Thursday, April 7, 2016

अंडरवर्ल्डचा अखेरचा डाव .....?सावळ्या रंगाच्या, किंचित बुटक्या चणीच्या, घोगऱ्या आवाजाच्या राजेंद्र निकाळजेचा जन्म एका सर्वसामान्य मराठी कुटूंबात जन्म झाला होता पण त्याच्या प्राक्तनात काही वेगळंच होतं. मुंबईच्या गुन्हेगारीची कुंडली मांडताना दाऊद इब्राहिम हे नाव प्रथम क्रमांकावर असले, तरी दाऊदचा इतिहास या राजेंद्र निकाळजेच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होऊ शकणार नाही असं तेंव्हा कुणी सांगितलं असतं तर त्याला मुर्खात काढलं असतं. मात्र राजेंद्रला याचं अप्रूप वाटलं नसतं कारण त्याची पावले त्याच वळणावर होती हे त्याला स्वतःला चांगले ठाऊक होते. लहानपणापासूनच तो गुंडगिरीला चटावला होता आणि त्या काळातील मुंबईचे डॉन हाजी मस्तान, करीम लाला, वरदाभाई यांच्या गुन्हेगारी कारवायांची त्याला भुरळ पडलेली होती. त्यातूनच त्याने आपला पुढचा मार्ग निश्चित केला. चेंबूर परिसरात त्या वेळी वरदराजन उर्फ वरदाभाईचा साथीदार आणि कामगार नेता म्हणविणारा राजन महादेव नायरच्या नावाचा मोठा दबदबा होता. गल्लीतल्या लहानमोठय़ा मारामाऱ्या आणि छोटेमोठे गुन्हे करीत या राजन नायरने आपले साम्राज्य प्रस्थापित केले होते. चेंबूर परिसरात त्याच्या नावाची एक दहशत तयार होत गेली अन राजन नायरच्या ऐवजी तो राजनभाई नावाने फेमस झाला...

राजेंद्र निकाळजेने चेंबूरच्या टिळकनगरमध्ये सहकार सिनेमागृहाबाहेर काळ्या बाजारात चित्रपटाची तिकिटे विकण्याचे काम बिनदिक्कतपणे सुरु केले. एका मराठी मध्यमवर्गीय कुटूंबातील एक मुलगा असूनही त्याने हे काम करत असतानाच लहान मोठी भाडणेही सुरु केल. हा काळ होता १९८०चा,या काळात तिकीटांचा काळाबाजार हा अंडरवर्ल्डच्या सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या व्यवसायांपैकी एक होता. १९७० ते १९८५ पर्यत हा व्यवसाय चांगलाच तेजीत होता. राजनभाईच्या कानावर त्याच्या कारनाम्यांच्या कहाण्या पडू लागल्या आणि राजनने राजेंद्र निकाळजेला आपल्या पंखाखाली घेतले. लहानमोठय़ा गुन्ह्य़ांची जबाबदारी त्याच्यावर सोपविण्यास सुरुवात केली आणि राजेंद्र निकाळजे हा राजनचा उजवा हात बनला. पोलीस दप्तरात छोटा राजनच्या गुन्हेगारी कारवायांची नोंद सुरू झाली, इथेच त्याचे अन राजनचे नामकरणही बदलले अंडरवर्ल्ड आणि 'डिपार्टमेंट' दोन्हीकडे ख्याती वाढली, राजन नायर झाला बडा राजन अन राजेंद्र निकाळजेचा झाला छोटा राजन ! काळ्या बाजाराच्या या गोरखधंद्यात दोघांनी चांगलाच जम बसवला. अन दिवस वेगाने पुढे जाऊ लागले तसतशी यांची ख्याती पसरू लागली...

