Saturday, July 23, 2016

गौरी गणपती ...आज गौराईचे पूजन झाले. ज्या दिवशी गौराई घरी येतात, त्या रात्री त्यांची खातरदारी करून त्यांचा जामानिमा करण्यात, त्यांची आरास करण्यात घरातल्या बायकांची अख्खी रात्र मोडायची. अजूनही तो सिलसिला जारी आहे. एकेकाळी सख्खे चुलत मिळून आम्ही ३२ भावंडं होतो. सगळेजण एकापेक्षा कुरापतीखोर अन करामती ! त्यामुळे बालपणी गौराई आणायच्या रात्रीस आम्हाला दुसऱ्या वाड्यात कोंडून ठेवलं जायचं. जेणेकरून आम्ही मध्ये लुडबुड करू नये. त्रास देऊ नये, खेळण्यांची मोडतोड करू नये. गौराईसाठी केलेल्या खमंग, चविष्ट खाद्यपदार्थावर डल्ला मारू नये म्हणून ही खबरदारी घेतली जायची.गौराईंचे मुखवटे उभे करण्यापासून ते त्यांची प्रभावळ बांधण्यापर्यत आणि त्यांच्यासमोर आरास करण्यापासून ते विविध फळे. खाद्यपदार्थ मांडण्यापर्यंत अनेक कामे असत. हे सर्व प्रत्यक्ष उभं करताना, यांची मांडणी करताना पाहणे हा निर्भेळ अन निखळ आनंददायी असे.

या आनंदाची अनुभूती आता येत नाही कारण आता बालपण सरलेय ! आता एका गोष्टीची जास्त खंत वाटते की आपले सर्व सण बायकांची प्रचंड दमछाक करतात. माझ्या लहानपणी आजीला काम करताना पाहिलंय. त्यानंतर कुमार वयात असताना माझ्या चुलत्या, मोठ्या बहिणींना झटताना पाहिलंय. आता कारभारणीसह माझ्या भावजया, मुली, पुतण्या ही कामे करतात. गावाकडे तर अधिकचे काही कष्ट उपसावे लागतात. त्या दिवसात घराला शाडू लावून सारवण करण्यापासून सुरुवात होई. सगळ्या घरादरातील कपडा न कपडा चारेक दिवसांत धुवून काढावा लागे. इतक्या लोकांचा रोजचा स्वयंपाक करतानाच सणासुदीच्या फराळाचा वेगळा बेत तडीस न्यावा लागे. हे करताना हातातले खुरपे, विळे बाजूला करून चालत नसे. चूल बघायची, मुल बघायचे आणि घरादाराची खरकटी काढायची. सणासुदीला कंबर मोडेपर्यंत काम कारायचे. आजही काम करणारया या सगळ्या बायका इतक्या दमून जातात की घरातील सगळ्यांची जेवणे झाल्यावर जेंव्हा या जेवायला बसतात तेंव्हा त्यांच्या डोळ्यांवरची पेंग स्पष्ट जाणवते. 'किती करावी एकट्यानेच जाग्रणे' असा प्रश्न त्या कधीच विचारत नाहीत हे विशेष आहे. 'काबाडाचे कढ प्यावेत तरी किती तर सामाधानाचे अश्रू जोवर डोळा न झळकती' असं हे सगळं चालते.

याच वेळीस काही अपवाद वगळता बहुतांश पुरुष मंडळी लागेल त्या वस्तू आणून देणे हेच उपकार झाले अशा थाटात वागतात. (यात मीही आलो !) पोराटोरांना हे सण म्हणजे तृप्ती आनंदाची पर्वणी, त्यामुळे त्यांच्याकडून मदतीऐवजी उत्पात होतो ! वयस्क लोकांची गाऱ्हाणी अन दुखणी वेगळी असतात, त्याकडे लक्ष देत या सणांचे छकडे आपल्या बायकांना संसाराच्या गाडयाबरोबर जिकिरीने ओढत न्यावे लागते तेंव्हा त्यांची अक्षरशः फरफट होत असते. इतके सारे कष्ट- क्लेश होऊनही त्यांच्या चेहऱ्यावर असते ते विलक्षण तृप्तीचे विलोभनीय तेज ! हसतमुखाने आल्यागेल्याचे प्रसन्न वदनाने आदरातिथ्य करून त्या तरतरीत उत्फुल्ल असतात. त्यांच्या या ऊर्मीचे अन उर्जेचे रहस्य कदाचित त्यांच्यातील स्त्रीत्वाच्या बहुआयामी नात्यांच्या वीणेत लपले असावे. किंबहुना यामुळेच 'घरची लक्ष्मी सुखात तर घर सुखी' हे ज्या घराला उमजते तिथल्या गौराई अधिक प्रसन्न व तेजःपुंज दिसतात...

खरेच त्या आहेत म्हणून घराला घरपण आहे. नाहीतर घर नावाचे काँक्रीटचे सरपण आहे...

- समीर गायकवाड.

( सोबतच्या फोटोमध्ये आमच्या घरातील गौराई. ज्यांच्या मांडणीपासून ते पूजेअर्चेपर्यंत आणि जेवणावळीपासून ते आरास करण्यापर्यंतचे सगळे श्रेय घरातल्या स्त्रियांचे ! मी निमित्तमात्र असणारा आस्वादक !! )