Monday, May 16, 2016

'गायी पाण्यावर काय म्हणूनी आल्या ...' आणि कवी बी - एक रसग्रहण.


गाय आणि तिचे वासरू, तिची माया, तिचं दयाळू वर्तन अन तिची करुण प्रतिमा याचा साहित्यिकांनी गदय पदय या दोन्ही साहित्यप्रकारात यथार्थ वापर केल्याची अनेक उदाहरणे आपल्याला पानोपानी आढळतील. कवितांत तर आईची माया दर्शविण्यासाठी गायीची उपमा अत्यंत खुबीने वापरली गेलीय. मात्र तरीही काही कविता केवळ गाईच्या ममतेवर असे काही अप्रतिम भाष्य करून गेल्या आहेत की त्यांनी रसिक वाचकांच्या मनाचा अचूक ठाव घेतला आहे. अशाच एका कवितेचे रसग्रहण ..

शास्त्रीय दृष्टीकोनातून गाय हा जरी पाळीव प्राणी म्हणून ओळखला जात असला तरी सांस्कृतिक मुल्ये वा धार्मिक आस्थेचे प्रतिक या दृष्टीनेही ज्ञात आहे. या बरोबरीनेच प्रेम, माया आणि वात्सल्य यांचेही प्रतिक म्हणून लोकजीवनापासून ते आधुनिक साहित्यप्रकारात गायीला स्थान आहे. मराठी कवितेत गायीचे रूपक वापरून अनेक कवींनी आपल्या प्रतिभाशक्तीच्या जोरावर प्रेम, करुणा, माया, आस्था, कोमलता व ममता या भावनांनी युक्त आशयाच्या कविता अत्यंत प्रभावीपणे रचल्या आहेत. कवी प्रा.स.ग.पाचपोळ त्यांच्या कवितेत म्हणतात की,
'हंबरून वासराले चाटते जवा गाय
तवा मले तिच्यामंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय
रे हंबरून वासराले ...................’
डोळ्यात पाणी आणणारे हे वर्णन गायीच्या रूपकातून काळजाला भिडते. मुळात गायीच्या अंगी करुणाशीलता, वात्सल्य अन मायाळूपणा हे गुण काठोकाठ भरले आहेत. त्यामुळे आईची माया वा आईच्या प्रेमासाठी गायीची उपमा अगदी चपखल ठरते.

'आई' ही कवी फ.मु.शिंदे यांची अत्यंत गाजलेली कविता या कवितेत देखील आईचा अगाध महिमा सांगण्यासाठी कवींनी गायीच्या रूपकाचा वापर केला आहे. या कवितेत कवी लिहितात की,
'....याहून का निराळी असते आई?
ती घरात नाही तर मग कुणाशी बोलतात गोठ्यात हंबरणाऱ्या गायी?
आई खरंच काय असते?
लेकराची माय असते
वासराची गाय असते
दुधाची साय असते….’

युगप्रवर्तक कवी बा.सी.मर्ढेकर त्यांच्या अभ्रांच्या या कुंद अफूने या कवितेत आषाढ श्रावण महिन्यात येणाऱ्या पावसाने ओल्या झालेल्या सृष्टीचे वर्णन केले आहे. पावसाची चातकासारखी वाट पहाणारे पक्षी, पाने, फुले, पाखरे यांची दखल घेत घेत पर्यावरणीय बदलावर कवी सूचक भाष्य करतानाच तत्कालीन आंतरराष्ट्रीय घटनांशी देखील तिचे तार जुळवतात. या कवितेत गाय आणि तिच्या गळ्यातील घंटा या उपमांचा वापर चपखलपणे केलाय. किंचित गूढ वाटणारी ही कविता या शब्दप्रतिमामुळे अत्यंत देखणी झाली आहे -
'अभ्रांच्या ये कुंद अफूने. 
अभ्रांच्या ये कुंद अफूने.
पानांना ह्या हिरवी गुंगी;.
वैशाखातिल फांदीवरती.
आषाढातील गाजर पुंगी.
मिटून बसली पंख पाखरे,
पर्युत्सुक नच पीसही फुलते;.
मूक गरोदर गायीची अन्.
गळ्यातली पण घंटा झुरते !.......'

'वाऱ्याने हलते रान' या कवितेत कवी ग्रेस यांनी आपल्या अर्थपूर्ण रचनेत गायीच्या डोळ्यांचा इतका सुंदर वापर केला आहे की कवितेला आपसूकच एक करुण झाक प्राप्त होते. काही समीक्षक ग्रेसांच्या कवितेवर दुर्बोधतेचा आरोप करतात मात्र त्यांच्या कवितातील आशयघनता आणि उत्कट शब्दसौंदर्याचे कमनीय मिश्रण यावर निरुत्तर होऊन जातात. अस्तित्वाच्या शोधातील ही विरह कविता तिच्या प्रत्येक पंक्तीत गहिरे शब्दालंकार अनोख्या पद्धतीने अन नव्या अर्थसंदर्भाने सजली आहे. आपल्या काव्यरचनेच्या अन शब्दसौंदर्याच्या प्रेमात पडलेले ग्रेस या कवितेत दुर्बोध न वाटता अत्यंत हळवे वाटतात, याला कारण यातील  उपमा आहेत. गहिवरणाऱ्या ह्रदयासाठी त्यांनी योजिलेल्या गायींच्या डोळ्यांना सांज निळाईची ही उपमा जोडून वापरल्याने या दोन्ही प्रतिमा चित्रमय पद्धतीने डोळ्यापुढे येतात अन काव्यार्थ अधिक रसरशीत होतो.
‘वारयाने हलते रांन, तुझे सुनसान
हृदय गहिवरले,
गायीचे डोळे करुण उभे की
सांज निळाईंतले,….’

