Sunday, May 15, 2016

फ्रँक सिनात्रा ...


‘‘जेव्हा कधी या कादंबरीवर चित्रपट काढला जाईल, तेव्हा त्यातल्या प्रायव्हेट मॅगिओ या रोलसाठी केवळ मीच एकमात्र नट असेन, याविषयी माझ्या मनात तीळमात्र संदेह नाही!’’ जेम्स जोन्सची फ्रॉम हिअर टु इटर्निटीही पहिलीच आणि द नॅशनल बुक अ‍ॅवॉर्ड फॉर फिक्शन’ (१९५२) विजेती जाडजूड कादंबरी वाचून संपवताच ख्यातनाम गायक-नट फ्रँक सिनात्रा स्वत:शी मोठय़ानं उद्गारला. तशी ती वाचायला घेतल्यापासून अधूनमधून मनातल्या मनात तो हेच उद्गार काढत होता. दुस-या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवरील या कादंबरीतला हा मॅगिओ पर्ल हार्बरवर हल्ला करण्यास सज्ज असलेल्या अमेरिकन सन्यातला एक इटॅलो-अमेरिकन सनिक असतो. कणखर, हिंमतबाज, तापट आणि गमत्याही, बाणेदार, मनस्वी आणि उन्मळेन, पण वाकणार नाही’, अशा जातकुळीचा. स्वाभिमानाशी कसलीही तडजोड न करणारा, अन्यायाशी प्राणपणानं लढणारा. असा हा मॅगिओ फ्रँकला आपल्याशी अगदी मिळताजुळता वाटला, यात नवल नव्हतं. शिवाय हा रोल वन्स इन अ लाइफटाइमअसून सध्याच्या आपल्या ढासळत्या कारकीर्दीला परत उभारी मिळवून देईल, हे त्यानं नेमकं ओळखलं होतं. आणि म्हणूनच या कादंबरीचे चित्रपटीय हक्क कोलंबियाकंपनीनं विकत घेतल्याचं कळताच त्याच्या आशा पल्लवित झाल्या आणि त्यानं कंपनीचा सर्वेसर्वा हॅरी कोहन याला गाठायचं ठरवलं.आपली पत्नी, ख्यातनाम अभिनेत्री अ‍ॅव्हा गार्डनर हिला त्यानं आपला हा मानस कळवला. तिनं उत्तमअसं गुळमुळीतपणे म्हटलं. कारण मनातून ती साशंक होती. फ्रँक उत्तम नट खरा. पण अलीकडे ओळीनं त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटले होते. शिवाय त्याचं वागणं हीही चिंतेची बाब होती. अशा परिस्थितीत मॅगिओसारखा वन्स-इन-अ-लाइफटाइमरोल त्याला मिळणं सोपं नव्हतं. बायकोची कोमट प्रतिक्रिया फ्रँकच्या लक्षात आली नाही. आली असती, तरी त्यानं तिकडे दुर्लक्षच केलं असतं. त्यानं फोन जवळ ओढला आणि हॅरी कोहनला लंचचं आमंत्रण दिलं. इकडच्या तिकडच्या गोष्टी आणि जेवण झाल्यावर फ्रँक एकदम खासगी स्वरात कोहनला म्हणाला, ‘‘हॅरी, आपली दोघांची खूप जुनी ओळख आहे. म्हणूनच मला तुझ्याकडे काहीतरी मागायचं आहे. अर्थातच जे देणं तुलाच शक्य आहे, असंच.’’
‘‘म्हणजे?’’ कोहननं डोळे किलकिले करत बेरकी स्वरात विचारलं. ‘‘साक्षात जगन्नियंत्या परमेश्वराचीच भूमिका तर करायची नाही ना तुला?’’ ‘‘नाही. पण मॅगिओची भूमिका मात्र जरूर करायची आहे.’’कोहननं डोळे विस्फारले; समोर एखादा याडचाप बसला आहे किंवा आपण काहीतरी असंबद्ध, हास्यास्पद ऐकतो आहोत, असे भाव त्यानं चेह-यावर आणले. मग तो उसन्या समजुतीच्या स्वरात म्हणाला - ‘‘असं बघ फ्रँक, हा किनई एक अ‍ॅक्टरचा रोल आहे. रंगभूमीवरच्या कसलेल्या अ‍ॅक्टरचा. आणि तुलादेखील ठाऊकच आहे की, तू म्हणजे नुसतीच नाचगाणी करणारा एक सो सो नट आहेस.’’ आपला उफाळून आलेला क्रोध प्रयासपूर्वक गिळून टाकत फ्रँक अजिजीनं जवळजवळ तासभर कोहनची मनधरणी करत राहिला. म्हणाला, ‘‘माझ्या नाचण्या-गाण्यापेक्षाही मी मॅगिओ अधिक चांगला करून दाखवीन.’’

