Monday, May 9, 2016

सामाजिक समरसतेची आद्य पताका - संत चोखामेळा ...एक आकलन.

हीन मज म्हणती देवा। कैसी घडो तुमची सेवा।असा उपरोधिक प्रश्र्न ते देवालाच विचारणारया एका अलौकिक संताचा आज  स्मरणदिन !
"ऊस डॊंगापरी रस नोहे डोंगा, काय भुललासी वरलीया रंगा?" यासारख्या अभंगांमधून समाजाला निरुत्तर करणारे प्रश्न या संताने विचारले. 'का म्हणून आम्ही या यातना सहन करावयाच्या, भगवंताच्या लेखी सर्व त्याचीच लेकरे आहेत ना, मग असा दुजाभाव का?’ असे प्रश्र्न त्यांच्या मनात निर्माण होऊन ते व्यथित होताना दिसतात.आयुष्यभर उपेक्षा सहन करणारया या संताची गावकीची कामे करायला साक्षात विठ्ठल तिथे आला अन त्याने मेलेली गुरेढोरे ओढली, अन याचा उल्लेख तुकोबांनी आपल्या अभंगात केला ! त्यांच्या अभंगरचना हृदयाला भिडणाऱ्या आहेत. त्यांना भोगावे लागलेले दु:ख, त्यांची झालेली अक्षम्य उपेक्षा, मानसिक छळ याचे पडसाद भावविभोरतेसह त्यांच्या काव्यरचनेत अभिव्यक्त झालेत. "देव चहूकडे कोंडियेला । चोखा म्हणे देव भावाचा बांधला ।।" अशी बोलकी व्यथा ज्यांच्या अभंगात आहे त्या संत चोखोबांचे हे वर्णन आहे.


संत चोखोबांनी विठ्ठलाच्या नामाच्या गजराने दुमदुमलेल्या पंढरपूर नगरीचे वर्णन असे केले आहे. विठ्ठलाचा नामघोष. त्याचे भजन कीर्तन वगैरेंची त्यांनासुध्दा किती गोडी होती हे यात दिसते.
विठ्ठल विठ्ठल गजरी गजरी । अवघी दुमदुमली पंढरी ॥१॥
होतो नामाचा गजर । दिंड्या पताकांचा भार ॥२॥
निवृत्‍ती ज्ञानदेव सोपान । अपार वैष्णव ते जाण ॥३॥
हरि कीर्तनाची दाटी । तेथें चोखा घाली मिठी ॥४॥

संत चोखा मेळा यांची पत्नी संत सोयराबाईसुध्दा परम विठ्ठलभक्त होती. तिनेही स्वतः सुंदर अभंग लिहिले आहेत, पण त्यांच्या शेवटच्या ओळीत स्वतःचा उल्लेख मात्र चोखियाची महारी असा केला आहे. या काहीशा अपरिचित कवयित्रीचे दोन प्रसिध्द अभंग खाली दिले आहेत. विठोबाचे नाम गायिल्याने संसार सुखाचा होईल, कामक्रोध आदि गळून जातील वगैरे जो उपदेश इतर संतांनी केला होता तोच तिच्या पहिल्या अभंगांमध्येही आहे. विठ्ठलाच्या दर्शनामुळे मीपण गळून पडले, देहभान राहिले नाही वगैरे मनाची उन्मन झालेली अवस्था दुस-या अभंगात वर्णलेली आहे. तेराव्या शतकातल्या संत कान्होपात्रा, संत चोखामेळा आणि संत सोयराबाई या व्यक्ती त्या काळातल्या समाजाच्या तळागाळातल्या समजल्या जात होत्या असे त्यांच्यासंबंधी असलेल्या माहितीत सांगितले जाते. यावरून त्या बहुधा अशिक्षित असाव्यात असे वाटेल, पण हे अभंग पाहिले तर असे दिसते की त्यांनासुध्दा मराठी भाषा उत्तम प्रकारे अवगत होती आणि त्यांनी चांगल्या साहित्यरचना करून ठेवल्या आहेत.
सुखाचें हें नाम आवडीनें गावें । वाचे आळवावें विठोबासी ॥१॥
संसार सुखाचा होईल निर्धार l नामाचा गजर सर्वकाळ ॥२॥
कामक्रोधांचें न चलेचि कांही । आशा मनशा पाहीं दूर होती ॥३॥
आवडी धरोनी वाचें म्हणे हरिहरि। म्हणतसे महारी चोखियाची ॥४॥