ग्रामीण भागातील जीवन शब्दांकित करताना कवी इंद्रजीत भालेराव त्यांच्या कवितेत त्यांनी बालपणी अनुभवलेला तिथला निसर्ग, प्राणी-पक्षी यांचं मानवाशी असलेलं जिव्हाळ्याचं नातं यांच्याशी एकजीव होऊन व्यक्त करतात. त्यांच्या कवितेतून ते जाणवत राहते. या कवितेतील गायीचे असे वर्णन एक मातीतला माणूसच करू शकतो, कारण या गोष्टी अनुभवल्याशिवाय शाईत उतरत नाहीत.
'माझी एक गाय होती तिला होते वासरू
तोच माझा दोस्त होता त्याला कसे विसरू,
मीही व्हायचो गुबगुबीत दूध पिऊ-पिऊ
दोघासाठी एक पान्हा, आम्ही भाऊ-भाऊ....'

वर उल्लेखिलेल्या सर्व कवितांपेक्षा थोडीशी वेगळी मात्र अंत्यंत भावपूर्ण अर्थ असणारी एक कविता कवी 'बी' यांनी लिहिली होती, जिला अफाट लोकप्रियता मिळाली अन अनेकांच्या स्मृतीपटलावर ती कायमची कोरली गेली. ती कविता म्हणजे 'गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या...' होय.

पित्याचे दारिद्रय मुलांच्या उर्मी, अपेक्षा मूकपणे मारून टाकत असते, खरे तर कोणत्याही पित्याची आपल्या
मुलाबाळांच्या अपेक्षापूर्तीसाठी अखेरपर्यंत देह झिझवण्याची तयारी असते. पण जिथे भौतिक सुखसुविधांचा प्रश्न उपस्थित होतो तिथे व्यावहारिक जगातील घटक भावभावनांपेक्षा वरचढ ठरतात. अशा वेळी सगळेच मूक दर्शक बनून राहतात, बाप मनातल्या मनात कुढत राहतो अन त्याची निष्पाप लेकरे आपल्या इच्छा आकांक्षांचा गळा घोटत राहतात. आपल्या पित्याकडून आपल्या सर्व मनोकामना पूर्ण झाल्या नसल्या तरी आपल्या पित्याने आपल्यासाठी अहोरात्र उपसलेले काबाडकष्ट प्रत्येक अपत्याच्या मनात कुठे तरी रुतून बसलेले असतात. पित्याच्या या ऋणातून कोणीच उतराई होऊ शकत नाही मात्र त्याला समाधान तरी आपण निश्चित देऊ शकतो. अशाच एका स्नेह भावनेने ओथंबून भरलेल्या पित्याच्या लाडक्या लेकीची ही कविता. ही 'देवाघरची फुले' आपल्या अल्प अपेक्षेने आणि त्यावरील सोप्या पण खोट्या उपायाने आपल्या पित्यास कसे हृदय पिळवटून टाकणारे समाधान देत असतांत.याचे प्रत्ययकारी वर्णन या कवितेत कवी बी यांनी केले आहे.

गायी पाण्यावर काय म्हणुनी आल्या ?का ग गंगायमुनाहि या मिळाल्या ?
उभय पितरांच्या चित्त-चोरटीला कोण माझ्या बोलले गोरटीला ?

विभा-विमला आपटे-प्रधानांच्या अन्य कन्या श्रीमान कुलीनांच्या
गौर चैत्रींची तशा सजूनि येती, रेशमाची पोलकी छिटे लेती.

तुला 'लंकेच्या पार्वती' समान पाहुनीया, होवोनि साभिमान
काय त्यातिल बोलली एक कोण 'अहा ! - आली ही पहा - भिकारीण !'

पंकसंपर्के कमळ का भिकारी ? धूलिसंसर्गे रत्‍न का भिकारी ?
सूत्रसंगे सुमहार का भिकारी ? कशी तूही मग मजमुळे भिकारी ?

लाट उसळोनी जळी खळे व्हावे, त्यात चंद्राचे चांदणे पडावे;
तसे गाली हासता तुझ्या व्हावे, उचंबळुनी लावण्य वर वहावे !

नारि मायेचे रूप हे प्रसिद्ध, सोस लेण्यांचा त्यास जन्मसिद्ध;
तोच बीजांकुर धरी तुझा हेतू, विलासाची होशील मोगरी तू !

तुला घेइन पोलके मखमलीचे, कुडी मोत्यांची, फूल सुवर्णाचे;
हौस बाई ! पुरवीन तुझी सारी, परि आवरि हा प्रलय महाभारी !

