Saturday, April 23, 2016

बाभळीचा डाव …


दूर आडरानी एक वस्तीचा ठाव ,जिथे काळजात बाभळीचा डाव
उगवे सूर्य संगट पोटाचा सवाल, हाता फुटत पारंब्या लाखलाल

काटेरी जू माणसाच्या मानेवर , जित्तेपणीचं जणू मुकं कलेवर
खपाटीचे पोट बरगड्या बाहेर , डोळ्याची विहीर माथा सैरभैर

वारा खुनशी फिरे शेतशिवारातून, काळ्या मातीस आधण आंतून
करपल्या पानी किडे चिटकून, पाल फिरे कोरडया जात्यातून

खोपटात टांगे छिललेले प्राक्तन , झाडा लटकत वाघळे बेभान
वाटे उन्हास दयावे सुळी छिन्न, भकास चुलीत मुंडके चिरून

पाहता जित्राबा श्वासा येई बळ, खाऊनि आतड्यास लागे कळ
का रे देवा दिलास भुकेचा जाळ, मारुनी काळा जगे भुईचा हा बाळ …. 

- समीर गायकवाड.