कालपरत्वे दोघांमधील संबध घनिष्ट होत गेले. बडा राजनने त्याच्यावर आता मोठे व्यवहार सोपवायला सुरुवात केली त्याचबरोबर छोटा राजन हळूहळू वादग्रस्त व्यवहारांमध्येही लक्ष घालु लागला. यात प्रामुख्याने पैशांच्या व्यवहारांबरोबरच जमिनीच्या व्यवहारांचाही समावेश होता. अश्विन नाईक, अमर नाईक आणि अरुण गवळी यांची या काळात मुंबईवर चांगलीच दहशत होती. नाईक व गवळी यांच्या बरोबरीने त्या काळात वरदराजन मुदलीयार हा मुंबईत स्मगलिंगचा व्यवसाय करता होता. या सर्वांचे 'इलाखे' वाटून घेतलेले होते कुणी त्यात हात मारायचा प्रयत्न केला की त्यातून रक्तपात होई. या रिस्कपायी वरदराजन नेहमी बडा राजनच्या संपर्कात असे अन तोही त्याला हरामाच्या धंद्यात बेईमानी चालत नाही या नियमाने मनापासून मदत करत होता. बडा राजनच्या संपर्कात आल्याने राजन निकाळजेला हळूहळू पुढच्या व्यवहारांची मोठी किंमत कळू लागली. त्यामुळे आपसूकच राजन निकाळजे गुन्हेगारी जगताच्या गाळात रुतत चालला होता.

याच काळात मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये एक वेगळा अध्याय सुरु झाला होता. तो दिवस होता १२ फेब्रुवारी १९८१चा. प्रभादेवी पेट्रोलपंपाजवळ दाऊदचा भाऊ शाबीर इब्राहीम हा चित्रा नावाच्या नर्तकीच्या प्रेमात पडला होता. केनेडी ब्रीज येथून चित्राच्या घरातून रात्री उशिरा बाहेर पडल्यानंतर शाबीर रात्री प्रभादेवी पेट्रोलपंपाजवळ आला तेंव्हा त्याच्या डोळ्यातून 'चित्रा'ची नशा उतरली नव्हती. तो त्याच धुंदीत काही अंतर पुढे आल्यानंतर प्रभादेवी परिसरात दहशत असलेल्या मन्या सुर्वेच्या मदतीने करीमलालाच्या टोळीतील आलेमजेब व आमीरजादाने मशीनगनने बेछूट गोळीबार केला. त्यात शाबीरच्या अंगाची अक्षरशः चाळण झाली ! दाऊदच्या संतापाचा कडेलोट झाला, भावाच्या हत्येने त्याचे काळीज सूडाग्नीत दग्ध झाले. त्याने शांत डोक्याने सगळी 'गेम' तयार केली आणि अमलात आणली...

शाबीरवर झालेल्या हल्ल्याचा बदला दाऊदने अख्खी पठाण गॅंग संपवून घेतला. त्यात या गॅंगचे अनेक शूटर मारण्यात आले. १६ सप्टेंबर १९८३ ला या अध्यायाचे सर्वात खतरनाक पान लिहिले गेले. या दिवशी दुपारी मुंबई सत्र न्यायालयात पठाण गॅंगच्या आमीरजादाला हजर करण्यात आले होते. त्यावेळी दाऊदने फिल्मी स्टाईलने न्यायाधीशांच्या समोरच विटनेस बॉक्समध्ये त्याला गोळ्या घातल्या. त्यासाठी दाऊदचा खासम खास राजन नायर ऊर्फ बडा राजन याच्यावर आमीरजादाला मारण्याची जबाबदारी देण्यात आली होती. राजन गुंडगिरीसोबतच त्यावेळचा टिळकनगर येथील रिक्षाचालकांचा नेता होता ही एक विशेष बाब म्हणावी लागेल.