प्राण ज्यांचेवर गुंतले सदाचे, कोड किंचित्‌ पुरविता न ये त्यांचे;
तदा बापाचे हृदय कसे होते, नये वदतां, अनुभवी जाणती ते !

देव देतो सद्गुणी बालकांना काय म्हणुनी आम्हांस करंट्यांना ?
लांब त्याच्या गावास जाउनीया गूढ घेतो हे त्यास पुसोनीया !

"गावि जातो," ऐकता त्याच काली पार बदलुनी ती बालसृष्टि गेली !
गळा घालुनि करपाश रेशमाचा वदे "येते मी" पोर अज्ञ वाचा !या कवितेतील गाई पाण्यावर काय म्हणून आल्या ही ओळच मुळात जादुई चित्रमय प्रभाव पाडून जाते. इथला गायी पाण्यावर हा शब्द रूढ अर्थाने पाणी पिण्यास काठावर (जलाशयाच्या) आलेल्या गायी असा नसून डोळ्यातल्या अश्रूंशी त्याचे भावबंध कवीने जोडले आहेत. गाय ही मूर्तिमंत करुणेची सात्विक प्रतिमा आहे, अन लग्न होऊन सासरी चाललेल्या मुलीच्या डोळ्यातील अश्रू हा याचा अर्थ आहे. डोळ्यात पाणी असे काही दाटून आले आहे की जणू मायेने व्याकुळ झालेल्या, प्रेमासाठी तहानलेल्या गायीने आपली तहान शमवण्यासाठी ह्रदयाच्या (पाण्याच्या) काठाशी यावे !

इथे आपली मुलगी इतर मुलींच्या तुलनेत गरीब आहे याची खंत खूप नेटक्या शब्दात कवी बी यांनी व्यक्त केली आहे. आपल्या चित्तचोरटीस, गोरटया मूर्तीसम देखण्या मुलीस कोणी टोचून बोलले की वाईट वाटते. इतर मुली छानछोकीत राहतात अन आपल्या मुलीस सणवाराला देखील जुने कपडे घालावे लागतात याची खंत मनी दाटून येते. त्यातच आपल्या मुलीस कुणीतरी भिकारीण असं संबोधते तेंव्हा मन विदीर्ण होऊन जाते अन कवी पित्याच्या वतीने प्रश्न विचारतात की, चिखलाच्या स्पर्शाने कमळ अभद्र होते का ? धुळीच्या संपर्काने रत्न खराब होतात का ? हारातील धाग्यात गुंफल्याने फुले अपवित्र होतात का ? नाही ना. मग एखाद्या गरीब बापाच्या पोटी मुलगी जन्मास आली तर ती भिकारी कशी होते ? अत्यंत रोकडा अन मार्मिक सवाल करत कवी इथे आर्थिक विषमतेच्या वर्मावर बोट ठेवतात.

कोणत्याही स्त्रीला तिच्या नैसर्गिक स्वाभाविकतेनुसार दागदागिने आणि नटणे मुरडणे आवडत असते, किंबहुना यामुळे तिचे सौंदर्य खुलून दिसते अन स्त्रिया या सौंदर्यालंकाराच्या प्रेमात पडतात. हे सर्व ज्याच्यापाशी सहज उपलब्ध असते त्याच्यावर अगदी सहजपणे स्त्रीचे मन जडते. तद्वत प्रत्येक पिताही हे जाणून असतो म्हणून तो त्याची ऐपत नसतानाही आपल्या मुलीस सांगतो की, 'तुला मखमली पोलके घेईन, मोत्याची कुडी घेईन. इतकेच नव्हे तर तुझी सर्व हौसमौज पुरी करेन.' मात्र प्रत्यक्षात दारिद्र्याचा प्रलय या प्रेमभावनेवर कुरघोडी करतो अन सारी शब्दवचने फुकाची ठरतात. आपले प्राण ज्या कन्येत गुंतले आहेत तिच्या साध्यासुध्या इच्छा ज्या बापाला पुऱ्या करता येत नसतील त्याच्या मनाच्या किती चिंधडया उडत असतील याचा अनुभव केवळ त्या पित्यालाच येऊ शकतो असे हेलावून टाकणारे वर्णन कवी बी यांनी केले आहे.

 शेवटी कासावीस झालेला हा बाप एक अनोखी फिर्याद मांडतो. तो म्हणतो की, 'जो आपल्या मुलीचे साधे कोडकौतुक करावयास असमर्थ आहे अशा कपाळकरंटयाच्या, दारिद्रयाने ग्रासलेल्या बापाच्या पोटी परमेश्वर इतक्या सद्गुणी मुली (ज्या एका शब्दाने तक्रार न करता सुहास्यवदनाने पित्याला सन्मुख राहतात) का जन्माला घालतो ? मी तर आता त्या विश्व निहंत्याकडे जाऊन याचा जाब विचारावा असे म्हणतो.' अत्यंत आर्त अशी ही कैफियत कुणाही सृजनशील माणसाच्या हृदयाला पीळ पाडून जाते.

