Tuesday, July 19, 2016

सुंबरान मांडिलंऽऽ सुंबरान मांडिलं.....


महिनोनमहिने वणवण भटकणाऱ्या धनगरांचे पाय पावसाळ्यात जेंव्हा आपल्या वाड्यावस्त्याकडे वळतात तेंव्हा लोकसंस्कृतीचा एक नवा अविष्कार बघायला मिळतो. मेंढरामागं धावत धावत जीवन उभं करणाऱ्या धनगर समाजाचा हा एक हक्काचा विरंगुळा असतो. पावसाळ्याच्या चार महिन्यात गावी असलेल्या धनगरांची पावलं सायंकाळी मेंढरांना वाड्यात कोंडलं की ढोलाच्या आवाजाच्या दिशेनं पडतात. मग सुरू होतं गजनृत्य आणि 'सुंरान मांडिलं गा, सुंरान माडिलं,' चा घोष! धनगरी समाजाच्या अस्मितेचं प्रतीक असणारं हे गजनृत्य आता माणदेशातील सर्व जातीधर्माची शाळकरी मुलं पुढं नेतायत. माणदेशात छोट्या-छोट्या 'बनगरवाड्या' बहुसंख्येनं आहेत. त्यामुळं धनगर समाज इथं एकवटलेला आहे. त्यामुळं माणदेशी महोत्सवाला धनगरी बाज नसता तरचं नवल.

काय आहे गजनृत्य...
मेंढपाळ असणारा धनगरी समाज हा नृत्य प्रकार सादर करतो. धनगर मेंढी, बकर्‍या यांचे कळप पाळतात आणि तेच त्यांच्या दैनंदिन जीवनाचं साधन असतं. त्यांचं जीवन सदाहरित हिरवी झाडं, निसर्ग यातूनच प्रेरित झालेलं असतं आणि ते ओव्यांच्या रूपानं त्यांच्या ओठी येतं. या सर्व कविता बर्‍याचदा त्यांचं दैवत सतोबा याच्याशी संबंधित वर्णन करणाऱ्या असतात. धनगरी नृत्य ही त्यांची पूजा आहे. म्हणजे हा समाज आपल्या देवतेला प्रसन्न करण्यासाठी आणि त्याचे आशीर्वाद मिळवण्यासाठी धनगरी गाजा सादर करतात. हे नृत्य गोलाकार फेर धरून ढोलाच्या तालावर केलं जातं. पारंपरिक वेशभूषा या गजनृत्यासाठी धनगरी पारंपरिक वेशभूषा वापरली जाते. पायात घुंगरू चाळ, फेटे, चोळणा, रंगीत रुमाल, घाटन्या आदी वस्तू वापरल्या जातात, त्याला ढोल आणि काठीनं साथ दिली जाते.


धनगर ही शेळ्या-मेंढय़ा राखणारी जमात. गोकुळ, वृंदावन आणि मथुरेहून मजल दरमजल करीत धनगर बंधू गुजरात आणि पुढे महाराष्ट्रात आले. हटकर, व्हटकर, कुटेकर, शेंगर, अहिर, कुरुबा, भारवाड, खाटिक, कोकणी धनगर यासह धनगर समाजाचे जवळपास १४ उपघटक. शंकर, विष्णू, पार्वती, महालक्ष्मी ही त्यांची कुलदैवते. विरोबा, शिदोबा, खंडोबा, म्हसोबा, विठोबा, तुळाई, यमाई, अंबाबाई त्यांचे देव. धनगरी ओव्या गुणगुणायला लावणारया तर धनगरी नृत्य म्हणजे कुणालाही ठेका धरायला लावणारे. पावसाळ्याचे चार महिने सोडल्यास धनगरांची वर्षाचे आठ महिने भटकंती ठरलेली. त्यांचे मार्गही ठरलेले. घोडय़ावर संसार. शेळ्या-मेंढय़ा, कुत्रे, कोंबडय़ा त्यांचे सखेसोबती. ना घर ना दार, नाही शिक्षण, नाही नोकरी अशा बिकट अवस्थेत भटकंती करणारे धनगर बंधू. अजूनही सामाजिक, आर्थिकदृष्टय़ा मागासलेले आणि राजकीयदृष्टय़ा असंघटित. पारंपारीक शिक्षणापासून हा समाज वर्षानुवर्षे वंचित होता. तरीसुद्धा आपल्या कुलदैवतांची आराधना, प्रार्थना करणाऱ्या "ओव्या' मौखिक रूपात एका पिढीकडून पुढच्या पिढीला शिकविल्या गेल्या. त्या ओव्या "मौखिक वाङ्‌मय' या सदरात मोडतात. छापील ठोस लेखन-साहित्य आजही उपलब्ध होऊ शकले नाही, कारण "निरक्षरता'! तरीही तोंडी, पाठांतराद्वारा या सांस्कृतिक ठेव्याचे जतन हजारो वर्षे धनगरांनी केले, हे अत्यंत कौतुकास्पद आहे.


