Saturday, June 4, 2016

बाशा खानांची गाथा....


कथा भारतरत्न मिळालेल्या एकमेव पाकिस्तानी असामीची...
जानेवारी २०१६ मध्ये पाकिस्तानातल्या पेशावरमध्ये बाशा विद्यापीठात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ३० लोक मरण पावले होते. त्या दिवशी बातम्या बघताना 'बाशा' या नावाने काही काळ डोक्यात घर केले आणि पुन्हा रोजच्या कामाच्या रहाटात ते विस्मरणात गेले. मात्र काही दिवसांपूर्वी एक डॉक्युमेंट्री पाहण्यात आली, " दि फ्रंटियर गांधीहे तिचं नाव. या सिनेमाने पुन्हा त्या 'बाशा' नावाची आठवण झाली. हा सिनेमा ज्यांच्यावर होता त्या खान अब्दुल गफार खान यांना पाकिस्तान बाशा खान म्हणून ओळखतो तर आपण सरहद गांधी म्हणतो. खान अब्दुल गफार खान हे एकमेव पाकिस्तानी नागरीक आहेत, ज्यांना भारतरत्नया भारताच्या सर्वोच्च सन्मानाने गौरवण्यात आले आहे.  
आपली जन्मभूमी पाकिस्तानमध्ये राहूनही भारताशी असणारी कर्मभूमीची त्यांची नाळ कधीच तुटू शकली नाही. तर मातृभूमीतला त्यांच्या मागचा नजरकैदेचा ससेमिरा कधी सुटला नाही. त्यांच्यावर एक काळ नौबत अशी आली की शेवटी त्यांना काही काळ जन्मभूमी सोडून परागंदा व्हावे लागले. भारताच्या विभाजनाविरुद्ध ते शेवटपर्यंत आशावादी होते; भारतावर त्यांचे प्रेम होते, पाकिस्तान त्यांची जन्मभूमी होती अन त्यांचे अंत्यविधी अफगाणीस्तानात झाले ! त्यांच्या मृत्यू पश्चात मात्र पाकिस्तानला उपरती झाली अन तिथे त्यांची कवने रचायला थोडीफार सुरुवात झाली. तरीदेखील पाक मधला एक विचारप्रवाह आजतागायत त्यांच्या विरोधातच बोलत असतो.


४ वर्षांपूर्वी इफ्फीतही हा सिनेमा दाखवण्यात आला होता. दि फ्रंटियर गांधीया माहितीपटातून कॅनेडियन सिनेनिर्मात्या टी. सी. मॅकलुहन यांनी बादशहा खान यांचे झाकोळले गेलेले व्यक्तीमत्त्व जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला होता. मुळात १० तासांच्या एकुण चित्रीकरणाला आटवून ९२ मिनीटांचा हा माहितीपट बनविण्यात आला होता. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मॅकलुहन यांना सुमारे २२ वर्षे लागली. भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, कॅनडा या देशांत माहितीपटाचे चित्रीकरण झाले आहे. एक उंच, धिप्पाड, दाढीवाली, कुरता- पायजम्यातील व्यक्ती महात्मा गांधी यांच्यासोबतच्या काही छायाचित्रांत आवर्जुन दृष्टीस पडते. सरहद गांधी ऊर्फ खान अब्दुल गफार खान ऊर्फ बादशहा खान अशी त्यांची ओळख इतिहास शिकताना सर्वांच्या कानी असल्याने मेंदूला फारसा ताण द्यावा लागत नाही. महात्मा गांधींना समकालीन असलेल्या खान यांनी स्वतंत्ररित्या उभारलेली अहिंसेची चळवळ खानसाहेबांसह बरीचशी विस्मरणात गेली ही खंत डॉक्युमेंट्री पाहताना सतत छळत राहते.