असं म्हणता म्हणता काळ पुढे जातो अन एक वेळ येते की आपली कधीकाळची तान्हुली असणारी लाडकी आता मोठी होते अन विवाहाच्या वेदीवरून आपला निरोप घेते, सासरी जायला निघते. खरे तर तिची बालसृष्टी आपल्या डोळ्यादेखता कधी बदलून गेली आणि ती कधी परिपक्व झाली याचा आपल्याला अंदाज येत नाही. आपण अजूनही तिचे लाड कसे पुरवायचे या वंचनेत असतो अन पाहता पाहता ती उंबरठयाच्या बाहेर पाऊल टाकते. आपण तिला रेशमी वस्त्रे काही दिली नाहीत मात्र सासरी जाताना ती आपला रेशमी करपाश पित्याच्या गळ्यात घालून साश्रूपूर्ण नयनांनी 'येते मी' इतकेच बोलून निरोप घेते. ती कधीच काही तक्रार न करणारी, काहीही न मागणारी, कशाचा हट्ट न धरणारी, आपल्या पित्याची गरिबी जाणून असणारी, पित्यावर अपार माया करणारी मुलगी सासरी जातानाही काहीच बोलत नाही याची त्या गरीब पित्याला इतकी खंत लागते की तो आपल्या कन्येस 'अज्ञ' संबोधतो. खरेच आहे, आजच्या भौतिक सुखांच्या व्याख्या त्या मुलीच्या गावी नसतात, तिला पैसा अडका, जमीन जुमला, हौस मौज यातलं काहीच कळलं नाही. तिला फक्त माया-प्रेम कळले, म्हणून ती एका अर्थाने व्यवहारिक रूढ जगाच्या नजरेने अज्ञच म्हणावी लागेल. या कवितेत वडील आणि मुलगी यांच्या प्रेमाची इतकी करूण आर्त वेदना शब्दबद्ध झालीय की वाचणारा दिग्मूढ होऊन जातो. या कवितेला लय आहे, नादमाधुर्य आहे. चाल लावून एकदा जरी ही कविता गायली तरी अखेरपर्यंत तिचे गारूड आपल्या मनावर राहतं.

कवी बी यांची आणखीन एक गाजलेली कविता म्हणजे 'चाफा' ही कविता होय. चाफा कविता म्हणजे एक प्रकारचे प्रतिकात्मक प्रेमगीतच आहे. विषय व इंद्रिये यांच्या संयोगापासून उत्पन्न होणारे भोग सुखरूप भासत असले तरी दुःखमूलच होत. त्यांना उत्पत्ती व नाश असल्यामुळे  ज्ञानी त्यांत रमत नाही.  हा अध्यात्मविषय  'बी' यांनी आपल्या 'चाफा' या कवितेत काव्यमय केला आहे.  शुध्द प्रेमानंद हा अद्वैतानंद आहे हे तत्व सूचक प्रतिकांद्वारा त्यांनी अत्यंत बहारदार रीतीने विशद केले आहे.  त्यात भावनेची उत्कटता व तत्वाची उदात्तता यांची अक्षरशः परमावधी झालेली आहे.

एक जून १८७२ रोजी जन्मलेल्या नारायण मुरलीधर गुप्ते यांनी कवी बी हे नामाभिधान धारण करून आपल्या अमृतमधुर गुंजारवाने मराठी साहित्यात  विचाराचे व कल्पनेचे दालन काही काळ निनादवून सोडले व  रसिकांवर आपल्या गीतमाधुर्याची जबरदस्त मोहिनी घातली. त्यांच्या कवितांतून त्यांच्या काविश्रेष्ठत्वाची प्रचीती येते. त्यांच्या प्रसिद्धीपराङ्मुख स्वभावामुळे 'कवी बी' कोण हे लोकांना अनेक वर्षे माहिती नव्हते. अनेक कवींना स्फूर्ति पुरविण्याइतके चैतन्य व तेज त्यांच्या कवितेत काठोकाठ भरलेले आहे. त्यांच्या कवितांची शैली ही अतिशय बांधेसूद आणि मधुर आहे. दीर्घकविता हे कवी ‘बीं’च्या लेखन शैलीचे वैशिष्ठ्य. त्यांच्या प्रणयपत्रिका, बकुल, माझी कन्या, चाफा, वेडगाणे या काही विशेष उल्लेख कराव्या अश्या कविता! यातील ‘माझी कन्या‘ ही कविता पूर्वी बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात विद्यार्थ्यांना अभ्यासाला असल्यामुळे आणि ‘चाफा‘ ही कविता लता मंगेशकरांच्या समधुर स्वरात गीतबद्ध केली गेली आहे.

 'बी' यांच्या या निसर्गसिध्द विशुध्द प्रेमभावनेवर स्फुरलेल्या चिंतनपर गीतात  'चाफा' हा मुखस्तंभ राणा असून त्याची प्रेयसी मात्र 'बोलकी राणी' आहे.  ती आपल्या लाडक्या प्रियकराबरोबर 'निसर्गशुध्द' प्रेमभावनेचे निःशंक आतुर उद्गार काढीत असली तरी ते तिचे आत्मगत भाषण आहे. हृदय आत्म्याला आळवीत आहे. या प्रेमगीताची सुरुवात कवीने मोठ्या नाट्यात्मक रीतीने केली आहे. रुसून बसलेल्या आपल्या प्रियकराचे हृदयकमल फुलविणारी ही 'राणी' सुरुवातीपासूनच तक्रार करीत असते, "चाफा बोलेना, चाफा चालेना । चाफा खंत करी काही केल्या फुलेना ।"  आणि हेच तिच्या तक्रारीचे  पालुपद ती पुनःपुन्हा आळवीत असते, त्यामुळे गीताचा गोडवा अधिकच वाढला आहे.

