Wednesday, May 11, 2016

माहेरवाशिण.....एका जिद्दी स्त्रीची कथा ...


कालचीच गोष्ट आहे. चिलारीच्या माळावर असणारया बायडाबाईच्या खोपटात दोन दिवसापासून लगबग चालली होती. बायडाबाईची म्हैस व्यायला झाली होती, म्हातारी बायडाबाई सदानकदा तिच्या पुढयात तर जाऊन बसायची न्हाई तर तिच्या बाजूला बसून तिच्या पाठीवरून हात फिरवत राहायची. तिचा नातू बन्सीधर तिची लगबग आपल्या डोळ्यात साठवत तिला उठबशीत बारीक सारीक मदत कारायचा. साठीच्या घरातली बायडाबाई दशरथ पाटलाची दुसरी बायको होती. दशरथ पाटील म्हणजे रोमनाळ गडी. त्याचं सारंच काम आडमाप होतं. संसार देखील त्यानं बाभळीच्या वाकडया फाटयासारखाच केला होता. त्याची पहिली बायको सावित्री अत्यंत देखणी होती, नाकी डोळी नीटस अन खानदानी कुळातली सावित्री दशरथ पाटलाला एकदम शोभून दिसायची.


डोईवर पदर, कुरळ्या केसाची कपाळावर महिरप, मासोळी भुवयांच्या मधोमध लालबुंद रुपयाच्या आकाराचं कुंकू तिला खूप शोभून दिसायचं. चाफेकळी नाकाखालची पांढऱ्याशुभ्र मोत्यासारख्या दातांना झाकणारी नाजूक लालचुटूक जिवणी तिच्या चेहऱ्याला खुलून दिसायची. बुटक्या अंगाची सावित्री अंगापिंडाने देखील नाजूक होती, अंजिरी रंगाची बुट्टीदार इरकल साडी चोळी घालून तिची कामाची लगबग चालू असली की घमेल्यासारख्या तोंडाचा दशरथ पाटील तिला डोळा भरून बघत राहायचा. मात्र लगेच त्याच्या मस्तकात एक तिडीक यायची अन तो बोटं पिरगाळून मुठी आवळत बसत राहायचा त्याला कारणही तसेच होते, लग्नाला चार वर्ष उलटून गेली सावित्रीची कूस उजवली नव्हती. घरात तान्ह्या बाळाचा आवाज घुमला नव्हता, रांगणारी सानुली पाऊले सारवलेल्या अंगणात उमटली नव्हती. त्यामुळें दशरथ पाटील सदा दुर्मुखलेल्या तोंडाने बसून असायचा. त्याचे साठ एकराचे शेत होते, त्यातले चाळीस एकर बागायती अन बाकीचे वीस एकर चिलारीच्या मालावर जिरायती रान होते. जिरायती जमीन त्याने खंडाने कसायला दिली होती. बागायती जमिनीत मात्र स्वतः राबायचा, काळ्या भोर रंगाचा दशरथ पाटील रंगेल नव्हता मात्र कमालीचा रग्गील होता, उंचापुरा धिप्पाड असलेला हा गडी डोक्याने देखील आडदांड होता. त्याच्या डोक्यात एखादं खुळ शिरलं की तो ते पुर करायचाच, त्यात कुणी आडवं आलेलं त्याला खपत नसायचं. कुणी त्याला मोडता घालायचा प्रयत्न केला की तो त्याच्या अंगाची वळकटी बांधायचा. त्याला सख्खे भाऊ नव्हते , तीन बहिणी होत्या त्या दिकून कधी तरी वेळ वखत बघून आपल्या माहेरी यायच्या अन आल्या पावली निघून जायच्या. कारण दशरथाचा असा घडीत तोळा घडीत मासा स्वभाव. मात्र दशरथ पाटलाला कुणाची फिकीर नसे तो त्याच्या भावकीला देखील मोजत नसे. तो त्याच्या मर्जीचा खरा मालक होता. एकदा तो कुळवाडयाच्या लोकांबरोबर तालुक्याच्या गावाला गेला तिथं कामासाठी मुक्कामाला राहिला. बाकीचे सारे सांज निळाईची होईस्तो गावाकडं परतले, हा बहाद्दर मात्र दोन दिवसांनी आला अन येताना बायडाबाईला संगट घेऊन आला. त्याला अशा नावाड्या बाई बरोबर बघून गाव भोचक होऊन बघत राहिलं ! पण कुणा मायेच्या भाद्दराने त्याला विचारायची हिम्मत केली नाही.

