Thursday, June 2, 2016

एक 'दिवस' वेश्यांचा !.....

एक 'दिवस' वेश्यांचा... २ जून १९७५. सेंट निझीअर चर्च, लिओन, फ्रान्स. दुपारचे रखरखीत ऊन सगळ्या रस्त्यांवर चमकत होते. सारं शहर शांत होतं, जो तो आपल्या नादात दंग होता. कुठेही कसलीही लगबग नव्हती. मात्र ज्वालामुखीचा लाव्हा उसळावा तसा अचानक तिथल्या शांततेचा भंग झाला. शहराच्या पूर्व भागात एका गल्लीत गोळा झालेल्या शंभरएक वेश्या हातात फलक घेऊन मोठमोठ्या आवाजात घोषणा देत चर्चच्या समोर आल्या. समाजाकडून होत असलेले त्यांचे शोषण आणि त्यांची ढासळत चाललेली आर्थिक - मानसिक अवस्था यासाठी त्यांचा आक्रोश सुरु होता. बघता बघता सारया शहरात याची कुणकुण लागली आणि नागरिकांचे जत्थे तिथे येऊ लागताच त्या सर्व जणींनी चर्चवर ताबा मिळवला. चर्च मधील सर्व प्रीस्टसना बाहेर काढून त्यांनी चर्चची दारे लावून घेतली आणि आतून घोषणाबाजी सुरु ठेवली. बघता बघता संपूर्ण फ्रान्समध्ये बातमी पसरली. अकस्मात उद्भवलेल्या या आंदोलनाला कसे हाताळायचे याचे कोडे फ्रेंच पोलिसांना पडले होते. त्यांनी वेश्यांना आवाहने करून पहिली पण ठोस आश्वासनाशिवाय त्या माघार घ्यायला तयार नव्हत्या. शेवटी 'व्हेटीकन सिटी'कडून दबाव आला आणि फ्रेंच सरकारला कठोर भूमिका घेणं भाग पडले. १० जून १९७५ रोजी संध्याकाळी म्हणजे लिओन शहरातील वेश्यांनी सेंट निझीअर चर्चवर ताबा मिळवल्यानंतर तब्बल ८ दिवसांनी फ्रेंच पोलिसांनी अत्यंत निर्दयतेने चर्चवरच हल्ला चढवला. या सर्व वेश्यांना जबरदस्त मारहाण करण्यात आली आणि मोठ्या नाट्यमय घडामोडीनंतर या सर्व महिलांना ताब्यात घेण्यात आले. मात्र या घटनेची अंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. युरोपातील खुल्या विचारधारेच्या लोकांनी वेश्यांच्या आंदोलनाचे समर्थन केले त्यामुळे फ्रेंच सरकारचा नाइलाज होऊन त्यांना या सर्व वेश्यांना मुक्त करावे लागले. मात्र त्या दिवसापासून २ जून हा दिवस 'अंतरराष्ट्रीय सेक्स वर्कर डे' म्हणून साजरा केला जाऊ लागला. आपल्याकडे अजूनही या सर्व बाबींच्या बाबतीत 'आनंदीआनंद' आहे. अजूनही वेश्यांना समाजात कसलेही स्थान नाही, त्यांच्या कोणत्याही अधिकारांची वा मानवी हक्काची त्यांना जाणीव नाही, व्यवसायाअंतर्गत होणारया शोषणाविरुद्ध काम करणारी यंत्रणा नाही की वेश्याव्यवसायापासून परावृत्त करणारी एखादी योजना नाही. त्याच बरोबरीने ह्युमन ट्रेफीकिंग रोखून यात बळजबरीने सामील केल्या जाणारया नवीन मुलींना यातून बाहेर काढण्यासाठी कुठलेही अभियान नाही. तरीदेखील आज कामाठीपुरयात काही एनजीओ आणि सामाजिक चळवळीतील काही व्यक्तींनी 'सेक्स वर्कर्स डे' साजरा करण्याचे ठरवले आहे त्याचीही कुठे दखल नाही ! इतक्या वाईट आहेत का या स्त्रिया ? आपण त्यांना सन्मान नाही तर नाही त्यांचा आनंद तरी कधी देऊ शकणार नाही का ? की आपण कायम पांढरपेशे असल्याचा आव आणत नाकाला रुमाल लावूनच या घटकाकडे पाहणार ? मग यांच्याकडे जाणारे कोण असतात ? यांना वाट नसेल का, की आपलीही दखल घेतली जावी, आपणही एखादा आनंदाचा दिवस साजरा करावा अन इतरांनी त्यांच्या