Saturday, April 30, 2016

पूर्णविराम नसलेली वाक्यरेष - सैराट .सैराट म्हणजे सुसाट ! या सिनेमात हळुवार प्रेम करणारया जोडप्यापाच्या लाघवी प्रेमापासून ते कोणत्याही टोकाला जातील अशा शीघ्रकोपी माणसांचा आततायी थयथयाट आहे. अंगावर काटा आणणारे क्रौर्य आहे अन मनाला रिझवणारे शीतल प्रेम देखील आहे. अर्चना उर्फ अर्ची ही राजकारण आणि समाजकारणाची रग असणाऱ्या मराठयाची पाटलाची अंगी रग असणारी पोरगी आहे तर प्रशांत काळे हा कोळी समाजातला देखणा तरुण आहे. यांच्या प्रेमाची ची कथा आहे. रामलीला, बॉम्बे ,एक दुजे के लिए, इश्कजादे, कयामत से कयामत तक अशा ढीगभर सिनेमांतून समांतर प्रेमकथा पाहील्याने ही कथा वेगळी वाटत नाही. मात्र या कथेचं सादरीकरण नागराज मंजुळे यांच्या शैलीचे आहे. मंजूळेंनीच पटकथा लिहिलीय त्यामुळे तिच्यावरही त्यांची छाप लक्षात येते. बोली भाषेतील खटकेबाज संवाद दाद घेऊन जातात. आयुष्यभर साथ देण्याच्या आणाभाका खाऊन एखादे जोडपे जेंव्हा आपला सारा भूतकाळ मागे टाकून जगण्याची लढाई जिंकण्यासाठी पुढे जाते तेंव्हा त्याची कशी ससेहोलपट होते याचे टोकदार चित्रण यात आहे. माणसे किरकोळ गोष्टीवर कशी हातघाईला येतात हेही एक सैराटपणच ! तात्यांच्या क्रिकेटवरच्या भाषणापासून ते प्रिन्सने शिक्षकांना झोडून काढण्यापर्यंतचे अनेक प्रसंग छोट्याछोट्या तुकड्यातून येतात आणि बेफाम झालेली, डोक्यात क्रोधाचा,सूडाचा जाळ भरलेली माणसे पडदा व्यापून राहतात. 
यात मंजूळेंचे कौतुक असे की त्यांनी बटबटीतपणाला, अतिरंजित अन रक्तलांच्छित हिंसेला फाटा देऊन आक्रोश करणारी खडबडीत सत्य समोर आणणारी मांडणी वेगवान शैलीत केलीय.

अर्चना आणि प्रशांत काळे उर्फ परश्या ह्यांची ही प्रेमकथा आहे. पौगंडावस्थेत प्रेमाची भावना समजू लागल्यावर, आपल्याच वर्गातल्या अर्चिच्या प्रेमात परश्या पडतो. परश्या आपल्या निरागस आणि उत्कट प्रेमाने अर्चीचं मन जिंकून घेतो. एकाच वयाचे असले, तरीही समाजाच्या दोन वेगवेगळ्या श्रेणीतली ही दोन मुलं. त्यामुळे घरच्यांचा विरोध, त्यातंच फुलणारं आर्ची- परशाचं प्रेम, आणि प्रेमातलं सैराटपण हळूहळू चित्रपटात उलगडत जातं. एके दिवशी दोघे रंगे हाथ सापडतात ! रंगे म्हणजे अक्षरशः रंगे हाथच ! हाणामारी आणि तुडवातुडवी होते. त्या दिवसापासुन त्यांचे जीवन बदलते. (ज्युनिअर कॉलेज संपून हे दोघे सिनियर कॉलेजमध्ये जातात असं पटकथा दर्शवते मात्र हे दोघेही शाळकरी वाटतात ). आपल्या प्रेमावर आणि जीवावर उठलेल्या आपल्याच लोकांना पाहून हे दोघे सैरभैर होऊन जातात मात्र त्यांच्यातली प्रेमाची उर्मी त्यांना स्वस्थ बसू देत नाही अन ते दोघे गाव सोडून थेट हैदराबादला पळून जातात. इथे आल्यावर त्यांच्यातल्या विश्वास, समज आणि जगण्याच्या भौतिक जाणिवांचा संघर्ष सुरु होतो. स्वप्नात रंगवलेले प्रेम आणि वास्तवातली दुनियादारी यावर मंजूळेंनी बराच वेळघालवलाय हा मुद्दा उल्लेखनीय वाटतो. कारण प्रेम करणे, पुढच्या सहजीवनाची स्वप्ने बघणे सोपे आहे मात्र या वाटेवरची काटेरी वाटचाल किती कठीण आहे हे कदाचित मंजूळेंना हायलाईट करायचे असावे.