आपला नवरा कुणा परक्या बाईसोबत गावाकडं परतलाय ही बातमी सावित्रीच्या कानात तापलेलं शिसं ओतून गेली, तिच्या सर्वांगाची लाही लाही झाली, झेंडू फुटावा तशी लालेलाल होऊन ती पाटलाच्या चौसोपी वाडयाच्या मधोमध पदर खोचून उभी राहिली. पाटलाच्या वाड्याभोवती माणसं घुटमळू लागली पण तिथं थांबायची हिंमत कुणाचीच होत नव्हती. सांज झाली तरी दशरथ पाटील घरी आला नाही तशी सावित्री कावरीबावरी झाली अन तिचं सारं अवसान गळून पडलं. रातकिडं किरकिरायला लागलं, पुनवेचा चांदवा आभाळभर झाला त्याला मोठठलठ गोलगरगरीत खळं पडलं, गाव झोपी गेला, पारावरच्या पिंपळानं डुलकी घेतली, देवळातल्या पाकोळ्या झोपी गेल्या अन कळसाभोवती घुमणारे पारवे कोपऱ्या खुपऱ्यात जाऊन माना वेळावून बसले, सावित्री वाड्याची दारं उघडी टाकून माजघरातनं उंबरठयावर शून्यात नजर लावून बसली होती. इतक्यात कुत्र्यांचा केकाटण्याचा आवाज मोठा झाला अन दाराम्होरं बैलगाडी लावून दशरथ पाटील झुलतच घरात शिरला. सावित्रीशी एक चकार शब्द न बोलता तो खाटेवर जाऊन पडला अन पडल्या पडल्या सूर धरून घोरायला लागला. त्याचं घोरणं ऐकून सावित्रीच्या अश्रूंचा बांध फुटला अन तोंडात पदराचा बोळा कोंबून ती मुकाट रडू लागली.

दशरथ पाटलांनं बायडाबाईला गावात आणून वाड्यावर न्यायच्याऐवजी तिला थेट चिलारीच्या माळावर असणाऱ्या वस्तीवर नेऊन ठेवले होते. त्यामुळे सावित्रीची सवत आली पण ती गावात न येता शेतात गेली. आता ती लग्नाची की बिगर लग्नाची हे पुसायची हिंमत देखील कुणाची नव्हती अगदी सावित्रीची सुद्धा नव्हती. नाही म्हणायला तिने टपाल टाकून आपला भाऊ माहेरावरून बोलावून घेतला होता, मात्र त्याने बहिणीलाच चार शब्द ऐकवले अन तुझी कूस न उजवल्यामुळेच दाजी असं वागत असतील असं तो सुनावून गेला. माहेरकडून पाठीवर हात आला नाही की सासूरवाशीणीची ताकद निम्मी होते, सावित्रीचंही तसंच झालं. दशरथ पाटील सावित्रीशी वाईट वागत होता अशातलीही बाब नव्हती, मात्र बायडाबाईचे नाव काढले की त्याच्या कपाळावरच्या शिरा उडत असत. ऐन उन्हाळ्यात गावात आलेल्या बायडाबाईला आता तीनेक महिने उलटून गेले होते तरी गावाची वेस दशरथ पाटलाने माहित होऊ दिली नव्हती. पण तिचीही काही तक्रार नव्हती.

