Wednesday, June 29, 2016

'केवळ माझा सह्यकडा' - वसंत बापट.


"मुशाफिरीने माणूस माणसाळतो. तो आपला शिकारी स्वार्थ आणि दुष्ट पूर्वग्रह सोडून देतो. 
जेवढ्या नद्या तो ओलांडतो तेवढ्या खंदकांच्या तो पलिकडे जातो. 
जेवढ्या राज्यांच्या सीमा तो उल्लंघून जातो तेवढे तट तो मोडून टाकतो. 
जेवढी क्षितिजे तो छेदतो तेवढ्या त्याच्या शृंखला तुटतात आणि जेवढ्या शहरागावातून तो रहातो तेवढी नवी दालने त्याच्या वाड्यात उगवतात...."
"अनादी कालापासून माणसाची भ्रमंती चाललेलीच आहे. अनंत काल ती तशीच चालणार आहे. विशेषत: अस्वस्थ आत्मे फिरत राहतात.  स्वतःच्या नकळत काही ना काही शोधत राहतात. त्यातही विचित्र घडते ; एकाकीपणात गजबज भेटते, पण गजबज असूनही माणूस एकाकी असतो.
एक टिचकी मारल्यावर कॅलिडोस्कोप हलतो. आतले रंग, आतल्या रेषा रचतात निराळाच अवकाश. सर्वात मोठी आकृती आहे ती मात्र पंचखंड पृथ्वी आणि अखंड अवकाश यांची ...."
'गोष्टी देशांतरीच्या' हे वसंत बापट यांचे एक आकर्षक प्रवासचिंतन आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचे प्रवासवर्णन यात आहे. वरील उतारा त्यातीलच आहे. वसंत बापट हे संवेदनशील कवी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कवितांचा एक धांडोळा घेण्याचा प्रयत्न या लेखात केला आहे....  
`माझीया जातीचे मज भेटो कोणी, ही माझी पुरवून आस, जीवीचे जिवलग असे भेटला की दोघांचा एकच श्वास' कवितेवर अशी निष्ठा असणारा कवी म्हणून वसंत बापट ओळखले जात. लहानपणापासून वसंत बापटांवर राष्ट्रसेवा दलाचे आणि सानेगुरूजींच्या सहवासाचे संस्कार झाले. राष्ट्रसेवादलाच्या मुशीत घडलेल्या वसंत बापट यांच्या १९५२ सालातील 'बिजली' हया पहिल्या काव्यसंग्रहावर हया संस्काराचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. 'सेतू', 'अकरावी दिशा', 'सकीना', 'मानसी' हे त्यांनंतरचे काव्यसंग्रह होत . त्यांच्या प्रतिभेची विविध रुपे रसिकांनी वाचली अनुभविली. पुढे 'तेजसी' व 'राजसी' हे दोन काव्य संग्रह ना. ग. गोरे यांच्या हस्ते प्रकाशित झाले. 'चंगा मंगा', 'अबडक तबडक', 'आम्ही', 'गरगर गिरकी', 'फिरकी', 'फुलराणीच्या कविता' आणि परीच्या राज्यात हे त्यांचे बालकवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. लहान मुलामध्ये मूल होऊन जगण्याची कला बापटांना नक्कीच अवगत असावी असे त्यांच्या बालकाव्यसंग्रहांच्या नावावरून वाटते. त्याच बरोबर  'बालगोविंद' हे त्यांचे बालनाट्य विख्यात आहे. पौराणिक एतिहासिक कथानकांवरची त्यांची नृत्यनाट्येही प्रभावी ठरली `केवळ माझा सह्यकडा' ही त्यांची कविता सर्वतोमुखी झाली. 'गगन सदन तेजोमय' सारखे अप्रतिम प्रार्थनागीत त्यांनी लिहिले. कालिदासाच्या विरही यक्षाची व्याकुळता त्यांनी मेघहृदयाच्या रूपाने मराठीत आणली. त्यांची 'सकीना' उर्दूचा खास लहेजा होऊन प्रकटली आणि, `तुला न ठेवील सदा सलामत जर या मालिक दुनियेचा,कसा सकीना यकीन यावा कमाल त्यांच्या किमयेचा'  असं व्यक्त होत त्यांच्या लेखन किमयेची कमाल सांगून गेली.