पण कोहनच्या दृष्टीनं हा विषय केव्हाच संपला होता. फ्रँकची बिनगायकी भूमिका असलेल्या मिरॅकल ऑफ द बेल्सया चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोसळून एमजीएमला कसं खड्डय़ात टाकलं होतं, ते तो विसरला नव्हता.
‘‘प्लीज हॅरी, प्लीज,’’ फ्रँक गयावया करत म्हणाला. ‘‘तू माझ्या पैशाची मुळीच चिंता करू नकोस.’’
‘‘म्हणजे?’’ ‘‘मला प्रत्येक चित्रपटासाठी दीड लाख डॉलर्स मिळतात. ’’‘‘मिळतात नाही,’’ चूक दुरुस्त करत कोहन म्हणाला. ‘‘मिळत होते. इत:पर नाही.’’
‘‘बरं बाबा, मिळत होते. पण मॅगिओसाठी मला त्याच्या जवळपासचीही रक्कम नको.’’
‘‘आपल्याला कसलाच व्यवहार करायचा नाहीये. तरीपण.. जस्ट फॉर द रेकॉर्ड, काय अपेक्षा?’’
‘‘आठवडय़ाला हजार डॉलर्समध्ये मी मॅगिओ करायला तयार आहे.’’
‘‘अरे अरे! मॅगिओ करण्यासाठी इतका घायकुतीला आला आहेस तू?’’ करुणार्त नजरेनं त्याच्याकडे पाहात कोहन म्हणाला. ‘‘बघूया. मात्र तत्पूर्वी मला दुस-या काही नटांची टेस्ट घ्यायची आहे.’’

फ्रँकनं आपले नवे एजंट एब लास्टफॉजेल आणि सॅम विस्ब्रॉड याना गाठलं; त्यांना कोहनशी झालेल्या भेटीचा वृत्तांत कथन केला आणि मॅगिओची भूमिका आपल्याला मिळवून देण्यासाठी तो त्यांच्या खनपटीलाच बसला. आठवडय़ाला अगदी५० डॉलर्सवरही काम करण्याची त्यानं तयारी दाखवली. एजंटांचा निरोप घेताना तर तो म्हणाला, ‘‘मी छदामदेखील न घेता काम करायला तयार आहे. अगदी काहीही नाही. फक्त तुम्ही तो रोल तेवढा मला मिळवून द्यायचं बघा.’’
दोघे एजंट परत जोमानं कामाला लागले. पण त्या फ्रँक सिनात्रा या नावालाही जणू अपयशाचाच वास येत होता. तरीही एबनं फ्रेड झिनेमानला गाठलं. फ्रेडही त्यांचा क्लायंट होता आणि फ्रॉम हिअर टु इटर्निटीचा दिग्दर्शक म्हणून त्याचं नाव जाहीर झालं होतं. पण फ्रेडला मॅगिओच्या भूमिकेसाठी फ्रँक
मुळीच नको होता. कादंबरीतल्या शोकनाटय़ाचा हा पार विचका करून टाकील, असं त्याचं स्पष्ट मत होतं. फ्रेडच्या मनात ब्रॉडवेवरचा अभिनयकुशल नट एली वॉलाच हा होता. फ्रँकनं नंतर आणखी कुणाकुणाचेवशिले राबवून हॅरीवर दडपण आणण्याचा प्रयत्न करून पाहिला. पण व्यर्थ. हॅरीला कोलंबियाचेच स्टार्स हवे होते. त्यानं इटर्निटीमधल्या भूमिकांसाठी नट ठरवूनही टाकले. मॅगिओच्या भूमिकेसाठी अर्थातच एली वॉलाच!