चित्रपटाचा पूर्वार्ध अधिक रंगतदार आहे त्यात रंगीबेरंगी केन्व्हांस आहे, पक्षांच्या थव्यांचे चित्रीकरण अफलातून आहे. कॅमेरा नुसता सैराट फिरत राहतो, अत्यंत देखण्या फ्रेम्स आल्हाददायक वाटतात. परशा आणि आर्ची गाव सोडून जातात तिथून कॅमेरादेखील स्लो टेकऑफ करतो, लिफ्ट आणि ट्रॉली टेकऑफचा खुबीने वापर केलाय. तळ्याच्या काठावरचे संवाद काळीज हलवून जातात अन शेवट अंगावर सर्रकन काटा आणून जातो. मन विदीर्ण होऊन जाते अन ती लहानगी पावले डोक्यात घर करून राहतात.पुवार्ध आणि क्लायमॅक्स डोक्यात फिट बसून राहतात. मात्र उत्तरार्ध तुलेनेने रटाळ वाटतो कारण पुढे काय होणार ह्याचा दर्शकांना अंदाज येतो कारण असे खुपसे सिनेमे आपण पाहिलेले असतात.

मंजूळेंचा टच अख्ख्या सिनेमात जाणवत राहतो. मात्र पूर्वार्ध हा वेगळा सिनेमा वाटावा इतका भव्य झालाय तर उत्तरार्ध आपल्या परिचयाचा घासून गुळगुळीत झालेला असल्याने त्यात नाविन्य नाही मात्र पुन्हा क्लायमॅक्समध्ये मंजुळे जादू करून जातात असं काहीतरी वेगळे काँबिनेशन झाले आहे. १७० मिनिटांच्या या सिनेमाची लांबी बरीच कमी करता आली असती. सिनेमा संपल्यावर सुन्न होऊन प्रेक्षक बाहेर पडतो पण त्याच्या डोक्यात अख्खा सिनेमा न राहता आर्ची - परशा आणि क्लायमॅक्सच राहतो.

अजय अतुल यांची गाणी श्रवणीय असण्यापेक्षा इथे प्रेक्षणीय झालीत. यातली गाणी चांगली आहेत मात्र ती माईलस्टोन गाणी नाहीत. पार्श्वसंगीतात थीम व्यतिरिक्त आणखी चांगली कामगिरी त्यांना करता आली असती हे इथे आवर्जून नमूद करावे वाटते. नितीन केनी, गार्गी कुलकर्णी आणि निखील साने यांनी निर्मितीमुल्ये उच्च दर्जाची ठेवलीत.