`लोक सागराचे भान असलेला लोकांचा कवी' हीच त्यांची खरी ओळख. त्यांचा जनसंपर्कही प्रचंड. सतत माणसांत रहायला त्यांना आवडायचे. मनमोकळ्या स्वभावामुळे त्यांना अनेक मित्र मंडळी होती. तीही वेगवेगळ्या स्तरांतली ; त्यांच्या मित्र मंडळीत पं. भीमसेन जोशी, पं. कुमार गंधर्व, जेष्ठ नेते नाथ पै, मधु दंडवते, एस. एम. जोशी, ना. ग. गोरे असत. महाराष्ट्र् सेवादलातल्या सर्वांना, `साधने'त त्यांच्याबरोबर काम करणार्‍या सहकार्‍यांनाही ते आपले वाटतात. त्यांचे मराठी, संस्कृत भाषेवरचे प्रभुत्व आणि प्रेम तर सर्वश्रूतच होते. त्यांचे इंग्रजीवरही प्रभुत्व होते. `शतकाच्या सुवर्णमुद्रा' हे त्यांचे अखेरचे पुस्तक. प्रा.बापट यांनी तब्बल साडेपाच दशके सातत्यांने दर्जेदार लेखन केले. विविध साहित्यप्रकार त्यांनी हाताळले असले तरी कविता हाच त्यांचा आत्मस्वर होता. रविकिरण मंडळाचे संस्कार त्यांच्या वरही झाले होते. १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात त्यांचा सहभाग होता. मात्र शिक्षक हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विशेष उल्लेखनीय पैलू म्हणावा लागेल.

वसंत बापटांचा काव्यलेखनाचा काळ विंदा आणि मंगेश पाडगांवकरांच्या समकालीन आहे. अविरतपणे चार दशके आपल्या काव्य वाचनाने या तिघांनी सारं महाराष्ट्र गाजविला. महाराष्ट्रात एक पिढी अशी होती की ती  या तिघांच्या  काव्याने भारली होती. ह्यात काही नवल वाटण्यासारखेही नाही. कारण त्यांच्या कविता तशाच श्रेष्ठ दर्जाच्या होत्या. भावगीते, आधुनिक कविता, वृत्तबद्ध काव्य असे सर्व प्रकार पाडगावकर, बापट आणि करंदीकर या तिघांनी समर्थपणे हाताळले होते. त्यांच्या कवितांतून या  तिन्ही कवींचे बाह्य जीवन, भावविश्व , जीवन दृष्टी आणि त्यांच्या सौदर्यकल्पना यात फरक होता असे दिसून येते. बापटांच्या काव्यसातत्यावरून पु.लं.नी एकदा वसंत बापट यांना, `बापट, बापट रोज गाणं थापट' असं मिश्किलीने म्हटलं ! "वसंत बापटांनी मात्र आपलं गाणं `थापटत' असतांना कधी-कधी `थोपटलं' ही आहे" असंही ते म्हणत. त्यांना प्रोत्साहन देताना पुलं म्हणंत, "नव्या कवितेतून गाणे हरविले आहे, तरुणाईने गाणी गुंफायला हवेच."

बापट हे केशवसुतांच्या मालिकेतील कवी होते. समाजात भोवताली घडणारया घटनांची दखल घेऊन मत मांडले पाहिजे असे मानणारे कवी होते. कवींच्या संस्कृती समृध्दीमुळे त्यांच्या कवितेत भाववलयं उठत राहतात. माणसांबद्दलचे प्रेम आणि सामाजिक जिव्हाळ्यातून बापट यांचे मन घडले होते. त्यांच्या कवितेला अनेक धुमारे आहेत. रचनाशुध्दता, विलक्षण शब्दचापल्य, हेवा वाटावा अशी शैली ही बापट यांच्या कवितेची वैशिष्ट्ये होत. अंतर्गत लय सांभाळून त्यांनी अनेक रचनाप्रकार हाताळले.

कविवर्य वसंत बापट यांचा जन्म २५ जुलै, इ.स. १९२२ रोजी महाराष्ट्रात कऱ्हाड येथे झाला. तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या स.प. महाविद्यालयात झाले. त्यानंतर 'नॅशनल कॉलेज आणि रामनारायण रूईया कॉलेज' हया महाविद्यायलयांतून मराठी व संस्कृत ह्या विषयांचे प्राध्यापक होते. महाराष्ट्रसेवादलाच्या कलापथकाचे काम त्यांनी १९४१ ते ८० अशी सलग चाळीस वर्षे केले. १९४८ ते ७४ अशी चोवीस वर्षे त्यांनी मराठी व संस्कृतची प्राध्यापकी केली. इ.स. १९७४ पासून मुंबई विद्यापीठातील गुरूदेव रवींद्र टागोर अध्यासनात तौलनिक साहित्यांचे प्राध्यापक होते. साहित्य अकादमीचे सदस्य होते.बापट भारताच्या स्वांतत्र्यलढ्यातही सहभागी झाले होते. इ.स. १९४२ च्या चलेजाव चळवळीत ते सहभागी होते. ऑगस्ट, इ.स. १९४३ ते जानेवारी, इ.स. १९४५ पर्यंत ते तुरूगांत होते. इ.स. १९४७ ते इ.स. १९८२ ते पर्यंत ते मुंबई विद्यापीठात ते प्राध्यापक होते. इ.स. १९८३ ते इ.स. १९८८ ते साधना नियतकालिकाचे संपादक होते. लोककलांच्या जोपासनेविषयी त्यांना विशेष आस्था होती. शाहिरी पोवाडे, लावण्या, भजन, प्रार्थना, गजल, भावगीते, स्फूर्तिगीते, समूहगीते अशा विविध काव्यप्रकारांचा प्रभावी वापर त्यांनी केला. राष्ट्रसेवा दलाशी ते संलग्न होते. इ.स. १९९९ साली मुंबईत भरलेल्या ७२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.युगोस्लोव्हियातील आंतरराष्ट्रीय कविसंमेलनात भारताचे अधिकृत प्रतिनिधी म्हणूनही ते सहभागी झाले. १९७७, १९९३ मध्ये अमेरिकेत आणि १९९२ मध्ये आखाती देशात त्यांचा काव्यदर्शन कार्यक्रम झाला.

