Thursday, July 7, 2016

वेश्यांची मुले - एक कैफियत ; 'बॉर्न इनटू ब्रॉथेल्स'..जगभरात हे एक असे ठिकाण आहे, जिथे तरुणींना, अल्पवयीन मुलींना जबरदस्ताने ढकलले जाते. ते ठिकाण वेश्यालय. मात्र याच परिसरात जन्म घेणा-या आणि तिथेच लहानच्या मोठ्या झालेल्या मुलींना लहानपणापासूनच या गोष्टी शिकवल्या जातात.तिथल्या मुलांचे कोमेजलेले विश्व कसे असते ? पश्चिम बंगालच्या कोलकाताच्या सोनागाछी परिसरात एक डॉक्युमेंट्री चित्रित झाली होती. तिला त्यावर्षीचे ऑस्कर देखील मिळाले होते. हा परिसर वेश्यालयासाठी ओळखला जातो. अशा परिसराला 'बदनाम गली' असे सामान्य भाषेत म्हटले जाते. या परिसरात राहणा-या महिलांची आणि मुलांची छायाचित्रे लंडनच्या सॉविद दत्ता या फोटोग्राफरनेही काढली होती ज्याला पाश्चात्त्य जगात गौरवले गेले. या परिसरात जाणे आणि राहणे खूप कठिण असते, तरीदेखील येथील महिलांचे -मुलांचे चित्रण समर्थपणे केले गेले आहे ...


जवळपास १२ हजार मुली सोनागाछीमध्ये राहतात. त्या येथे सेक्स वर्कर म्हणून काम करतात. त्यात १८ वर्षाखालील मुलीदेखील समील आहेत. येथे अनेक मुली शाळा सोडून येथे काम करताय. येथे लहान असो अथवा मोठी प्रत्येक तरुणीला देहव्यापारात ढकलले जाते. येथे जन्मलेल्या मुलींना लहानपणापासूनच येथील सर्व कामे शिकवली जातात. तसेच मुलांना स्ट्रिट गँगला सांभाळण्यास शिकवले जाते. येथे जन्म घेणा-या मुलींच्या नशीबीच देहव्यापारासारखी शिक्षा लिहिलेली असते. कोलकातामधील या वेश्यालयावर बनवलेली ती फिल्म होती बोर्न इनटू ब्रॉथेल्स. (Born Into Brothels)

कोची,शांती,सुचित्रा,अविजित,माणिक,गौर, पूजा मुखर्जी आणि तापसी व अमेरिकी पत्रकार जेना ब्रीस्की यांची ही कथा आहे. सोनागाछीमधल्या एक अंधारया गल्लीतून डॉक्युमेंट्री सुरु होते आणि आपल्याला सव्वातास खिळवून ठेवते. उंदरांची बिळे, रंगांचे पोपडे उडालेल्या भिंती, पान खाऊन जागोजागी मारलेल्या पिचकारया, ठिकरया उडालेल्या पायरयावरून भेलकांडत वरखाली जाणारी दारू पिलेली माणसे, डोळ्यात पोटाची आग घेऊन अर्धउघड्या वेशातल्या भडक मेकअप करून उभ्या असलेल्या बायका-पोरी, जिन्यांच्या कानाकोपरयात खितपत पडलेली रोगट माणसे अन जगण्याची शर्यत हारलेल्या अन या अंधेरी दुनियेची अडचण झालेल्या वृद्ध गलितगात्र स्त्रिया आणि तिथली ही मुले एकेक करून समोर येत राहतात.