Wednesday, April 27, 2016

हिटलर - 'नाझी भस्मासुराचा उदयास्त' एक आकलन .......

८ मे १९४५ या दिवशी म्हणजे ५ वर्षे, ८ महिने व ७ दिवसांनंतर दुसरे महायुद्ध संपले. तिसरे राईश गडपच झाले. जर्मनीत सरकार उरले नाही. शास्ता उरला नाही. लक्षावधी सैनिक व सर्वसामान्य नागरिक बेघर झाले. अन्न नव्हते, निवारा नव्हता, सर्वत्र पडलेली घरे होती. चिंध्या पांघरून अर्धपोटी अवस्थेत पुढचा हिवाळा जनतेला काकडत काढावा लागणार होता. पुढे फक्त अंधार होता, भीषण अंधार. मृत्यू-दरीसारखा.
तिसरे राईश इतिहासजमा झाले होते. या तिसर्‍या राईशच्या उदयास्ताची कहाणी. 'नाझी भस्मासुराचा उदयास्त' मध्ये वाचायला मिळते. हिटलरच्या समग्र जीवनाचा आणि तत्कालीन सामाजिक, राजकीय व आर्थिक घटनांचा वेध यात अत्यंत प्रवाही व रसाळ शैलीत घेतला होता. या पुस्तकावर आधारित हिटलरच्या जीवनाचा हा एक आलेख... ..


हिटलर पेक्षा हिटलर चे डोळे खूप बोलायचे, बाकी त्याच्या चेहऱ्यात विशेष आकर्षित करण्यासारखे काही नसाव. सुंदर डोळ्यांबरोबरच त्याला अपार भाषाप्रभुत्वाची जणू काही दैवी देणगीच मिळाली होती. आणि ह्या गोष्टी त्याला लहानपणीपासूनच माहित होत्या ! मग त्याचा त्याने उभ्या हयातीत उपयोग करून घेतला ह्यात गैर ते काय ? आपल्या जिवलग मित्राच्या उद्धट आणि कडक शिस्तीच्या वडिलांचं मन - त्यांच्या मुलाने पारंपारिक सुतारकामाचा धंदा सोडून मित्राला आवडणाऱ्या संगिताच ज्ञान घ्याला परावृत्त करणारा हिटलर त्यावेळी फक्त आणि फक्त सोळा वर्षाचा होता.

त्याच्या ह्या भाषाचातुर्याची चुणूक त्याच्या आप्तांना आणि जीवालागाना वेळोवेळी दिसून आली.
हिटलर खूप शिष्टाचारी वृतीचा होता. त्याला नीटनेटके राहायला खूप आवडायचं. विएन्ना मध्ये ज्यावेळी तो राहायचा त्यावेळी रात्री झोपताना आपल्या पायजम्याची व्यवस्थित घडी करून तो गादीखाली ठेवायचा. त्याची ती सवयच होती. अतिशय गरिबीत सुद्धा आहे त्यात नीटनेटके राहण्याची कला त्याने फार पूर्वीच आत्मसात केली होती. इतिहासाचं असामान्य ज्ञान आणि त्याच तोडीच वाकचातुर्य ह्यांची सांगड त्याने वेळोवेळी घातली आणि म्हणूनच एकीकडे नीटनेटका, हुशार, चाणाक्ष आणि सुशिक्षित भासणारा हिटलर आणि दुसरीकडे गरिबीत भुकेल्यापोटी झोपणारा हिटलर विएन्ना वासीयांच्या आकलना पलीकडे होता.. त्यांना तो घमेंडी आणि नाटकी वाटला नसता तर नवलंच ...! हिटलर ने कधी मांसाहार केला नाही कि कधी दारूचा अतिरेक केला नाही ! विएन्नातले दिवस त्याने फक्त आणि फक्त पाव आणि दुधावर भागवले .

एक सांगायचं राहून गेलं, हिटलरच बालपण लिंझ नावाच्या एका छोट्याशा खेड्यात गेलं. निसर्गाने नटलेलं हे खेड ! म्हणून निसर्ग नेहमीच हिटलर ला जवळचा वाटायचा जणू त्याचं दुसरे  घरच ! त्याला शहराची खूप ओढ होती. तेथील राहणीमान, जगण, माणस ह्याबद्दल खूपच उत्सुकता होती. त्यांच्या धकाधकीच्या आणि समेस्येनी भरलेल्या जीवनात त्याला रस होता. जिथ समस्या तिथ हिटलर ! तो विचार खूप करायचा आणि समोर असलेल्या समस्यांवर उपाय शोधायला त्याला खूप बर वाटायचं. लिंझ हे खेड त्यामानान खूपच साध आणि सरळ होत आणि म्हणूनच हिटलरने त्याच्या कर्मभूमीची निवड विएन्ना हे शहर केलं असावं !