'केवळ माझा सह्यकडा'मधून त्यांचा मराठी मातीबद्दलचा जाज्वल्य आभिमान प्रकट होतो. हिमालय तर सर्वांचाच आहे मात्र सह्यकडा हा केवळ आणि केवळ मराठी माणसांचा आहे. जसा गौरीशंकर सकळ विश्वात पूजनीय आहे तसा रायगड देखील वंदनीय आहे. गंगा यमुनेस सर्वांच्या मनात अढळस्थान आहेच मात्र भीवरेच्या तीरेची गोडी मराठी मनालाच आहे. ह्या सह्यकडयाचे कभिन्न काळे कातळ जणू एखाद्या महापराक्रमी वीराच्या निधडया छातीसारखे असल्याने आपला त्यावर विशेष जीव आहे असे बापट सांगतात. काही लोकांना हे निरस बेचव शब्दकवन वाटू शकते कारण त्यांच्या लेखी मधुगुंजनालाच जास्त महत्व असते, मात्र ह्या सह्यकड्याचे अन इथल्या मुलखाचे रांगडे बोल अधिक प्रिय वाटतात असं वर्णन बापट या कवितेत करतात. भगवान येशू ख्रिस्त आणि महाज्ञानी गौतम बुद्ध असे लोक जगाचे शासनकर्ते असू शकतात मात्र मला तुकयाच्या अभंगवाणीचा आधार जास्त सुखदायक वाटतो असं कवी म्हणतात. या कवितेतून मराठी माणसाच्या मनातील मानाचे अग्रबिंदू म्हणून ज्यांचे स्थान आहे ते सह्याद्री अन रायगड इतक्या चपखलपणे बापटांनी आपल्या कवितेत वापरले आहेत की सर्व मराठी माणसांचा अहं सुखावला जावा, सर्वांच्या माना गर्वाने ताठ व्हाव्यात !! दीर्घ कविता, कवितांना असणारी लय, संस्कृतचा प्रभाव असणारी शब्दसंपन्न भाषा, विषयांची विविधता हे बापटांच्या कवितेचे प्रमुख लक्षण होते ते या कवितेत देखील प्रत्ययाला येते.
'भव्य हिमालय तुमचा अमुचा , केवळ माझा सह्यकडा
गौरीशंकर उभ्या जगाचा, मनात पूजिन रायगडा
तुमच्या अमुच्या गंगायमुना, केवळ माझी भिंवरथडी
प्यार मला हे कभिन्न कातळ ,प्यार मला छाती  निधडी
मधुगुंजन लखलाभ तुम्हाला, बोल रांगडा प्यार मला
ख्रिस्त बुद्ध विश्वाचे शास्ते ,तुकयाचा आधार मला
धिक तुमचे स्वर्गही साती, इथली चुम्बीन मी माती
या मातीचे कण लोहाचे, तृणपात्यांना खड्गकळा
कृष्णेच्या पाण्यातून अजूनी, वाहतसे लावा सगळा ....'

आपली साहित्यविषयक आणि विशेषतः काव्यविषयक भूमिका स्पष्ट करताना वसंत बापट म्हणतात, "अनुभूतिशी प्रामाणिक राहण्याचे खडतर तप प्रत्येक कवीने केले पाहिजे.  नादमाधुर्याने भरलेल्या छंदबद्ध कवितांपासून राजकीय आणि सामाजिक जाणिवेच्या कविता अशा विविध अवस्थातून जात असताना प्रत्येक कवी, जर आपल्या अनुभूतिशी प्रामणिक राहिला तरच त्या कविता चिरकाल टिकतील अन्यथा त्या निर्मितीचा फोलपणा लवकरच सिद्ध होईल. " ह्या जाणीवपूर्वक बदलांचा प्रत्यय बापटांच्या लेखनात जागोजागी येतो.  हा प्रतिभासंपन्न कवी मराठी मनाला स्पर्श करणाऱ्या अनेक हळुवार, ओघवत्या माधुर्याने भरलेल्या कविता देत राहिला. एवढेच नाही तर  उपहासात्मक, जळजळीत आणि परिस्थितीवर हल्ला करणाऱ्या पण विषयांचे वैविध्य असणाऱ्या कविता देखील त्यांनी लिहिल्या. त्या वाचल्यावर त्यांच्यातील एका डोळस नागरिकाचे दर्शन नक्कीच होते. "सेतू" आणि "बाभुळझाड" ह्या दोन्ही कवितात वसंत बापट ह्यांच्या शैलीत आणि स्वतःच्या कवितेविषयीच्या जाणिवेत बापटांना झालेला बदल नक्कीच जाणवतो.  बापटांनी बाभूळझाड या कवितेत  वृद्ध पण खंबीर  व्यक्तीचे रूपकात्मक चित्रण खूप छान केले आहे-
बाभुळझाड
अस्सल लाकूड भक्कम झाड
ताठर कणा टणक पाटः
वारा खात गारा खात बाभुळझाड उभेच आहे