वेदनांवर एक हलकीशी फुंकर घालावी. या स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टीकोन आपण कधी बदलणार याचे नेमके उत्तर आज कोणाकडेच नाही. यांनाही काही तरी इतिहास आहे यांचेही काहीतरी भविष्य आहे याची आम्ही कधी नोंद घेणार ते देखील सांगता येत नाही. इंग्रजांनी त्यांच्या सैनिकांच्या लैंगिक सुखाच्या सोयीसाठी जो कम्फर्ट झोन मुंबईत तयार केला होता त्यात मोठ्या प्रमाणात आंध्राच्या कामाठी मजुर महिलांचा समावेश होता. सावळ्या वर्णाच्या, तुकतुकीत कांतीच्या अन काहीशा स्थूल देहाच्या कमनीय भारतीय नारीच्या ज्या इंग्रजांच्या मनातील प्रतिमेत या कामाठी महिला अगदी फिट बसणाऱ्या होत्या. त्यामुळे त्यांना इथे वसवण्यात आले. एकूण १६ गल्ल्यां मध्ये कामाठीपुरा वसलेला आहे. त्यापैकी (आजच्या घडीला) ९ गल्ल्यांत हा देहविक्रीचा व्यवसाय चालतो तर उर्वरित सात गल्ल्यांत रहिवासी आणि आस्थापने आहेत.या गल्ल्या पुढे नार्थबुक गार्डन, बॅलेसिस रो, फॉकलंड रोडला जोडल्या जाातात. त्यातही गल्ली नंबर ११ सर्वात घनदाट वस्तीची आहे, इथे एका इमारतीत शेकडो मुली आढळतात. इंग्रजांच्या राजवटीत १९२८ पर्यंत या व्यवसायासाठी परवाना पद्धत होती मात्र त्यानंतर १९५० मध्ये हे परवाने रद्द करून बेकायदेशीर ठरवले गेले. आजघडीला एकट्या मुंबईत दहाहजार सेक्स वर्कर आहेत. पुण्यातील बुधवार पेठ परिसरात दोन हजार सेक्स वर्कर्स आहेत तर सेक्स वर्कर्सची देशातील सर्वात मोठी वस्ती सोनागाची, कोलकाता इथे आहे. आज देशाच्या प्रत्येक शहरात अशी एक बदनाम वस्ती आहे की जिथं या राहतात अन अंधारून आलं की आपले मुखवटे लपवत शहाजोग सभ्य माणसं आपली वासना शमवायला इथं येतात किंवा यांना दुसरीकडे घेऊन जातात ! आजघडीला अनेक जणी यांतून जीव धोक्यात घालून तर काही हिकमतीने बाहेर पडत आहेत पण त्यांच्या जागी लगेच दुसरया मुली येतातच. काही दिवसांपूर्वी कामाठीपुरयातील एक इमारत कोसळल्याची एक पोस्ट मी लिहिली होती. आता त्या मागील आणखी काही कथा बाहेर येतायेत, या परिसरातील जागांचे गगनाला भिडलेले भाव आणि सहज मोडून काढता येणारे वेश्यांचे आव्हान यामुळे मुंबईतील बिल्डर्सचा डोळा आता या ११ गल्ल्यांवर पडला आहे असं म्हटलं जात आहे. अशीच स्थिती पुण्यात सुद्धा होऊ पाहत्येय. यांना हुसकून दिल्यावर यांनी कुठे जायचे याचे उत्तर कोण देईल असे वाटत नाही कारण मुळात हा प्रश्नच कुणी विचारणार नाही. समाजातील कोणत्याच घटकांना हे शेजारी म्हणून नकोसे आहेत हे चाणाक्ष बिल्डरांनी ताडलेले आहे. आयुष्यभर अनंत यातना सोसून आपल्या देहाचा बाजार कधी इच्छेने तर कधी अनिच्छेने तर कधी जोरजबरदस्तीने मांडणारया अन आपल्याच शरीराच्या चिंधडया करवून घेणारया या अभागी स्त्रीयांमुळे पुरुषी गिधाडे काही प्रमाणात तरी शमतात हेही आपला समाज कबुल करत नाही. धुत्कारलेले जीणं जगताना स्वतःच्या आयुष्यात अंधार करून जगाची अंथरुणे सजवणारया या दुर्दैवी स्त्रियांना त्यांच्या जीवनात कधी तरी आनंदाचे चार दिवस यावेत या मनापासूनच्या शुभेच्छा…. - समीर गायकवाड. http://sameerbapu.blogspot.in/2016/06/blog-post_2.html