युद्ध, लढाई ह्या गोष्टींच त्याला अपार कौतुक ! पूर्वी घडलेल्या लढ्याची माहिती मिळवायला, जेथे लढाई घडली तेथील लोकांशी बोलायला, त्या अनोळखी शहरात/खेड्यात तो दोन दोन दिवस राहिला ह्या वर कोणी विश्वास ठेवेल का ? लहानपणी मित्रासोबत पोहायला गेल्यावर मागून पाळत ठेवणाऱ्या मित्राच्या आईला पाण्यात पडल्यावर जीवावर उदार होवून वाचवणारा हिटलर अगम्य आणि त्याच माऊलीला तिच्या ऐंशीव्या वाढदिनी ( १९४४ ) लक्षात ठेवून भेटवस्तू पाठविणारा हिटलर तर त्याहूनही अगम्य !!

हिटलर खूप गंभीर स्वभावाचा होता आणि म्हणूनच त्यानं ज्याही विषयात लक्ष घातलं त्या गोष्टीत स्वतःला अक्षरशः झोकून दिल. एखाद्या गोष्टीबद्दल त्याची भयंकर आसक्ती त्याच्या पंधरा-सोळा वर्षे वयाला न शोभणारी होती. हसून कोणतीही गोष्ट सोडून देण त्याला कधीच शक्य झाल नाही आणि म्हणूनच तो आपल्या प्रश्नांच्या दुनियेतून कधीच बाहेर आला नाही ! त्याला प्रत्येक गोष्टीत समस्याच दिसली उदारणार्थ लोकांच राहणीमान, शहरातील गरिबी, उंच इमारतींचा ढांचा, शहराचा एकूणच साचा, सरकारचे कर विषयक धोरण, संगीताबाद्दलाचा दृष्टीकोण आणि बरंच काही...प्रत्येक गोष्टीच समाधान/उत्तर त्यानं आपल्याजवळ तयार ठेवलं - एक न एक दिवस हे बदलण्यासाठी ! बदल घडवण्यासाठी लागणाऱ्या पैशांचा आणि सत्तेचा विचार त्यानं कधीच केला नाही - क्षणभर सुद्धा नाही ! हाच तो दुर्दम्य आत्मविश्वास ज्याकडे त्याच्या एकमेव मित्राने आणि पर्यायानं इतिहासानं दुर्लक्ष केल - आणि हिटलर जे हवं त्यानं तेच केलं. हिटलरने कधी हास्यविनोद केल्याचं फारसं कोणाच्या लिखाणात आलेलं नसावं पण त्याचे हे विनोद त्याच्या एकदम जवळच्या वर्तुळा पुरते मर्यादित असायचे हेही तितकंच खर !


जर्मनीतल्या नाझी पक्षाचा अध्यक्ष व जर्मनीचा हुकूमशहा अ‍ॅडॉल्फ हिटलरचा जन्म २० एप्रिल १८८९ ला ब्राउनाऊ अ‍ॅम इन येथे( बव्हेरिया आणि ऑस्ट्रिया यांच्या सीमेवर) एलोइस व क्लारा पोलझल या दांपत्यापोटी झाला. हिटलरचे वडील ऑस्ट्रियन सरकारच्या अबकारी खात्यातील एक सामान्य अधिकारी होते. क्लारा ही त्याच्या वडिलांची तिसरी पत्नी होती. हिटलरचे आपल्या आईवर विशेष प्रेम होतं, पण त्यानं ते कधी बोलून दाखवलं नाही. त्याच्या स्वभावातच  ते बसत न्हवतं. तिच्या शेवटच्या आजारपणात तो बराच खचला होता. दिवसभर तिच्या शेजारी बसून तिला हवं नको ते पाहाणं आणि प्रसंगी किचन मध्ये जावून तिचा आवडता पदार्थ करणं एवढाच त्याचा दिनक्रम असायचा !
आपल्या लाडक्या आईची इच्छा म्हणून पुस्तकी ज्ञान देणाऱ्या शाळेत जावं कि आपली आवड असणाऱ्या कलेचं शिक्षण घ्यावं ह्या द्विधा मनस्थितीत तो बरेच दिवस राहिला. पण त्याचा निर्णय झाला होता आणि म्हणूनच आईला दुखावणारा निर्णय घेताना त्याला किती त्रास झाला असेल ते देव जाणे.
वडिलांबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्यात भरपूर मतभेद होते.त्याच्या जीवनाची दिशा त्यांनी आधीच ठरवली होती. आपल्या मुलानं सरकारी नोकरी करावी अशी त्यांची इच्छ्च्या आणि म्हणून दारू पिऊन आल्यावर बऱ्याच वेळा दोघांच्यात खटके उडायचे. म्हणून काही बाहेर वडिलांबद्दल अनादराने हिटलर कधीच काही बोलला नाही. कधीच नाही !