देहा फुटले बारा फाटे
अंगावरचे पिकले काटे
आभाळात खुपसून बोटे बाभुळझाड उभेच आहे

अंगावरची लवलव मिटली
माथ्यावरची हळद विटली
छाताडाची ढलपी फुटली बाभुळझाड उभेच आहे

जगले आहे जगते आहे
काकुळतीने बघते आहे
खांद्यावरती सुताराचे घरटे घेउन उभेच आहे

टक टक टक टक
चिटर फटर चिटर फटक
सुतारपक्षी म्हाताऱ्याला सोलत आहे शोषत आहे

आठवते ते भलते आहे
उरात माझ्या सलते आहे
आत काही कळते आहे आत फार जळते आहे

अस्स्ल लाकूड भक्कम गाठ
ताठर कणा टणक पाठ
वारा खात गारा खात बाभुळझाड उभेच आहे

घराघरात आढळणारा जिना  आणि माणसांचे त्याच्याशी असणारे नाते सांगणारी  वसंत बापटांची "जिना" ही एक अप्रतिम कविता.
लहान असल्यापासून आपण सर्वजण कधी ना कधी किंवा अगदी दरदोज किती तरी वेळा जिना चढून उतरून जातो. पण त्यावर कविता करावी असे मनात येणे आणि बापटांसारखी कविता करणे हा अनुभवच  विरळा. त्यातली सहजता, माधुर्य आणि कल्पकता पाहिली, की वसंत बापट किती सोप्या विषयावर मनाला स्पर्श करणारी कविता लिहू शकतात  ह्याची अनुभूती वाचकाला आली नाही तरच नवल म्हणावे लागेल.
जिना -
कळले आता घराघरातुन
नागमोडिचा जिना कशाला
एक लाडके नाव ठेवुनी
हळूच जवळी ओढायाला

जिना असावा अरुंद थोडा
चढण असावी अंमळ अवघड
कळूनही नच जिथे कळावी
अंधारातिल अधीर धडधड

मूक असाव्या सर्व पायऱ्या
कठडाही सोशिक असावा
अंगलगीच्या आधारास्तव
चुकून कोठे पाय फसावा

वळणावरती बळजोरीची
वसुली अपुली द्यावी घ्यावी
मात्र छतातच सोय पाहुनी
चुकचुकणारी पाल असावी

जिना असावा असाच अंधा
कधि न कळावी त्याला चोरी
जिना असावा मित्र इमानी
कधि न करावी चहाडखोरी

मी तर म्हणतो स्वर्गाच्याही
सोपानाला वळण असावे
पृथ्वीवरल्या आठवणींनी
वळणावळणावरी हसावे


युरोप, जपान आणि अमेरिकेच्या परदेश वास्तव्यावर वसंत बापट ह्यांनी "प्रवासाच्या कविता" हा एक काव्यसंग्रह लिहिला. त्यातील "अलाण्याच्या ब्रशावरती" जाहिरातमय जीवनाचे वर्णन करणारी एक विनोदी पण वाचकाला विचारमग्न करणारी कविता. अमेरिकेत राहणारी मंडळी चटकन ह्या कवितेतील संदर्भांशी  जुळवून घेऊ शकतील तर अमेरिकेबाहेरील  रसिकांनाही अमेरिकेतील जाहिरातमय जीवनाची किंवा एकंदरीत जाहिरातींचा असणाऱ्या प्रभावाची कल्पना ही कविता वाचून  स्पष्ट होईल.
अलाण्याच्या ब्रशावरती फलाण्याचे दंतमंजन
अलबत्याचे अंडरवेयर गलबत्याचे थोबाडरंजन
लिलीसारख्या त्वचेसाठी लिलीब्रॅंड साबणजेली
चरबी हटवा वजन घटवा हजारोंनी खात्री केली
केंटुकीच्या कोंबडीवरती फेंटुकीचे मोहरी चाटण
डबलडेकर सॅंडविचमध्ये बबलछाप मटन घाटण
पिझ्झा हटचा पिझ्झा खा मेपल्ज्युस् ऍपलपाय
अमूक डोनट तमूक पीनट अजून खाल्ले नाहीत काय?
अबकड इ फ ग तयार घरे सात टाईप्स
रेडीमेड खिडक्या दारे भिंती छपरे गटर पाईप्स
हॉटेल मोटेल खेटर मोटर देशभर करा प्रवास
एकच रूप एकच रंग एकच रूची एकच वास
आकाशवाणी घटवत असते दूरदर्शन पटवत असते
जहांबाज जाहिरातबाजी गिऱ्हाईकांना गटवत असते
अजब देश अजब तऱ्हा व्यक्तिवरती सक्ती नाही
सहस्त्रशीर्षा पुरुषा तुझी गणवेशातून मुक्ती नाही
वसंत बापट-
काव्यसंग्रह- प्रवासाच्या कविता


