Saturday, July 2, 2016

दुसरा प्रवास ....

रेल्वे स्टेशन असो बस स्थानक वा अन्य कुठले सार्वजनिक गर्दीचे स्थान असो ...
आपल्याला मलूल, ओशाळवाणी, करपलेली अनाथ मुले हटकून दिसतात ..
त्यांना पाहून आपण काय विचार करतो ...आपली संवेदनशीलता तेंव्हा नेमका काय प्रतिसाद देते ?
रेल्वे फलाटाच्या,
मालधक्क्यावर रिकाम्या खोक्याशेजारी फाटक्या पोत्यांच्या मागे मऊशार फरशीवर
विस्कटलेला कचरा पडावा तसा तो पडून असतो...
लोकांची अव्याहत गर्दी हजारोने येत जात असते. डोळे नसलेले, कर्णबधीर, स्पर्शज्ञान विसरलेले, गंधवेणा हरवलेले
अक्राळ विक्राळ गर्दीचे चेहरे त्याच्या जवळून येजा करत असतात.
धडाडत जाणारया रेल्वे गाड्या, कर्कश्श आवाज करणारे इंजिन अन काळाकुट्ट धूर सोडत अजगरासारखी लवलवत चालणारी मालगाडी,
त्याच्याजवळून जाताना त्याला पाहून हात हलवत ओळखीच्या शिट्या वाजवतं, कुंदटलेल्या हवेत त्याला धुरांच्या रेषा काढून दाखव पुढं निघून जातं ...
काळया डगल्यातले टीसी, लाल शर्टातले हमाल त्याला हुसकावू पाहतात, धुत्कारून बघतात.
आपला समाजावरचा राग त्याच्यावर काढून बघतात, घरादारातलं हताश असहाय पौरुषत्व त्याच्यावर अमलात आणून बघतात.
पोलीसही त्याला हटवू पाहतात अन मनातल्या मनात त्याच्याकडूनही चिरीमिरीचे मांडे खात राहतात.
वेगळ्या विश्वात जगणारे, पोटाची भ्रांत हातावर असणारे पाणीवाले, फेरीवाले, चायवाले आपापल्या तालात ओरडत पळत असतात.
पॉश कपड्यातले प्रवासी त्याच्या जवळून जाताना नाकाला रुमाल लावत जातात, कुणी त्याची किळस करतो तर कुणी टवाळकी करतो !
सर्वांची वर्दळ अंगवळणी पडलेली फलाटघर असणारी बरगड्या बाहेर आलेली भेसूर, भटकी कुत्री त्याचे पाय चाटून पुढे जातात,
अन अंगाचे वेटोळे करून बाकड्याखाली जाऊन बसतात.
ऊन, वारा, पाऊस यांची गणिते माहिती असलेले पक्षी फलाटावरच्या लटकत्या एकतालीय पंख्याच्या डोक्यावर आपल्या आशियान्यात जाऊन त्याच्याकडे दीनवाणे बघत राहतात.
सकाळपासून भिक मागून खाणारे, स्वतः अर्धपोटी असणारे कुणी त्याच्याजवळ गेले की त्याला खायला घासातला घास देतात.
कळकटलेल्या, शेवाळी विटकरी कपड्यातला जराजर्जर फकीर झाकणं नसलेल्या प्लास्टीक बाटल्यातून दोन घोट पाणी पाजून जातो.
फलाटावर राहणारी अशाच पोरांची टोळी त्याला कानतुटक्या कपातून थंड झालेला चॉकलेटी चहा देऊन जाते.
तो मात्र तसाच अचेतन पडून असतो, लावारसपणाचं मणामणाचं अश्वत्थामी ओझं त्याच्या माथ्यात रुतून बसलेलं असतं.
काय विचार करत असतो तो ? काय पुटपुटत असतो ...
त्याच्या पायाच्या चिरलेल्या तळव्यांना कधी कुणी तीट लावली होती का याचा सवाल तो सटवाईची गचांडी धरून करत असतो,
आयुष्याचा उकिरडा करून जन्म देणारया पाप्यांचे पत्ते विचारत असताना त्याचे सर्वांग थरथरत असते, त्याचा मेंदू फुटायला येतो !
'सारेच हात का उगारतात, कुणीच का गालावरून हात फिरवत नाही' याचा अर्थ तिला तो पुसत असतो, तेंव्हा त्याच्या नजरेतून लाव्हा वाहत असतो.
दिवसभर त्याचे असेच सवाल जवाब चालू असतात.
लोक म्हणतात, 'वेडा मुलगा ! किती मोठ्याने बरळतो !'
तो बरळत नसतो, तो अस्तित्वाचा शोध घेता घेता स्वतःला विसरत असतो.
शोध घेता घेता मिळेल त्या जागेवर हिरमुसल्या चेहरयाने झोपी जात असतो..
त्याची ही कसरत निहंत्याच्या नजरेतून सुटत नसते .
त्याच्या डोळ्यातले थिजलेले भाव बघण्या वारा कधी मंद होतो ; मग हडबडून जातो, तर कधी त्याच्या घामेजलेल्या देहाभोवती नुसतीच रुंजी घालतो.
सकाळचा सूर्य त्याला पाहून खुश होतो तर अस्तास जाणारा सूर्य त्याच्या म्लान गालांवरून तांबूस किरणांचे पीस फिरवतो,
उदयाच्या सकाळी सुखरूप भेटण्याचा शब्द देतो.
त्याच्याकडे बघत बघत रडवेल्या चेहऱ्याने दादऱ्यामागे हळूहळू जड मनाने अस्तास जातो.
अंधाररात्री उगवणारा चंद्र त्याच्या काजळमायेची त्याला चादर पांघरतो,
स्टेशन गाढ झोपी गेल्यावर चांदण्या खाली उतरतात, त्याच्या भोवती कोंडाळं करतात.
त्याच्या स्वप्नवेड्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या की चांदण्या त्याला एकेक करून आपल्या उराशी कवटाळतात, धाय मोकलून रडतात.
सर्वांगाला चांदणं लखडलं की त्याला मायेची उब येई अन अंधाराच्या कृष्णविवरात त्याचा रोजचा दुसरा प्रवास सुरु होई...

- समीर गायकवाड.

ब्लॉग पत्ता -
http://sameerbapu.blogspot.in/2016/07/blog-post_2.html