तारुण्याच्या उंबरठयावर असताना हिटलर प्रेमात पडला. आपल्या सारख्या बऱ्याच जनांप्रमाणे त्यालाही ते तिच्याजवळ व्यक्त करता आलं नाही. दोन जीव जर एकमेकांवर खरोखर प्रेम करत असतील तर त्यांना भाषेची गरज पडत नाही, अंतःस्फूर्ती न त्यानां ते आपोआप समजतं. हे हिटलरच तत्त्वज्ञान ! म्हणूनच तिच्याशी बोलण्याची हिटलरला कधी गरज वाटली नसावी. तसं समोर गेल्यावर बोलायचं काय ? आणि काय करतोस ह्या प्रश्नाला समर्पक उत्तर नसणं हे दुसरं कारण. हिटलरच्या प्रेमाची व्याख्या एवढ्या उच्च्य पातळीची होती कि, काहीच पात्रता नसताना कोणाही पोरीच्या समोर जाऊन तिची माहिती विचारणं वा ओळख करून घेणे त्याला प्रशस्त वाटत न्हवते.
हिटलरच भावविश्व समजण कठीण आहे. आपलं माणूस मिळत नाही म्हटल्यावर त्याला नैराश्येने घेरलं. त्यानं तिच्या अपहरणाचा ही कट रचला. मित्राला त्याची जबाबदारी सोपवली गेली. अर्थात हे प्रत्यक्षात कधीच उतरलं नाही. हेच त्याच्या पहिल्या आत्महत्येच्या योजनेबद्दल सुद्धा झालं, आणि विशेष म्हणजे स्टीफनी नेही त्याच्याबरोबर आत्मघात करून घेणं जरुरी होतं !!!
१९०६ ला जेव्हा विएन्नाला जायची वेळ आली तेव्हा मनातून त्याला वाटल कि दानुबे पुलावर ( जिथ तो मित्राला घेऊन ती यायची वाट पाहायचा ) ती जेव्हा  मित्राला एकट पाहिल तेव्हा निश्चितच विचारपूस करेल. आणि म्हणूनच मित्राला काय उत्तर द्यायचं ते त्याने बजावून ठेवलं - " माझा मित्र उच्च शिक्षणासाठी विएन्नाला गेला आहे. चार वर्षांनी जेव्हा तो परत येयील तेव्हा तो तुम्हाला लग्नासाठी विचारेल. जर तुमचा आत्ताच होकार असेल तर झटापट तयारी करता येईल !!! "
अशा ह्या पहिल्या प्रेमाच्या अवती भोवती हिटलरने खूप स्वप्नं रंगवली. तिची प्रत्यक्ष भेट टाळताना त्याच्या स्वप्नात मात्र ती नेहमीच वावरली. तो तिला बायको म्हणून स्वप्नं सजवतोय, स्वतःचं असं देखण घरट तयार करतोय आणि बरचं काही... नंतर त्यान असं घर बांधलंही, पण स्टीफनी त्यात न्हवती. स्वप्नं आणि सत्याचं अनोखं मिश्रण हेच त्याचं वैशिष्ठ्य. स्टीफनी त्याच्यासाठी दोन्हीही होती, वस्तुस्थिती आणि स्वप्नं ! स्वप्नं त्यानं प्रत्यक्षात आणली आणि वस्तुस्थितीला मात्र तो नेहमीच बगल देत आला !!!

हिटलरला अनेक भावंडे होती; परंतु त्यांपैकी बरीच बालपणी निर्वतली होती. धाकटी बहीण पॉला मात्र मोठी झाली. हिटलरच्या सावत्र भावंडांपैकी अ‍ॅलाइस हा भाऊ आणि एंजेला ही बहीण ही दोघे कालमानानुसार मोठी झाली. एंजेला हिच्याशीच हिटलरची जवळीक होती. १९२८ मध्ये जेव्हा हिटलरने हौस वॉचेनफेल्ड येथे घर घेतले, तेव्हा त्याने व्हिएन्नाहून एंजेलास बोलावून घेतले. एंजेला विधवा होती. तिने आपल्या दोन मुलींना बरोबर आणले. नंतर त्यांपैकी थोरली गेली रौबल हिच्या प्रेमात हिटलर पडला.

