Tuesday, June 7, 2016

सरण....


वेचताना जळण वैराण मनातले, सरपण देहाचे झाले कधी काही कळलेच नाही,
जाताना अनवाणी उदास, पावलांना सजवत काट्यांनी कसे गेलो समजलेच नाही.

झिजताना दुनियेसाठी, पारा कायेतला उडत कधी गेला काही कळलेच नाही,
गाताना विराणी भकास, कंठाला हुंदक्यांनी आळवत कसे गेलो समजलेच नाही.

राबताना घरादारासाठी, चांदवे स्वप्नांचे हरवून कुठे गेले काही कळलेच नाही,
घेताना इतरांचा ध्यास, उमाळ्यांना आर्त गोंजारत कसे गेलो समजलेच नाही
 
रडताना गोतावळ्यासाठी, घनव्याकुळ वेदना मुकी झाली कशी कळलेच नाही,
मोजताना शुष्क श्वास, आयुष्याला जीर्ण उसवत कसे गेलो समजलेच नाही

वेचताना जळण वैराण मनातले, सरण माझेच रचले कसे काही कळलेच नाही.
ऐकताना कैफियती खास, अंतरीच्या गझलेस फसवत कसे गेलो समजलेच नाही.

- समीर गायकवाड.