"शिंग फुंकिले रणी" ह्या काव्यसंग्रहातील मनाला प्रसन्न करणारी आणि नादमय अशी एक कविता म्हणजे  "देह मंदिर चित्त मंदिर " हेच त्यांचे एक लोकप्रिय गीतसुद्धा आहे.
देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रर्थना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

दुःखितांचे दुःख जावो ही मनाची कामना
वेदना जाणावयाला जागवू संवेदना
दुर्बळांच्या रक्षणाला पौरुषाची साधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

जीवनी नव तेज राहो अंतरंगी भावना
सुंदराचा वेध लागो मानवाच्या जीवना
शौर्य लाभो धैर्य लाभो सत्यता संशोधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

भेद सारे मावळू द्या वैर सार्‍या वासना
मानवाच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना
मुक्त आम्ही फक्त मानू बंधूतेच्या बंधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना


बापट ह्यांच्या सर्वच कवितांना एक अंगभूत लय आहे. त्यामुळे त्या कविता छंदात आहेत अथवा नाहीत याचे भानही वाचकाला रहात नाही. त्याच्यापर्यंत पोहोचते ती कवितेतील लय आणि मनाची हुरहूर वाढवणारी शब्दरचना.  त्यांच्या कित्येक कवितेतील वेदना आपल्या मनात घर करते. अशीच एक राजसी या काव्यसंग्रहातील कविता म्हणजे "भास"
'भास' -
संध्याकाळी किनाऱ्यावर एकाएकी झाला भास
कोण आलं.. कोण गेल? कोणीच नाही जवळपास?
कुठून आली ..कुठे गेली? मी पाहिली एवढ खर
अस येण अस जाण तिल दिसल नाही बर!
चुळबुळणाऱ्या लाटांचा जिना उतरत उतरत आली
रेतीवरती पाउलखुणा न ठेवता परत गेली
थांब थांब म्हणेस्तोवर कशी दिसेनाशी झाली
गुल्बाक्षीच्या मावळतीवर आली जास्वंदाची लाली!
पुस्तक मिटून ठेवल्यावरती चांगल का हे पुन्हा येण?
तेव्हा वचन दिल होत पुढील जन्मी देईन देण !
आयुष्याच्या क्षितीजावर अंधारात बुडले रंग
कशासाठी कशासाठी आता अस तपोभंग?
समुद्राच्या लाटा झेलत जेव्हा दोघे भिजलो होतो
ओल्याचिंब देहानीच पेटलो होतो, विझलो होतो!
आता असे कोरडे.. जस जळण्यासाठी उत्सुक सरण
निमित्ताला ठिणगी हवी! एवढ्याकरता दिल स्मरण?
- ("राजसी" ह्या काव्यसंग्रहातून)


"सावंत" ही वसंत बापट यांची पारतंत्र्यातून स्वातंत्र्यात गेलेल्या पण मूल्ये बदलेल्या पिढीवर केलेली एक  जळजळीत आणि उपहासात्मक कविता. अंदाजे अडीच पाने असणाऱ्या कवितेतील काही निवडक ओळी -
सावंत,
किती वर्षांनी भेटतो आहेस मला!
स्वराज्य आले आणि जुनेदेखील झाले.
चले जाव पुकारणारा
तुझा इरसाल म्हातारा केव्हाच शांत झाला
सकाळी दुपारी... तू केव्हाच दिसला नाहीस
सिंहासने पुन्हा पुन्हा भरली आणि  पुन्हा पुन्हा रिती झाली
मैफिलीत तुझा पत्ताच नाही!
खरे सांगू? मीही तुला विसरून गेलो...
तर आज तू उभा.
सावंत, तू कुठे होतास?
सावंत,
सावंतच ना तू?.........

तुला खरे सांगतो सावंत
हिवाळ्या पुलाखाली डायनामाइट पेरायची
कल्पनाच केव्हढी ग्रेट होती
मोतीराम फितूर झाला नसता तर
पंजाबमेल सहयाद्रीने गिळली असती
कसला पच्चकन थुंकलास तू
त्याच्या नावावर
तो आता मंत्री झाला आहे, सावंत
दचकतोस कशाला?....
आता कंत्राटदाराचे राज्य आहे भैया!
खरे सांगतो ... मीही बदललो आहे
पोट पहा ना सुटले किती
.........

अंगातली रग आणि तोंडातली शिवी
दोन्ही हरवून बसलास?
माझ्याशी तसा बोल, पंचवीस वर्षांनी...
नाहीतर सावंत
चले जाव
चले जाव आमच्या फोपशा स्वराज्यातून!