असं करत करत दिवस गेले अन पावसाळा लागला अन पाऊस असा काही कोसळायला लागला की गावातनं कुणाचं पाऊल घराबाहेर पडनासं झालं. एकडाव मुसळधार पाऊस, सगळ्या रानोमाळ चिखल ऱ्याड रबडी झालेली अन मोक्याच्या वाटेवर गुढघाभर खड्डे तयार झाले. त्यामुळं कुणी घराबाहेर येईना झालं अन वाडया वस्तीवर अडकलेली माणसांना गावाकडं येता येईना. साराच खोळंबा झाला. मात्र या पावसानं एक काम झालं, दशरथ पाटील लई दिवसानंतर घरात सलग राहिला. अन यातून जे आधी साधलं नव्हतं ते आता कांडक्यात मोकळं झालं. महिनाभरात सावित्रीला उलट्या होऊ लागल्या तशी गोड बातमी पाटलाचं काळीज आभाळाएव्हढं झालं अन गाव अचंबा करू लागलं. सावित्रीचं पाय भारी झालं याचा साऱ्यांनाच आनंद झाला मात्र त्याच बरोबर आता बायडाबाईचे काय होणार असा प्रश्न ज्याच्या त्याच्या मनात उभा राहिला. लोक आपसात कुजबुजू लागले अन ती कुजबुज पाटलाच्या कानापर्यंत येऊन पडत होती. तो मात्र शांत होता. आपल्या घरात पाळणा हलणार या बातमीने हरखून गेला होता.

बऱ्याच दिवसानंतर दशरथ पाटील चिलारीच्या माळावर आला अन बायडाबाईपाशी निमूट येऊन बसला. तिथल्या पडायला झालेल्या जुनाट भिंतीकडं बघत बाजंवर बसून हातातली दगडं आडव्या हातानं भिरकावून देऊ लागला, बसल्या बसल्या जोरात हलायला लागलेले त्याचे जाडजुड पाय त्याच्या अस्वस्थतेची जाणीव बायडाबाईला करून देत होते. तिचंही चित्त स्थिर नव्हतं, पितळी तांब्यात तिनं पाणी आणलं पाणी पुढं करायचं निमित्त करून शेवटी तीच बोलती झाली. 'एक सांगायचं हुतं, महिना झाला, मला आंबट खावं वाटतंय अन कुस जड झालीय. तुम्हाला सांगावं म्हटलं पण तुमी आलाच न्हाई. सांगावा धाडून सांगण्याजोगी बाब न्हवं म्हणून कळीवलं न्हाई !' तिचं बोलणं ऐकून दशरथ पाटलाला काय बोलावं सुचंनासं झालं. इतकी वर्षे त्यःच्या घरी पाळणा हलत नव्हता म्हणून दुनियेची भीडभाड न ठेवता त्याने दुसरी बाई आणून ठेवली. पण देवाचा न्यायच निराळा. त्यानं दोन्हीकडंच्या पारड्यात आपलं वजन टाकलं. त्याला पुढं काय करावं हे सुचत नव्हतं. बळेबळे तोंडावर हसू आणत तो तिला दिलासा देऊन गावाकडं वाड्यावर परतला. ती रात्र त्याला फार जड गेली. आपल्या नवरयाची घालमेल सावित्रीच्या नजरेतून सुटली नाही, तिने सकाळ होताच दशरथ पाटलाच्या रापलेल्या खडबडीत गालावरून हात फिरवत सांगितलं की काळजात काय असंल ते सांगून मोकळं व्हावं. तिच्या डोळ्यातला विश्वास बघून पाटलाला धीर आला न त्याने तिला सारा प्रकार सांगितला. खरं तर ते सारं ऐकून सावित्रीच्या डोळ्यात पाणी आलं पण तिनं ते हसण्यावारी नेलं. त्याला धीर दिला अन तिच्या पोटात वाढणारा वंश देखील त्यांचाच असल्याचे बजावले.