आजच्या "साक्षर' पिढीला "मौखिक वाङ्‌मय' हा शब्द कदाचित खटकणारा वाटेल, तरीही हा शब्दप्रयोग योग्य आहे, असे मला ठामपणे नमूद करावेसे वाटते. धनगर समाज आपल्या राज्यापुरते बोलायचे झाल्यास तो राज्यातील सर्वात मोठा मेंढपाळ, पशुपालक समाज आहे. काही धनगर शेतीसुद्धा करतात. घोंगड्या विणणाऱयांना "सनगर' म्हणतात, तर मेंढ्या पाळणाऱ्यांना "हाटकर' म्हणतात. आपल्या मेंढ्यांना बरोबर घेऊन धनगर दिवाळीनंतर चाऱ्यासाठी भटकंती करीत असत. पावसाळ्याच्या सुमारास आपापल्या गावी परतत असत. पुढे पावसाळी चार महिने गावातच राहत असत.

"खेळ' हा त्यांचा मोठा उत्सव कुलदैवतांच्या आराधनेसाठी साजरा केला जातो. प्रामुख्याने खंडोबा (जेजुरीचा), धुळोबा (विडणीचा), बिरोबा (आरेवाडीचा), मायाक्का (चिंचणीची), भिवाई (कांबळेश्‍वरची), शिंग्रुबा (खंडाळ्याचा)... या देव-देवतांची आराधना, स्मरण करण्यासाठी या "ओव्या' मराठीत म्हटल्या जातात. ओवीच्या सुरवातीला सूर्य, चंद्र, पृथ्वी (जमीन), नद्या, मेघ (ढग) यांना नमन करून कुलदेवतांचे स्मरण केले जाते. ढोल व झांजांच्या तालावर, ठेक्‍यात व ठसक्‍यात या ओव्या गायल्या जातात. बऱयाच वेळा बासुरी (पावा) सुद्धा वाजवली जातो.


जात्यावर गायल्या जाणाऱ्या ओव्यांपेक्षा किंवा ज्ञानेश्वरीतील ओव्यांपेक्षा धनगरी ओव्या भिन्न आहेत, वेगळ्या आहेत, हा महत्त्वाचा फरक लक्षात घेणे आवश्यक आहे. धनगरी ओवीचे ढोबळमानाने दोन भाग पडतात. पहिला भाग म्हणजे "गाणे' (पद्यरूपात सादर).