आपल्या प्रियकराला बोलका करण्यासाठी ती प्रथम त्याला 'आंब्याच्या वनांत घेऊन गेली' व 'तेथे गळ्यात गळे मिळवून' तिने 'मैनासवे गाणी म्हटली' पण व्यर्थ!  चाफ्याची कळी फुलली नाही, आम्रवनातील चुतांकुराचा उन्मादक गंध व मैनेच्या उनाड प्रेमाची मादक धुंद यांचा त्याच्यावर काहीही परिणाम न झालेला पाहून तिने त्याला नंतर 'केतकीच्या वनांत नेले'  केतकीच्या मोहक गंधाने धुंद झालेल्या नागाच्या सहवासांत देहभान विसरलेल्या केतकीकडे तिने अंगुली निर्देशही केला, परंतु विषयाने उन्मत्त होऊन गाढ आलिंगन देणाऱ्या या बाह्यात्कारी प्रेमभावनेत  'चाफ्याला' काहीही अर्थ वाटला नाही, तो आपला स्तब्धच !

तेव्हा तिने त्याला पशुपक्ष्यांच्या आवाजाने गजबजलेल्या रानामधील माळरानावर  नेले व आपल्या प्रियकरासोबत हुंबर घालून क्रीडारत झालेले पशू पाहू लागली. परंतु त्या पशुपक्ष्यांच्या शब्द विषयानेही त्याचे मन खुलले नाही.  त्याची ती गंभीर वृत्ती पाहून मग तिने त्याचे लक्ष आपल्या बाहुपाशांनी कड्याला विळखा घालणारी नदी, प्रेमवेड्या मेघांच्या बाहूपाशातून चटकन निसटणारी विद्युल्लता, मुग्ध कलिकेशी लगट करणारा खट्याळ वारा अशा प्रकारच्या उन्मादक प्रणयदृश्यांकडे वेधले तरी ते स्पर्शसुख चाफ्याला निरर्थकच वाटते !  साऱ्या सृष्टीमध्ये प्रणयक्रीडा चालली असली तरी त्याचा त्या मुखस्तंभ चाफ्यावर काहीही परिणाम होत नाही , तो आपला स्तब्धच !  मुखस्तंभच !

'शुध्द रसपान'  हे शब्द कानी पडताच अबोल राणा खुलला. तिच्या 'दिठी ' (दृष्टी) त्याची 'दीठ ' मिळताच त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले.  तिच्या दृष्टीत त्याला प्रेमाची मूर्ती दिसताच त्याची गात्रे सचेतन झाली. 'चाफा फुली फुलून आला '  व अपूर्ण मीलनाच्या धवल तेजामध्ये 'दाही दिशा आटून गेल्या' , 'प्रणयिनी आणि प्रियकर' अभिन्न झाले.  त्या आंतरिक अभिन्नतेने द्वैताची बंधने गळून गेली म्हणूनच ती त्याला म्हणते ,  "कोण मी चाफा ?  कोठे दोघेजण ?"   कारण आता तर आपण परस्परांत मिसळून गेलो ! एकरूप झालो!

चाफा व त्याची मिलनोत्सुक  प्रणयिनी या दोन प्रतिकांच्या साह्याने कवी  'बी' यांनी आपल्या या कवितेत शुध्द प्रणयाचे अतिशय मनोहर व मधुर चित्र रंगविले आहे.  दोन जीवांतील आंतरिक मीलन म्हणजे संपूर्ण अद्वैतच हा विचार 'बी' यांनी येथे प्रभावशाली शब्दांच्या साह्याने मांडला आहे.  या विचाराच्या पुष्टीकरणार्थ निसर्गसिध्द विशुध्द प्रेमाचे पावित्र्य स्वयंसिध्द  असल्याचे प्रतिपादन केले आहे. शुध्द प्रेम म्हणजे दोन प्रेमी हृदयांचे संपूर्ण ऐक्य असून अशा हृदयैक्याची अवस्था प्राप्त झाली की ते प्रेमी युगुल परस्परांत विलीन होते व मग तेथे विषयस्वाद राहत नाही तर ते 'शुध्द रसपान' असते,  ही कवीची कल्पना चाफा व त्याची प्रेयसी यांच्या प्रतिकात्मक रूपांत पूर्णपणे अविष्कृत झाली आहे.  'दिठी दीठ' मिळताच  'अंगी रोमांच उभे' राहतात व 'तेजी दिशा आटून जातात'  या कल्पनांतील माधुरी अवीट आहे व गूढरम्यता अप्रतिम आहे .

'खंत करणे ' ,  'गळ्यात गळे मिळविणे ' , 'देहभान गळणे' , 'हुंबर घालणे' , दिठी दीठ मिळणे ' , 'गात्रे पांगुळणे' , 'रोमांच येणे' व 'फुली फुलून येणे ' इत्यादि सरस व सौंदर्यपूर्ण वाक्प्रचारातून कवीच्या वाक्-चातुर्याचे दर्शन घडते तर 'आंब्याचे वन' , 'मुखस्तंभ राणा', 'आंदण', 'मैना' , 'केतकीचे वन' व 'नाग' इत्यादी लोकविश्रुत शब्दांतून विशिष्ट अर्थछटा येत असल्यामुळे कल्पनासौंदर्य ओसांडू लागते.