आपण आपल्या बायकोच्या उरावर बाई आणून ठेवली अन आता तिच आपल्याला धीर देतेय याचा जितका आनंद झाला तितकाच त्याला धक्का देखील बसला. आपण आपल्या बायकोला ओळखायला चुकलो याची त्याच्या मनाला खंत लागून राहिली. अन एके दिवशी मनाचा हिय्या करून त्याने ठरवले की बायडाबाईला देखील सारे खरे सांगायला पाहिजे. पावसाळा भरात आला होता. रोरावाणारा आवाज करत वारे वाहत होते अन भर दिवसा आभाळ गोळा झाल्याने चांगलेच अंधारून आले होते, सावित्रीने किती आर्जवे केली तरी दशरथ पाटील घराबाहेर पडला अन पावसाचा जोर प्रचंड वाढला. धोधो पाऊस कोसळू लागला, आभाळ गरजू लागलं अन वीजा कडाडू लागल्या. रानाच्या अर्ध्या रस्त्यात असतानाच घात झाला अन वीजेने डाव साधला. दशरथ पाटील अंगावर वीज कोसळून जागीच ठार झाला. पोटुशा असलेल्या त्याच्या दोन्ही बायकांचा आधार गेला. सावित्रीने मोठया हिकमतीने सारं वावर सांभाळलं, माहेराहून भाऊ बोलावला पण तिने गाव सोडला नाही. शेतातच त्याची मोठी समाधी बांधली. तसंच तिने बायडाबाईला देखील अंतर दिले नाही. तिला हप्ता दर हप्त्याला किराणा पोच होऊ लागला. तिच्या पोटात आपल्या नवऱ्याचं बीज वाढतंय अन आपण जसं आई होणार तशीच ती देखील आई होणार आहे या भावनेतून ती घरी काही चांगलं चुंगलं खायला केलं की गावातल्या वाटसरूपाशी बायडासाठी शिदोरी बांधून देई. होता होता दिवस पुढं जात गेलं अन आधी बायडाबाईच्या खोपटात चीलमिल झाली तिच्या पोटी एक गोजिरवाणी पोरगी जन्मा आली तर काही दिवसांत सावित्रीच्या वेलीवर एक बाळसेदार फुल उमलले. तिला अगदी देखणं पोर झालं. नियतीने आपलं काम चोख बजावलं होतं.

सावित्रीने बायडाबाईला कापडचोळी पासून ते दवापाण्यापर्यंत मदत सुरु ठेवली. मात्र एकदाही या दोघी आमने सामने आल्या नाहीत की यांनी गावापुढं तमाशा होईल असं आक्रीत काही केलं नाही. गाव दशरथ पाटलाला विसरून गेला. त्याचा मुलगा आता मोठा झाला होता अन इकडे बायडाबाईची पोरगी न्हातीधुती झाली होती. सावित्रीची अग्नीपरीक्षा घेणारा हा काळ ठरला, सावित्रीने एक चांगले स्थळ बघून स्वतःच्या खर्चाने बायडाबाईच्या पोरीचे लगीन लावून दिले. सगळ्या गावानं तिचं नाव काढलं. अन एका भरल्या दिवाळीत सावित्रीने आपल्या पोराचा अर्जुनचा लग्नाचा बार उडवून दिला. तिच्या घरी सून हळदओल्या अंगाची सून आली होती. दिवस वेगाने पुढे जाऊ लागले अन या दोघींच्या घरी तान्हुले आले. दोघींना नातवंडे झाली. हे सगळं सुख बघून हरखून गेलेली सावित्री पुढे आजाराच्या विळख्यात सापडली अन दोनेक वर्षात तिनं आपली इहलोकीची यात्रा संपवली. इकडे बायडाबाई खाल्ल्या मिठाला जागून त्याच रानात त्याच पडायला झालेल्या जीर्ण खोपटात तशीच रहात होती. एक दिवस तिच्यावर आभाळ कोसळलं, तिच्या पोरीला सासरच्या लोकांनी विहिरीत ढकलून दिलं अन आत्महत्या केल्याचं जगाला भासवलं. बायडाबाईला मात्र ते पचनी पडलं नाही तिनं पोरीच्या सासरला जाऊन तिच्या पोटचा गोळा, बाळूत्यात गुंडाळलेला आपला नातू बन्सीधरला घेऊन पुन्हा चिलारीच्या माळावर येऊन राहिली. गावात पुन्हा चर्चेला ऊत आला, जुनी म्हातारी माणसे म्हणू लागली, बायडाबाईला देवाने तिच्या कर्माचे फळ दिले. नव्या पिढीला या घटनेने फारसा फरक पडला नाही. मात्र कालांतराने अर्जुनच्या वागण्यात फरक येऊ लागला तशी बायडाबाईने त्याची मदत घेणे बंद केले. त्याची साडीचोळी घेणं बंद केलं.

