Sunday, July 31, 2016

नव्या अरण्योत्सुकाचा उदय.......


१७ जुलै, नाशिक, आमच्या 'कुबेर'समुहाचा वर्धापन सोहळादिवस ! श्री. संतोषभाऊ लहामगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आयोजित केलेल्या या देखण्या मेळाव्यात अनेक सृजनांची, प्रज्ञावंतांची, प्रतिभावंत कलाकारांची अन मान्यवरांची भेट झाली. याच सोहळ्यात भव्य रुपात काही पुस्तकांचे प्रकाशन झाले. पुढच्या फावल्या वेळेत प्रकाशित झालेली सर्व पुस्तके विकत घेतली. ही सर्वच पुस्तकं चांगली होती. मात्र हर्षद बर्वेंच्या पुस्तकावर नजर जास्त खिळून राहिली त्याचे कारण पुस्तकविषय आणि आशय !

वाघ, सिंह, हत्ती यांचा माझा संबंध सर्कशीपुरता होता आणि आहे. मागे चुकून एक दोन अभयारण्यात जाऊन आलो आणि बंद काचेच्या बसमधून फक्त पॉपकॉर्न खाण्याव्यतिरिक्त काही हाती लागले नाही. त्यामुळे पुन्हा
तिकडची वाट वाकडी केली नाही. बालपणी सर्कस छान वाटायची आता मात्र सर्कशीच्या तंबूबाहेरचा प्राण्यांचा उग्र दर्पाचा भपकारा डोकं उठवून जात, हा दर्प शैशवात देखील येत असणार पण तेंव्हा सगळे ध्यान वाघ सिंहांवर केंद्रित असल्याने वास गौण होता. आता तर हिंस्त्र श्वापदे व धोक्यात असलेले प्राणी सर्कशीत सामील करता येत नाहीत. अर्थात ही वेळ आपणच आणली आहे. वन्य प्राण्यांची अशी दुरावस्था आपणच केली आहे. अलीकडील काळात त्यामुळेच नागरी वस्तीत जंगली प्राणी आढळून येण्याचे प्रमाण वाढले आहे. वन्य जीवांच्या अशा हातघाईच्या नेमक्या काळात बर्वेंची ही दोन पुस्तके आली आहेत हा चांगला योगायोग म्हणावा लागेल. आपल्या अक्षम्य हेळसांडीमुळे आज आपण आपली शान समजली जाणारया वाघ चित्त्यांना संरक्षित प्रजातीत समाविष्ट करून बसलो आहोत. या बद्दलची जागरुकता नैसर्गिक ओढीने वाढविण्यात ही पुस्तके यशस्वी ठरतील. त्या पुस्तकांचा थोडक्यात घेतलेला हा गोषवारा...

'टायगर अँड आय' या इंग्लिश भाषेतील चकचकीत आकर्षक पुस्तकात प्रसिस्द्ध वन्यजीव छायाचित्रकार
चार्ल्स ग्लेझर यांनी त्यांच्या प्रस्तावनेत लिहिलंय - "You can feel the passion in his iemages that stirs the soul for all things wild "... एका दिग्गज छायचित्रकाराने दुसऱ्या छायाचित्रकाराला दिलेली ही दाद खूप बोलकी आहे. बांधवगढच्या अरण्यातील झुरझुरा आणि कल्लू यांचे अन ताडोबामधील सर्किट आणि त्यांचं कुटुंब यांचे बर्वेंच्या फोटोग्राफीतच नव्हे तर त्यांच्यात मनात देखील वेगळे स्थान असल्याचे यातील विलक्षण देखण्या अन बोलक्या तसबिरींवरून स्पष्ट होते. 'टायगर अँड आय'च्या दुसऱ्या आवृत्तीत वाघ का वाचवले पाहिजेत हे बर्वेनी भारदस्त शब्दात लिहिलंय -
"They are royal neighbours, living with pride and dignity, guarding our world like the kimgs that are. If we fail to love and respect these marvelous friends, we will indeed deserve the calamity that follows........I Humbly request all of you to play your part in tiger conservation so my grandchildren can experience the same joy that I\have been gfted with."
येणारया पिढ्यांना ही धरोहर अनुभवू दयायची असेल तर त्याचे रक्षण आणि संगोपन करण्याची जबाबदारी निस्संशयपणे आपलीच आहे अन आपण ती पार पाडली नाही तर आपल्यासारखे करंटे आपणच असू.