बडा राजनने ही मोठी रिस्क का घेतली असावी याचे कारण अगदी स्पष्ट होते. याचे उत्तर त्या काळातच सापडते. १९८० नंतरच्याच काळात गुन्हेगारी विश्वाच्या नाडय़ा आवळण्यास पोलिसांनी सुरुवात केली होती. वरदाभाईचे साम्राज्य पोलिसांनी उखडून टाकले होते. हाजी मस्तान आणि करीम लाला यांच्यातील आपसी रंजिशने परमोच्च टोक गाठले होते. त्यातीलच दाऊद इब्राहिमने हाजी मस्तानच्या साम्राज्यावर आपली पकड बसविली होती. राहता राहिला होता करीमलाला अन त्याचे साम्राज्य. मस्तानची गादी दाऊदने हस्तगत केल्याने करीमलालाचा डोळा आता मस्तानगॅंगचा नवा म्होरक्या म्हणून दाऊदकडेच होते. यातूनच करीमलालाने दाऊदचा भाऊ शाबीर याला उडवले होते. आता शाबीरच्या हल्लेखोरांच्या बदल्यात भाग घेऊन दाऊदच्या टोळीशी 'सेटिंग' लावायची ही गोल्डन मोमेंट आहे हे बडा राजनने हेरले होते अन त्यापायी थेट न्यायालयात जाऊन गेम वाजवली होती !

याचा मोठा फायदा बडा राजनला झाला अन त्याचे दाऊदच्या टोळीशी एकदम खंग्रे सुत जुळले.याच काळात तिकिटाच्या काळाबाजारावरून त्यांचे घाटकोपरच्या यशवंत जाधव टोळीशी त्यांचे वाद होऊ लागले. यशवंत जाधवने काट्याने काटा काढायचा हे अंडरवर्ल्डचे सूत्र मोक्याच्या टाईमला वापरले त्याने लालाच्या पठाणी टोळीशी टाका भिडवला ! अन बडा राजनला अंडरवर्ल्डचा दुसरा न्याय लागू पडला, त्याने जे पेरले तेच उगवले. त्याने आपली सेफ्टी फिट करण्यासाठी केलेली गेम त्याच्यावर उलटली अन २१ सप्टेंबर १९८३ रोजी त्याचा खून झाला. अचानक झालेल्या या घटनेने छोटा राजनचे छत्रच हरपले. तो मानसिक दृष्ट्या थोडा खचला त्यातून त्याला आता भक्कम आधाराची गरज वाटू लागली. त्याच्या घराशेजारच्याच एका इमारतीत राहणाऱ्या तरुणीशी त्याचे भावनिक नाते जुळले आणि योगायोगाने दाऊद इब्राहिमने तिला बहीण मानले. ही तरुणी दाऊदला राखी बांधू लागली. या नात्यामुळे छोटा राजन आणि दाऊद एकमेकांच्या अधिक जवळ आले आणि छोटा राजन दाऊदचा विश्वासू साथीदार बनला.

राजन नायरच्या या हत्त्येमुळे राजनच्या टोळीची सर्व सुत्रे राजेंद्र निकाळजेकडे आली आणि गुन्हेगारी जगताला नवा डॉन छोटा राजनच्या रूपाने मिळाला. १९८३ ते १९८८ पर्यंत सुरवातीला छोटा राजन, दाऊद इब्राहिम आणि अरुण गवळी एकत्र व्यवसाय करत होते. या काळात अमली पदार्थांच्या व्यवसायात चांगला मलिदा मिळत असल्याचे एव्हाना या तिघांच्या चांगलेच लक्षात आले होते. या व्यवसायावरुन त्यांच्यात कालातराने मतभेद होऊ लागले. याचे पर्यवसान ज्यात व्हायचे होते त्यातच झाले, या सगळ्यांनी बाभळी पेरल्या होत्या त्याचे काटे त्यांनाच रुतायला सुरुवात झाल्याचे हे चिन्ह होते. दाऊद व गवळी टोळीत धुसफुसत असलेल्या शत्रुत्वातून दाऊदने २२ जानेवारी १९९० ला गवळीचा भाऊ पापा गवळीला उडवून गवळीला मोठा धक्का दिला. पुढे गवळी टोळीच्या राजा जाधवने दाऊदचा खतरनाक गुंड माया डोळसचा सख्खा भाऊ रवींद्र विठ्ठल डोळस याला बोरिवली येथील एकसार रोड येथे उडवून पापाच्या हत्येचा बदला घेतला.