बाशा खानांचा समग्र इतिहास यात बारकाईने मांडलाय. ३ जून १८९० रोजी पाकिस्तानातील पेशावरमध्ये खान अब्दुल गफार खान यांचा जन्म झाला. त्यांचे वडील बैराम खान हे शांत स्वभावाचे अन धार्मिक भावनांत लीन होणारे सरळमार्गी सभ्य व्यक्ती होते. बाशा खानांचे आजोबा सैफुल्ला खान यांनी मात्र आपली उभी हयात इंग्रजांविरुद्ध लढा देण्यात घालवली होती. इतकेच नव्हे तर त्यांचे पणजोबा आबेदुल्ला खान हे देखील पठाणी काबिल्यांसाठी आयुष्यभर संघर्ष करत होते. बाशा खानांवर त्यांच्या आजोबांचा मोठा प्रभाव होता. पेशावरच्या मिशनरी स्कूलपासून अलिगढच्या पूर्व महाविदयालयीन शिक्षणाचा त्यांचा प्रवास राहिला. १९१९ मध्ये पेशावर मध्ये मार्शल लॉ लागू झाल्यावर त्यांना खोट्या आरोपाखाली पहिला कारावास भोगावा लागला होता.

मक्का येथे गेल्यावेळी गफार खानांना शांतीच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरणा प्राप्त झाली. पुढे पश्तूनला परतल्यावर या अहिंसक मार्गाचा स्वीकार करण्यासाठी आपल्या जमातीतील इतरांनाही आवाहन केले. त्यावेळी संघटित भारत हा ब्रिटीशांच्या ताब्यात होता (सध्याच्या पाकिस्तानकडील) वायव्य सीमेवर वसलेला पश्तून प्रांत हा हिंसेने लथपथ होता. हिंसेचा एक ज्वलंत इतिहास पाहिलेल्या खैबर खिंडीच्या परिसरात पाकिस्तान अफगाणिस्तान सीमेवर वसलेला पश्तून (पठाण) प्रांत. परंपरागत पद्धतीने इथे बंदुका म्हणजे जणू दागिने समजले जात. हिंस्त्र लढाया इथे जीवनाचा एक भाग होता. भारत ताब्यात घेतल्यावरही ब्रिटीशांना याठिकाणी सशस्त्र फौजेची खास तटबंदी उभारावी लागली होती. तेथे खान साहेबांनी हजारो जणांना अहिंसेची दीक्षा देऊन त्यांना बंदुका सोडायला भाग पाडले. एकेकाळी इट का जवाब गोलीसेम्हणणार्‍या या सर्व पश्तूनींनी पुढे ब्रिटीशांशी अहिंसक मार्गाने लढा उभारला. त्यासाठी ब्रिटीशांकडून होणारे अत्याचार झेलले पण हिंसेच्या मार्गाने पुन्हा कधीच प्रतिकार केला नाही.

जो बुंदुकीच्या रणनीतीने लढतो त्याचा विजय हा टिकणारा नसतो व जो शांतीच्या व अहिंसेच्या मार्गाने लढतो तो कधीच पराजीत होत नाहीहे त्यांचे तत्त्वज्ञान होते. त्यातूनच त्यांनी १९२० साली शस्त्रांचा त्याग करायला लावून हजारो पश्तूनांची खुदाई खिदमदगारसंघटनेची स्थापन केली. पश्तुनी लोक तिला 'सुर्ख पोश' असं म्हणत. 'खुदाई खिदमतगार' ही आधी एक सामाजिक संघटना होती मात्र बाशा खानांनी नंतर तिचे स्वातंत्र्य चळवळीच्या संघटनेत रुपांतर केले. या संघटनेची एक अर्थपूर्ण प्रतिज्ञा होती. तिचा थोडक्यात सारांश असा - "हम खुदा के बंदे हैं, दौलत या मौत की हमें कदर नहीं है। और हमारे नेता सदा आगे बढ़ते चलते है। मौत को गले लगाने के लिये हम तैयार है l".हे खुदाई खिदमदगारइतके विश्‍वासार्ह बनले होते की पश्तून फाळणीनंतर पाकिस्तानात समाविष्ट झाला तेव्हा तेथील हिंदू भितीपोटी घरांना कुलूपे लावून लपून बसले होते. पण जेव्हा खान यांचे सैनिक त्यांच्या मदतीला आलेत असे कळले तेव्हा ते पुन्हा घराबाहेर पडले होते. हे सर्व वाचताना - ऐकताना एखाद्या परीकथेप्रमाणे भासते. पण हे सर्व गफार खानांनी वास्तवात उतरवून दाखवले होते.