इसवी सन १९०० मध्ये हिटलर जवळच्या लिंझ रिअल स्कूलमध्ये माध्यमिक शिक्षणासाठी दाखल झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर त्याच्या आईला निवृत्तिवेतन मिळत असे. त्यांची परिस्थिती हिटलरने 'माइन काम्फ' (माझा लढा) मध्ये म्हटल्यापेक्षा खूपच चांगली होती. १९०४ मध्ये हिटलरने स्वतःच्या असमाधानकारक प्रगतीमुळे लिंझ रिअल स्कूल सोडले आणि स्टेर येथील शाळेत प्रवेश घेतला. नंतर वयाच्या सोळाव्या वर्षी त्याने शिक्षण सोडले ; परंतु त्याला शाळा सोडल्याचा दाखला मिळाला नाही. लीन्झ मधले हिटलरचे दिवस कलेच्या ध्यासाने भरले होते तर विएन्ना राजकारण  !
त्याकाळात ऑस्ट्रोहंगेरीयन राजवटीतील, ऑस्ट्रियात राहणाऱ्या जर्मन लोकांचा संघर्ष चालूच होता. ऑस्ट्रीयातील हे जर्मन, स्लाव, माग्मार,  ईटली यांच्यात उभे होते. लिंझ ह्या मानाने जर्मनीच्या सीमारेषेवर वसलेलं गाव, त्यामुळे तिथे जर्मन लोकांची वस्ती अधिक होती. नजीकच्या  प्रांतातल्या प्राग मध्ये तर नेहमीच निदर्शने चालू असायची. शांत शांत असलेलं लिंझही आता धुमसू लागलं होतं. राजसत्ता आणि त्यांचे पोलीस हि लिंझच्या जर्मनांचे तिथल्या चेक लोकांकडून सुरु झालेले अतिक्रमण रोखू शकत न्हवते. कळस तेव्हा झाला जेव्हा चेकच्या ह्या लोकांकडून पैसे गोळा करणे सुरु झाले, कारण काय तर –चेक भाषेची शाळा स्थापन करणे !!!
ह्यामुळे लिंझ वासियांना आपल्यावर आक्रमणाची भावना तयार झाली आणि हिटलर ह्या वातावरणात वाढत होता…! शैक्षणिक क्षेत्रातील अपयशामुळे शिक्षणाविषयी आणि शिक्षितांविषयी हिटलरच्या मनात विलक्षण अढी निर्माण झाली. आपण मोठे चित्रकार होणार अशी त्याची खात्री होती. १९०७ मध्ये हिटलर व्हिएन्ना येथील अकॅडेमी ऑफ फाइन आर्ट्समध्ये शिक्षण घ्यावे या महत्त्वाकांक्षेने प्रवेशपरीक्षेस बसला व अनुत्तीर्ण झाला. त्याला पुन्हा परीक्षेस बसण्यास परवानगी मिळाली नाही. १९१३ पर्यंत तो व्हिएन्ना येथे होता. ह्या काळात त्याने कोणतीही नोकरी केल्याविषयीचा पुरावा उपलब्ध नाही.मात्र राष्ट्रवादाचे भूत त्याच्या डोक्यात कसे शिरले याची कथा मात्र रोमांचक आहे. एके रात्री नाट्यगृहात वेग्नरचा “रिन्झी” सादर होणार होता. ह्या पूर्वी कधी रिचर्ड वेग्नरचा कोणताच ओपेरा पहिला नसल्यामुळे हिटलर आणि  त्याचा मित्र खूप उत्सुक होते. नाटक सुरु झालं आणि हिटलर त्यात तल्लीन होऊन गेला, त्याला कशाचंच भान राहिलं नाही. रिन्झीचा रोम मधला प्राचीन लोकनियुक्त अधिकारी म्हणून झालेला उदय आणि नंतर अस्त पाहताना तो त्याच्यात एकरूप होऊन गेला. नाटक/ओपेरा संपल्यानंतर तो बोलू लागला, पण ह्यावेळी त्याच्या शब्दांना वेगळीच धार होती. त्याचा आवाजच सांगत होता कि ह्या अनुभवानं तो किती प्रभावित झालाय ते. जणू काही रिन्झीच त्याच्यात अवतरलाय...!!
आतापर्यंत हिटलर एखादा चित्रकार, कलाकार किंवा कदाचित वास्तुविशारद होईल असं वाटतं होतं पण आता गोष्ट वेगळी होती. आता त्याला काहीतरी वेगळंच व्हायचं होतं. एक न एक दिवस जनादेश घेऊन आपल्या माणसांना पारतंत्र्यातून स्वातंत्र्याकडे नेणाऱ्या वाटेचं नेतृत्व करण्याचं  तो बोलत होता…
ह्या तासाभरात तो कोणीतरी वेगळाच भासत होता, एक न एक दिवस एखाद्या विशेष मोहिमेची जबादारी आपल्या खांद्यावर येऊन पडेल… तो बोलत होता आणि  त्याचा एकमेव मित्र ऐकत होता…राजकारणात विशेष कल नसल्याकारणाने त्याला ते फारसं समजत न्हवत..
काही वर्षांनी त्याला ह्या गोष्टीचं महत्व आपोआपच समजलं…!
 नंतर १९३९ ला लिंझमध्ये ह्याच नाटकाच्या प्रयोगाला वेग्नरशी बोलताना त्यानं ह्याची कबुली दिली की, 'त्या तासाभरात त्याच्यातल्या वेडाची सुरुवात झाली होती !'चित्रे काढून अगर प्रारूपकाराचे (ड्राफ्ट्समन) काम करून तो जगत होता. ह्याच काळात हिटलरचा श्रमजीवी वर्गाशी संपर्क आला. ह्या वर्गाविषयी त्याला सहानुभूती वाटण्याऐवजी घृणा उत्पन्न झाली. साम्यवादविरोध तो येथेच शिकला.

