Sunday, April 3, 2016

रिअललाईफ मध्ये 'नटसम्राट' जगलेला माणूस - जनार्दन परब....


ठाण्याच्या प्लॅटफॉर्म नं. २ च्या ओसंडून वाहणाऱ्या गर्दीमध्ये ते एकटेच उभे होते... आपल्याच विचारात... ना गर्दीचं त्यांच्याकडे लक्ष, ना त्यांचं गर्दीतल्या कुणाकडे. ‘नमस्कार परबदादा’ म्हटल्यावर ते भानावर आले. भरदार पांढरी मिशी, तुळतुळीत टक्कल फिकट निळ्या रंगाचा अर्ध्या बाह्यांचा खादीचा सदरा, किरमिजी रंगाची पँट, खांद्यावर बऱ्यापैकी जड काळ्या रंगाची बॅग, पायात साध्याशा चपला...खोल आवाजात नमस्काराचा प्रतिसाद..

‘क्रांतिवीर’ चित्रपटातील ‘उजडेचमन’ही भूमिका साकारणाऱ्या जनार्दन परबांना पाहताच नाना आणि त्यांचा तो ‘बता ये किसका खून है? इसमें हिंदू का कौनसा और मुसलमान का कौनसा?’ हा गाजलेला मेलोड्रॅमॅटिक सीन झर्रकन डोळ्यां पुढे सरकून गेला.


ओळख झाल्यावर जवळच्याच एकाहॉटेलात पोहोचलो. हातानेच खुणा करूनहल्ली बोलताना आणि चालताना दम लागतो, असे सांगून काही क्षण ते शांत बसून राहिले. पाणी पिऊन झाल्यावर हॉटेलच्या आढ्याकडे पाहात म्हणाले, ‘माझ्याकडे काय काम काढलंत? हल्ली कुणालाच आमची आठवण होत नाही.’ ‘काहीही नाही, सहज. नवीन काय सुरू आहे?’ या माझ्या प्रश्नावर उसासा सोडत परबदादांनी, ‘झी’ मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाची आठवण सांगितली. म्हणाले, ‘त्या कार्यक्रमात मी दिसलो आणि अनेकांना धक्का बसला. कारण मी ढगात गेलो, अशीच अनेकांनी इतरांची समजूत करून दिली होती. तेव्हाही मी हेच म्हणालो होतो की, माझा स्ट्रगल मी जिवंत आहे, हे सांगण्यासाठी सुरू आहे...’

शंभर टक्के कोकणी व्यक्तिमत्त्व शोभणारे परबदादांचे वडील गिरणीत काम करीत असताना दशावतारी नट होते. हीच आवड परबांनी विल्सन महाविद्यालयातून पदवीधर होताना जोपासली आणि हळूहळू मराठी रंगभूमी-चित्रपटांतून ते भूमिका साकारू लागले. महिंद्रा युजिन्समधील नोकरी आणि अभिनय ही कसरत बरीच वर्षे यशस्वीरीत्या सांभाळली... विजयाबाई मेहतांसारख्या दिग्गज दिग्दर्शकांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करताना परब म्हणाले, विजयाबाईंनी केलेल्या ‘अजब न्याय वर्तुळाचा’ या नाटकामुळे माझ्यासारख्या छोट्या अभिनेत्याला ओळख दिली. भारतातील हे पहिले नाटक जे भारताच्या सीमा ओलांडून जर्मन, इग्लंड या देशांमध्ये सादर करण्यात आले. या नाटकामध्ये मला वेगवेगळ्या प्रकारच्या सहा भूमिका साकारण्यास मिळाल्या होत्या.

अशोक सराफ, नाना पाटेकर यांच्यासोबत ‘मुद्राराक्षस’, ‘अभिज्ञान शाकुंतलम’मध्ये भूमिका साकारणारे जनार्दन परब काही क्षण भूतकाळात रमले. काशिनाथ घाणेकर वगळतामराठी रंगभूमी किंवा चित्रपटातील सर्व आघाडीच्या कलाकारांसोबत काम करण्याचे भाग्य मला लाभले आहे, असे ते म्हणाले. मात्र, ऐन उमेदीत असताना पत्नीचा मृत्यू आणि त्यानंतर आलेले आजारपण परबांना आयुष्याची खरी ओळख देऊन गेले.