'फँड्री' आणि 'पिस्तुल्या'चे मंजुळे आणि सैराटचे मंजुळे यांची तुलना करायची झाल्यास सैराटचे मंजुळे या सिनेमाच्या प्रेमात जास्त पडल्यामुळे त्यांनी फँड्रीत दाखवलेला रफनेस इथे नाहीये अन पिस्तुल्यातली अणकुचीदार मांडणी इथे नाहीये. काही तरी हरवल्यासारखे वाटणे हे टिपिकल मंजुळे फिलिंग मात्र सैराटमधेही अनुभवाला येते. सिनेमातली पात्रनिवड अचूक आहे. फक्त परश्या आणि आर्चीच नाही तर, बाळ्या, सल्या, मंग्या, अनी ही मित्रमंडळी ते अगदी, तात्या, प्रिंस आणि पाटलांपर्यंत योग्य कलाकारांच्या निवडीमूळे सिनेमा रंगत जातो. रिंकु आणि आकाशसह ह्या सिनेमातली बरीचशी मुख्य पात्र सिनेमा माध्यमासाठी नवीन असली, तरीही त्यांच्या अभिनयात नवखेपण जाणवत नाही. ह्याचं क्रेडिट अर्थातच जातं मंजूळेंना. रिंकू राजगुरूचा निरागस एटीट्युड मात्र जबर आहे. तिचा चेहरा आणि देहबोली कमालीची बोलकी आहे. सुधाकर रेड्डीची विलोभनीय सिनेमॅटोग्राफी का कुणास ठाऊक पण दाक्षिणात्य सिनेमांची आठवण करून देते.

जातीभेद, अर्थकारण, समाजकारण आणि या सर्वांवर आधारित राजकारण यावर मंजुळे भाष्य करत नाहीत मात्र त्यांनी याच्या परिणामांचा आलेख मस्त मांडलाय मात्र त्यावर उत्तरार्धाच्या लुप्स मुळे बंधने येतात. फक्त पूर्वार्ध आणि फक्त उत्तरार्ध असे दोन वेगवगळे सिनेमे वाटावे इतकी पटकथा ताणली गेलीय याकडे आणखी लक्ष दयायला पाहिजे होते असे राहून राहून वाटते. 'फँड्री'मध्ये जब्याने फेकलेला दगड काळजाचा ठाव घेऊन जातो तसे इथे काही घडत नाही मात्र सुन्न शांततेतला शेवट सैराटला तारून नेतो असे म्हणणे वावगे ठरणार नाही. या मुद्द्याचा अधिक कीस पाडताना मणिरत्नमच्या बॉम्बेची प्रकर्षाने आठवण होते. त्यातही असेच पूर्वार्ध आणि उत्तरार्ध दोन वेगवेगळे होते मात्र मणीने सिनेमा उत्तुंग उंचीवर नेला होता. त्यातही धार्मिक तणाव निर्माण होईल अशी कथा होती, त्यातली सिनेमॅटोग्राफी,गाणी आणि संगीत सर्व उठावदार झाले होते अन मनाचा ठाव घेईल अशी मुंबई बॉम्बस्फोटाची पार्श्वभूमी उत्तरार्धात वापरल्याने सिनेमा उत्तरोतर रंगत गेला होता. सैराटमध्ये तसे काही करता आले असते पण बहुधा मंजूळेंना क्लायमॅक्स अधिक उठावदार करावा वाटला असावा त्यापायी त्यांनी ही रिस्क घेतली असावी.

शाळा, टाईमपास यामध्ये अल्पवयीनांचे प्रेम होते आणि बालकपालक मध्ये सेक्स आणि पौगंडावस्थेतील मुलांचा विषय होता, रेगे मुलांच्या गुन्हेगारीकरणावर होता तर फँड्री विषमतेचे वाभाडे काढणारा सिनेमा होता तर सैराट हळुवार प्रेमकथेच्या वेष्टनातला हरवत चाललेल्या सामाजिक भानावरचा सिनेमा आहे. तरीही हे सर्व सिनेमे कुठे तरी एका लिंकमधून समोर येत राहतात. मराठी चित्रपटाच्या नायक नायिकांचे घटत चाललेले वय हा या लिंकमधला समान दुवा आहे. मात्र हा चिंतेचा विषय आहे असे अनेकांना वाटते, ज्या वयात मुलांचे आईवरती प्रेम असते अन पुढे घडवायच्या करिअरची चिंता असते त्या वयात अशा कथा अन असे विषय कितपत योग्य आहेत असे विचारले जाणे स्वाभाविक आहे कारण आपल्या समाजाची वीण वेगाने उसवत चालली आहे अन चित्रपट या माध्यमातून त्याला आणखी खतपाणी दिले जातेय. यावर युक्तिवाद करताना अनेकजण मोबाईल व कॉम्प्यूटरवर २४ तास चालू असलेल्या पॉर्नचा दाखला देतात. तोही विचार करण्यासारखा आहे. अशा सिनेमातून पळून जाऊन आपला संसार थाटण्याकडे कल वाढेल, जातीयता आणखी टोकदार होईल असा विचारही काही ठिकाणी वाचायाला मिळाला. मात्र त्याला समर्पक मुद्दे मिळाले नाहीत. उलट असे केले तर काय होते याचे दाहक चित्रण यात आहे.