पडेल ती कामे करणे, देतील त्या शिव्या ऐकणे अन दृष्टीस पडेल ते पाहणे आणि या सर्वांचा एकत्रित अर्थ लावणे ही या मुलांची दिनचर्या. यात भांडी घासण्यापासून ते अंथरून लावण्यापर्यंतची सर्व कामे आहेत. मोठाल्या आंटीला बादलीभर पाणी अंघोळीला काढून देण्यापासून ते किरकोळ बिडीकाडीची शॉपिंग अशी नानाविध हरकामे ही मुले करतात.तिथे येणारी माणसे वाईट आहेत, हे पुरुष असे का वागतात असा यांचा एक प्रश्नही आहे. '१० वर्षाच्या किशोरवयीन कोचीला आता सांगितलं जातंय की तिला लवकरच 'लाईन' मध्ये यायचंय' हे तिच्या तोंडून ऐकताना तिची निरागसता आपल्याला अंतरबाह्य हादरवून टाकते. पत्रकार जेना ब्रीस्की ह्या सर्व मुलांना एकेक कॅमेरा आणि भिंग देते. या कॅमेरयाशी ती मुले खेळणी समजून खेळू लागतात. नंतर फोटो काढू लागतात. ह्या मुलांनी काढलेली स्थिर छायाचित्रे आपल्या डोळ्यात पाणी आणतात. त्या फोटोत एक कौशल्य म्हणून काहीही विशेष नाही पण त्यात जे दिसते ते अत्यंत विदारक अन बोलके आहे.या व्यवसायातलं वेठबिगारी जीवन स्वीकारलेल्या आपल्या आई-वडिलांसोबत राहणारी शांती आणि माणिक ही दोन भावंडे सांगतात की आई बंदखोलीत काम करते तेंव्हा गच्चीवर जावे लागते.या भावंडांनी काढलेले फोटो त्यांच्या घरातलं अस्ताव्यस्त अमिबा सारखं आयुष्य आपल्या समोर मांडतात .
कोचीला तिचा बाप विकणार होता पण ती मावशीमुळे वाचली. तिच्या आईचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे, तिची सहा भावंडे मेली आहेत. आईने एकदा हावडा ब्रिजवरून उडी टाकून जीव देण्याचाही प्रयत्न केलेला आहे. कोचीच्या आजीला तिला या धंद्यात आणायचे नाहीये. पहाटे ४ वाजल्यापासून कामाला जुंपली गेलेल्या कोचीमध्ये तिची आजी स्वतःला पाहते.ती तिला घेऊन वसतिगृहात येते.तिथे सगळी चौकशीचे लचांड तिच्या मागे लागते. कोची शाळेचा गणवेश घालून तयार आहे पण शाळेच्या प्रवेशाची जुजबी कागदपत्रे तिच्या घराच्या त्या छोट्याशा खोलीवजा उकीरड्यामध्ये सापडत नाहीयेत.हे सगळं अगदी सहज आपल्यापुढे येत राहतं आणि आपण सुस्कारे सोडत ते बघत राहतो.
 लहानग्या पुजाच्या आईला तिचा बाप दारूसाठी बडवत राहतो आणि ती व तिची आजी हताश होऊन बघत राहतात. गौरला वाटते की पुजाला येथून दूर कुठेतरी घेऊन जावे. या नरकातून तिची सुटका करावी, पण कसे आणि कुठे हे त्याला माहिती नाही. एकदा ही सगळी बच्चे कंपनी दोन वेगवेगळ्या टॅक्सीमधून प्राणीसंग्रहालयाला भेट द्यायला जातात. तेंव्हा त्यांच्या तोंडची शिवीगाळी आणि धक्काबुक्की याचं आपल्याला काही दुःख वाटत नाही.