आणि म्हणूनच 'चाफा' चिंतनपर असला तरी आशयाच्या दृष्टीने तो जितका संपन्न आहे तितकाच तो कलेच्या दृष्टीनेही सुंदर व सरस उतरला आहे.  केतकी-नाग , नदी-कडा , वीज-मेघ , कलिका-वायू  या जोड्यांच्या योजनेनं कवितेतील प्रत्येक शब्दाभोवती जशी सूचकतेची वलये निर्माण झाली तसेच भावनेची परिपूर्ती न झाल्यामुळे खिन्न झालेल्या पण मीलनासाठी आतुर असलेल्या प्रणयिनीचे भावमधुर चित्रण 'आम्हा मुखस्तंभ राणा, मुळी आवडेना । रे आवडेना '  हे उद्गारातून बहारदारपणे आले आहे.  आपल्या अबोल प्रियकराला खुलविण्याच्या प्रयत्नांची येथे परमावधी झाली असून त्यातून भावनोत्कटतेचा अत्युच्च बिंदू दृग्गोचर झाला आहे आणि हा अत्युच्च बिंदू गाठल्यावर 'चल ये रे ये रे गड्या , नाचू ,उडू , घालू फुगड्या '  या प्रणयिनीच्या हर्षोद्गारात भावनेची उत्कटता दिसून येते.  'चाफा' म्हणजे 'आत्मा ' 'तरुणी' म्हणजे  'जीव'  आणि शुध्द रसपान म्हणजे  'जीवा-शिवाचे ऐक्य'  हे आध्यात्मिक रूपकात्मक विचाररत्न मोहक कल्पनेच्या कोंदणात बसविल्यामुळे  'चाफा' ही कविता अर्थपूर्ण शब्दांच्या कलाकुसरींनी अतिशय हृदयंगम व आकर्षक ठरली आहे .

'चाफा बोलेना, चाफा चालेना
चाफा खंत करी, काही केल्या फुलेना
गेले 'आंब्याच्या' बनी
म्हंटली मैनांसवें गाणी
आम्ही गळ्यांत गळे मिळवून रे
गेले केतकिच्या बनी
गंध दरवळला वनी
नागासवें गळाले देहभान रे
चल ये रे, ये रे गड्या
नाचु, उडू घालु फुगड्या
खेळु झिम्मा झिम्‌ पोरी झिम्‌ पोरी झिम्‌
हे विश्वाचे अंगण
आम्हां दिले आहे आंदण
उणे करू आपण दोघेजण रे
जन विषयाचे किडे
यांची धाव बाह्याकडे
आपण करू शुद्ध रसपान रे
चाफा फुली आला फुलून
तेजी दिशा गेल्या आटुन
कोण मी - चाफा ? कोठे दोघे जण रे ?' 


'फुलांची ओंजळ' हा त्यांच्या ३८ कवितांचा संग्रह असून प्रस्तावना आचार्य अत्र्यांची आहे.१९११ ते १९३३ पर्यंत, म्हणजे सुमारे एक तपभरच ‘बी’ कवींची प्रतिभा फुलून आली असे म्हणता येईल. त्यांची पहिली कविता ‘प्रणय पत्रिका‘ ही वऱ्हाडात चिखलदरा येथे दिनांक १४ सप्टेंबर १८९१ रोजी लिहिली गेली. त्यावेळी ते सुमारे १९ वर्षांचे असावेत. ही कविता त्याच वर्षी कै. हरिभाऊ आपटे यांच्या ‘करमणूक’ पत्रात प्रसिद्ध झाली. अनेक दिवस झाले तरी प्रियकराचे कुशल सांगणारे पत्र आले नाही म्हणून चिंताग्रस्त अश्या प्रेयसीचे आपल्या प्रियकराला लिहिलेले पत्र म्हणजे ‘प्रणय पत्रिका’.
किति तरि दिन झाले ! भेट नाही पदांची,
करमत मज नाही; वेळ वाटे युगाची.
या ओळींवरून आपल्या पतीचा विरह सहन होत नाहीये त्या प्रेयसीला हे दिसून येते.

तरल मन नराचे राहते ऐकते मी
विसर बघुनि पावे अन्य पात्रास नामी.
कमलिनि भ्रमराला नित्य कोशात ठेवी
अविरत म्हणुनी तो पंकज प्रेम दावी.
विसर पडुनि गेला काय माझाही नाथा ?
म्हणुनिच धरिले हे वाटते मौन आता
आपल्याला कुणा दुसऱ्या सुंदरीचा मोह तर झाला नाही आणि म्हणून आपण मला विसरलात तर नाही, अशी भीती ही प्रेयसी काव्यारुपातून व्यक्त करते आहे. जसा भ्रमराला कमळाचा मोह होतो आणि त्याच्या संपर्कात असताना तो सारे भान विसरतो, तसे तर आपले झाले नाही ना, आणि म्हणून आपण मौन धरले का ? असा प्रश्न प्रेयसी या प्रणय पत्रिकेत करते. कमळ आणि भ्रमर या समर्पक उदाहरणातून कवी बी या प्रेयसीच्या मनातली खळबळ अतिशय सुंदर रित्या व्यक्त करून जातात.