शेवटचा मुद्दा. या सिनेमाच्या निमित्ताने सोशल मिडीया दोन हिश्श्यात वाटला गेला हे खेदाने लिहावे वाटते. तथाकथित उच्चवर्णीयविरोधी वा ब्राम्हणद्वेषी आणि बहुजनद्वेष्टे अशा दोन गटातल्या लोकांनी या सिनेमाचे समर्थन वा विरोध करताना याला बहुजन विरुद्ध उच्चजातीय असा रंग देण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूंनी केलाय अन होतोय. जातीद्वेषविरोधात काढलेल्या सिनेमाचा वापर जातीद्वेष पसरवण्यासाठी व्हावा हे चित्रच खूप क्लेशदायक अन धक्कादायक आहे. काहींना हे संस्कृतीवरील गंडांतर वाटते तर काहींना हा अभिजनांचा, बहुजनांचा हुंकार वाटतोय ! मात्र एक उच्च निर्मितीमुल्ये असणारा मराठी सिनेमा म्हणून याकडे पाहायला काही हरकत नाही. कुठला संदेश अभिप्रेत धरून सिनेमा पाहणार असाल तर दोन्ही बाजूंच्या लोकांची निराशा होईल. सिनेमाची भट्टी चांगली जमलीय मात्र फँड्रीच्या तुलनेत ती फिकी आहे हे निश्चित ….

मंजूळेंचा आवाका मोठा आहे त्यांनी आता प्रेम आणि विषमता यातून बाहेर पडून जब्बार पटेलांच्या सिंहासनसारखा बुलंद राजकीय चित्रपट हाती घ्यावा, पर्यावरण, स्त्री पुरुष लिंग भेद, आंतरराष्ट्रीय तुलनेतील आपली परिपक्वता, राष्ट्रीय गरजा, सद्य स्थितीतील आव्हाने, दहशतवादामागची खरी कारणे आणि नव्याने लादला गेलेला आर्थिक विषमतावाद असे कसदार जोरकस विषय हाताळावेत. जेणेकरून त्यांच्यातल्या प्रतिभावंताचे सक्षम प्रकटीकरण खरया अर्थाने जगापुढे येईल …. माझ्याकडून सैराटला ५ पैकी ४ गुण ….

जाताजाता - 'द गर्ल इन द रिव्हर, द टेल ऑफ पाकिस्तानी सर्व्हायव्हर' ह्या ऑनर किलिंगच्या विषयावरील पाकिस्तानातील एका सत्यघटनेवर आधारित असलेल्या शॉर्टफिल्मने ह्यावर्षीचे बेस्ट डॉक्युमेंतट्रीचे ऑस्कर मिळवले आहे. गाणी, सुसाट संगीत आणि विलोभनीय सिनेमॅटोग्राफी यापैकी त्यात काहीही नाही तरीही ही शॉर्टफिल्म आपल्या बधीर संवेदनांना झिन्झोडते, आपल्याला अंतरबाह्य हलवून टाकते कारण दिग्दर्शकाचा हेतूच तो आहे. इथे बहुधा तसा हेतू नसावा. म्हणूनच हा सिनेमा म्हणजे पूर्णविराम नसलेली वाक्यरेष बनून राहतो.

- समीर गायकवाड.

No comments:

Post a Comment