Wednesday, April 13, 2016

जालियानवाला बाग, ब्रिटीश राज्यकर्ते आणि आपण....


आज १३ एप्रिल. ९७ वर्षंपूर्वी याच दिवशी जालियनवाला बाग येथे अमानुष नरसंहार घडला होता आणि आज ब्रिटनचा राजकुमार विल्यम्स आणि त्याची पत्नी केट मिडलटन भारतात अधिकृत दौऱ्यावर आहेत. हा विल्यम्स कुठे शिंकला इथेपासून त्याच्या बायकोने कुठले नेलपेंट लावले आहे इथपर्यंतच्या बाळबोध बातम्या आपल्या मिडीयात अत्यंत चढाओढीने दिल्या जात आहेत आणि बिनडोक पब्लिक मिटक्या मारत या बातम्या बघतेय ! काय म्हणावं या दैवदुर्विलासाला ?


२१ फेब्रुवारी २०१३ रोजी ब्रिटिश राजवटीत १९१९ मध्ये झालेल्या जालियनवाला बाग हत्याकांडानंतर भेट देणारे डेव्हिड कॅमेरॉन ब्रिटनचे पहिले पंतप्रधान होते. त्यांनी या स्थळाला भेट दिली होती. या वेळी कॅमेरॉन यांनी स्मारकाच्या ठिकाणी गुडघे टेकून शहिदांना अभिवादन करून प्रार्थना केली होती. जालियनवाला बाग स्मारकाच्या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण करून अमर ज्योती स्मारकासमोर ते काही वेळ नतमस्तक उभे राहिले होते. स्मारकातील नोंदवहीत संदेश देताना कॅमेरॉन यांनी लिहिलंय की, "ब्रिटिश इतिहासातील ही अतिशय लज्जास्पद घटना आहे. विन्स्टन चर्चिल यांनी ही घटना राक्षसी असल्याचे वर्णन केले होते. इथे जे घडले ते विसरण्यासारखे नाही. ब्रिटन नेहमीच जगभरातील शांततापूर्ण निदर्शकांच्या हक्काच्या बाजूने उभे राहील.'....मात्र या हत्याकांडाबद्दल जाहीरपणे माफी मात्र त्यांनी मागितली नव्हती.


ब्रिटीश राजघराण्याच्या वतीनेही कधी या घटनेवर माफीचे भाष्य केले गेले नाही तरीही आपली लाळघोटेपणाची अन रक्तात भिनलेल्या गुलामगिरीची सवय काही जात नाही ! आपला कुठचाही राज्यकर्ता ( यात कुठलाही पक्ष अपवाद नाही हे विशेष !) यावर ब्रिटीश राज्यकर्त्यांना ठणकावून बोलू शकला नाही हे आपले बोटचेपे नेतृत्व ! आपला हा इतिहास पूर्वीपासूनचा असा राहिला आहे...विशेष म्हणजे जालियनवाला हत्याकांडाबद्दल कॅमेरॉन माफी मागावी, अशी मागणी तेंव्हा जालियनवाला बाग शहीद परिवार समितीने केली होती. यामुळे शहिदांच्या कुटुंबीयांच्या दु:खावर फुंकर बसेल, तसेच ब्रिटिश जनरलकडून घडलेल्या या निर्घृण हत्याकांडाचा निषेध होईल, असे समितीने म्हटले होते


आज तोच दिवस आहे आणि ब्रिटीश युवराज भारतात आहे, राष्ट्रवादाच्या नावाने गळा काढून रडणारया एकाही संघटनेने वा व्यक्तीने आजच्या दिवशी ब्रिटीश युवराजाने जालियानवाला बाग हत्याकांडप्रकरणी किमान निषेधाचे तरी भाष्य करावे म्हणून कुठे दबाव टाकल्याचे माझ्या तरी वाचनात आलेले नाही..