महात्मा गांधी १९३८ साली पश्तूनच्या दौर्‍यावर गेले तेव्हा तेथील अहिंसेची चळवळ पाहून आश्‍चर्यचकित झाले. आपण भारतात जो अहिंसेचा जो प्रसार केला त्यापेक्षा बाशा(बादशहा) खान यांनी उभारलेली अहिंसेची चळवळ जास्त महत्त्वाची ठरते असे ते म्हणाले होते. कारण भारतात अहिंसा ही अनेकांची जीवनशैली होती शिवाय लढण्यासाठी मुळात शस्त्रेही फार लोकांकडे नव्हती मात्र पश्तूनमध्ये स्थिती उलट होते. तेथे तर हिंसा जणू जीवनशैलीचा एक भाग होता.

पुढे बाशा खान महात्मा गांधींच्या खूप निकट आले व दोघांची छान मैत्री जमली. ही मैत्री इतकी गाढ होती की आपला चष्मा सापडेनासा झाला की कुराण वाचताना बादशहा खान कधी कधी महात्मा गांधींच्या चष्म्याचा वापर करीत अशी वदंता लोकांत होती. आपल्या ९५ वर्षांच्या जीवनातील ३५ वर्षे बादशहा खान यांनी विविध चळवळींमुळे तुरुंगात व्यतीत केली. बहुतेक कैद ही नजरकैद होती. शेवटची कैद त्यांना ९५ व्या वर्षी झाली. दुर्देव म्हणजे ३५ पैकी १५ वर्षे कैद ही स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानात भोगावी लागली. पाकिस्तानने त्यांना कधीच आपले मानले नाही. महात्मा गांधी प्रमाणे खान हे सुध्दा फाळणीचे विरोधक होते. भारत स्वातंत्र झाला तेव्हा दोघे दिल्लीत आनंदोत्सव साजरा करण्यासाठी नव्हते. महात्मा गांधी पश्‍चिम बंगालमध्ये दंगे मिटवत होते तर खान पश्तून प्रांतात शांती राहावी म्हणून झटत होते.

इथे आणखी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. १९३० मध्ये पाकव्याप्त पंजाबात कारागृहात असताना त्यांनी एक अनोखी मोहीम राबवली होती. कैदेत असणाऱ्या सर्वच बंदीवानांसाठी त्यांनी गीता, कुराण आणि गुरु ग्रंथसाहिबचे सामुहिक पठण सुरु केले होते. खरं तर ही एक ऐतिहासिक घटना होती पण दुर्दैवाने आपल्या इतिहासाने त्याची योग्य ती नोंद घेतली नाही. यावरून स्पष्ट होते की सरहद गांधींनी आपल्या चळवळीत सर्व धर्मीयांना समान स्थान दिले होते. स्वातंत्र्य चळवळीत मुस्लिम स्त्रियांना आणण्याचे काम त्यांनी केले होते. मुलींच्या शिक्षणासाठीही त्यांनी पुढाकार घेतला होता.पेशावर भागात (वायव्य सरहद्द प्रांत) येथे कोंग्रेसचे सरकार त्यांच्या मुळेच निवडून आले होते ! जेंव्हा दुर्दैवाने देशाची फाळणी झाली तेंव्हा खानसाहेब त्यांच्या जन्मभूमीत पाकिस्तानात राहिले. तेथे राहिल्यावर त्यांनी पाकिस्तान कडे आपल्या पठाणी अनुयायांसाठी स्वतंत्र 'पख्तुनिस्ताना'ची मागणी आजन्म केली! खरे पाहता ते भारत व पाकिस्ताना या दोन्ही देशांचे सुपुत्र होते ! मात्र त्यांना न्याय मिळाला नाही.