एके काळी गळ्यात गळे घालून बसलेले हे सगळे पैसा आणि सूड या दोन्हीच्या चरकात असे काही पिसून निघू लागले की त्यांनी सर्व सीमा ओलांडल्या. गवळी गॅंगप्रमाणे नव्वदीत नाईक व दाऊद गॅंगमध्येही अधूनमधून खटके उडत होते. त्यातून१ एप्रिल १९९० रोजी सहार विमानतळावर अमर नाईकचा भाऊ व इंजिनिअर असलेल्या अश्विनवर गोल्डन गॅंगच्या बाब्या खोपडे व त्याच्या साथीदारांनी बेछूट गोळीबार केला. मात्र नशीब बलवत्तर असलेला अश्विन यातून सुदैवाने बचावला.

या काळात अरुण गवळीच्या डोक्यात धंदा कमी अन बदला जास्त होता, त्याला दाऊदच्या स्वाभिमानास धक्का बसेल असे काही करून दाखवायचे होते अन त्यातून गवळीच्या डोक्यात एक गेम जन्माला आली. त्याने मोठा हात मारायचे ठरवले अन ते करून दाखवले देखील ! २६ जुलै १९९२ रोजी दाऊदची बहीण हसिना पारकर हिचा पती इब्राहिम पारकर याला गवळीच्या खास माणसांनी,शैलेश हळदणकर व बिपीन शेरे यांनी गोळ्या घातल्या व ते पळून जाऊ लागले. त्यावेळी लोकांनी शैलेश व बिपीनला चांगलेच चोपले. पुढे ते जे. जे. रुग्णालयातील १८ क्रमांकाच्या वॉर्डमध्ये उपचार घेत असताना दाऊद टोळीच्या गुंडांनी एके-४७ रायफलने वॉर्डात अंदाधुंद गोळीबार केला. त्यात शैलेश जागीच ठार झाला, तर बिपीन गंभीर जखमी झाला. हा गोळीबार एवढा भयानक होता, की त्यावेळी पुढे आलेल्या दोन पोलिसांचाही मृत्यू झाला. देशाला हादरविणारी घटना आजही जे. जे. हत्याकांड म्हणून लोकांच्या स्मरणात आहे. हा सीन पुढे अनेक बॉलीवुड सिनेमात इतक्या वेळा वेगवेगळ्या अंदाजात दाखवला गेला की त्याचे अजीर्ण व्हावे !

हे सर्व घडत असताना मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये गुन्हेगार आणि पोलिस यांच्यात एक नेक्सस तयार होत गेला. काही अधिकाऱ्यांनी याचा योग्य वापर केला तर काहींनी गैरवापर केला अन त्याचे परिणाम भोगले ! १९९५ मध्ये पोलीस दलात उपनिरीक्षक म्हणून जुहू पोलिस ठाण्यात रुजू झाल्यानंतर दया नायक हे एन्काऊंटर स्पेशालीस्ट पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या पथकात आले. शर्मा यांच्यासमवेत अनेक चकमकींमध्ये त्यांनी भाग घेतला. यामुळे शर्मा यांच्यासोबत दया नायक हेही चकमकफेम म्हणून ओळखले जाऊ लागले. शर्मा यांच्यापेक्षा त्यांच्या नावाचीच अधिक चर्चा होती. सिनेसृष्टीतील मंडळींशी त्यांची जवळीक होती. कार्यालयातील टेबलवर दोन पिस्तुले ठेवून बसणारे नायक त्यावेळी चर्चेचा विषय झाला होता. परंतु शर्मा यांच्या पथकातून दूर झाल्यानंतर फारशा चकमकीत त्यांनी भाग घेतला नव्हता. दया नायक यांनी तब्बल ८० गँगस्टर्सला नरकाचा रस्ता दाखवला. ९० च्या दशकाच्या शेवटी दया नायक एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून पुढे आले. अंडरवर्ल्ड आणि गुन्हेगारांशी संबंध असल्याच्या आरोपावरुन त्यांना २००६ साली पोलिस सेवेतून निलंबित करण्यात आले होते. मात्र, आरोप सिद्ध न झाल्याने २०१२ मध्ये ते पुन्हा सेवेत दाखल झाले. जानेवारी २०१४ मध्ये त्यांची नागपूरमध्ये बदली करण्यात आली. तर २५ वर्षांच्या पोलिस सेवेत दहशतवाद्यांसह तब्बल १०८ गुन्हेगारांना नरक सदनी धाडणारे पोलिस अधिकारी म्हणून प्रदीप शर्मा यांची ओळख आहे. मुंबई एन्काऊंटर स्कॉडचे प्रदीश शर्मा यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे ३१ ऑगस्ट २००८ रोजी निलंबित करण्यात आलं होतं. १९८३ साली प्रदीप शर्मा पोलीस सेवेत रुजू झाले. महाराष्ट्रात लहानाचे मोठे झालेले प्रदीप शर्मा हे मूळचे आगऱ्याचे. त्यांचे वडील इंग्रजी विषयाचे प्राध्यापक होते. तर १९८३ पोलिस सेवेत रुजू झालेल्या प्रफुल्ल भोसले यांनी बहुतांशी छोटा राजन आणि छोटा शकीलच्या अनेक गुंडांचे एन्काऊंटर केले होते. तर अरुण गवळीच्या टोळीतील अधिकाधिक गुन्हेगारांचा खात्मा विजय साळसकरांनी केला होता. गुन्हेगारी वर्तुळाशी संलग्न राहून ५२ जणांचे एन्काऊंटर रविंद्र आंग्रे यांनी केले होते. हे अधिकारी मुंबई पोलिस दलासाठी अभिमान आणि वादगस्तता यांच्या जाळ्यात काम करत राहिले.