मॅगिओची भूमिका साकारण्याच्या एकमेव ध्यासानं पछाडलेल्या आपल्या नवऱ्याची धडपड, चिडचिड
नैराश्याचे झटके अ‍ॅव्हा गार्डनर पाहत होती; व्यथित होत होती. लवकरच ती मोगॅम्बोचित्रपटाच्या चित्रीकरणासाठी नैरोबीला जाणार होती. क्लार्क गेबलसह ती त्यात काम करणार होती. फ्रँकच्या हाताशी काहीच काम नसल्यानं आपल्या बायकोला तिथं सोबत करण्याचं त्यानं मान्य केलं. नैरोबीला निघण्यापूर्वी अ‍ॅव्हानं हॅरी कोहनची बायको जोन हिला फोन करून भेटीची इच्छा व्यक्त केली. पण जोननं आपण फ्लूनं बिछान्याला खिळलो असल्याचं सांगितलं. तरीही अ‍ॅव्हानं आपलं काम अत्यंत महत्त्वाचं आहे, असं सांगून भेटीचा आग्रहच धरला. जोनचा नाइलाज झाला.दुस-या दिवशी संध्याकाळी अ‍ॅव्हा एकटीच जोन कोहनच्या घरी गेली. जोन खरोखरच आजारी होती. गेल्यागेल्याच अ‍ॅव्हानं तिला सांगितलं की, आपण इथं येऊन गेलो, हे कोणत्याही परिस्थितीत फ्रँकला कधीच कळता कामा नये.

पुरुषी अहंकार दोघीही ओळखून होत्या. जोननं दिलेल्या पेयाचे दोनतीन घुटके घेतल्यावर अ‍ॅव्हानं सरळ 
विषयालाच हात घातला. ‘‘हे बघ जोन,’’ ती गंभीर होत म्हणाली, ‘‘मी तुझ्याकडे एक फेव्हर मागण्यासाठी आले आहे. हॅरीला सांगून तू फ्रँकला फ्रॉम हिअर टु इटर्निटीमधला मॅगिओचा रोल मिळवून द्यावास, अशी माझी तुला अगदी कळकळीची, आग्रहाची विनंती आहे. जगातल्या कोणत्याही गोष्टीपेक्षा तो त्याला निकरानं हवा आहे. नाही तर फ्रँक आत्मघातही करून घेईल, अशी मला भीती वाटते. प्लीज. नाही म्हणू नकोस. माझ्यासाठी एवढं तू करशील, असं वचन दे मला. निदान त्याला एका टेस्टची तरी संधी दे. जोन, फक्त एकच टेस्ट !’’ मिसेस कोहन थक्कच झाली. एका स्टारची बायको एका स्टुडिओप्रमुखाच्या बायकोकडे आपल्या नव-यासाठी दाताच्या कण्या करून चक्क याचना करत होती. हे काहीतरी अभुतपूर्वच होतं.

आपला नवरा किती हटवादी आणि स्वत:च्या मताला घट्ट चिकटून राहणारा आहे, हे साऱ्या हॉलिवुडसकट तीही पक्कं जाणून होती. शिवाय फ्रँकच्या कारकीर्दीने जवळजवळ तळच गाठला होता. कुणालाच तो नको होता. आणि मॅगिओच्या भूमिकेसाठी तर नाहीच नाही. या भूमिकेसाठी त्यानं हॅरीच्या खूप विनवण्या केल्या होत्या आणि हॅरीनं त्याला झिडकारलं होतं; हॅरीच्या लेखी तो केवळ नाचगाणंवालाच होता, हेही तिला ठाऊक होतं. पण अ‍ॅव्हाच्या भेटीनं ती हेलावून गेली होती आणि आपण आजारातून जरा ब-या होताच हॅरीची मनधरणी करू, असं तिनं अ‍ॅव्हाला वचन देऊन टाकलं.