२००२ मध्ये जनार्दन परब यांना अर्धांगवायूचा झटका आला. याचकाळात ते मुंबई सोडून आपल्या गावी निघून गेले. एकटेच देवघरात बसून असायचे. स्वत:शीच संवाद चालायचा. गतआयुष्याची उजळणी व्हायची. या सहा वर्षांच्या अज्ञातवासात शरीराने अधू असले तरीही जात्याच तैलबुद्धीच्या परबांनी ‘देवाक काळजी आसा’ या मालवणी-मराठी चित्रपटाची कथा लिहिली. सामान्य माणसाच्या मनात असलेल्या परमेश्वर या संकल्पनेवर भाष्य करणारा हा चित्रपट असल्याचे परब सांगतात. तर ‘वयल्याची तुटली दोरी, खायलो बोंब मारी’या नाटकात कोकणातील देव-देवस्कीवर भाष्य केले आहे.

वयाच्या सत्तरीत असलेल्या या अभिनेत्याला ‘अजब न्याय वर्तुळाचा’ या ब्रेख्तियन थिअरीवर आधारित नाटकातील अनुभवातून जावे लागत आहे. रक्ताच्या नात्यांपेक्षा जपणूक केलेली नाती अधिक घट्ट असतात, हे वास्तव परब प्रत्येक क्षणी अनुभवत आहेत. आयुष्यात एक क्षण असा आला की, नात्यांत आलेल्या कटुतेमुळे परब यांच्यावर स्वत:च्या मालकीच्या घरातून बाहेर पडण्याची वेळ ओढवली, हक्काचं छप्पर सोडावं लागलं. तेव्हा खरं तर काही क्षण त्यांनी ‘अप्पाबेलवलकरांची’च वेदना जणू अनुभवली...

नाट्यपरिषदेचे अध्यक्ष असताना मोहन जोशी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने गोव्याला चालले होते, परंतु वाटेत आवर्जून कणकवलीस थांबले. परबांचं घर शोधलं. सपत्निक घरी जाऊन तातडीची मदत म्हणून त्यांनी पंचवीस हजार रुपये देऊन परबांना मुंबईला येण्यास विनवले. सध्या जोगेश्वरीला बहिणीकडे राहात असलेले परब म्हणतात, जीवनातील ही सुद्धाएक मजा आहे, सत्याला सामोरे जाताना हसतहसत जायलाच हवे. मी तर एक सामान्य माणूस आहे. आंधळे प्रेम आणि माझे संस्कार कदाचित कमी पडले असावेत... असे जेव्हा ते म्हणतात, तेव्हा मनोमन त्यांनी एकटेपणाचा स्वीकार केल्याचेही जाणवते. अर्थात, एकटेपणातही स्वाभिमानी आयुष्य जगण्याचा आग्रह धरणारे जनार्दन परब शूटिंगच्या निमित्ताने आजही सकाळची साडेसहाची शिफ्ट करण्यासाठी पहाटे साडेचारला घर सोडतात...

मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ रंगकर्मी जनार्दन परब यांचे आज शनिवारी सकाळी हृदयविकाराने मुंबईत निधन झाले. आजच दुपारी जोगेश्वरीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.  मराठी रंगभूमी आणि चंदेरी पडद्यावर जनार्दन परब यांनी एक गाळ गाजविला. त्यांनी केलेल्या भूमिका आजही जुन्या प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. तब्बल ४०  वर्षाहून अधिक काळ त्यांनी मराठी रंगभूमीची सेवा केली. जनार्दन परब यांनी आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले. त्यांच्या निधनाच्या दोन महिन्यांपूर्वीच पत्रकार विकास नाईक यांनी त्यांची भेट घेतली होती. त्या भेटीदरम्यान परब यांनी त्यांचा जगण्याचा संघर्ष कसा सुरु आहे, याविषयी भाष्य केले होते. त्या आठवणींना उजाळा देणारा हा लेख दोनेक महिन्यांपूर्वीचा आहे...

संघर्षमय जीवन जगलेल्या जनार्दन परबांना शेवटच्या क्षणी काय वाटले असेल याची कल्पना करवत नाही ..ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती  देवो ....

- समीर गायकवाड .