पौगंडावस्थेत असलेल्या सुचीत्राची आई तिच्या लुगड्यातला अंधार धुता धुता आकाशीच्या बाप्पाला शिव्यांची लाखोली वाहायला गेलीय. तिला आता तिची मावशी सांभाळते. तिने सुचित्राच्या मागे धोशा लावला आहे मुंबईला जाण्याचा. तिला मुंबईच्या स्पॉट मध्ये धंद्यात लावून आतापर्यंत झालेला सर्व खर्च तिला वसूल करायचा आहे.सुचित्राच्या घरातल्या सर्व मुली लाईनमध्ये आहेत.आता तिनेही जायला पाहिजे असं तिथलं मत आहे. गौर आणि पूजाला मात्र हे अमान्य आहे.सुचीत्राला मात्र यावर उपाय काय आहे ते माहिती नाही.साखळीला बांधलेली लहान भावंडे, क्षयाने खंगलेले दारुडे बाप आणि दुपारच्या वेळेस डोक्यातल्या ऊवा काढत मांड्या दाखवत बसलेल्या रिकाम्या बायका हे इथले अविभाज्य भाग डोळ्यापुढे तरळत राहतात...
जेना ब्रीस्की या मुलांच्या निवासी शाळेच्या प्रवेशासाठी एका मिशनरी शाळेत जाते. सोनागाछीचे नाव ऐकून लोक कसे नाके मुरडतात यांचे ती किस्से ऐकते. चिंचोळ्या, अंधारलेल्या जळमटलेल्या गलिच्छ किळसवाण्या गल्ल्यामधून कॅमेरा फिरत राहतो. आपल्याला पाहिजे असलेली स्त्री घेऊन तिच्या चिंध्या चिरगुटाच्या घराकडे चालत जाणारी कसल्या तरी एका अनामिक धुंदीत चाललेली माणसे. भगभगत्या बल्ब खाली आपल्या देहाचा बाजार मांडून यंत्रवत उभ्या असलेल्या डार्क शेड मधल्या त्या मुली सतत समोर येत राहतात...कोलाहलात जगणारी माणसे, खरकटे खाणारे भुकेले लोक यांचे फोटो गौरने काढलेत. तो ठासून सांगतो, 'गावाकडे लोक मातीच्या लहान घरात राहत असतील पण ते त्यात सुखी आहेत. इथल्या सारखं बकाल आणि घाणेरडं जीवन कुठल्या देशात नसेल असं त्याचं बालमन सांगतं..." त्याला या सर्वांची घृणा आहे. तर अविजित हा चित्रेही खूप चांगली काढतो. त्याने काढलेले फोटो त्याच्यातल्या कलेची साक्ष देतात.सुनील हलदर हा त्याचा बाप आहे. आधी धडधाकट असणारा चांगली दोनचार माणसे बुकलून काढणारा सुनील पुर्वी चांगल्या वर्तणुकीचा होता. तो आता दिवसभर गांजा पीत असतो. अविजीतच्या घरात सकाळी उठ्ल्याप्सून लोक दारू प्यायला येतात. जे लोक पैसे देत नाहीत त्यांच्या मागे लागून त्यांचे पैसे आणणे हे अविजीतचे काम आहे.
जेना या सर्व मुलांना घेऊन समुद्र किनारयाच्या सहलीवर जाते. छान छान नवे कपडे घातलेली ही मुले पाहताना सुद्धा आपल्याला आंनद व्यक्त करता येत नाही इतके आपण खजील होऊन जातो. या सर्व मुलाना घेऊन जाणारी ती जादुई बस आणि पार्श्वसंगीतात वाजणारे गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला आपल्याला अजून विचार करायला भाग पाडते. बीचवरती खेळणारी ती निरागस स्वच्छंद मुले पाहताना आपल्याला वाटू लागते की ती तिथून परत जाऊच नयेत.दिवस मावळतीला लागतो, सहल परत फिरते. बसमध्ये आता मुली फिल्मी गाण्यांवर नाचू लागल्या आहेत अन बस त्या भगभगणारया बल्बच्या रस्त्यांवरून जाऊ लागलीय. आत मुलींचे नाचगाणे चांगलेच रंगलेय, हे पाहताना आपल्या काळजाचा नकळत थरकाप उडून जातो. आपली सुखवस्तू मुले उगाच डोळ्यापुढून तरळून जातात. नाही म्हणत म्हणत मुले आणि बस त्या चिंचोळ्या रस्त्याला लागतात. पुन्हा तोच बाजार आणि तिच माणसे ....सकाळी उठल्यावर लहानग्या माणिकला त्याच्या शेजारची बाई फरफटत ओढत नेऊन जनावरांसारखे मारते त्यावेळेस दिल्या जाणारया अर्वाच्च अभद्र लिंगवाचक भोचक शिव्या आणि तिथली सकाळची संथ निर्जीव बेचव रुटीन समोर येते. डॉक्युमेंट्रीतल्या पुढच्या प्रसंगात जेना अविजितच्या रेशन कार्डसाठी सरकारी कचेरीत जाते तो प्रसंग मेंदूत शिसे ओतून बधीर करून जातो....