फ्रँक अ‍ॅव्हाबरोबर नैरोबीला निघून गेला. तो इटर्निटीतली मॅगिओ ही साहायक भूमिका मिळवण्यासाठी कसा 
हवालदिल झाला आहे; कोणाकोणाकडून आपल्यावर दडपणं आणण्याचा तो कसाकसा प्रयत्न करतो आहे, ते एके दिवशी हॅरी कोहननं आपल्या बायकोला हसतहसत सांगितलं. अगदी वृत्तपत्रातल्या स्तंभलेखकांनाही फ्रँकनं कसं हाताशी धरलं आहे, तेदेखील ऐकवलं.अ‍ॅव्हा गार्डनरला दिलेल्या वचनाची पूर्तता करण्याची ही संधी जोन कोहनने सोडली नाही. तिनं लागलीच नव-याला विचारलं - ‘‘मग का बरं तू त्या भूमिकेसाठी फ्रँकचा विचार करत नाहीस? तो इटालियन आहे; कडका, काटकुळा आहे. मॅगिओच्या भूमिकेत अगदी फिट्ट बसणारा आहे.’’
‘‘काय? आता तूसुद्धा?’’ तिच्याकडे आश्चर्यानं पाहत हॅरी म्हणाला. ‘‘मला नाही वाटत, त्याला जमेलसं. शिवाय त्यासाठी मला त्याची टेस्ट घ्यावी लागेल.
आणि मला नाही वाटत, तो स्वत:ची इतकी अवनती करून घ्यायला तयार होईल.’’
‘‘पैज आपली. अगदी कशाचीही. फ्रँक सिनात्रा टेस्टसाठी नक्की तयार होईल.’’ जोन ठाम स्वरात म्हणाली. ‘‘तू एकदा त्याची टेस्ट तर घेऊन बघ. त्यानं काही बिघडत नाही. मग तुझं तुला कळेल.’’

अखेर होय नाही, होय नाही करता करता फ्रँकला टेस्टसाठी येण्याचा नैरोबी इथं सांगावा धाडण्यात आला. त्यानं फार मोठय़ा अपेक्षा बाळगून येऊ नयेत आणि यायचंच तर स्वखर्चानं यावं, असंही बजावण्यात आलं. फ्रँकला स्वर्ग दोन बोटं राहिला. तो ताबडतोब निघाला. तार धाडल्यापासून अवघ्या छत्तीस तासांच्या अवधीत तो हजर झाल्याचं पाहून इटíनटीचा निर्माता बडी अ‍ॅडलर थक्कच झाला. पण पुढच्या टेस्ट-अध्यायानं तर त्याच्यावर पुरतंच थक्क होण्याची पाळी आली.दारू पिऊन झिंगण्याच्या सीनचं स्क्रिप्ट त्यानं फ्रँकला दिलं, तशी ते परत करत तो म्हणाला - ‘‘मला याची गरज नाही. मी अनेक वेळा वाचलंय.’’ नाही तरी त्याला काम मिळणार नाहीच, याची खात्रीच असल्यानं बडी ठीक आहे’, असं म्हणून स्टुडिओत न थांबता आपल्या ऑफिसात निघून गेला.

पण काही वेळातच टेस्ट घेणाऱ्या दिग्दर्शक फ्रेड झिनेमानचा त्याला फोन आला. तो म्हणत होता, ‘‘बडी, तू 
जरा इकडे येऊन जाशील तर बरं होईल. तुला काहीतरी अविश्वसनीय, असं पाहायला मिळेल. मी आधीच ते कॅमेऱ्यात पकडलंय. या वेळी मी कॅमे-यात फिल्म घालणार नाही. पण तुला ते प्रत्यक्षातच दाखवतो. लवकर ये.’’ बडी अ‍ॅडलर आल्यावर फ्रेडनं फ्रँकला परत तो सीन करायला सांगितलं. फ्रँकला वाटलं, हा दुसरा टेक असावा. त्याचा हा दुसरा टेकअप्रतिमच नव्हे तर केवळ अद्भुत होता. थक्क झालेला बडी मनातल्या मनात म्हणाला, ‘‘प्रत्यक्ष चित्रपटात जर यानं हे असं करून दाखवलं, तर याला नि:संशय अ‍ॅकॅडमी अ‍ॅवॉर्ड मिळणार!’’ आणि तसं त्यानं ते मिळवूनही दाखवलं. १९५३ मध्ये फ्रॉम हिअर टु इटर्निटीला मिळालेल्या आठ  ऑस्कर्सपैकी एकावर सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता म्हणून फ्रँक सिनात्राची नाममुद्रा कोरलेली होती!