 रंगाने तू गव्हाळ ही 'सेतू' या काव्यसंग्रहातील प्रेयसीचे वर्णन करणारी एक कविता. त्या कवितेतील शब्द, ओघवतेपणा आणि कल्पना मला आवडल्या.
रंगाने तू गव्हाळ -
रंगाने तू गव्हाळ त्यातुन अंगावरती सोनसळा
टवटवीत घवघवीत मुखडा चाफ्याचा जणु सोनकळा
कुरळ्या कळपामधून चुकला भाळावर कुणि वाट खुळा
मधाळ ओढी सुढाळ मोती मधेच करती झळाझळा
कानशिलाचे पान कोवळे सान त्यावरी तीळ निळा
तिरप्या नजरेमधुन घातला कसा काळजावरी विळा

'सेतू' याच काव्यसंग्रहातील कोवळ्या वयातील असफल प्रेमाचे वर्णन करणारी 'जपावयला शिकली होतिस'  ही आणखी एक मनाला हुरहुर लावणारी कविता. त्या कवितेतील लय आणि कवितेचा शेवट मला  आवडला.
जपावयाला शिकली होतिस
जपावयाला शिकली होतिस सारे काही
काठ जरीचा श्वासानेही ढळला नाहि
मोजित होतिस शब्दांमधल्या छटाछटांना
करायचिस तू शिक्षा अपुल्या स्वैर बटांना

शैशव माझे सरले होते, सरले नव्हते
सारे काही कळले होते कळले नव्हते
नुकते होते स्वप्नपऱ्यांना फुटले पंख
अभिलाषेचा जरा कुठे झालेला डंख
..
आज मला ते आठवती मी मलाच हसतो
आठवता ते अजून परि मी माझा नसतो.

'अहा, देश कसा छान' हे कवी वसंत बापट यांचे एक आकर्षक प्रवासचिंतन आहे -
"अहा देश कसा छान - माझं हरलं भान,
हिरवं हिरवं रान - कवळं नागनेली पान,
कसा पिकला ग गहु हरभरा - वरी शाळु-मक्याचा तुरा,
महाराष्ट्रदेश सुंदरा - सोनेरी गुढी मंदिरा ..."
असं बेभान करणारं सौदर्य
दगडफुलांच्या देशातही आपल्याला वेड लावतंच ....
पण नंतर काय होतं?
मळ्यांच्या बागशाही दर्शनानं सुखावलेलं
पोटरीला आलेल्या कणसांच्या गंधानं धुंदावलेलं
आपलं मन
सह्याद्रीवरून खाली झेपावतं
सागरतीरी, कुळागारांत भटकून येतं
तर कधी जातं
क्षितिजापावत पसरलेल्या वाळवंटात, महाल हवेल्यांत ...
किंवा अप्रूप वाटावं अशा पाणवठ्यांवर
रंगश्रीमंत वस्त्रांच्या, बिलोरी काकणांच्या झगमगाटात
रंगील्या राजस्थानात ...
शिवाय नेपाळ, लदाख या अद्भुतांच्या राज्यांत
आणि कधीही न उलगडणार्‍या हिमालय नावाच्या रहस्यात ...

अनामिकाचे अभंग आणि इतर कविता - कवी वसंत बापट म्हणजे प्रखर ऊर्जेचा आविष्कार. अगस्ती ऋषी आणि शिवाजी महाराज ह्यांचं जीवनदर्शन घडवणारी ही दीर्घकविता. दररोज चालणारे घोटाळे आणि भ्रष्टाचार ह्यांच्यावर अभंगांच्या माध्यमातून केलेली खुमासदार, पण मार्मिक टीका हे ह्या पुस्तकाचे खास वैशिष्टय.. जीवनावर भाष्य करणार्‍या, करुण आणि वीररसानं ओतप्रोत भरलेल्या असंख्य प्रकारच्या कवितांचा हा संग्रह म्हणजे रसिकांसाठी मेजवानीच आहे.देशभक्ती, समता, धर्मनिरपेक्षता, मानवता ह्यांसारख्या उदात्त मूल्यांनी ओथंबलेल्या,जीवन समृद्ध करणार्‍या ह्या कविता प्रत्येकानं एकदा तरी जरूर वाचायलाच हव्यात.

'शततारका' -  आकाशातील शततारका नक्षत्राचे लखलखते तेज आणि सौंदर्य प्राप्त झालेल्या या वसंत बापट यांच्या निवडक कविता. स्वातंत्र्य लढ्याच्या काळापासून कवितेशी नाते जोडणार्‍या बापटांच्या बहुविध कवितेच्या विविधांगी सौंदर्याची झलक या संग्रहात अनुभवण्यास मिळते.

'सेतू'- वसंत बापट यांच्या कवितेचे नवे वैभव सेतू या काव्यसंग्रहात उठावदारपणे दिसते. या कवितांच्या अभिव्यक्तीत कलात्मक अपरिहार्यता जाणवते. ही कविता प्रौढ असूनही मिश्किल,चंचल आहे तरीही उदासगंभीर आहे. अनुभवांतले नाट ती अचूक हेरते.