छायाचित्रकार रोसं कुफमेन या मुलांना फोटो काढण्याच्या आणखी काही टिप्स देतात. बाह्यजगातल्या चार गोष्टी विमानापासून ते वर्तमानपत्रापर्यंतच्या अर्थासह त्यांना सांगतात. 'मला आधी डॉक्टर व्हावे वाटत होते, नंतर आर्टिस्ट व्हावे वाटत होते पण आता काही नाही..माझ्या आयुष्यात आशा नावाची गोष्टच नाही' असं अविजित त्यांना सांगतो. मुलांना संगणक शिकविला जातो तेंव्हा त्याना त्यावरून जेना मावशीसोबत गप्पा माराव्याशा वाटतात. या मुलांमध्ये ती सर्व प्रज्ञा आहे जी डॉक्टर, वकील, इंजिनियर होणारया इतर मुलांमध्ये आहे.पुढे या मुलांवरती परदेश दौऱ्याचे सर्व सोपस्कार पार पाडले जातात आणि डॉक्युमेंट्रीच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने काहींची विदेश वारी निश्चित होते. त्याआधी जेना त्यांना सबेरा या 'होम फॉर हेल्पलेस चाईल्ड' निवासी शाळेमध्ये दाखल करते, तेंव्हा घरातून निघताना आपआपल्या आईचे,आजीच्या पायी ही मुले मस्तक ठेवतात. हळवी होतात,रडू लागतात.
अॅमस्टरडॅमला भरलेल्या जागतिक छायाचित्र प्रदर्शनात अविजितने काढलेली छायाचित्रे समाविष्ट होतात, तो त्याने काढलेल्या छायाचित्रातले दुःख तिथे विषद करून सांगतो. तिथून परतलेला जीवनात आशा नाही म्हणणारा अविजित आशेच्या नव्या घरात जातो. माणिकचे वडील मात्र त्याला बाहरेच्या जगात सोडत नाहीत. काही दिवसांनी पुजाच्या आईने पुजाला सबेरामधून काढून नेले आहे. शांती मात्र स्वतःच्या जबाबदारीवर सबेरा सोडून गेली आहे. जीवनातल्या मोठ्या विषयावर बोलणारा गौर मात्र सबेरामध्येच आहे, त्याला विश्वविद्यालयापर्यंत शिकायचे आहे. फारसे न बोलणारी तापसी मात्र सबेरा सोडून पळून गेली अन नंतर तिने संलाप या फक्त मुलींसाठी असलेल्या निवासी शाळेत स्वतःला भरती करवून घेतले आहे. सुचित्राच्या मावशीने तिला या नरकातून बाहेर काढण्यास नकार दिला आहे आणि बडबडी कोची सबेरातच खुषीत आहे.या डॉक्युमेंट्रीनंतर या मुलांवर लिहिलेले पुस्तक, फिल्म आणि प्रदर्शनातून झालेला नफा या अंधारलेल्या वस्तीतल्या उजाड मुलांना देण्यासाठी 'किड्स विथ कॅमेरा' ही संस्था काढलेली आहे.फिल्मच्या श्रेयनामावलीत सत्यजित राय फौंडेशन, माता मृदुलानंदमयी आणि १४वे दलाई लामा यांचीही नावे आहेत.फिल्मच्या शेवटी जेना काही मुलांसमवेत ह्या गल्ल्यांमधून पाठमोरी चालत जाताना दिसते आणि फिल्म संपते.