'टायगर अँड आय' ह्या १२० पानी पुस्तकात एकूण ९४ छायचित्रे आहेत. प्रत्येक छायाचित्र कुठे  आणि
कोणत्या  कॅमेरयाने व कोणती लेन्स वापरून, किती अंतरावरून काढलेय याचे तपशील छायाचित्रावर एका कोपरयात देण्यात आल्यामुळे त्याविषयी अधिक माहिती मिळत जाते. यातील वाघांचे क्लोजअप्स अत्यंत विलोभनीय आहेत, प्रकाश आणि अंतर यांचा योग्य मेळ घालून काढलेले हे फोटो आपले डोळे खिळवून ठेवतात, प्रत्येक फ्रेम देखणी आहे, शिवाय भिन्नही आहे तरीही त्यांचे तार कुठेतरी आपल्या मनात जुळत राहतात... सावलीत आरामात बसलेला वाघ असो वा संथ पाण्यात बसलेला वाघ असो दोघेही आकर्षक वाटतात अन पुढच्याच क्षणी आक्रमक वाटतात. पट्टेदार वाघाचं पाण्यात पडलेलं प्रतिबिंब तर अगदी मोहक दिसते.रस्ता ओलांडणारा किंवा रस्त्यातच आडवा उभा राहणारा वाघ जितका अंगावर आल्यासारखा वाटतो तितकाच सावजाच्या टप्प्यात येण्याची वाट बघत असलेला कोणत्याही क्षणी हल्ला चढवण्यासाठी सज्ज असलेला वाघ अगदी भेदक वाटतो. दोन पाय पुढे करून
अन मागचे पाय पोटात मुडपून बसलेला वाघ वरवर शांत दिसतो पण पुढच्याच पानावरचे त्याचे कराल जबडे शहारे आणतात. सकाळ असो वा संध्याकाळ वा रणरणती दुपार सूर्यप्रकाशाचा वापर बर्वेनी अगदी खुबीने केल्याचे त्यांच्या प्रत्येक तसबिरीत जाणवते. पानगळ झालेली पिवळसर झाडे, अधून मधून उगवलेले हिरवे कोंब अन वाळलेली झुडुपे याचा वापर चित्रपटाच्या सेट सारखा झाला आहे. पान क्रमांक १०२ वरती पाणवठयाच्या बांधावर गवतात दबा धरून बसलेल्या वाघाचे छायाचित्र इतके बोलके आहे की आता काही घटिकात तो झेप टाकणार असं वाटतं. वाघांच्या बछडयांची छायाचित्रे  आपल्या अंतर्मनाला स्पर्श करून जाणारी आहेत. खरेच आपलं कुटुंब आपण जपतो जर या वाघांच्या पिढ्या आपण नीट जोपासल्या नाहीत तर हे बछडे अनाथ होतील अन कालांतराने ते देखील नाहीसे होतील. पृथ्वी आपली एकट्या मनुष्यप्राण्याची नसून सकल चराचराची आहे याची जाणीव पुस्तक पाहत असताना  वारंवार होत राहते. माझ्या मते हे छायाचित्रकार म्हणून हर्षद बर्वेंचे मोठे यश म्हणावे लागेल.

शिकार करणारे वाघ असोत की शिकार टप्प्यात येण्याआधी त्यांच्यावर आपली करारी नजर राखून बसलेले
वाघ असोत वा सावलीचा वापर खुबीने करून (पान क्र.७१) असो दगडांच्या आड लपून नजर रोखून बसलेल्या वाघाचे फक्त डोळे असोत हे वाघ आपल्या मनात एक अनामिक आकर्षण निर्माण करतात अन आपल्याला देखील तिथे प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन हे सारं अनुभवावंसं वाटते. ही उर्मी दाटून येणे ही या पुस्तकाची यशाची पावती आहे असं मी समजतो....

"आफ्रिका आणि मी"  या पुस्तकात बर्वे आपल्याला आपण घरात पुस्तक वाचत - पाहत बसलो असलो तरी  मनाने आफ्रिकेत घेऊन जातात. आपला देह घरी अन चित्त आफ्रिकेत अशी आपली अवस्था होते. हे देखील १२० पानांचे कॉफी टेबल बुक टाईपचे पुस्तक असून त्यात ४८ छायाचित्रकथा (photostories) आहेत. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बर्वेंचे अभियांत्रिकीमाधील शिक्षण झालेय.  अन त्या पश्चात नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय उभा करून आपले छंद जोपासणाऱ्या बर्वेनी साहजिकच आपल्या कुटुंबीयांचे आभार प्रस्तावनेत मांडलेत. माजी खासदार भारतकुमार राऊत यांनी प्रस्तावनेत केलेला जिम कॉर्बेटचा उल्लेख लेखकास अगदी चपखल लागू होतो.