स्वातंत्र्यानंतरच्या काळात त्यांनी अफगाणिस्तानात दौरे काढले. तेथे त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ब्रिटीशांना पश्तूंनांना विभक्त करण्यासाठी पाकिस्तान अफगाणिस्तान सरहद मर्जीप्रमाणे व सोयीप्रमाणे आखली होती. त्यालाही खान यांचा विरोध होता.आक्रस्ताळ्या पाकिस्तानने त्यांना आवश्यक तो मान सन्मान दिला नाही. उलट त्यांच्या उभ्या हयातभरात त्यांच्याकडे संशयाच्या नजरेने पाहिले. १९८८ साली तर पाकिस्तान सरकारने भारताशी संधान बांधल्याच्या संशयावरून त्यांना पेशावरमध्ये नजरकैदेत ठेवलं होतं. स्वातंत्र्यानंतर आपल्या पश्तून प्रांतात काहीसे उपेक्षित जीवन त्यांच्या वाट्याला आले. २० जानेवारी १९८८ रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांचा मृतदेह अफगाणिस्तानातील जलालाबाद येथे दफन करण्यात आला होता. त्यावेळी पाकिस्तान-अफगाणिस्तान अशा दोन्हीकडे विभक्त झालेले पश्तून जमातीतील लोक व्हिसा वगैरेचे नियम मोडून त्यांच्या अंत्ययात्रेत हजारोंच्या संख्येने सामील झाले होते व आपली एकता त्यांनी जगासमोर आणली होती. हजारो जणांची खुदाईखिदमदगारचळवळ उभारणारा हा लढवय्या आणि त्याचा इतिहास पुढे हळू हळू विस्मरणात गेला. या अभागी नेत्यासाठी दुर्दैवाची बाब अशी की, २० जानेवारी २०१६ला त्यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम चालू असताना पेशावर इथे त्यांच्या नावाने असणारया 'बाशा विद्यापीठा'वर अतिरेक्यांनी निर्घृण हल्ला केला होता.

भारताचे माजी पंतप्रधान आय. के. गुजराल, पाकिस्तानी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ, अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई तसेच बादशहा खान यांचे परिवारजन, खुदाईखिदमदगार चळवळीतील (शंभरी ओलांडून गेलेले) सैनिक तसेच तीन्ही देशांतील पत्रकार, उच्च पदस्थ अधिकारी इत्यादींनी खान यांच्याबद्दल आठवणींना दिलेला उजाळा यामुळे हा माहितीपट अधिक वजनदार झाला आहे. शिवाय त्याच्याविषयीच्या दुर्मीळ ऐतिहासिक ध्यनिचित्रफीतींचा समावेश माहितीपटात आहे.

माहितीपटात एकेठिकाणी ज्येष्ठ पत्रकार एम. जे. अकबर म्हणतात, 'महात्मा गांधींभोवती अहिंसेचे ब्रॅण्ड तयार झाले व त्यामुळे बादशहा खान यांचे अहिंसात्मक लढ्याचे स्वतंत्र कार्य झाकोळले गेले. श्रीमती मॅकलूहन हेच खान यांचे स्वतंत्र व्यक्तीमत्त्व शोधतात व त्यांचे इतिहासातील स्थान अधोरेखित करतात. बादशहा खान यांंची बृहन् आशियाई नेता म्हणून प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्नही माहितीपटातून दिसून येतो.'