यामध्ये काही शॉटस साठी मुलांच्या कपड्यात कॅमेरे लपवले गेले होते, त्यात ग्राहकासोबत शोषल्या गेलेल्या स्त्रिया आणि जवळच काळीज पिळवटून टाकेल अशी रडणारी आईच्या दुधावर जगणारी अर्भके यांचा आवाज होता. यामुळे कोलकत्त्यात फार मोठा गदारोळ माजला होता.

'पश्चिमी जगाला आपले दैन्य, भकासपणा, भुकेकंगाल जिणे, मानवी हक्कांची सर्रास होणारी पायमल्ली आणि बालकांची- स्त्रियांची पिळवणूक यामध्ये खूप स्वारस्य आहे' असे म्हणून आपण या फिल्मला आपल्या पळपुटया अवसानघातकी वास्तवापासून दूर लोटू शकत नाही. फिल्ममधली पहिली ४० मिनिटे आपण जितके बेचैन होतो तितके आपण शेवटच्या विसेक मिनिटात होत नाही. कारण आपली हतबलता आणि आपल्या बोथट संवेदनानी आपण इतके निगरगट्ट झालो आहोत की फिल्मच्या शेवटी तर आपण निव्वळ सुस्कारे सोडून या जगण्याप्रति दळभद्री सहानुभूती व्यक्त करून आपल्या सामाजिक जाणिवांचा षंढपणा अलगद लपवतो. इथल्या अफाट समस्या, अगदी तोकडे व्यवस्थापन, त्रोटक एनजीओ आणि भरीस भर आपली स्वप्नदोषग्रस्त पंगु झालेली शासनव्यवस्था ! या सर्वांवर काय बोलावे आणि काय लिहावे ?ब्रोंथेल म्हणजे वेश्यालये.to board या अर्थाने वापरल्या जाणारया जुन्या जर्मन बोर्ड या शब्दापासून फ्रेंच bordel हा शब्द आला आणि पुढे brothel हा शब्द रूढ झाला. ह्या ब्रॉथेलमध्ये जन्मलेली ही अभागी मुले आणि त्यांच्या या तहहयात नरकयातनांचे आपण करंटे, कर्म दरिद्री साक्षीदार हा टोकदार अपराधीपणा खूप खोलवर आघात करून जातो अर्थातच ज्याच्या जाणीवा अन संवेदना जिवंत आहेत त्यालाच हे आघात जाणवतात....

फिल्मला आता बारा वर्षे झाली आहेत.यातली दोनेक मुले वगळली तर बाकी त्या नरकातच आहेत.बाहरेच्या जगातल्या आपल्या इतर माताभगिनीना सुखाचे आणि बरयापैकी सुरक्षित असे जे काही जीवन आज जगता येतेय त्यामागे अशा गावोगावच्या ब्रोथेल्समधल्या नरकातलं असह्य अब्रूच्या चिंधड्या उडालेलं आयुष्य आपल्या या अनामिक माता भगिनी आणि कोवळी बालके जगतायत. त्यांच्या जगण्याला सलाम म्हणावा इतकी देखील माझी लायकी नाही...

ही फिल्म बघताना कुठेही अश्लीलपणा येऊ दिलेला नाही, देहप्रदर्शनही टाळले आहे. तरीसुद्धा इतकी खोलवर आघात करणारी ही फिल्म बघून कुणाच्या सेक्स विषयक भावना उद्दीपित होत असतील तर त्याने आपल्यात एक लिंगपिसाट श्वापद आहे असे समजण्यास काही हरकत नाही...


- समीर गायकवाड.