१९११ साली ‘बी’ हे अभिनव नाव धारण करून त्यांनी “टला-ट रीला-री । जन म्हणे काव्य करणारी ।” ही ‘वेडगाणे‘ नावाची एक अत्यंत नादमधुर व तात्त्विक कविता ‘मासिक मनोरंजनात’त प्रसिद्ध केली. केवळ यमकाला यमक जुळवून अर्थहीन काव्य करण्यावर उपहासात्मक आणि तात्त्विक अशी ही कविता म्हणजे बींच्या प्रतिभेचे एक उत्तम उदाहरण. परंतू ही अतिशय अर्थपूर्ण कविता रचताना स्वतः कवी बी मात्र यमक जुळविल्याशिवाय रहात नाहीत. पण हे सारे साधताना कवितेचे सौंदर्य देखील त्यांनी ढळू दिले नाही. उदाहरण दाखल याच ओळी पहा ना,

पाचूंच्या वेली
न्हाल्या लावण्याच्या जली
दारी उभ्या स्वर्गीय नरनारी-ग,
जन म्हणे काव्य करणारी.

काव्यलेखनातील विषयांचे वैविद्ध्य दाखवणारी उत्तम कविता म्हणजे ” माझी कन्या”. शाळेतील श्रीमंत घरातील मैत्रिणींचे आपल्या लंकेच्या पार्वतीसमान अवताराला वाईट बोललेले ऐकून घरी रडत आलेल्या आपल्या छोट्या मुलीला समजावून सांगणाऱ्या गरीब पित्यावरची ही कविता. जरी ही कविता त्या लहान मुलीला समजवण्यासाठी लिहिलेली असली तरी ती कितीतरी बोध देऊन जाते. सद्गुणांची श्रीमंती असलेल्याने वस्त्रालन्कारांच्या गरिबीची लाज बाळगू नये हा किती महत्वाचा संदेश ही कविता देते. अश्या उत्तम वैचारिक कविता हे कवी बींच्या लेखनाचे वैशिष्ठ्य.


रत्‍न सोने मातीत जन्म घेते,
राजराजेश्वर निज शिरी धरी ते;
कमळ होते पंकांत, तरी येते
वसंतश्री सत्कार करायाते.
आपल्याला कुणा दुसऱ्या सुंदरीचा मोह तर झाला नाही आणि म्हणून आपण मला विसरलात तर नाही, अशी भीती ही प्रेयसी काव्यारुपातून व्यक्त करते आहे. जसा भ्रमराला कमळाचा मोह होतो आणि त्याच्या संपर्कात असताना तो सारे भान विसरतो, तसे तर आपले झाले नाही ना, आणि म्हणून आपण मौन धरले का ? असा प्रश्न प्रेयसी या प्रणय पत्रिकेत करते. कमळ आणि भ्रमर या समर्पक उदाहरणातून कवी बी या प्रेयसीच्या मनातली खळबळ अतिशय सुंदर रित्या व्यक्त करून जातात.


कवी बी यांच्या सर्वच कविता एक सुराच्या होत्या असं म्हणणारया टीकाकारांचा 'आशादेवी' या त्यांच्या कवितेने मुखभंग होतो. दुर्गेचे अत्यंत तेजस्वी अन वीररसाने भरलेले वर्णन या कवितेत आहे.

 आशादेवी -
गेली माजुन मानदर्पमदिरा बेहद्द ती प्राशुन;
प्रेतांनी भरले नभातिल दरेकोरे तयांच्यावर
मांसाच्या चिखलात मुक्त फिरते ही भैरवी भेसुर.
होती पूर्व ! उषासखी, गुणवती, सत्वाढ्य, तेजोवती,........
आहे जोवरि एक तंतु उरला वीणेवरी शाबुत,
आशा अद्‍भु रम्य बोल असले राहील तो काढित;
ती होऊनि निराश, उज्ज्वल तिची स्वप्ने लया पावती
रक्षो एक तदा दया भगवती आम्हा प्रभूचीच ती !

कवी बी यांचा जन्म मलकापूरचा (जि. बुलढाणा). तर यवतमाळ व अमरावती येथे त्यांचे शालेय शिक्षण झाले ; परिस्थितीमुळे त्यात खंड पडला; ते मॅट्रिकही होऊ शकले नाहीत. नंतर त्यांनी सरकारी नोकरी धरली. त्यांचा बहुतेक काळ विदर्भातील अकोला येथे गेला. १६ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाल्यावर एक दिवसाच्या कालफरकाने मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे ते निवर्तले.