त्याचप्रमाणे त्याचा ज्यूद्वेषही याच वेळी जागृत झाला. ज्यू लोकांच्या पापाचा इतिहास वाचून त्याने आपल्या ज्यूद्वेषाचा पाया बळकट केला. लोकशाही मार्गाचा अवलंब करणे हेही मूर्खपणाचे आहे, असे त्याचे मत बनले. हुकूमशाही सर्वश्रेष्ठ आहे हे पायाभूत सत्य हिटलर व्हिएन्ना येथेच शिकला. एकंदरीत व्हिएन्नातील १९०७ ते १९१३ हा काळ हिटलरच्या जीवनात अत्यंत परिणामकारक होता. त्याच्या राजकीय विचारांना स्पष्ट स्वरूप देण्यास व्हिएन्नातील ज्या गटांची मदत झाली, त्यांमध्ये ऑस्ट्रियन सोशल डेमोक्रॅट, पॅन जर्मन नॅशनॅलिस्ट आणि ख्रिश्चन सोशल पार्टी यांचा वाटा मोठा होता.राजकारण आणि प्रेम ह्या एकदम भिन्न गोष्टींची तुलना करणं येथे मूर्खपणाचे वाटेल पण सुरुवातीच्या काळात ह्या दोन्ही गोष्टींकडे पाहण्याचा हिटलरचा दृष्टीकोन सारखाच होता.भावनिक पातळीवर ज्या उत्कटतेने राजकारणात तो गुंतत गेला, वास्तवात मात्र तितकाच तो त्याच्यापासून तो दूर पळत राहिला ! त्यानं कोणताच  राजकीय पक्ष स्वीकारला नाही.अर्थात हि झाली त्याच्या एकोणवीस वर्षापर्यंतच्या काळापर्यंतची  गोष्ट, नंतर त्याला राजकारणात यावंच लागलं हि गोष्ट  अलहिदा  !!

हिटलरच्या राजकीय जीवनाबद्दल लिहिताना एक गोष्ट नक्कीच समोर येते – ज्यू आणि ज्यू संधर्भातला त्याचा दृष्टीकोन ! जेव्हा तो लिंझ  मध्ये रहात होता, त्याने लिहिल्याप्रमाणे – “ हे सांगणं अवघड आहे, नसेल, अशक्य आहे  ज्यू नावाचा शब्दानं माझ्या विचारांना कधी खाद्य पुरवलं. वडील हयात असताना घरी नेमकं मला आठवत नाही कि हा शब्द कानांवर कधी पडला. ह्या शब्दाला विशेष महत्व देणं म्हणजे त्या वृद्ध माणसाला आपल्या संस्कृतीच अधःपतन वाटलं असावं. प्रखर राष्ट्रवादाबरोबर त्यांच्या अशा स्वतःच्या कल्पना होत्या ज्यांनी मी प्रभावित झालो. वारसा हक्कानं मिळालेल्या ह्या संकल्पना पुढे शालेय जीवनातही तशाच अढळ राहिल्या.हे खरं कि  शाळेत असताना  एका ज्यू मुलाला भेटलो, त्याची आम्ही काळजीही घ्यायचो पण विविध अनुभवांवरून असं लक्षात आलं कि  विश्वास ठेवायच्या पात्रतेचा न्हवता. पण  ह्या गोष्टीला आम्ही जास्त महत्व दिलं नाही. चौदा – पंधरा वर्षाचा होईपर्यंत हा शब्द कधी कानांवर पडला नाही पण नंतर कधीतरी राजकीय चर्चेत हा विषय कानांवर पडत राहिला. जेव्हा लोक माझ्यासमोर धार्मिक गोष्टींची चर्चा करायचे तेव्हा कुठली तरी अप्रिय भावना मनात यायची.एवढंच काय ते मला आठवतं. लिंझमध्ये फारसे ज्यू न्हवते…  ”
असं म्हणता येईल कि ज्यू विरोधी भावना विएन्नाला जाण्यापूर्वीच त्याच्या मनात तयार झाली असावी. विएन्नातल्या त्याच्या अनुभवांनी त्याच्यावर शिक्कामोर्तब केले पण ज्यू विरोधी भावनेला तर निश्चितच जन्म दिला नाही, त्याची पेरणी कळत-नकळत आधीच झाली असावी...


पहिल्या महायुद्धात हिटलरने स्वयंस्फूर्तीने भाग घेतला. तत्पूर्वी त्याला अशक्त म्हणून सैन्यात अपात्र ठरविण्यात आले होते. बव्हेरियाच्या सोळाव्या राखीव दलात त्याचा समावेश करण्यात आला. युद्धात हिटलरने धैर्याने आणि सचोटीने कामगिरी बजावली. त्याबद्दल त्याला आयर्न क्रॉस देण्यात आला. १९१६ मध्ये जखमी झाल्यामुळे त्याला जर्मनीस परत आणण्यात आले. पुन्हा युद्धात भाग घेतल्यानंतर १९१८ च्या ऑक्टोबरमध्ये त्याच्या डोळ्यांवर परिणाम झाल्यामुळे त्याला दिसेनासे झाले व पुनश्च इस्पितळात ठेवण्यात आले. त्यानंतर लवकरच युद्ध संपले.

