होणारी बायडाअक्का म्हणजे माझ्यासाठी एक कधीच न संपणारी अवीट गोडीची रसाळ मायेची चवदार शिदोरी होती. जिचा मी कधी तिरस्कार केला नाही. जग बदलले, जगाचे विचार बदलले. पण ती तिथेच आहे पण ती जिथे आहे तिथे ती खूप समाधानात आहे. मी मात्र जगाप्रमाणे बदलत गेलो आणि दिवसागणिक असमाधानी होत गेलो ...     

आणि हो, त्या दिवसानंतर चि. गजेंद्रची सुकन्या इशिता आमच्या आजीपुढे कधीच आली नाही....

- समीर गायकवाड.