हा भाग "गाऊन' दाखविला जातो. दुसरा भाग म्हणजे "कथा'! हा भाग गोष्टीरूपाने (गद्यरूपात) सांगितला जातो. गाणारे वेगळे असतात. कथा सांगणारे वेगळे असतात. कथेच्या भागाला "सपादनी' म्हणतात. गाण्यातील माहितीच कथारूपाने पुन्हा पुन्हा सांगितली जाते. ओवीची "गायलेली' प्रत्येक ओळ किमान दोन वेळा, तर कधी कधी चार वेळा सलग म्हटली जाते. तीच ओळ दुसरा, तिसरा, चौथा आळीपाळीने म्हणतो. पहिल्याची चूक झाली असेल तर पुढचा गाणारा ती चूक सुधारून घेतो. कथा सांगणारेसुद्धा "मागच्याची चूक' सुधारून घेतात. प्रत्येक वेळेला "चाल' बदलून नव्या चालीत गाणे म्हणण्याची व कथा सांगण्याची प्रथा धनगरांनी जपली आहे. तसेच प्रत्येक वेळी "आवाज' बदलून गाणे व कथा सांगितली जाते, हे विशेष! आणि हीच खरी आगळी-वेगळी ओळख आहे धनगरांच्या "मौखिक वाङ्‌मयाची' म्हणजेच "ओव्यांची'! या लेखात तीन दैवतांची माहिती आपण घेऊ, ती म्हणजे बिरोबा, धुळोबा आणि शिंग्रुबा यांची!धनगरांचे मुख्य दैवत बिरोबा! -
धनगरांचे मुख्य दैवत आहे "बिरोबा' आणि त्यांची आई सुरावंती. या ओव्यांमध्ये बिरोबांच्या आईची माहिती तपशीलवार सांगितली जाते. तसेच बिरोबांची जन्मकथासुद्धा सांगितली जाते. यानंतर बिरोबांच्या मानलेल्या बहिणीची म्हणजे पायक्काची आणि बिरोबांच्या पत्नीची म्हणजे कामाबाईची माहिती "गाण्या'त व "कथे'तून सांगितली जाते.

दुसरे दैवत धुळोबा!
धनगरांचे दुसरे दैवत धुळोबा. धुळोबांच्या आणि बिरोबांच्या कथांमध्ये एक समानता आहे. दोघेही एका विशिष्ट पद्धतीनेच जीवन जगले... म्हणजे... जन्म, बालपण, तारुण्य, विवाह, गृहस्थी जीवन आणि दुष्टांचा नाश! परंतु या दोन कथांमध्ये महत्त्वाचा भेदसुद्धा आहे.
धुळोबांच्या ओव्यात देव भक्ताला भेटायला येतो! धुळोबांच्या ओव्यात धुळोबा आणि भिवाई (नदी-देवता) या बहीण-भावांच्या नात्यावर जास्त जोर दिलेला आढळतो.

तिसरे दैवत "शिंग्रुबा'
मुंबई-पुणे मार्गावर खंडाळ्याच्या घाटात शिंग्रुबा नावाचा धनगर राहत होता. ब्रिटिशांनी मुंबई-पुणे लोहमार्ग व
रस्ता (रोड) सह्याद्रीच्या घाटातून तयार करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा "रस्ता' कसा व कोठे तयार करायचा व रूळ (रेल्वेचे रूळ) कोठल्या भागात टाकायचे, हे ब्रिटिश इंजिनिअरांना समजावून सांगणारा हा धनगर शिंग्रुबा! धनगरांची स्वतःची अस्मिता जपत शिंग्रुबाने आधुनिक तंत्रज्ञानाचे आव्हान स्वीकारून मानवजातीच्या कल्याणासाठी कसे अफाट कार्य केले, त्याची चित्तरकथा शिंग्रुबाच्या ओव्यांतून सांगितली जाते. शिंग्रुबा वर्षानुवर्षे या घाटाच्या कुशीत, डोंगरमाथ्यावर, डोंगर-कपारीत आपली मेंढरं चरायला नेत असे. त्यामुळे येथील जमिनीची, कड्याकपारींची, जमिनीच्या भुसभुशीतपणाची व दगडी-टणकपणाची खडा न्‌ खडा माहिती त्याला होती. ही माहिती त्याने इंग्रजांना सांगितली. त्या माहितीच्या आधारेच वैज्ञानिक दृष्टिकोनातून तपासणी करून, सह्याद्रीच्या खंडाळा घाटात डोंगर फोडून रस्ता तयार केला गेला, बोगदे निर्माण केले गेले व मुंबई-पुणे जोडले गेले. म्हणूनच शिंग्रुबाला आधुनिक देव मानले जाते. परंतु निर्दयी व धोकेबाज ब्रिटिश अधिकाऱ्यांनी रस्ता तयार झाल्यावर शिंग्रुबाला बंदुकीच्या गोळ्या मारून ठार मारले. ज्या जागेवर शिंग्रुबाला ठार मारले, त्या जागेवर, घाटात, शिंग्रुबाचे स्मरणार्थ एक छोटुकले देऊळ बांधले गेले. प्रत्येक ड्रायव्हर, प्रवासी आपले वाहन क्षणभर थांबवून, शिंग्रुबाला वंदन करूनच, पुढे जातो. आजही ही प्रथा पाळली जाते. जर्मन संशोधक प्रो. सोन्थायमर यांनी मराठी भाषेत धनगरांच्या मौखिक वाङ्‌मयाचे "छापील' ग्रंथसंग्रहात जतन करण्याचे महान कार्य केले आहे. प्रोफेसर गुन्थर सोन्थायमर पुण्यात आले. मराठी शिकले व १९६६  ते १९९१ या काळात धनगरांच्या चालीरीती, संस्कृती, ओव्या, इतिहास, पशुपालन पद्धत यावर जागतिक कीर्तीचे संशोधन केले. प्रत्यक्ष या ओव्या कशा आहेत, याची कल्पना येण्यासाठी "शिंग्रुबा'च्या ओवीतील काही निवडक भाग.


