Thursday, April 28, 2016

चंदेरी दुनियेतील खोटी चमक...मुंबईच्या ओशिवरा भागात लोखंडवालाच्या रस्त्याव भर उन्हात अंगावर टेटू काढलेली तरुणी भीक मागत फिरत होती, तिच्या कपड्यावरून अन चेहरयावरून मात्र ती भिकारी वाटत नव्हती. पंचविशीच्या आसपास असणारी ती तरुणी इंग्लिश, हिंदी आणि भोजपुरीतदेखील बोले. दोन -तीन दिवस लोकांनी तिला रस्त्यावरच पहिले आणि तिला ओळखणारया लोकांनी जेंव्हा जवळून तिला पाहिले तेंव्हा ते नखशिखांत हादरले ! कारण ती नामांकित अभिनेत्री होती...
चंदेरी दुनियेत अपयश आल्यानंतर अनेक कलाकारांचे आयुष्य उद्ध्वस्त होताना बॉलीवूडने पाहिले आहे. असेच भोग नुकतेच पुन्हा एकदा या अभिनेत्रीच्या नशिबी आले आहेत. मिताली शर्मा हे तिचे नाव. तिचे रूप आणि अवतार पाहून लोक तिला भीक देईनात तेंव्हा तिने चोरी केली. मिताली चोरी करताना पकडली गेली कारण ती काही सराईत चोर नव्हती. भीक मागताना -चोरी करणे या आरोपावरून आता पोलिसांनी तिला अटक केलीय. तिला ओळखीच्या लोकांनी पाहिल्यावर घरी नेण्याचा प्रयत्न केला होता मात्र ते यशस्वी झाले नाहीत कारण तिची खचून गेलेली मनोवस्था ! यातच कुटुंबीयांनी तिची साथ सोडल्याचे या परिचीतांच्या ध्यानी आले.

मिताली शर्मा ही मूळ दिल्लीची . तिने अनेक भोजपुरी चित्रपट आणि मालिकांत काम केले आहे. भोजपुरीतील ती एके काळची नामांकीत अभिनेत्री. तसेच तिने अनेक नामांकित ब्रँडसाठी मॉडेलिंगही केले आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून तिला काम मिळाले नाही. त्यामुळे तिला प्रचंड आर्थिक समस्येला सामोरे जावे लागले. शिवाय तिला व्यसन असल्याने जवळ असलेले पैसेही लगेच संपून गेले. त्यानंतर तिने रस्त्यावर भीक मागणे सुरू केले. अन तिचे दुर्दैवाचे दशावतार सुरु झाले, तिच्या अब्रूची लक्तरे थेट रस्त्यावर टांगली गेली.

पोलिसांनी तिला ताब्यात घेतल्यावर तिने कथन केलेली कहाणी ऐकून पोलिसही चक्रावून गेले. मितालीने गेल्या काही दिवसांपासून काहीही खाल्लेले नव्हते. तिला प्रचंड भुक लागली होती. पोलिसांनी पकडले तेव्हा तिने प्रथम अन्नाची मागणी केली. तिची स्थिती बघता ती गेल्या दोन-तीन दिवसांपासून रस्त्यावर भटकत असल्याचे दिसते. मुंबईत ती एकटीच राहत असल्याचे समोर आले आहे.

एका अभिनेत्रीची आणखी दुर्दशा होऊ नये या हेतूने पोलिसांनी तिला मानसिक उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलेय. आता पोलिस तिच्या कुटुंबीयांचा शोध घेत आहेत. चित्रपटांमध्ये काम करण्यास तिच्या कुटुंबीयांचा विरोध होता. त्यामुळे ती घरुन पळून आली होती. पण तिला अपेक्षित यश मिळाले नाही. तिच्या कुटुंबीयांनी तिच्यासोबत असलेले नाते तोडले आहे. तिच्या घरची जरी दर्दभरी कहानी असली तरी तिला आता मानसिक आधाराची आत्यंतिक निकड आहे. झालेगेले विसरून तिच्या कुटुंबीयांनी पुढे यावे म्हणून पोलीस प्रयत्न करताहेत त्यांना यश आले तर एका फुलाचे अकाली कोमेजणे नक्कीच वाचेल !

मितालीप्रमाणेच एकेकाळी मॉडेल गीतांजली नागपाल ड्रगच्या व्यसनामुळे भिकारी झाली होती. अशाच अवस्थेत ती रस्त्यावर मृत आढळली होती. गीतांजलीला ग्लॅमरने वेढले होते. मात्र ती चुकीच्या दिशेने जात असल्याचे तिला लक्षात येत नव्हते. तिने ड्रगसाठी मोलकरणीचेसुध्दा काम केले. 'फॅशन' सिनेमा गीतांजलीच्या आयुष्याने प्रेरित होता. मितालीची गीतांजली होऊ नये म्हणून तिच्या कुटुंबीयांनी अन समाजाने पुढे व्हावे लागेलच...

मुंबईच्या ग्लॅमरस दुनियेमागचा हा दाहक काळा चेहरा बघितला की अस्वस्थ वाटू लागते अन खोट्या चंदेरी दुनियेतला मायावी झगमगाट अनुभवण्यापेक्षा आपले समई निरंजनाचे शीतल शांत उजेड कितीतरी दिलासादायक अन जीवनदायी वाटतात....

- समीर गायकवाड.

( छायाचित्रात डावीकडे मिताली अन उजवीकडे गीतांजली)