Wednesday, June 22, 2016

'तुझे गीत गाण्यासाठी' .....माझ्या मनातला उदास जिप्सी ....'तिन्ही लोक आनंदाने भरुन गाउ दे रे
तुझे गीत गाण्यासाठी सूर लावु दे रे ...'असं आता मी कुणासाठी गाऊ ?
मराठी साहित्यातला इंद्रधनुष्यी 'शुक्रतारा' 'जिप्सी' नक्षत्रांचे देणे द्यायला अन 'चांदोमामा, चांदोमामा..... भागलास काय ?' असं विचारायला त्या विश्वनिहंत्याच्या भेटीस गेलाय अन तिथे जाऊन त्यालाही तो सांगणार आहे, 'या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे..."अखरेच्या प्रवासाला जाताना ते सर्वांसाठी आधीच लिहून गेलेत,
'अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती
दोन दिसांची रंगत संगत दोन दिसांची नाती.....'

मला खात्री आहे ते वर जाऊनही आपल्याला सांगत राहतील की,
'अवती भवती असून दिसेना, शोधीतोस आकाशी
हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी ...'

त्यांना बघून चक्क मार्गशीर्षातही ईश्वरही म्हणेल की
'श्रावणात घन निळा बरसला रिमझिम रेशिमधारा,
उलगडला झाडांतून अवचित हिरवा मोरपिसारा ...'

ते मात्र गात राहतील,
'वल्हव रे नाखवा, वल्हव रे नाखवा, वल्हव रे नाखवा, वल्हव
आम्ही कोळ्याची पोरं हाय्‌ हो, हाय्‌ हो, हाय्‌ हो
आम्हां दर्याची भीती नाय हो, नाय हो, नाय हो...'

आपल्या या जिप्सीला पाहून स्वर्गातला कृष्णाने लावलेला पारिजातकही गाईल,
'टप्‌ टप्‌ पडती अंगावरती प्राजक्ताची फुले
'भिर्‌ भिर्‌ भिर्‌ भिर्‌ त्या तालावर गाणे अमुचे जुळे !...'

मी मात्र ते गेले त्या दिशेने बघत त्यांचे गाणे गात राहीन,
'डोळे कशासाठी ? कशासाठी ?
तुला साठवून मिटून घेण्यासाठी
आला भरून पाऊस, नको एकटा जाऊस
अरे सरी कशासाठी, तुला बिलगून भिजून जाण्यासाठी...'

माझ्या परसदारातील जाई जुईच्या वेली त्याच्यासाठी अश्रू ढाळतील,
'जरि या पुसून गेल्या सार्‍या जुन्या खुणा रे
हा चंद्र पाहताना होते तुझी पुन्हा रे....'

त्याची आठवण डोळ्यात साठवून पाने फुले सांगत राहतील ,
'जाहल्या काही चुका अन्‌ सूर काही राहिले
तू दिलेले गीत माझे आवडीने गायिले....'

माझा जिप्सी त्याच्या अनंताच्या प्रवासात देखील भातुकलीचा मोडलेला खेळ 'सावरेल अन अधुरी कहाणी पूर्ण करेल,
भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी
अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी...'

इथे मात्र तरुणांचे तराणे आता गायचे कुणी हा प्रश्न पडला आहे, कुणी आता कुणासाठी झुरायचे याचे एक उत्तर तरी तुम्ही जाण्यापूर्वी द्यायचे होते ..
'दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्यावाचून झुलायचे
स्वप्‍नात गुंगत जाणे, वाटेत भेटते गाणे
गाण्यात हृदय झुरायचे....'

जरी ते ईश्वराकडे गेले असले तेरी त्यांची विराणी डोळ्याचा पारा हळूच मोकळा करून जाईल,
'डोळ्यांत सांजवेळी आणू नकोस पाणी
त्या दूरच्या दिव्यांना सांगू नको कहाणी

कामांत गुंतलेले असतील हात दोन्ही
तेव्हा नको म्हणू तू माझी उदास गाणी'

सर नंदाच्या त्या गोकुळात जाऊन आता तुम्ही त्याला गाऊन दाखवणार का ही अंगाई, विचारताना तुम्हाला माझ्या डोळा पाणी येई ,
'नीज माझ्या नंदलाला, नंदलाला रे...
शांत हे आभाळ सारे
शांत तारे, शांत वारे
या झर्‍याचा सूर आता मंद झाला, मंद झाला रे...'

किती वाईट प्रसंग जीवनात येऊन गेले पण तुमच्या गाण्यांनी मला धीर दिला अन मीही तुमचेच गीत गात राहिलो,
'माझे जीवन गाणे, माझे जीवन गाणे !'
व्यथा असो आनंद असू दे
प्रकाश किंवा तिमिर असू दे
वाट दिसो अथवा न दिसू दे, गात पुढे मज जाणे !....'

माझी मराठी माती देखील आता उदास झाली आहे कारण
"या ओठांनी चुंबुन घेइन हजारदा ही माती
अनंत मरणे झेलुन घ्यावी इथल्या जगण्यासाठी
इथल्या पिंपळपानावरती अवघे विश्व तरावे......"

असलं हे काळजाला भिडणारं अन मातीला चुंबणारं आता कोणी कधी लिहील काय ?
तुम्ही गेला नाहीत सर, आमच्या सर्वांच्या मनाताल्या प्रत्येक अक्षरात तुमचे 'सूर आनंदघन' बनून नश्वर झाले आहेत अन प्रत्येकाच्या मनातला एक जिप्सी तुमच्या रूपाने जिवंतच असणार आहे ...

- समीर गायकवाड