आजच्या पिढीला इतिहासाच्या आवडीचे किती दुर्भिक्ष्य आहे हे अधूनमधून स्पष्ट होत असते, प्रत्येक भारतीयांस माहित असावी अशी काळजावर कायमची जखम करून गेलेली अशी ही घटना होती. आज तिचे मोठ्या प्रमाणात स्मरण देखील होत नाही तिथे आणखी वेगळे काय घडणार ?

आज १३ एप्रिल. ९७ वर्षंपूर्वी याच दिवशी १९१९ मध्ये पंजाबातील अमृतसरमधील जालियनवाला बाग येथे अमानुष नरसंहार घडला होता. बैसाखी मेळ्यानिमित्त जमलेल्या हजारो निरपराध नागरीकांवर मायकेल ओडवायर व डायर यांच्या अधिपत्याखालील शिपायांच्या तुकडीने गोळयांच्या १६५० हून अधिक फैरी झाडत ३७९ माणसे ठार केली तर हजाराहुन अधिक जखमी केली. मृतांचा आकडा अधिक असल्याचा अनेक ठिकाणी उल्लेख आहे. नि:शस्त्र नागरिकांना कोंडीत गाठुन असहाय्य अवस्थेत टिपुन मारण्यात आले. अनेक जण जीव वाचविण्यासाठी विहिरीकडे धावले तर अनेकांनी भिंती चढुन जाण्याचा प्रयत्न केला. पण परिणाम एकच - मरण. या नरसंहाराबद्दल कुणाला ना खेद ना खंत. डायरने तर उद्दाम पणे विधान केले की त्याला याबद्दल कसलाही खेद होत नाही, गोळ्या संपल्यामुळे त्याचा नाईलाज झाला अन्यथा आणखी माणसे मारण्याने त्याला फरक पडत नव्हता. आपल्या विरुद्ध डोके वर काढणार्‍याला काय शासन होते हे दाखवुन देण्यासाठी हे भयानक कृत्य इंग्रज सरकारच्या अधिकार्‍यांनी केले. पुढे इंग्लंडला परत गेल्यावर 'सुसंस्कृत व लोकशाहीच्या पुरस्कर्त्या' इंग्लिश नागरिकांनी ओडवायरचा सत्कार केला व २०,००० पौंडांची थैली त्याला त्याच्या दैदिप्यमान कामगिरीबद्दल दिली.


मात्र जवळपास दोन दशकांच्या प्रतिक्षेनंतर हुतात्मा उधमसिंह यांनी इंग्लंडमध्ये जाऊन नराधम ओडवायरला कंठस्नान घातले व या अत्याचाराचा प्रतिशोध घेतला. अनेकदा संधी असतानाही शस्त्र न चालविता अखेर हुतात्मा उधमसिंह यांनी ओडवायरला भरसभेत यमसदनास धाडले व देशातील अस्मिता व जनतेच्या अंगातील रग अजुन संपली नसल्याचे दाखवुन दिले. हुतात्मा उधमसिंह अभिमानाने व कर्तव्यपूर्तीच्या समाधानात पेंटनविले तुरुंगात फाशी गेले. पुढे अनेक देशाभिमानी भारतीयांच्या प्रयत्नांती हुतात्मा उधमसिंहांचे अवशेष १९७४ साली भारतात आणले गेले व सुनाम या त्यांच्या जन्मग्रामी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि त्यांच्या अस्थी सतलज नदीत विसर्जित करण्यात आल्या.


जालियनवाला बाग नरसंहारात बळी पडलेल्या नागरिकांना या घटनेच्या ९७ व्या स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली. ब्रिटीश युवराजांचे तळवे चाटणारया भारतीय मिडीयाने आणि बधीर राज्यकर्त्यांनी ब्रिटीश युवराजांवर दडपण आणावे इतके काम जरी केले तरी हुतात्म्यांच्या आत्म्यांना थोडेसे समाधान तरी लाभेल....


- समीर गायकवाड.