खान अब्दुल गफार खानांचे मोठेपण त्यांना दिलेल्या सरहद गांधी या उपमेतच आहे. कारण गांधी या नावाची अलौकिक महती त्यांच्याशी आपसूक जोडली गेली आहे. वास्तवात काही लोकांनी गांधीजींवरही शिंतोडे उडवायला मागे पुढे पाहिले नाही. पण गांधीजींना बदनाम करण्याचं प्रमाण जितकं वाढत गेलं तितकी त्यांची ख्याती जगभरात पसरत गेली. या मोहिमेतून सरहद गांधी देखील सुटले नाहीत. काही वर्षांपूर्वी रिचर्ड ग्रेनियर हा अमेरिकन स्तंभलेखक रिचर्ड अ‍ॅटेनबरोचा गांधीपाहून काहीसा खंतावला होता आणि गांधींचे महत्त्व कमी करण्यासाठी त्याने त्यांचे जीवन आणित्यांचे सिद्धांत यांच्यामधील तफावती उघड करण्याचा त्याने प्रयत्न केला होता . (थोर कवी जॉन मिल्टन किंवा संगीतकार बीथोव्हेन यांनी बालकांवर अत्याचार केल्याबद्दल किंवा तत्त्वज्ञ प्लेटोने समसंभोगाच्या नावाखाली त्याची भलावण केल्याबद्दल ग्रेनियरने कधी नाराजी दाखविल्याचे मात्र ऐकिवात नाही.) परंतु अशा रहस्यभेदाचे प्रयत्न फारसे कधी यशस्वी होत नाहीत. कारण जगभरच्या ग्रेनियर्सना कधी ना कधी मानवी क्षमतांवर विश्वास ठेवण्याची गरज भासतेच. पोलंडच्या कामगारांनी १९८० च्या दशकात त्यांच्या देशातील जुलमी राजवटीविरुद्ध लढा दिला तेव्हा- लेक वालेसा हे आमचे गांधी आहेत,’ असेच ते म्हणाले होते. अर्थात व्होडका पिणाऱ्या, रोखठोक बोलणाऱ्या कामगार संघटनेच्या या नेत्याला ही उपाधी पचविणे तसे जडच गेले असणार. पण पोलंडच्या जनतेला या दोन व्यक्तिमत्त्वांमधील ऐतिहासिक साम्य-भेद पडताळून पाहण्यात काहीच स्वारस्य नव्हते. त्यांना वेगळेच काही म्हणायचे होते. गांधी हे एका काळात राज्यव्यवस्थेचे व आधुनिक तंत्रज्ञानाचे पाठबळ असलेल्या निरंकुश नोकरशाही आणि जुलमी राजवट यांच्याविरोधात बंडखोरी करण्याचे व त्यासाठी आक्रमक अहिंसेचे हत्यार वापरण्याचे प्रतीक बनले होते. थोडक्यात सांगायचे तर गांधी हे अन्यायाच्या विरोधात करावयाच्या संघर्षांचे नाव आहे. असा संघर्ष- जो पराकोटीच्या अमानुषतेशी सामना करतानाही आपली माणुसकी सोडत नाही. म्हणूनच फिलिपाइन्सच्या बेनिटो अ‍ॅक्विनोची हत्या झाली तेव्हा तेथे रस्त्यावर आलेल्या मोर्चेकऱ्यांनीही तेच केले. आमचा गांधी बेनिटोअशाच घोषणा त्यांनी दिल्या. हाही जर कुणाला योगायोग वाटत असेल तर आणखी एक उदाहरण आहे - म्यानमारच्या विद्यार्थ्यांनी तेथील लष्करी राजवटीविरुद्ध उठाव केला तेव्हा त्यांनीही गांधींचाच धावा केला. फक्त एवढेच की, या खेपेला त्यांच्या नेत्या होत्या ऑंग सान स्यू की! गंमत अशी की, स्यू की यांच्यावर दुराग्रही गांधीवादीअसल्याचा दुर्दैवी आरोप झाला तेव्हा त्यांनी गांधी वाचलाच नव्हता.अशा गांधीजींचे नाव बाशा खान यांना चिकटले मात्र इतिहासाने आणि वर्तमानानेही त्यांची योग्य ती दखल घेतली नाही.

काल ३ जून, सरहद गांधींचा १२६ वा जयंती दिवस. विस्मरणात गेलेल्या एका अनोख्या लढवय्या नेत्याचे हे एक छोटेसे स्मरण. या नेत्याबद्दल इतकं सारं ज्ञात असूनसुद्धा आपल्या देशात आजच्या दिवशी सरहद गांधींबद्दल एक शब्द छापून आला नाही वा कुठल्या वाहिनीवर एखाद्या मिनिटाचा बाईट त्यावर दाखवला गेला नाही हे क्लेशदायक आहे. या अभागी धीरोदात्त नेत्याच्या उत्तुंग कार्यास अभिवादन ...

- समीर गायकवाड.

संदर्भ- विस्मरणातल्या गांधीची गोष्ट - समीर झांट्ये.
गांधींनंतरचे गांधी - आशीष नंदी.

(ज्यांना ही पूर्ण डॉक्युमेंट्री पाहता येणार नाही त्यांनी किमान यु ट्यूब वर अपलोड केलेले या माहितीपटाचे काही तुकडे - exerpts पाहता येतील. तेंव्हा वेळ काढून आवर्जून पहा, तुम्हाला निश्चित या माणसाचा अभिमान वाटेल )