महायुद्धात जर्मनीचा पराभव होण्यास राजकारणी लोक कारणीभूत होते, ह्या सर्वसामान्य मतप्रणालीशी हिटलर सहमत होता. प्रजासत्ताक पक्षाने व्हर्सायच्या तहावर सह्या केल्याने प्रजासत्ताक व लोकशाही यांविषयी त्याचे मत आणखी वाईट झाले. १९१९ च्या जानेवारीत हिटलर म्यूनिक येथे स्थायिक झाला. तेथे अर्न्स्ट र्‍होम ह्या दहशतवादी लष्करी अधिकाऱ्याशी त्याचा परिचय झाला. बव्हेरियन सरकारचे धोरण हे मध्यवर्ती सरकारच्या विरुद्ध असल्याने दहशतवाद अथवा मध्यवर्ती प्रजासत्ताकाविरोधी उठाव यांच्याकडे सरकारने नेहमीच कानाडोळा केला. ह्याच सुमारास हिटलरला लष्कराच्या राजकीय खात्यात आदेशाधिकारी (इन्स्ट्रक्शन ऑफिसर) म्हणून नेमण्यात आले. पुढे जर्मन कामगार पक्षात सामील होण्याचा आदेश मिळाल्यावरून हिटलरने त्या पक्षात प्रवेश केला (सप्टेंबर १९१९). मुळात सात सभासद असलेली ही संघटना हिटलरच्या नेतृत्वाखाली नॅशनल सोशालिस्ट जर्मन वर्कर्स पार्टी म्हणून नावलौकिकास आली. म्यूनिकमधल्या लष्करी अधिकाऱ्यांच्या अनुमतीने त्याने आपली संघटना प्रबळ केली. पक्षाचे पाशवी बळ वाढविण्यासाठी स्वयंसेवक संघटनेची (स्टॉर्मट्रपर्स) योजना काढण्यात येऊन अनेक बेकार लष्करी जवानांचा तीत समावेश करण्यात आला. नाझी पक्षाच्या कार्याला सुरुवात येथपासूनच झाली. ह्या काळात हिटलरचा हेरमान गोरिंग, आल्फ्रेट रोझेनबेर्ख आदी लोकांशीसंबंध आला. १९२१ मध्ये दहशतवादाच्या आरोपावरून हिटलरला तीन महिन्यांची शिक्षा झाली (एका महिन्यानंतर त्याला सोडण्यात आले) .८ नोव्हेंबर १९२३ रोजी हिटलरने बव्हेरियात सशस्त्र उठाव घडवून आणण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्याबद्दल त्याला पाच वर्षांची शिक्षा झाली (प्रत्यक्षात नऊच महिने) . तुरुंगाबाहेर आल्यावर हिटलरने पुन्हा पक्षसूत्रे हाती घेऊन पक्षबल वाढविण्यास प्रारंभ केला. ह्या काळात ल्यूडेन्डोर्फने पक्ष सोडून दिला. १९२५-२६ मध्ये हिटलर व इतर नाझी पुढारी यांच्यात वितुष्ट येऊन हॅनोव्हर येथील बैठकीत उत्तर नाझी पक्षाने हिटलरचा पक्षकार्यक्रम अमान्य केला. गोबेल्सने हिटलरला पक्षातून काढून टाकण्याची सूचना केली. बॅम्बर्गच्या बैठकीत इतर नाझी पुढारी व गोबेल्स यांची मने वळवून हिटलरने एकजूट राखली. ह्या सुमारास स्वयंसेवक संघटनेशी हिटलरचे वितुष्ट आले; परंतु अंती त्याने त्यांना आपल्या वर्चस्वाखाली आणले. हिटलरची संपूर्ण वैयक्तिक अधिकाराची मागणी संघर्षाच्या मुळाशी होती.