पोटाची खळगी भरायला बायडाबाई उतारवयात लोकाच्या रानात रोजंदारीने कामावर जाऊ लागली. ज्या वयात आराम करायचा त्या वयात तिच्या एका हातात नातू तर दुसऱ्या हातात खुरपे आले. डोक्यावर चुंबळ ठेवून त्यावरच्या दुरडीत ती बन्सीधरसाठी अन स्वतःसाठी चटणी भाकर घेऊन जाई. कधी कधी दिस लई जड झाला की डोक्यावरची पाटी तशीच घेऊन ती पाटलाच्या समाधीकडे जाऊन बसत असे. मन रिते झाले की पुन्हा कामावर रवाना होई. कामावरच्या दुसऱ्या बायका त्या तान्हुल्याला काही तरी भरवत असत. कंबरेत वाकून गेलेल्या बायडाबाईने दशरथ पाटलानंतर कोणालाही आपल्या अंगाला हात लावू दिला नव्हता. एखाद्या कंन्कवर बाईचे आयुष्य ती जगत राहिली होती, त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर अजूनही तेज होते. सावित्रीची सूनदेखील उठवळ वळणाची होती तिचं वागणं म्हणजे आधीच नांदायचा कंटाळा अन त्यात माहेरचा सांगावा या उक्तीप्रमाणे होते त्यामुळे अर्जुनने देखील बायडाबाईकडे लक्ष देणे बंद केले अन तो स्वतःच्या संसाराच्या विवंचनेत बुडून गेला. बन्सीधर आणि बायडाबाई त्याच्या वर्तुळातून कधीच बाहेर पडले होते. इकडे बायडाबाईने काम करून जमवलेल्या पैशात एक जाफराबादी म्हैस विकत घेतली. खोपटाजवळच्या मातीच्या भागात तिने घास लावला अन म्हशीच्या पोटापाण्याची तजवीज केली, संध्याकाळ झाली की म्हशीच्या आचाळाला पाणी लावून पुढ्यात पितळी चरवी घेऊन बसायची अन त्यातील थोडे दुध घरात ठेवून राहिलेले दुध चिंचेच्या पट्टीवर राहणारया लक्ष्मणाला दयायची, आणखी दहा घरचे दुध गोळा करून तो ते दुध डेअरीला घालायचा. बायडाबाईला मात्र म्हातारी लई हिकमती अन ईमानी आहे असं म्हणत रोजच्या दुधाचे पैसे देऊन टाकायचा.

म्हशीचे एक वेत होऊन गेले तिला एक पाड झाले अन खपल्या निघालेल्या अंगणात रांगणारा बन्सीधर आता लुटूलुटू दौडू लागला. बायडाबाईचा उर अभिमानाने भरून आला. तिने पोराच्या शाळेची चौकशी सुरु केली, त्याचा खर्च किती अंदाज घेतला अन तिने त्याला तालुक्याच्या ठिकाणी मोठ्या शाळेत घालायचे ठरवले. गावात जाऊन सोसायटीचे कर्ज मिळते का बघितले मात्र तिच्या नावावर वितभर जमीन देखील नसल्याने तिला कर्ज मिळू शकले नाही अन तिच्या म्हशीचे दुध ज्या ठिकाणी जायचे तिथल्या दुधसंघाकडून तिला कर्ज देण्यासाठी दोन जामीनदार तिला पायपीट करूनही मिळाले नाहीत. शेवटी तिने सावकारी कर्ज उचलले अन बन्सीधरच्या शिक्षणाची तजवीज केली. तिची म्हैस पुन्हा गाभण राहिली तेंव्हा तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. आधीचे वासरू अन आताचे वासरू मोठे झाले तर आपल्याकडे तीन म्हशी होतील अन आपण आधीचे कर्ज फेडून काही रक्कम गाठीशी बांधून राहिलेले दिवस सुखात काढू अशी तिने स्वप्ने रंगवली. बन्सीधर मोठा झाल्यावर त्याचा आपल्याला मोठा सहारा होईल अन आपला वृद्धापकाळ बरा जाईल असं तिला वाटू लागलं, पण आपल्याला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे याचं तिला भान होतं. कधीकधी एखाद्या बेचैन रात्री ती एकटीच जागी होऊन बसायची, पाटलाची आठवण तिच्या डोळ्यात गंगा यमुना घेऊन येई. न पाहिलेल्या सावित्रीचे ऋण आठवून तिला आणखी भरून यायचे अन मग आपला अस्वस्थपणा दूर करण्यासाठी ती म्हशीजवळ जाऊन बसायची. गोठ्यातल्या आवाजाने ती ओळखायची की म्हैस काय करतेय अन काय नाही हे देखील ती पळभरात ओळखायची.