"शिंग्रुबाची ओवी' -
इठ्ठल-बिरुदेवाचं चांगभलं।
खेलु महादबुवाचं चांगभलं।।
सुंबरान मांडिलं सुंबरान मांडिलं (दोन वेळा म्हणणे)
सुंबरान मांडलं गं, सुंबरान मांडलं गं।
(सुंबरान याचा अर्थ स्मरण, इथे अर्थ शिंग्रुबा-देवाचे स्मरण)
सुंबरान मांडिलं, सुंबरान मांडिलं
पइल्या सत यौगाला आता।
खंडाळ्याच्या घाटाला खंडाळ्याच्या घाटाला। गोरा मंग सायेब 
शिंग्रुबा हे नावाचा। रहात व्हता धनगर
खंडाळ्याच्या घाटाला। शेळ्या-मेंड्या राकाइला
आन गोरा मंग सायेब। रस्ता लागलं धुंडाइला
गोरा मंग सायेब। रस्ता लागलं धुंडाइला
खंडाळ्याच्या घाटाला। रस्ता नव्हता घावत
गोरा मंग सायब। शिंग्रुबाला बोलतो
रस्ता दाव आमाला। म्होरं तवा जायाला
हर हर म्हादेवाऽऽ हर हर शंकरा.."
आता ऐका! गोऱ्या साहेबाला शिंग्रुबा धनगराने रस्ता दाखविल्यावर काय बक्षीस गोऱ्या सायबानं शिंग्रुबाला दिलं त्याची कथा! (निर्दयी ब्रिटिशांनी शिंग्रुबाला बंदुकीच्या गोळ्या घालून ठार केलं.) 
"गोऱ्या मंग सायबानं हो। 
बंदुकीला गोळी या आन्‌ गोळी त्यानं भरले। 
शिंग्रुबाला मारले गोळी त्यानं भरलं। शिंग्रुबाला मारलं
गोळियांचा आवाज गं। मेंड्यांच्या ये कानाला
आन्‌ गोळी मग आइकून। शिंग्रुबाच्या भवतनं
गोळी मग आइकून। शिंग्रुबाच्या भवतनं
शेळ्या बगा मेंड्या या। शिंग्रुबाच्या भवतनं
आन्‌ गोळा बगा वव्हून। वर्डायाला लागल्या
आन्‌ नाराळाचं फळ या। फळ बगा देऊन
आन्‌ खंडाळ्याच्या या घाटाला। गाडी उबा या राहिलं
नाराळाचं फळ याऽऽ फळ बगा देऊन
गाडी गेली निगूनऽऽ पुण्याच्या हे जाग्याला
हर हर महादेवाऽऽ हर हर ये शंकरा
सुंबरान मांडिलंऽऽ सुंबरान मांडिलं"

जगण्याच्या जाणीवा समृद्ध करणाऱ्या महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा हा अनमोल खजिना अजूनही मराठी माणसाकडून आणि मराठी माध्यमांकडून उपेक्षित आहे याची खंत वाटते... जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही दुर्लक्षिलेली माहिती पोहोचावी म्हणून पोस्टचा खटाटोप... 
  
- समीर गायकवाड.

(छायाचित्र सौजन्य - श्री. कल्याणजी वर्मा, माहिती संदर्भ - 'सुंबरान मांडिलं' - डॉ.श्री.सुधीरजी तारे )