गुस्टाव्ह श्ट्रेझमानच्या परराष्ट्रीय धोरणामुळे जर्मनीची परिस्थिती सुधारत होती. लोकांचे वैयक्तिक उत्पन्न वाढले, पुनरौद्योगिकीकरण झपाट्याने होत होते. नाझी पक्षाची त्यामुळे पीछेहाट झाली असती; परंतु युद्धखंडणीचाप्रश्न हिटलरने ज्वलंत ठेवला. श्ट्रेझमानच्या मृत्यूनंतर (१९२९) त्याला आवश्यक ती संधी मिळाली. त्यापूर्वी यंग कमिटीने ही खंडणी निश्चितकरून ४५ वर्षे ती हप्त्याने द्यावी, असा निर्णय दिला होता. याविरुद्धजर्मनीत आल्फ्रेड हिंडेनबुर्ख ह्या श्रीमंत व अतिरेकी माणसाच्या नेतृत्वाखाली चळवळ सुरू झाली. तिचा मुख्य उद्देश असफल झाला; परंतु तिच्यामुळे हिटलर राष्ट्रीय पुढारी बनला. त्यामुळे व्यक्तिशः हिटलरची तसेच नाझी पक्षाची लोकप्रियता वाढली. १९२९ च्या डिसेंबरमध्ये नाझी पक्षाने प्रांतिक निवडणुकांत बेडन, ल्यूबेक, थुरिंजिया, सॅक्सनी व ब्रंझविक प्रांतांत यश मिळविले. १९३० च्या जागतिक आर्थिक मंदीचे परिणाम जर्मनीवर मोठ्या प्रमाणात झाले. नाझी पक्षाची लोकप्रियता वाढली. नाझी पक्षाचे धोरण प्रथमपासूनच व्हर्सायचा तह, साम्यवाद, लोकशाही यांना विरोधी होते. मंदीमुळे त्या विरोधाला राष्ट्रीय आधार मिळाला.

इसवी सन १९३३ च्या जानेवारीत अध्यक्ष पॉल फॉन हिंडेनबुर्खने हिटलरला चॅन्सलरपदी नेमले. जर्मन संघराज्याच्या मध्यवर्ती संसदेत नाझी पक्षाचे बहुमत झाले होते. संसद व हिंडेनबुर्ख यांच्याकडून हिटलरने एक जादा कायदा (इनॅबलिंग अ‍ॅक्ट) संमत करून घेतला व त्या बळावर नाझी राजवट सुरू केली. १४ जुलै १९३३ रोजी एका वटहुकमाने नाझीशिवाय इतर पक्षांवर बंदी घालण्यात आली. नाझी राजवटीचा प्रारंभ हिंसेने व दहशतवादाने झाला. विशेष कायद्यांद्वारा ज्यूंना सर्व अधिकार नाकारण्यात आले. अर्थकारणाशिवाय सर्व क्षेत्रांचे त्याने नाझीकरण केले. वाढत्या अंदाधुंदीला आळा घालण्याचा त्याने प्रयत्न केला. त्यास स्वयंसेवक संघटनेकडून विरोध होऊ लागला. विरोधकांचे खून करून त्याने त्यांचा कायमचा बंदोबस्त केला (३० जून १९३४ चे शुद्धीकरण) . २५ जुलैला ऑस्ट्रियात नाझी क्रांती घडवून आणण्यात त्याला यश मिळाले. २ ऑगस्ट १९३४ रोजी (हिंडेनबुर्खच्या मृत्यूनंतर) हिटलर जर्मनीचा अध्यक्षझाला. तो अध्यक्ष, चॅन्सलर, सरसेनानी आणि नाझी पक्षप्रमुख होता. १९ ऑगस्टला ह्या प्रश्नावर सार्वजनिक कौल घेण्यात येऊन हिटलरच्या बाजूने ८९.९३% मते पडली. परराष्ट्रखाते हिटलरने स्वतःकडे ठेवून घेतले. सर्वंकषवादी राज्य आणि एक नेता, एक वंश, एक पक्ष असे धोरण जर्मनीत स्वीकारण्यात आले. याला कारण हिटलरच्या डोक्यात असणारे राईशचे भूत !!
त्या बिकट परिस्थितीत एक शब्द त्याच्या तोंडून सारखा बाहेर पडू लागला  – “ राईश “ (reich) ! सद्य अस्थिर राजकारणातून कसे बाहेर पडता येईल? – राईश ! ( फर्स्ट राईश - रोमन साम्राज्य, दुसरे राईश - १८७१ ते १९१८चे जर्मन साम्राज्य, तिसरे राईश - नाझींचे साम्राज्य ) आपण तयार केलेल्या मोठमोठ्या ईमारतीच्या आराखड्यांना अर्थसहाय्य कोण पुरवील ? – राईश !!, लहान-सहान प्रश्नाचं उत्तर – राईश !, नाट्यव्यवस्थेचा विकास – राईश स्टेज डिझाईनर !, अंध लोकांच्या समस्या, प्राणीमात्रांचे संरक्षण – राईश !, थर्ड राईश म्हणजे नाझींचे राज्य, जगावर राज्य करणारी जर्मन अधिसत्ता  !!, त्याच्या सर्व प्रश्नांवर त्याने एकच उत्तर पक्के केले ते म्हणजे थर्ड राईश !!
हा इतिहास आहे की नंतर सोळा-सतरा वर्षांनी खरोखरच "थर्ड  राईश" चा जन्म झाला आणि “ राईश  स्टेज   डिझाईनर ” हेही पद निर्माण केलं गेलं हे वेगळं सांगणे नको !!! हीच प्रखर राष्ट्रवादी विचारसरणी नंतर त्याचं राजकीय तत्व आणि जीवनाचा अविभाज्य घटक बनलं. कोणतीच गोष्ट त्यानं नगण्य मानली नाही आणि बारीक सारीक गोष्टींचाही अभ्यास केला. कोणतच अपयश, कोणतीच गोष्ट त्याला ह्या गोष्टीपासून परावृत्त करू शकली नाही.  मरतानाही हिटलर तसाच होतां जसा तो सोळाव्या वर्षीही होता अगदी प्रखर राष्ट्रवादी !