१९६९ मध्ये प्रकाशित झालेल्या मारिओ पुझोलिखित द गॉडफादरया कादंबरीत एक कथाभाग (एपिसोड) 
आहे. आपल्याला नाकारण्यात आलेली एक चित्रपट-भूमिका आपल्याला मिळवून देण्यात मदत करावी, अशी जॉनी फॉंटेन नावाचा एक प्रसिद्ध इटालियन गायक माफिया गॉडफादरला (डॉन) कळकळीची विनंती करतो. जॉनीवर डॉनचं पोटच्या पोरासारखं प्रेम असतं. तो आपल्या कारभा-याला त्या चित्रपटाच्या निर्मात्याकडे जॉनीचा पुनर्विचार करण्याची विनंती करण्यासाठी पाठवतो. पण हेकट आणि घमेंडखोर निर्माता त्याची विनंती धुडकावून लावतो. कारभारी पुन्हापुन्हा त्याची विनवणी करतो. पण त्याचा हटवादीपणा कायमच. आपल्या उत्तमोत्तम घोडय़ांसाठी जीव टाकणारा तो निर्माता माणसांना मात्र फारशी किंमत देत नाही. कारभारी न्यूयॉर्कला परततो आणि आपल्या माफिया बॉसला घडला प्रकार कथन करतो. आणि मग थोडय़ाच दिवसांत त्या घमेंडी निर्मात्याला एका पहाटे झोपतून जाग येताच पलंगाजवळच्या टीपॉयवर दिसतं, ते त्याच्या सर्वात लाडक्या आणि अत्यंत मौल्यवान घोडय़ाचं धडापासून छाटलेलं मस्तक. तो तात्काळ बोध घेतो. कडेकोट बंदोबस्तातला आपला सहा लक्ष डॉलर्सचा घोडा जो सहज मारू शकतो, त्याला आपल्याला ठार करणं कितीसं कठीण असेल! तो मुकाटपणे जॉनीला भूमिका देतो आणि जॉनीची कारकीर्द पुन्हा भरारी घेते. पुझोच्या या कादंबरीच्या लक्ष, लक्ष प्रती हातोहात खपल्या. त्याबरोबरच तिनं इटर्निटीच्या वेळच्या फ्रँक सिनात्रा एपिसोडची आठवणही जागवली. कारण तोवर फ्रँकचे माफिया जगताशी असलेले स्नेहसंबंध उघड झालेले होते. लोकांना काय! त्यांनी लागलीच दोघांचा संबंध लावून हवे ते निष्कर्ष काढायला सुरुवात केली. लोकच काय, पण बीबीसीवरही एका मुलाखतीत फ्रँकला मॅगिओची भूमिका माफियांमुळं मिळाली, असा उल्लेख केला गेला. फ्रँकनं बीबीसीला कोर्टात खेचलं. तो जिंकला. बीबीसीला शब्द मागं घ्यावे लागले!