सोयराबाई यांनी लिहिलेला हा अभंग तर भल्याभल्यांना तोंडात बोटे घालायला लावणारा आहे. त्यातील आशय त्यांच्या दुःखाला हलकेच स्पर्शून जातो. अवघा रंग एक झाला या एका वाक्यात त्या खूप काही सांगून जातात. पुढच्या पंक्तीत भेदाभेदाच्या पायऱ्या त्या पूर्णतः मोडून काढत म्हणतात की, ' पाहता पंढरीच्या राया , मी तूं पण गेले वाया ! ' इतकेच नव्हे तर पांडुरंगाचे खरे दर्शन घेणे हे भेदाभेद करणारयांचे काम नाही असं सूचक वक्तव्य त्यांच्या अभंगात आहे. या पुढची पायरी गाठत त्या म्हणतात की त्यातूनच षडरिपूंचा नायनाट होईल अन देहाच्या पलीकडे जाऊन विठ्ठलाशी मन एकरूप होऊन जाईल. आपसूकच देह सदा समाधिस्त राहील असा आशावाद त्या व्यक्त करतात. मग दृष्टादृष्ट होणे वा दर्शन घडणे या पलीकडे चित्त जाते असं भावोत्कट भक्तीचे रूप त्या रेखाटतात.
अवघा रंग एक झाला । रंगि रंगला श्रीरंग ॥१॥
मी तूं पण गेले वाया । पाहतां पंढरीच्या राया ॥२॥
नाही भेदाचे ते काम । पळोनि गेले क्रोध काम ॥३॥
देही असोनि विदेही । सदा समाधिस्त पाही ॥४॥
पाहते पाहणें गेले दूरी । म्हणे चोखियाची महारी ॥५॥

भारंभार पदव्या घेऊन स्वतःला ज्ञानी म्हणून मिरवून घेणारया मूढ व्यक्तीच्या जाणीव नेणीवापेक्षा सहस्त्र पटीने या अभंगाची रचना अधिक प्रगल्भ, उठावदार, आशयघन आहे. अन साधीसोपी, प्रवाही अन गेयता असणारी मधुर शैली हे या अभंगांचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. चोखा मेळा आणि त्यांच्या पत्नी सोयराबाई यांनी तेराव्या शतकात केलेल्या या रचना अचंबित करणारया आहेत कारण ते ज्या समाजातून आले होते त्यातील अक्षरशत्रुत्व, त्यांच्या विचार प्रकटनावरील बंधने, उपेक्षेत दबून गेलेल्या मनाचे हुंकार शब्दबद्ध करताना त्यात भक्तीभावही व्यक्त करायचा ही तारेवरील सर्कस त्यांनी लीलया पार पाडली, अभूतपूर्व उत्तुंग प्रतिभाशक्तीची देणगी लाभलेल्या या जोडप्याच्या रचना एकाच वेळी समाजमनाचा आरसा दाखवतात अन आर्त भक्तीच्या नवरसात न्हालेल्या शब्दचित्रांचे दर्शन घडवतात.

अशा या ज्ञानी संताचे कौतुक तुकोबारायांनी यथार्थ शब्दात करून त्यांचा गौरव केला आहे. 'शंभरा लोकात सद्गुणी ऐका, तुका म्हणे चोखा पंढरीचा !'
संत तुकाराम महाराजांनी संत चोखा मेळा यांची स्तुती केलेला अभंग काही काळापुर्वी संशोधित झाला. मौखिक परंपरेने जपलेला, पण आता विस्मृतीत गेलेला हा अभंग एका बाडात गवसला होता. तुकाराम महाराजांचे चोखोबांचा उल्लेख असलेले काही अभंग ज्ञात आहेत. 'पवित्र ते कुळ पावन तो देश,
जेथे हरिचे दास जन्म घेती' या बरोबरच  'उंचनिच काही नेणे हा भगवंत' या अभंगात तुकोबांनी अन्य संतांबरोबर चोखा मेळा यांचा उल्लेख केला आहे. जुन्नरी जाड कागदाच्या बावन्न पानांच्या या बाडात तुकोबांचे २०४ अभंग आहेत. 'सुंदर ते ध्यान' या नमनाच्या अभंगाने बाडाची सुरवात होते, तर 'हेचि दान देगा देवा' या तुकाराम महाराजांनी मागितलेल्या पसायदानाने शेवट होतो. या बाडात १४३ क्रमांकावर चोखोबांची स्तुती आहे. ती स्तुती अशी:

'रायाचे सीपई हाजाराचे बारा l लाखाचा मोहोरा प्राणी येक
सवा रूपयाची येती पाच मोती l हाजाराची येती जोडी येक
रूपयाच्या कवडया मध्ये भरे गोणी l मोहोर बांधुनि पदरी न्यावी
शंभरा लोकात सद्गुणी ऐका l तुका म्हणे चोखा पंढरीचा'

आणखी एका अभंगात तुकाराममहाराज अगदी आवर्जून संत चोखा मेळ्याचा उल्लेख करतात. चोखा मेळा  खालच्या जातीतला म्हणून त्याला कधीही विठ्ठलाच्या गाभाऱ्यात जाऊ दिलं गेलं नाही. एवढंच नाही तर देवळाच्या आसपास फिरकला तरी त्याला प्रचंड मारहाण झाली. शेवटी तो चंद्रभागेच्या पलिकडच्या तीरावर जाऊन राहिला
उंचनिंच कांही नेणे भगवंत। तिष्ठे भावभक्ति देखोनियां।। 
दासीपुत्र कण्या विदुराच्या भक्षी। दैत्याघरी रक्षीं प्रल्हादासी।।
चर्म रंगू लागे रोहिदासासंगे। कबिराचे मागीं विणी शेले।।
सजनकसाया विकूं लागे मांस। माळ्या सांवत्यास खुरपूं लागे।।
नरहरिसोनारा घडों फुंकूं लागे। चोखामेळ्यासंगे ढोरें ओढी।।
विठुराया या चोखोबाला त्याची सगळी गावकीची कामं करू लागला. अगदी मेलेली ढोरंही ओढू लागला. त्याच्या घरी पोटभर जेवला. गावकुस पडून चोखोबांचा अंत झाला तेव्हा त्याच्या अस्थि आपल्या महाद्वारासमोर पुरण्याचा आदेश देवानंच दिला असं मानले जाते. ज्या सवर्णांनी चोखोबाची सावलीही अंगावर पडल्यास विटाळ मानला त्यांना देवानं चोखोबाच्या मृत्यूनंतर अंगाला शिवू दिलं नाही. 'मला शिवू नका, मला चोखोबाचं सुतक आहे' असं त्यांना बजावलं.  संत चोखोबांचे सुमारे ३५० अभंग आजच्या घडीला उपलब्ध आहेत.

संत चोखामेळा (चोखोबा) हे यादव काळातील नामदेवांच्या संतमेळ्यातील वारकरी संतकवी होते. ते जातीने महार होते. चोखोबांचा जन्म विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यात असलेले मेहुणा किवा मेहुणपुरी झाला असे काही संशोधक सांगतात तर काहींच्या मते ते मंगळवेढ्याचे होते तर चोखोबांचा जन्म पंढरपूरला झाल्याचे संत महिपती सांगतात. चोखोबा मूळ वर्‍हाडातील आहेत असेही म्हटले जाते. देवानं आंबा चोखला आणि बाळरूपे प्रसाद दिला, म्हणून बाळाचं नाव चोखा मेळा ठेवलं अशी कोणताही आधार नसलेली आख्यायिकाही त्यांच्या बाबतीत सांगितली जाते. मंगळवेढ्याच्या किल्ल्याच्या तटबंदीखाली काम करताना चोखोबा अन्य मजुरांसमवेत गाडले गेले. त्यानंतर ज्या हाडातून विठ्ठलनामाचा गजर ऐकू येत होता, ती चोखोबांची हाडं वेगळी करून नामदेवरायांनी पंढरीत आणली व तिथं त्यांची समाधी बांधली असे चरित्रकार सांगतात. पंढरपूरात संत नामदेवांची महाद्वारात जिथे पायरी आहे, त्याच्या बाजूला संत चोखोबांची समाधी आहे.

संत चोखोबा हे एक, संत ज्ञानेश्वरांच्या प्रभावळीतले संत होते. संत नामदेव हे त्यांचे गुरू होत. तत्कालीन सामाजिक विषमतेमुळे चोखोबा होरपळून निघाले. ते शूद्र-अतिशूद्र, गावगाडा, समाज जीवन, भौतिक व्यवहार, उच्चनीचता व वर्णव्यवस्था यांच्या विळख्यात अडकले. संत चोखामेळा हे प्रापंचिक गृहस्थ. ते उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करत, पण ते विठ्ठलाच्या नामात सतत दंग असत. गावगाड्यातील शिवाशिवीच्या वातावरणात त्यांचा श्वास कोंडला जात होता. दैन्य, दारिद्रय, र्वैफल्य यांमुळे ते लौकिक जीवनात अस्वस्थ होते. परंतु प्रत्यक्ष परमेश्वराने त्यांना जवळ केले, त्यांना संतसंग लाभला. त्यांना मंदिरांत प्रवेश नव्हता. श्रीविठ्ठलाला त्यांना इतरांप्रमाणे उराउरी भेटावे असे खूप वाटत होते. परंतु ते सावळे, गोजिरे रूप महाद्वारातूनच पाहावे लागे, ही खंत त्यांच्या मनात होती.