जब्बार पटेलांच्या 'उंबरठा' चित्रपटासाठी त्यांनी लिहिलेली प्रार्थना तर मराठी साहित्यात नव्हे तर मराठी चित्रपटसृष्टीत अढळस्थानी विराजमान झाली आहे.
गगन, सदन तेजोमय
तिमिर हरून करुणाकर
दे प्रकाश, देई अभय

छाया तव, माया तव
हेच परम पुण्यधाम
वार्‍यातून, तार्‍यांतुन
वाचले तुझेच नाम
जगजीवन, जनन-मरण
हे तुझेच रूप सदय

वासंतिक कुसुमांतून
तूच मधुर हासतोस
मेघांच्या धारांतुन
प्रेमरूप भासतोस
कधि येशील चपलचरण
वाहिले तुलाच हृदय

भवमोचन हे लोचन
तुजसाठी दोन दिवे
कंठातील स्वर मंजुळ
भावमधुर गीत नवे
सकलशरण, मनमोहन
सृजन तूच, तूच विलय

याच चित्रपटासाठी त्यांनी लिहिलेलं चांद मातला आजही लोकांच्या आठी ऐकायला मिळते.
चांद मातला, मातला, त्याला कशी आवरू ?
अंगी वणवा चेतला, मला कशी सावरू ?

कशी पुनवेची निशा, चढे चांदण्याची नशा
गेल्या हरवून दिशा झाले खुळे पाखरू

आला समुद्र ही रंगा, त्याचा धिटाईचा दंगा
वेड्या लहरींचा पिंगा बाई झाला की सुरू

गोड गारव्याचा वारा, देह थरारला सारा
चांद अमृताचा मनी बाई लागला झरू

मराठी शाळेत शिकणाऱ्या प्रत्येक मुलाला कवी वसंत बापट हे माहिती असतातच कारण त्याने कधी ना कधी हातावर छडया झेललेल्या असतात अन त्या छडीचे मग गीत गायलेले असते. या छडी गीताला कोण बरे विसरेल ?
छम्‌ छम्‌ छम्‌..... छम्‌ छम्‌ छम्‌
छडी लागे छमछम, विद्या येई घमघम
छम्‌ छम्‌ छम्‌..... छम्‌ छम्‌ छम्‌

मोठ्या मोठ्या मिश्या, डोळे एवढे एवढे लाल
दंतोजींचा पत्ता नाही, खप्पड दोन्ही गाल
शाळेमधल्या पोरांना हा वाटे दुसरा यम
छम्‌ छम्‌ छम्‌

तंबाखूच्या पिचकार्‍यांनी भिंती झाल्या घाण
पचापचा शिव्या देई खाता खाता पान
"मोर्‍या मूर्खा !", "गोप्या गद्ध्या !", देती सर्वा दम
छम्‌ छम्‌ छम्‌

तोंडे फिरवा, पुसती गिरवा, बघु नका कोणी
हसू नका, रडू नका, बोलू नका कोणी
म्हणा सारे एकदम, ओ नमा सिद्धम्‌
छम्‌ छम्‌ छम्‌

अशीच एक वीर रसाने भारलेली कवायतगीता सारखी चाल असणारी बालभारतीच्या पुस्तकाचा प्राण असणाऱ्या कवितांपैकी एक म्हणजे सदैव सैनिका ...ही कविता होय ...
 सदैव सैनिका पुढेच जायचे
न मागुती तुवा कधी फिरायचे

सदा तुझ्यापुढे उभी असे निशा
सदैव काजळी दिसायच्या दिशा
मधून मेघ हे नभास ग्रासती
मधेच या विजा भयाण हासती
दहा दिशांतुनी तुफान व्हायचे

प्रलोभने तुला न लोभ दाविती
न मोहबंधने पदांस बांधिती
विरोध क्रोध वा तुला न थांबवी
न मोह भासतो गजांत वैभवी
न दैन्यही तुझे कधी सरायचे

वसंत वा शरद तुला न ती क्षिती
नभांत सूर्य वा असो निशापती !
विशीर्ण वस्‍त्र हो विदीर्ण पावले
तरी न पाय हे कधी विसावले !
न लोचना तुवा सुखे मिटायचे

नभात सैनिका प्रभात येउ दे
खगांसवे जगा सुखात गाउ दे
फुलाफुलांवरी सुवर्ण शोभु दे
जगास शांतता सुहास्य लाभु दे
न पाय तोवरी तुझे ठरायचे

वसंत बापट ह्यांनी काव्याबरोबर इतर साहित्यप्रकारांचेही लेखन केले आहे.  त्याची उदाहरणे म्हणजे: "परीच्या राज्यात" हे त्यांचे बाल नृत्य नाट्य. तर "बारा गावच पाणी,' 'अहा देश कसा',आणि गोष्टी देशांतराच्या ही वसंत बापटांची प्रवासचित्रे. "ताणे बाणे" हे त्यांचे ललित गद्य . वसंत बापट ह्यांनी  "जिंकुनि मरणाला "हे व्यक्तिदर्शन ही लिहिले आहे.

