Saturday, May 7, 2016

सच्चे दोस्त - मुंबई पोलिसांच्या मॅक्सची अन त्याच्या दोस्तांची अनोखी दास्तान !


आपण कित्येक वेळा उद्वेगाने म्हणतो की माणसापेक्षा मुकी जनावरे जास्त खरी असतात. आपली हताशा संपली की आपल्यातील माणूस पुन्हा लोप पावतो अन आपणही पुन्हा इतरांप्रमाणेच मतलबी जगात स्वतःला सामील करून टाकतो. पण प्राणी याला अपवाद असतात, ते खोटे बोलू शकत नाहीत की खोटे वागू शकत नाहीत, त्यांची दुनिया ही खऱ्या अर्थाने खऱ्याची दुनिया असते. ही सत्यघटना आहे काही दोस्तांची ! काही श्वानांची ! हे सगळे श्वान सामान्य नाहीत, यांनी बॉम्बशोधक पथकात काम केले आहे. या जिवलग मित्रातला एक मित्र माणसांची मतलबी दुनिया सोडून गेला. त्याचं नाव होतं 'मॅक्स' !.
२६/११च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात मॅक्सने जीवाची बाजी लावून हॉटेल ताजमध्ये आठ किलोग्रामची विस्फोटके आणि पंचवीस गेनेडसचा ठावठिकाणा शोधून मोठी कामगिरी बजावली होती. ९ एप्रिल २०१६ रोजी मॅक्सचा मृत्यू झाला, मॅक्स आणि त्याचे दोन साथीदार दोस्त मागील वर्षीच बॉम्बशोधक व बॉम्बनाशक पथकातून निवृत्त झाले होते. मुंबई पोलिसांनी अगदी थाटात त्यांचा निवृत्ति सोहळा पार पाडला होता. फिजा शाह यांनी या तिघांना रीतसर दत्तक घेतले होते. वयोमानानुसार मॅक्सचं निधन झालं, त्याला विरारजवळील एका खाजगी जमिनीत दफन करण्याची तयारी सुरु झाली अन त्याच्या साथीदारांची घालमेल सुरु झाली. ते त्याच्यापासून हटायला तयार नव्हते,

शेवटी मुंबई पोलीसदलातील मॅक्ससोबत काम केलेल्या अधिकाऱ्यांना फिजा शाह यांच्याकडे जावे लागले. मॅक्सचा देह तिरंग्यात आणला गेला मात्र त्याच्या साथीदारांनी असा काही गलका केला की त्यांनाही तिथपर्यंत आणावे लागले. या तिघांची नावे सीजर, टायगर अन सुलतान अशी आहेत. आधी तर यांनी दफनविधीसाठी खड्डा खंदून होईपर्यंत मॅक्सच्या देहाचा ताबा आपल्याकडे ठेवला. ते कोणालाही आपल्याजवळ येऊ देत नव्हते. शेवटी युक्त्या क्लृप्त्या लढवून या तिघांना मॅक्सपासून बाजूला केले अन मॅक्सचा थकलेला देह मातीत कायमचा विसावला. मॅक्सचा दफनविधी जिथे केला तिथे माती लोटून झाली, फुले चढवली गेली आणि सारे तिथून निघण्याच्या तयारीला लागले. पण सुलतान काही केल्या तिथून यायला तयार होईना. लाख प्रयत्न केले तरी तो तिथून येईनासा झाल्यावर साऱ्यांचे डोळे पाणावले. शेवटी त्यालाही कसेबसे तिथून बाहेर काढले अन फिजा त्याला आपल्या सोबत घेऊन गेल्या.

घरी परत आल्यापासून या सर्वांचे वर्तन बदलले. ते तासंतास निपचित बसून राहू लागले. त्यांची तहानभूक हरपली जणू ते आपल्या जिवलग मित्राच्या वियोगाच्या धक्क्यातून बाहेर येऊ शकत नव्हते. त्यांना जास्त आग्रह केला गेला तर मॅक्सला ठेवण्यासाठी जे पिंजरावजा डॉगहाउस होते, जिथे मॅक्सने शेवटचे श्वास घेतले होते तिथे शिरण्याचा प्रयत्न हे करू लागले. शेवटी फिजा त्यांच्यापुढे नमल्या, त्यांनी त्यांची बंधने मुक्त केली. त्या दिवसापासून आजतागायत सीजर, टायगर आणि सलमान आपल्या जिवलग दोस्ताच्या मॅक्सच्या अखेरच्या विसाव्यापाशी जाऊन आपल्या दोस्तीचे क्षण जागवतात, आपल्या मित्रापाशी आपले हितगुज करून मगच घरी परत येतात.

रक्ताच्या नात्यातला माणूस गेल्यावर आपण किती दिवस अन कसे शोकाकुल राहतो हा आपल्या अंतरमनाच्या चिंतनाचा विषय आहे, मात्र हे उदाहरण सच्च्या दोस्तीच्या गहिऱ्या नात्याचे आहे ज्याची मिसाल माणूसदेखील देऊ शकत नाही !

- समीर गायकवाड.