चंद्रभागा नदीच्या वाळवंटात आध्यात्मिक लोकशाही संत ज्ञानदेवांमुळे १३व्या शतकात उदयाला आली. म्हणून संत चोखोबा म्हणतात, ‘खटनट यावे, शुद्ध होऊनी जावे। दवंडी पिटीभावे डोळा।।’ ... असा पुकारा करून त्यांनी वारकरी संप्रदायातील अध्यात्मनिष्ठ, अभेद भक्तीचे लोण आपल्या उपेक्षित बांधवांपर्यंत नेऊन पोहोचवले. आत्मविकासाची संधी तत्कालीन समाजरचनेतील अगदी तळातील लोकांनाही मिळावी असे ज्ञानेश्र्वरादी सर्वच संतांना प्रांजळपणे वाटत होते. त्याच वेळी संत चोखोबांनी भक्तिमार्गाचा संदेश आपल्या अभंगांतून समाजबांधवांना दिला.

संत चोखोबांचे भावविश्व अनुभवण्याचा प्रयत्‍न केला असता, एक मूक आक्रंदनाचा अनुभव येतो. संस्कारसंपन्न, संवेदनक्षम, भक्तिप्रवण, आत्मनिष्ठ व्यक्तिमत्त्वाच्या चोखोबांच्या रचनांतून, त्यांच्या आंतरिक वेदनांचे सूर छेडलेले जाणवतात. हीन मज म्हणती देवा। कैसी घडो तुमची सेवा।असा उपरोधिक प्रश्र्न ते देवालाच विचारतात. त्यांच्या अभंगरचना हृदयाला भिडणाऱ्या आहेत. त्यांना भोगावे लागलेले दु:ख, त्यांची झालेली अक्षम्य उपेक्षा, मानसिक छळ याचे पडसाद भावविभोरतेसह त्यांच्या काव्यरचनेत अभिव्यक्त झालेले दिसून येतात.

धाव घाली विठू आता। चालू नको मंद।
बडवे मज मारिती। ऐसा काही तरी अपराध।।

जोहार मायबाप जोहार। तुमच्या महाराचा मी महार।
बहु भुकेला जाहलो। तुमच्या उष्ट्यासाठी आलो।।

आमुची केली हीन याती। तुज कां न कळे श्रीपती।
जन्म गेला उष्टे खाता। लाज न ये तुमचे चित्ता।।

ऊस डोंगा परि । रस नोहे डोंगा। काय भुललासी वरलीया रंगा।।
चोखा डोंगा परि। भाव नोहे डोंगा।।

विठ्ठल विठ्ठल गजरी। अवघी दुमदुमली पंढरी।

हे त्यांचे अभंग जनमानसामध्ये आजही लोकप्रिय आहेत. चोखोबांच्या रचनांत भक्ती, तळमळ, आध्यात्मिक उंची तर दिसेतच, तसेच उपेक्षेची खंत जाणवते आणि वेदनेचा जो सूरलागलेला दिसतो, तो अंत:करण हेलावून टाकतो.

आम्हा न कळे ज्ञान न कळे पुराण। वेदांचे वचन न कळे आम्हा।।
चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा। गाईन केशवा नाम तुझे।।

जन्मता विटाळ मरता विटाळ। चोखा म्हणे विटाळ आदिअंती।।
आदि अंती अवघा, विटाळ साचला। सोवळा तो झाला कोण न कळे।
चोखा म्हणे मज नवल वाटते। विटाळापरते आहे कोण।।
या रचनांतून उपरोक्त उल्लेख केलेल्या भावभावना दिसतात.

कर जोडोनिया दोन्ही। चोखा जातो लोटांगणी।।
महाविष्णूचा अवतार। प्राणसखा ज्ञानेश्वर।।
या वैशिष्ट्यपूर्ण रचनेत चोखोबा ज्ञानेश्ववर माउलींबद्दल प्राणसखाहा अतिशय सुंदर शब्द सहजगत्या योजून जातात. यातून तेराव्या शतकातील या संतकवीचे साहित्यगुणही दिसून येतात.