असं करत करत १९९३ साल उजाडले अन मुंबईच्या काळजाला जखमा झाल्या, देश हादरला ! मुंबईत दाऊदने साखळी बॉम्बस्फोट घडवून आणले, शेकडो माणसे कुत्र्याच्या मौतीने मेली. या घटनेचा मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये अनेक पडसाद उमटले.१९९३ मध्ये घडलेल्या बॉम्बस्फोट मालिकांनंतर राजन आणि दाऊद यांच्यातील वैराला हिंदू-मुस्लीम अशा धार्मिक वादाचेही रंग लागले. सूडाने पेटलेल्या राजनच्या टोळीने दाऊदच्या टोळीतील पाच जणांना टिपले आणि नवा डॉन म्हणून छोटा राजनने आपल्या टोळीचे स्वतंत्र अस्तित्व जाहीर केले. याचा बदला घेण्या साठी २००० मध्ये छोटा राजनवर दाऊदच्या हस्तकांनी प्राणघातक हल्ला केला. त्यातून तो बचावला व रुग्णालयात उपचार घेतानाच राजनने पोबारा केला.खरे पाहता मुंबई बॉम्बस्फोटानंतर भारतातून परागंदा झालेल्या दाऊदने इथून जाताना छोटा राजनच्या हाती मुंबईतील गुन्हेगारी साम्राज्याची सूत्रे सोपवली होती. मात्र त्याला शह देण्यासाठी अमर नाईक, दशरथ रहाणे असे दुसरे गुंड उदयाला येत राहिले. या टोळ्यांमधील संघर्ष उफाळला. दाऊद टोळीतही संघर्षांच्या ठिणग्या पडू लागल्या. यातूनच छोटा राजन आणि दाऊद यांच्यात धार्मिक वितुष्टाबरोबरच इलाखाबंदीची बीजे पेरली गेली. दाऊदने कारस्थानाने शिवसेनेचा नगरसेवक खिमबहादूर थापा याची हत्या केली. थापा हा राजनचा विश्वासू होता. सुनील सावंत ऊर्फ सावत्या या दाऊदच्या हस्तकानेच थापाला मारल्याची खबर राजनला लागली. त्यातच, राजनचा आणखी एक साथीदार दाऊदने संपविला. दोघांत समझोत्याचेही प्रयत्न झाले, पण स्वाभिमान दुखावला गेलेल्या छोटा राजनने दाऊदचा प्रस्ताव नाकारून कठोर विरोध पत्करला.