कालसुध्दा तसेच चालले होते, तिने कामावर खाडा केला होता अन म्हैस कधीही 'मोकळी' होऊ शकते याचा तिला अंदाज आल्याने ती सारखी तिच्या जवळ येरझारया मारत होती. सांज तुळशीच्या वृंदावनात हळूच उतरली तेंव्हा म्हैस उकिडवी झाली अन कण्हू लागली तशी ती घाबरली अन शेजारच्या वस्तीवरून दोघातिघांना बोलवून घेऊन आली. त्यातल्या जाणत्या माणसाने तिचा अंदाज घेतला अन मोठा उसासा घेऊन त्यानं बायडाबाईला सांगितलं की, 'वासरू आडवं आहे. म्हैस रहायची न्हाय, डॉक्टर बोलवावा लागंल न्हायतर हिलाच बैलगाडीत घालून जनावराच्या दवाखान्यात न्यावे लागेल'. त्याचं बोलणं ऐकून बायडाबाईच्या पायाखालची माती सरकली. तिने बसल्या जागी बसकण मारली अन तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं.
'पांडूरंगा तुझ्या दाराला लागली काठी' असं पुटपुटू लागली, तिचा बुचडा सुटला, पांढरे केस सैरभैर झाले, तिच्या छातीचा भाता जोरात हलू लागला. जमलेल्या लोकांना म्हशीऐवजी तिचीच काळजी वाटू लागली. लहानगा बन्सीधर कावराबावरा झाला. आपल्या आजीला रडताना त्याने कधी पाहिले नव्हते, तो ओक्साबोक्शी रडू लागला. तसे तिथल्या गलक्याने आजुबाजूची आणखी माणसे गोळा झाली, कुणी काय मदत करता येते का आयची चर्चा सुरु झाली. पण म्हैस पार हातघाईला आली होती अन तिला वेणा सूरु झाल्या, वार बाहेर पडू लागली तशी ती जीवाच्या आकांताने ओरडू लागली. तिचे ओरडणे ऐकून बायडाबाई भानावर आली अन माझी 'माय गं तू, जरा धीरानं घे गं बाई !' तिच्या पाठीवरून हात फिरवत फिरवत रडवेल्या आवाजात ती असं काहीसं बोलून स्वतःच्या दुःखाचा भार हलका करण्याचा प्रयत्न करू लागली. म्हशीने पाय रगडले एक मोठा झटका दिला अन डोळे पांढरे करून मोठा हंबरडा फोडून सर्वशक्तीनिशी तिने आतला गर्भ बाहेर ढकलला.तिने जोरात हालचाल केली अन पुढच्याच क्षणाला तिचे श्वास मंदावले, शरीर ढिले झाले अन तिच्या जबड्यातून फेस वाहू लागला तशी बायडाबाईने धीर सोडला अन ती धाय मोकलून रडू लागली. जमलेल्या लोकांनी वासरू ओढून बाहेर काढले तर देवाने इथेही पाणी फिरवले होते. ते पाड जन्मतःच मृत होते, बायडाबाईच्या सगळ्या स्वप्नांचा एका दिवसात चुराडा झाला होता. तिच्या पुढ्यात अनेक प्रश्न आता आ वासून उभे होते. डोक्यावर परिणाम झाल्यागत हातपाय गाळून बन्सीधरला आपल्या मांडीवर घेऊन ती तिथेच बसून राहिली.