असंख्य हृदयांचा सम्राट फ्रान्सिस अल्बर्ट उर्फ फ्रँक सिनात्रा हा अत्यंत सुरेल आवाजाचा गायक होता, उत्कृष्ट 
नर्तक होता अन देखणा अभिनेताही होता. फ्रँक सिनात्रा द ग्रेटच्या ध्वनिमुद्रिकांचा खप पाहता पाहता एक कोटीच्या घरात जाऊन पोहोचे. एका आठवड्यात त्याला ९३ हजार डॉलर्स (आताचे साडेआठ लाख डॉलर्स) मिळत. आमच्या एका छोट्याशा कंपूला हॉलीवूड सिनेमांचं शाळेपासूनच आकर्षण, अगदीं त्यांतलं इंग्लीश फारसं समजत नसूनही (आजही इंग्लीशच्याबाबतींत यांत कांहीं फार फरक नाही पडलाय !) आमच्या आवडीचे हीरो, हिरॉईन्सही ठरत गेलेल्या - रॉक हडसन, मेल फरार, बर्ट लँकेस्टर, फ्रँक सिनात्रा, चार्ल्सस हेस्टन, एव्हा गार्डनर, एलिझाबेथ टेलर, इंन्ग्रीड बर्मन....... ! पण त्यांचे जुने सिनेमा मात्र रविवारचे 'मॉर्नींग शो' म्हणून कुठेही लागत. अगदीं छोट्या जाहिरातीही असत वर्तमान पत्रात. मग आठवडाभर कशीबशी पैशांची जमवाजमव करून रविवारी आम्ही तिथं मोर्चा वळवायचों, थियेटर कुठलं आहे  आहे याचं भान न राखतां. शारदा, आशा, सेन्ट्रल, कल्पना इथं हे सिनेमे असायचे ! सिनात्राची गाणी कानाला गोड वाटायची. सिनात्राचं जॅझ संगीतातलं कर्तृत्वही वादातीत आहे. त्याने जॅझ, स्विंग आणि ब्लूज संगीतामध्येच गायकाचं करीअर केलं. त्याने त्या काळात  लुई आर्मस्ट्राँग, बी. बी. किंग अशा कृष्णवर्णीय संगीतकारांबरोबरही कामं केली होती. जॅझ संगीत हे 'काळ्यांचं संगीत' या कॅटेगरीतून अभिजात संगीताच्या दर्ज्यापर्यंत पोहोचण्यासाठी सिनात्रासारख्यांचा हातभार फार महत्त्वाचा होता हे त्या वर्णभेदाच्या काळात ठळकपणे समोर येते. ऑस्करसहित अकरा वेळा ग्रेमी एवार्ड जिंकणारया फ्रँकने दोन वेळा गोल्डन ग्लोब अन सुवर्णमयुर पुरस्काराव्यतिरिक्त अनेक लहान मोठे आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले होते. १९९८मध्ये आजच्या दिवशी  फ्रँक सिनात्राने इहलोकीचा प्रवास संपवला. स्मृतीच्या एका कोपऱ्यात असलेल्या कुमारवयीन आठवणींना यानिमित्ताने आज पुन्हा उजाळा देता आला….

फ्रँक सिनात्राच्या शंभराव्या जयंतीला ग्रामीने त्याच्या सन्मानार्थ ऑल स्टार ग्रामीची मोठी काँन्सर्ट आयोजित केली होती. वुडी ऍलनच्या मॅनहॅटन ह्या चित्रपटात एक स्वगत आहे. ज्यात कथेतील पात्र एक यादी बनवते, की हे आयुष्य का जगावेसे वाटते कारण; (why is life worth living?) ज्यामधे काही कलाकार, खेळाडू, संगित, सिनेमे, पुस्तके, वैयक्तिक गोष्टी अशी यादी हे पात्र सांगते. या दहा गोष्टीत फ्रँक सिनात्राचं 'माय वे' या गाण्यासाठी  फॉर वन्स इन माय लाईफ समाविष्ट आहे. इंग्लीशचा गंध नसताना  इंग्लीश गाण्यांचे खुळ डोक्यात शिरवण्यात फ्रँक सिनात्राचा मोठा वाटा असल्याने मला जर कधी हॉलीवूडशी संबंधित दहा घटकांची यादी करावीशी वाटली तर त्यात फ्रँक सिनात्रा ह्या नावाचा समावेश नक्की असेल

- समीर गायकवाड.    

संदर्भ - 'फ्रॉम हिअर टू इटर्निटी'चे लेखन 'याचसाठी केला अट्टाहास' - श्री. यशवंतजी रांजणकर.