त्यांच्या कुटुंबातील सर्वच जण हरिभक्तिपरायण होते. त्या सर्वांचे विठ्ठलावर अनन्यसाधारण प्रेम होते. त्यांची पत्‍नी सोयराबाई हिचे बाळंतपण स्वतः विठाई माऊलीने नणंदेचे रूप घेऊन केले अशी कथा प्रचलित आहे. संत चोखोबांचा मुलगा कर्ममेळा हा पण संत परंपरेत आहे. सोयराबाई व कर्ममेळा यांच्याही काही सुंदर अभंग-रचना आहेत. संत चोखोबांचे मेव्हणे बंका महार व बहीण निर्मळा यांच्याही काही उत्तम रचना आहेत. संत चोखोबांच्या भक्तीची उंची फार मोठी होती. ते स्वतःला विठू पाटलाचा बलुतेदार समजत असत.  त्यांना उपेक्षित बांधवांच्या उद्धाराची सतत चिंता होती. त्यांना समान-हक्क मिळावेत, समाजातील तेढ कमी व्हावी, जातींमधील संघर्षाची भ्रामक कल्पना नष्ट व्हावी यासाठी त्यांनी भक्तिमार्गाद्वारे प्रयत्न केले.
चोखोबांच्या मनात जातिहीनत्वाची झोंबणारी जाणीव असतांनाही ते ते चोख (स्वच्छ) होते. कोणताही संत जन्मतः संत असत नाही. 'संतत्व' ही प्राप्त केलेली मनोवस्था आहे. हे त्यांच्यावरून निदर्शनास येते.

'शुद्ध चोखामेळा करे नामाचा सोहळा' अशी आपल्या नावामागे ते शुद्धत्वाची ग्वाही देऊन. देहभाव नष्ट झाल्याचे सांगतो. मेळा (अपवित्र) असणारा माणूसही भगवंताच्या दारी (चोख) पवित्र होतो. चोखोबांनी 'वाणी नाही शुद्ध | धड न ये वचन' असे आपल्या अभंगात म्हटले असले तरी, तो त्यांचा विनय आहे. त्यांची अभंगवाणी निर्दोष जाणवते. व्याकरण, विवेचन आणि वाङ्‌मय या तीनही दृष्टीनी त्याची वाणी चोख आहे. उत्कटता, सामाजिक आशय, बांधीव रचना, या गुणांमुळे त्यांच्या अभंगाला मराठी सारस्वतात मानाचे स्थान प्राप्त झाले आहे.

नामदेवप्रणीत भक्तियात्रेत संत चोखोबा, पत्‍नी संत सोयराबाई , बहीण निर्मळा, पुत्र कर्ममेळा आणि मेहुणा बंका हे कुटुंबीय सहभागी झाले होते. नामदेवाप्रमाणे समग्र कुटुंबच भक्तिभावात एकरूप झाले दिसते. अंत्यज म्हणून जीवन जगत असतानाच आपल्या भक्तिबळावर व आत्मनिष्ठेवर चोखा मेळा यांनी श्रेष्ठ संतांच्या मालिकेत स्थान प्राप्त करून घेतलं.  चोखोबा बहुश्रुत होते. त्यांना नामदेव महाराजांचा सहवास, आशीर्वाद व गुरुपण लाभलं. नामदेव महाराजांनी आपल्याला कृतार्थ केलं असं सांगताना ते म्हणतात, "धन्य धन्य नामदेव । माझा निरसला भेद।' पंढरपूर व मंगळवेढा ही त्यांची कर्मभूमी. त्यांच्यावर आळ आले, त्यांना त्रास देण्यात आला, पण त्यांची विठ्ठलभक्ती कायम राहिली. वैशाख व. ५ शके १२६० (९ मे १३३८)  या दिवशी संत चोखोबा वैकुंठवासी झाले. स्वतःचे आयुष्य भक्तिभावात घालवून आपली पत्नी, मुलगा, बहिण आणि मेव्हणा यांना भक्तीमार्गी  लीन करणारे चोखामेळा खरया अर्थाने सामाजिक समरसतेची पताका भक्तीपथावरून मार्गक्रमण करत आपल्या खांद्यावर घेणारे आद्य पाईक होते असे म्हणणे अधिक संयुक्तिक ठरेल. 

- समीर गायकवाड.