साऱ्या गोठ्यात पडलेली वार उचलून वासरासकट म्हशीला तिथल्याच रानात पुरले गेले. रात्री बायडाबाईच्या वस्तीवर दिवा लागला नाही की चूल पेटली नाही. बाजूच्या वस्तीवरल्या एकदोन बायका तिथं मुक्कामाला आल्या अन त्यांनी तिला धीर दिला. त्यांनी लाख मिनतवाऱ्या करूनही तिने काही खाल्ले नाही. बायडाबाई  तिच्या भंगलेल्या स्वप्नांचे तुकडे आपल्या डोळ्यात साठवत आढ्याकडे बघत रात्रभर तशीच पडून राहिली. आता पुढे काय याचं उत्तर तिला मिळत नव्हतं अन हा सवाल तिला झोपू देत नव्हता. हा विचार करता करता रामप्रहारीच तिचा काय तो डोळा लागला.

तिला जाग आली तीच माणसांच्या गलक्याने. गावातली चाळीसेक माणसे तिच्या खोपटापाशी गोळा झाली होती अन त्यांची काहीतरी कुजबुज सूरु होती. शेवटी लक्षमण पुढे झाला अन तिला म्हणाला, ' बायडा काकू, इथून आम्ही आपापल्या घरी गेलो खरं, पर आमचं सारं चित्त तुझ्यात लागून राहिलं. गावात दिकून सगळ्याच्या तोंडात तुझं नाव निघालं. दिस उगवल्याबरोबर पारावर माणसं भराभर गोळा होत गेली अन ज्याने त्याने आपल्या ऐपतीनुसार आपल्या पदराला खार लावला अन तुझ्या नुकसानीशी मेळ घातलीय. आता तू यातनं नवी म्हैस आण, तिचं दुध दुभतं तुला म्हातारपणाची काठी होईल !  आपला बन्सीधर शाळा शिकून मोठा होईल !"
त्याचं बोलणं ऐकून तिच्या डोळ्यातून आनंदाश्रु वाहू लागले. काय बोलावे तिला सुचेनासे झाले अन तिची लकालका हलणारी मान आणखी वेगात हलू लागली. तसे गावातले सगळ्यात वयस्क असणारे आदिनाथभाऊ पुढे झाले अन तिला म्हणाले, 'तू विचारलं नाहीस आम्ही ही मदत का केली ?'
त्यांच्या प्रश्नाने बायडाबाई चमकली.
'अगं दशरथ माझा मैतर, तो तुला सोडून गेला, सावित्री अर्ध्यात गेली, अर्जुनाला तुझ्याकडे बघणे जमले नाही, तुझी पोटची पोर एकाएकी गेली. एकामागून एक संकटे तुझ्यावर येत गेली पण तू कधी कुणाकडे एक शब्दाने तक्रार केली नाही की आपला वसा सोडला नाही.तू जिद्द राखलीस. तू खरी इमानी निघालीस अन तू आपलं शील सुदिक जपलंस. दशरथाची खरी सावित्री शोभावी असं तू वागलीस, वर ह्या वयात कामं करायला लागलीस अन मोठ्या हिमतीने तू म्हैस सांभाळली होती, देवाने तिला सुद्धा तुझ्यापासून हिरावून नेले तेंव्हा सारा गाव हळहळला. तू लई सोसलंस. तू आज पासून समद्या गावाची माहेरवाशिन आहेस बाई ! आम्ही सगळे तुझे भाऊबंद ! इथून पुढं तुझ्या अडीनडीला सारा गाव तुझ्या सोबत असंल !'

त्यांचं बोलणं ऐकून बायडाबाई हरखून गेली. तिच्या आयुष्यभराच्या तपश्चर्येचं देवानं उशिरा का होईना पांग फेडल्याने तिला कृतकृत्य वाटत होते, ती आदिनाथभाऊंच्या पाया पडण्यास पुढे झाली तसे ते म्हणाले, 'अगं बायडा आजपासून तू बायडाताई हायेस, तुझी जागा पायी न्हाई तर इथं काळजात हाये !"
त्यांचं बोलणं ऐकून बायडाच्या चेहऱ्यावर बऱ्याच वर्षांनी हसू फुलले होते अन जमलेल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर तिच्या समाधानाचे प्रतिबिंब उमटले होते

- समीरबापू गायकवाड.