१३ जानेवारी १९३५ च्या सार्वमताने सार प्रांत जर्मनीच्या ताब्यात आला. १६ मार्च १९३५ रोजी हिटलरने व्हर्सायच्या तहातील युद्ध-सामग्रीबंदीची कलमे झुगारल्याची घोषणा केली. ह्या सुमारास इंग्लंडशी नाविक करार केला. जपान व इटलीशी तह करून जर्मनीचे परराष्ट्रीय वजन वाढविले. १९३८ मध्ये त्याने संरक्षणखाते स्वतःकडे घेतले आणितो खऱ्या अर्थाने जर्मनीचा हुकूमशहा झाला. इ. स. १९३९ मध्ये दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर त्याने सर्वाधिकार आपल्याच हाती ठेवले. युद्धनीतीतही कुशल तज्ज्ञांचा सल्ला न घेता त्याचा स्वतःच्या बुद्धि-सामर्थ्यावर फार विश्वास असल्याने लष्करी अधिकारी दुरावले. तो स्वतः संशयी व कपटी असल्याने त्याला सर्वत्र कपटाचा संशय येई. त्याचे ज्यूंविषयींचे धोरण व्यक्तिगत वैफल्यभावनेतून निर्माण झाले होते. हिटलर-कालीन हत्याकांडामध्ये सुमारे साठ लाख ज्यूंचा बळी गेला. त्याच्या आत्यंतिक राष्ट्रवादाला आंतरराष्ट्रीय दृष्टी येऊ शकली नाही. विरोध त्यास सहन होत नसे. जगापासून संरक्षण करण्यासाठी त्याने अहंकाराचे कवच निर्माण केले. त्यातूनच त्याच्या वंशशुद्धीच्या सिद्धांताचा उगम झाला.

दुसऱ्या महायुद्धास हिटलर कारणीभूत होता हे निःसंशय; परंतु त्याची युद्धातील कर्तबगारी विचक्षण होती. त्याने मोठी प्रगती घडवून जर्मनीला समर्थ बनवले; परंतु महायुद्धापायी या साऱ्यावर पाणी पडले. महायुद्धातील प्रतिकूल परिस्थिती लक्षात येताच तो बर्लिनला परत आला. बर्लिन शहर रशियनांच्या ताब्यात जात असताना त्याने आपली नवपरिणीत पत्नी इव्हा ब्राऊनसह आत्महत्या केली.

कानिटकरांनी 'नाझी भस्मासुराचा उदयास्त'मधून हिटलरचे चरित्र मांडताना वाचक एकदा हातात घेतलेले पुस्तक वाचून पूर्ण होईपर्यंत हातावेगळे करणार नाही याची पुरेपूर दक्षता घेतली आहे. आपल्या ओघवत्या शैलीत ते केवळ जर्मनीचा नव्हे तर अख्ख्या युरोपीय राजकारणाचा प्रवास घडवून आणतात.  या पुस्तकाव्यतिरिक्त विन्स्टन चर्चिल, अब्राहम लिंकन – फाळणी टाळणारा महापुरुष, व्हिएतनाम: अर्थ आणि अनर्थ  ही त्यांची पुस्तके गाजली होती. माओ क्रांतीचे चित्र आणि चरित्र, अडॉल्फ हिटरलची प्रेमकहाणी, हिटलरचे महायुद्ध, रक्तखुणा, इस्रायल : युद्ध, युद्ध आणि युद्धच, फाळणी : युगांतापूर्वीचा काळोख, कालखुणा ही पुस्तके देखील लक्षणीय ठरली होती ...
काही दिवसांपूर्वी कानिटकरांचे वृद्धापकाळामुळे दुःखद निधन झाले आणि त्यांच्या नावासरशी डोळ्यापुढे हीच कादंबरी आली कारण वाचनसंस्काराच्या काळात किशोरवयात अनेक पुस्तके वाचली अन त्यातली काही पुस्तके डोक्यात पक्की रुतून बसली. यापैकीच एक मुख्य पुस्तक 'नाझी भस्मासुराचा उदयास्त' हे होते. वाचनात आलेल्या महत्वाच्या पुस्तकांच्या नावात आजही मराठी वाचक रसिक या पुस्तकाचे नाव समाविष्ट करतात ही या पुस्तकाच्या लोकप्रियतेची पावतीच होय.
एक सिद्धहस्त चरित्रलेखक म्हणून मराठी साहित्यात वि.ग.कानिटकर यांचे नाव सदैव स्मरणात राहील.

- समीर गायकवाड.