केशवसुतांच्या परंपरेतील कवी 'बी' यांच्या कवितेचे अध्यात्म, प्रेम, कुटुंब, समाज व इतिहास हे प्रमुख विषय आहेत. अध्यात्मप्रवणता व तत्त्वज्ञानाची ओढ यामुळे त्यांच्या काव्यावर चिंतनशीलतेची छाया पसरली आहे. त्यांनी काही काव्यभाषांतरेही केली आहेत. 'बीं' च्या रचनेवर संस्कृत-इंग्रजी भाषांतील काव्ये, भारतीय तत्त्वज्ञान व संतसाहित्याचा प्र्भाव पडला आहे. कर्तव्यप्रेरक व उदात्त आशावाद, प्रखर पुरोगामित्व, प्र्वृत्तिपर अध्यात्मावर आधारलेली जीवंदृष्टी, वेचक शब्दांत व्यक्ती व प्रसंगांचे चित्रण करण्याचे कौशल्य, संस्कृतप्रचुर ओरौढ भाषेतील संयत भावनाविष्कार, पांडीत्य व रसिकता यांचा मनोज्ञ संगम, मार्मिक, सौंदर्यदृष्टी, अभिजात काव्यप्रेम आणि आधुनिक मराठी काव्याविषयी प्रकटणारा अभिमान ही 'बी' कवींच्या काव्याची ठळक वौशिष्ठ्ये आहेत.

केशवसुतांचा ‘बीं’ वरील प्रभाव विविध तऱ्हांनी जाणवतो. एक तऱ्हा म्हणजे ‘डंका’, ‘आम्ही’, ‘भगवा झेंडा’ इ. कवितांतील जुने नष्ट करण्याची चेतना देणाऱ्या बंडखोर विचाराची; दुसरी ‘वेडगाणे,’‘पिंगा’, ‘चाफा’ यांसारख्या अलौकिकाचा ध्यास व्यक्त करणाऱ्या गूढ कवितांची; तिसरी, ज्यांत ‘आनंदाला म्‍लानपणा नच सौदर्याला क्षय’ अशा पूर्णाकडे जग जाणार असल्याचा निर्भर आशावाद उच्चारणाऱ्या‘फुलांची ओंजळ’ सारख्या कवितांची. सौंदर्यानंदाची तीच आस आणि ‘सान्त अनन्ताची मिळणी’ झाल्याचा उत्फुल्ल क्षणी होणारा साक्षात्कार, ‘बीं’चे बालकवींशी साधर्म्य दाखवतो.‘आठवण’-मधील निसर्गचित्रण काहीसे बालकवींच्या ढंगाचे आहे. ‘विचार-तरंगां’मध्ये वारंवार बालकवींच्या ‘फुलराणी’चा भास होतो.‘कमळा’ ही कथन-कविता गोविंदाग्रजांच्या इतिहासविषयक स्वच्छंदतावादी वृत्तीची आणि मधूनमधून त्यांच्या शाहिरी थाटाच्या शब्दकळेची आठवण जागी करते. पण ही साधर्म्ये कमीअधिक वरवरची. काही प्रमाणात ती एकाच युगातील समानधर्मी कवींची प्रस्फुरणे. पण ‘बीं’च्या स्वतंत्र काव्यव्यक्तित्वाला त्यांनी ढळ पोचत नाही.

‘बीं’ नी काव्यासंबंधीची आपली मते ‘कविवंदन’, ‘विचारतरंग,’ यांसारख्या कवितांत ठामपणे व्यक्त केली आहेत. छन्द – व्याकरण - रसादींची जुनी मापेकोष्टके लावून आधुनिक कवितेवर रोष धरणाऱ्या विद्वद्वर्यांचा (ते ‘विशाळ मणिगोटे’) ‘बी’ धिक्कार करतात. ‘संस्कृत-भाषानियमांची का तुजवरि बळजोरी’ असे मराठी भाषेला विचारतात; पण त्यांची स्वतःची भाषा बरीच संस्कृतप्रचुर आहे. ‘कमळा’ या कवितेत ते ‘निळ्या सारणीमध्ये वाहते मोत्याचे पाणी’ अशी नायिकेविषयी सहजसुंदर, चित्रमय, लावणी बाजाची ओळ लिहून जातात; पण तिच्यावर ‘विकासोन्मुखलावण्य शुद्धशालीन्यसुगुणशाली, ’‘तमालदल-सन्निभाभिरामा’ यांसारखी जडजंबाल विशेषणेही लादतात. संस्कृत आणि पंडिती कवितेप्रमाणे शाहिरी कविताही ‘बीं’ नी आत्मसात केली होती; पण त्या निरनिराळ्या शैलींच्या विसंवादी मिश्रणांमुळे ‘बीं’ची शब्दकळा गंगाजमनी झाली; त्याच्या तात्त्विक विचाराशी विसंगत झाली. बहिरंग हे गौण; अंतरंगातच सौंदर्य असते, ही त्यांची धारणा एका परीने खरी असली, तरी ती हा दोष पुरा झाकू शकत नाही. असे एखादे गालबोट सोडले, तर विषयाच्या अंतरंगाचा एकाग्रतेने खोलवर शोध घेणारी, भावना आणि विचार यांना एकजीव करणारी निर्भर संवेदनेची अशी कविता विरळ. समीक्षक वा अभ्यासक काहीही म्हणोत सामान्य रसिक वाचक मात्र कवी बी यांना त्यांच्या गायी पाण्यावर काय म्हणून आल्या या रम्य कवितेचे भावकवी म्हणूनच ध्यानात ठेवतो.

- समीर गायकवाड.