प्राण्यांना विचलित न करता किंवा त्यांना हानी वा इजा न पोहोचवता तासंतास योग्य पोजसाठी ताटकळत
बसून एका क्लिकसाठी दिवस वाया घालवण्याची मानसिक तयारी व प्रचंड एकाग्रता याच्या जोरावरच हा फोटोग्राफीचा उद्योग करता येतो याची जाणीव ह्या पुस्तकात देखील होते. या पुस्तकात जीववैविध्य अधिक आहे. यात नजर गोठवून ठेवणारा चित्ता आहे, काळजात धडकी भरवणारा जंगलाचा जीवघेण्या शांत मुद्रेतला सिंहही आहे. केफ बफेलो आहेत, आपल्या कडच्या सांबरासारखे दिसणारे राजबिंडे इलेंड आहे, विल्डबीस्ट आणि झेब्र्याचे ग्रेट मायग्रेशन आहे, आफ्रिकन कोल्हा आहे, कोरी बस्तार्ड-   क्रेन पक्षी आहेत, माउंट किलीमंजारोच्या विशाल पृष्ठभूमीवरचे विशालकाय हत्तींचे कळप आहेत, मसाई माराची लाईफ असणारया मारा नदीचे एअर फोटोग्राफीतून घेतलेलं मनोहर छायाचित्रही आहे, केनियाच्या अंबासोली राष्ट्रीय उदयानातील हत्तींचा फोटो तर घरात फ्रेम करून लावावा असा विलोभनीय आहे. पाण्यात डुंबणारया हिप्पोचे कळप आहेत, आपल्या पिलांना शिस्त लावत एकत्र करून नेणारी इजिप्शियन गुसदेखील आहे, जीव वेडावून टाकणारे व्हाईट रायनो डोळे विस्फारून टाकतात. वेस्टर्न सेरेंगटी मधील डोळ्यात न मावणारा हत्तींचा विशाल कळप व त्याच्या मागे असणारी आभाळाची निरभ्र निळाई आपल्याला आफ्रिकेत घेऊन जाते. याच भागातील पिवळ्या शेडमधल्या वाळून चाललेल्या गवताळ भागातले शेकडोंच्या संख्येतले विल्डबीस्टचे घोळके थक्क करून सोडतात.

'आफ्रिका आणि मी'चं आणखी एक मला भावलेलं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक फोटोची एक छोटीशी कथा फोटोच्या शेजारी दिली आहे. त्यात त्या प्राण्याची थोडक्यात माहिती तर आहेच शिवाय फोटो काढण्याआधीची हकीकत त्यात आपल्या पुढे येते त्यामुळे त्यातील बारकावे समजायला मदत होते. ताकदीच्या दृष्टीने दोन विजोड प्राण्यातील लढत - 'हायना आणि सिंह', चित्त्याच्या कुटुंबाची कथा - 'माय लेकरांची कथा', सिंहांच्या प्रजननाचा ऐरणीवर आलेला प्रश्न - 'नेमकं कुठे चुकतं आहे', हरिणाच्या शिकारीची कथा - 'अखेरचा श्वास', सिंहाच्या छाव्यांची गाथा - 'लहानपण दे गा देवा',सिंहाच्या मादयांची देखणी - 'द क्वीन', केनियाच्या लेक नाकारू मधील एकशिंगी रायनोची 'बिग बॉय' ही कथा, शिकार आणि जन्म मरण यांचे संबंध क्रूर हिंस्त्र असले तरी जैविक साखळीसाठी ते गरजेचे आहेत हे सांगणारी 'फूड चेन' ही शिकारीची फोटोस्टोरी, तर ग्राउंड हॉर्नबिल या लुब्ध रंगीत पक्षाची 'पौराणिक पक्षी' ही छोटेखानी माहिती हे सारं मनोहारी आहे.
नुसते वन्यजीव वैविध्यच यात बर्वेंनी हायलाईट केलं आहे असंही नाही. विमानातून काढलेलं सेरेंगटी बायोस्पियर हे छायाचित्र आपल्या डोळ्याचे पारणे फेडते. विमानातूनच टिपलेला मोंबासाच्या मँग्रूव्हजचा फोटो देताना लेखकाने खंत व्यक्त केलीय की, 'ते (आफ्रिकन्स) मँग्रूव्हज जतन करताहेत अन ते मोडून विमानतळ बांधतो आहोत. 'माणसा माणसा कधी होशील माणूस' या सारख्या फोटोस्टोरीतून लेखकाची निसर्गाप्रती असणारी संवेदनशीलता अधिक गहिरी होते. 