'बारा गावचं पाणी' या प्रवासवर्णनातील  परिच्छेद-
कुठे आहे मनाली ? काश्मीरच्या आग्नेयेला, पंजाबच्या उत्तरेला हिमालयाच्या कुशीत. केवढी आहे मनाली? खेड्याहून मोठी आहे. शहराहून छोटी आहे. अटकर आहे. 'सुशीलेचे परि बाल्य सरत आले' एवढी आहे.कशी आहे मनाली ? ती आहे  मनालीसारखी ! झोपेत चालणारी, झोपेत बोलणारी, झोपेत सफरचंदी स्वप्ने पाहणारी, नव्या जगाकडे, जमान्याकडे अर्ध उघड्या तिरप्या नजरेने बघणारी प्रमिला ! मनालीला कुणी जावे ? ज्यांचे हिशेब नेहमी चुकतात, ज्यांची घड्याळे हरवलेली असतात, जे यंत्रातून बाहेर घऱंगळतात, 'सुटी निवांतपणे घालवायची आहे ' हे बँड लावून ज्यांना जायचे नसते, प्रकाशझोतांनी चुरचुरणारे डोळे ज्यांना निववायचे असतात, हिमालयात ज्यांना चौपाटी भरवायची नसते त्यांनी निमूटपणे जावे मनालीकडे. ती या किरकिऱ्या बाळांना थोपटीत अंगाई म्हणेल.
 कुलू आणि लाहोल खोऱ्यात अडसर म्हणून हिमालयाने  आपली एक टांग टाकून दिली आहे. ही टांग ओलांडल्याशिवाय दोन्ही खोऱ्यातील मंडळी एकमेकांना भेटणार कशी ? ही टांग ओलांडायची असते त्या जागेलाच नाव आहे रोहटांग ! चौदा हजार फूट उंचीवरील ही खिंड हाच कुलू आणि लाहोलमधील दरवाजा. थेट तिबेटपासून निघालेले सौदागर आपली खेचरे घेऊन याच मार्गाने पोचतात कुलू खोऱ्यापर्यंत.  पण रोहटांग उतरून आल्यावर अवघ्या पाच कोसांवर सौदागर थबकतात. कारण इथे आहे मनाली. उंच उंच देवदारू, फर, भूर्ज असल्या जबरदस्त वृक्षराजांच्या पहाऱ्यात मनाली राहते. ती आपल्याच तंद्रीत असते. त्यामुळे सारे सौदागर आणि मुलखावेगळे मुशाफिर तिला मनसोक्त पाहू शकतात....'

या लेखनातून त्यांची वर्णन करण्याची एक विशिष्ट हातोटी लक्षात येते. गद्य लेखनातही एक आगळी लय आहे ते वाचकांना प्रकर्षाने जाणवते.
बारा गावचं पाणी या प्रवासवर्णनातील आणखी एक लेख आहे जयपूर या शहरावर. त्यामधील परिच्छेद -
'जनानी जयपुरी' -
"राजा जयसिंगाला सन सत्राशे सत्ताविसात एक स्वप्न पडले. खूप दीर्घ स्वप्न . प्रशस्त स्वप्न.  त्याचा आरंभ झाला तेव्हा आकाशात नक्षत्रांचा खच पडला होता. ते संपले तेव्हा अरुणाची झळाळी आभाळभर पसरली होती. जयसिंग जागा झाला आणि कामाला लागला. एक सुंदर स्वप्नाला कायम चिरेबंद करणे हे काम सोपे नव्हे, लहानसहान नव्हे. पण जयसिंगाने ते करून टाकले.  काम संपले, त्या वेळी जयपूर नावाचे एक महानगर अवतरले.
वाळूच्याच रंगाचा एक मोठा कागद जयसिंगासमोर होता. तो वाऱ्याने फडफडू नये म्हणून त्याने चौतर्फा कंकर ठेवले. मग हलक्या हाताने त्याने एक चौकोन रेखला; त्या चौकोनाच्या रेषांना  आठ ठिकाणी व्यवस्थित छेद दिला. मग या आठ ठिकाणाहून निघणाऱ्या आडव्या उभ्या पट्ट्यांचा एक पटच त्याने तयार केला.  त्याच्यावर इथे आणि  तिथे रत्ने मांडून झाल्यावर त्याने आपल्या प्रधानाला, पुरोहिताला, सेनापतीला, खजिनदाराला बोलावून घेतले. ....."
हे सर्व वाचतांना या घटना आपल्या डोळ्यासमोर घडत आहेत असे वाटत नाही का ? किरकोळ वाटणाऱ्या गोष्टींची प्रभावी मांडणी आणि कल्पनाविलास ही बापटांच्या गद्य लेखनाचीही वैशिष्ट्ये आहेत.

१७ सप्टेंबर २००२ रोजी वसंत बापट ह्यांचे पुणे येथे निधन झाले. पण विविध विषयांच्या गेय, विविध प्रगल्भ कवितांनी आणि आपल्या लेखनाने  त्यांनी मराठी कवितेला, मराठी साहित्याला जे योगदान दिले आहे ते मात्र कायम लक्षात राहील असेच आहे. 

- समीर गायकवाड.