२००० मध्ये बॅकॉकमधल्या हॉटेलमध्ये आपल्यावर दाऊदच्या माणसांनी जीवघेणा हल्ला केला याचे शल्य छोटा राजनला डाचत राहिले, या प्राणघातक हल्ल्यात तो थोडक्यात बचावला होता तरीही त्याने याचा बदला घेण्याचे ठरवून तशी पावले टाकली. या हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेल्या विनोद शेट्टी या हॉटेल व्यवसायिकाचा नंतर छोटा राजनने गेम केला. त्या नंतर तो फरारच राहिला मात्र त्याला भारतीय तपास यंत्रणांचे अभय असल्याचे बोलले जात होते. काही महिन्यांपूर्वी तब्बल दोन दशके फरारी असलेला छोटा राजन अचानक सापडल्याबद्दल आणि इंटरपोलने प्रसिद्धी दिलेल्या छायाचित्रातील आनंदी छोटा राजन पाहून 'अंडरवर्ल्ड'पासून ते डिपार्टमेंटपर्यंत तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

अंडरवर्ल्डचे काळचक्राचे वर्तुळ पूर्ण होणार का पुन्हा नव्या वर्तुळाची सुरुवात होण्याची ही नांदी आहे हे येणारा काळच सांगेल, कारण छोटा राजन जेंव्हा परदेशात ठाण मांडून बसला होता तेंव्हाही त्याच्या डोक्यात एकच किडा वळवळत होता आणि तो म्हणजे दाऊदचा खातमा ! त्याच्या सांगण्यावरून दाऊदला संपवण्यासाठी आपल्या गुप्तचर यंत्रणेने एक जोरदार कट आखला होता. या कटाचा विकी मल्होत्रा व फरीद तनाशा हे एक भाग होते.दाऊदचा गेम वाजवण्यासाठी हे दोघे कराचीत पोहोचले देखील, मात्र दाऊदची फौज छेदणे कठीण असल्याने तो डाव त्यांनी नंतर गुंडाळला होता. दरम्यान छोटा शकील टोळीने थेट ऑस्ट्रेलियात जाऊन छोटा राजनला ठार मारण्याचा कट आखला होता तो देखील आपल्या तपास यंत्रणांच्या सहाय्याने राजनला उधळून लावता आला होता. गुप्तचर यंत्रणेच्या छुप्या पाठिंब्यामुळे छोटा राजन कधी मलेशियात, कधी बँकॉकमध्ये तर गेल्या काही वर्षांत ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया असा वावर ठेवू शकला. मोहन कुमार वा वेगवेगळ्या नावाने पासपोर्ट धारण करणारा छोटा राजन अटक होईपर्यंत कधीच इंटरपोलला आढळून आला नाही आणि अचानक तो बालीमध्ये आढळला याचे आपल्याला आश्चर्य वाटते मात्र दाऊदला ते एक्स्पेक्टेड असेल ! त्याच्या गॅंगने एव्हाना याचे हिशोब कसे आणि कुठे करायचे याचे आडाखे नक्की आखण्यास सुरुवात केली असेल. कदाचित दाऊदला जाळीत पकडण्यासाठी आपल्या तपास यंत्रणांकडून राजनचा बकरा बांधला जाईल अन अंडरवर्ल्डच्या ह्या वर्तुळाचे काय होणार यावरून पडदा हटेल ! आपल्या गुप्तचर यंत्रणा आणि छोटा राजन यांनी खेळलेला हा अखेरचा डाव असेल कारण आता छोटा राजन थकल्याचे दिसतेय अन दाऊदला इतक्यात मोठी रिस्क घ्यायची नाही. याचे प्रतिबिंब म्हणून राजन भारतात येऊन काही महिने लोटले तरी अंडरवर्ल्ड शांतच आहे. या सर्वाचे कारण राजनचा पर्यायाने अंडरवर्ल्डचा अखेरचा डाव काय आहे याची सर्वांनाच अपार उत्कंठा लागून राहिली आहे.....

- समीर गायकवाड .

No comments:

Post a Comment