एक वेगळा उल्लेखही करावा वाटतो. या फोटोकथात एक वेगळीच कथा आहे - 'मौत तो एक पल है' या शीर्षकाची ! या कथेचे वैशिष्ट्य लेखाकाच्या खिलाडू वृत्तीत अन प्रामाणिकपणात आहे ते यासाठी कारण एखाद्या चांगल्या हॉट स्पॉट फोटोच्या वेळेस नेमकं सेटिंग चुकलं तर काय फरक पडू शकतो म्हणून लेखकाने हा फोटो उत्तम मनाजोगा न येऊनही या पुस्तकात ठेवला आहे. पण मला वाटते फोटोत जो काही एक दशांश एक्सिसचा फरक पडला असेल त्याच्या दहापट परिणामकारकतेची कसर या स्टोरीने भरून काढली आहे. या सर्वच फोटोकथांत अन लेखकाच्या मांडणीत दम आहे. त्यात माहितीच्या ज्ञात असण्याचा अहंकार नाहीये. ओघवत्या शैलीत सर्वसामान्य वाचकांना समजेल अशा वर्णनाद्वारे लेखक आपल्याला त्या विश्वात सहज सामील करून घेतो ही यातील लेखनाची जमेची बाजू म्हणावी लागेल.पुस्तकासाठी प्रिंटवेल इंटरनॅशनलने पुस्तकाच्या छपाईसाठी जागतिक दर्जाचा कागद वापरला आहे, याची छपाई अत्युच्च दर्जाची आहे, छायाचित्रांची स्पष्टता शब्दातीत आहे, छपाईत रंगांची मुक्त हस्ते उधळण करताना कुठेही हात आखडता घेतलेला नाही. सहज हाताळण्याजोग्या टेबलबुकच्या आकारातील हे पुस्तक आपल्या संग्राह्य असावे असेच आहे. प्रुफ रीडर्सनी काही व्याकरणिक त्रुटी दूर केल्या असत्या तर तीळमात्र उणीव यात राहिली नसती. पुढील आवृत्तीत या छोट्याशा त्रुटीवर लक्ष दिले जाण्याची अपेक्षा. दहा एक वर्षांची मेहनत घेऊन आपला उदरनिर्वाहाचे साधन सोडून, आपला मूळ प्रांत सोडून एखादा अवलिया जेंव्हा आपल्या आयुष्यातील तब्बल ३६५ दिवस या मुशाफिरीत घालवतो तेंव्हा त्यातून निर्माण होणारी कलाकृती नेहमीच श्रेष्ठ दर्जाची असते या समजाला दृढ करणारी या पुस्तकांचे समीक्षण करताना मी असं म्हणेन की, "गुरुवर्य व्यंकटेश माडगूळकरांच्या नंतर जंगल अन शिकारींचा लळा मराठी रसिकांच्या मनात कायम ठेवण्याचे कठीण काम मारुती चितामपल्ली सरांनी केलं. पण त्यांच्या विश्रांतीनंतर आता या क्षेत्रात मोठा अवकाश निर्माण झालाय. तो हर्षद बर्वेंच्या रूपाने भविष्यात भरून निघून शकतो. म्हणूनच बर्वेंच्या रूपाने मराठी साहित्यात एका नव्या अरण्योत्सुकाचा उदय झाल्याचे विधान करावेसे वाटते.सरते शेवटी या वनसंपदेचे आपण पुढे काय करायला पाहिजे याचे नेमके विश्लेषण मांडले नाही तर लेख अपुरा राहील. बर्वेंच्याच शब्दात सांगायचे तर - "आपण या सगळ्यांचे ट्रस्टी आहोत, पुढील पिढीला हे सगळे प्रत्यक्ष बघता यायला हवे, ही आपली जबाबदारी आहे. हे सगळे वाचवताना आपण कोणावरही उपकार करत नसून स्वतःवर कलंक लागू देत न लागू देण्याची भावना मनात असायला हवी. इतके जर आपण शकलो तरच आपण खरे 'माणूस' ठरू !'

- समीर गायकवाड.

( सूचना - लेखात वापरलेली छायाचित्रे कॉपीराईट ऍक्टअन्वये प्रोटेक्ट केलेली आहेत त्याचा वापर वा मुद्रण करून व्यावसायिक वा प्रदर्शनात्मक वापर करण्यापूर्वी लेखक व कॉपीराईटचे स्वामित्वधारक हर्षद बर्वे यांची परवनागी घेणे अनिवार्य आहे. पुस्तके हवी असल्यास barveharshad@yahoo.com किंवा rucha.hb@gmail.com या ईमेल पत्त्यावर संपर्क करावा )