Tuesday, April 12, 2016

लॉरेन्स ओलिव्हीयेचे सिनेमॅजिक...


किशोरवयात इंग्रजी सिनेमे पाहण्याचे वेड का लागले सांगता येत नाही मात्र हे चित्रपट पाहून आलं की काही दिवस डोकं त्यातच गुंतून पडलेलं असे. ४५ पैसे किंवा ८५ पैशाचे मॉर्निंग शोचे तिकीट काढले तरी काम भागत असे. सिनेमांची आवड समृद्ध करण्यात इंग्रजी सिनेमांनी मोलाचा हातभार लावला. एमजीएमचा आयाळवाला सिंह पडद्यावर येऊन डरकाळी फोडायचा तेंव्हा अगदी भारी वाटायचे. ००७ ची नशा काही और असायची. तर हिचकॉकचे सिनेमे डोक्यात गच्च रुतून बसत.शेरलॉक होम्सची मजाही काही और होती. युद्धपट पाहताना चित्त थारयावर नसे. अनेक जुन्या इंग्रजी नटांचे ते सिनेमे आता पाहताना मन हरखून जाते. फ्रेंक सिनात्रा, मायकेल केन, ख्रिस्तोफर ली, फ्रेंक मॉर्गन, जीन हेकमेन, डेव्हीड निवेन, ग्रेगरी पेक, रॉजर मूर, चार्ल्स हेस्टन,एन्थोनी हाफकिन्स, लॉरेन्स ऑलिव्हिये, रिचर्ड बर्टन, रेक्स हॅरिसन, सोफिया लॉरेन्स, मार्सेलो मॅस्त्रीयानी, मार्लन ब्रेन्डो, ओमर शरीफ, स्पेन्सर ट्रेसी, ग्रेटा गार्बो, केथरीन हेपबर्न अशी अनेक नावे सांगता येतील, ज्यांनी मनावर अधिराज्य केले. कल्पना, कला, शारदा,सेन्ट्रल आणि चित्रमंदिर या थियेटरमध्ये हे सिनेमे प्रामुख्याने मॉर्निंगला असत. या साऱ्या मांदियाळीत एक नाव होते लॉरेन्स ओलिव्हीयेचे.

लॉरेन्स ओलिव्हीयेचे बरेचसे सिनेमे पाहण्यात आले कारण त्याकाळी त्यांचे सिनेमे हॉलीवूडमध्ये दणकेबाज गल्ला गोळा करत. तिकडे सिनेमे हिट झाले की इकडे काही महिन्यांनी, कधी कधी वर्षाने तो सिनेमा यायचाच ! किंग लिअर, ए ब्रिज टू फार, हेम्लेट, रोमिओ & ज्युलीएट, ऑथेल्लो,स्पार्टाकस, रिबेका,मेराथोन मेन, स्लेथ, द एन्टरटेनर, जीग्सॉ मेन, द मर्चंट ऑफ व्हेनिस, द बॉयीज फ्रॉम ब्राझील, द बाउंटी, क्लाश ऑफ टायटन्स हे त्याचे लक्षात राहिलेले सिनेमे. तब्बल १२ वेळा ऑस्कर नॉमिनेशन मिळवणारया लॉरेन्सने ऑस्करच्या दोन पुतळ्यांवर अभिनयाच्या जोरावर नाव कोरले. त्याला लाईफ टाईम अचिव्हमेंटसाठीही ऑस्कर मिळाले होते. पाच एमी, तीन गोल्डन ग्लोब आणि BAFTAचा पुरस्कार त्याला मिळाले होते. कमी वयात सर पदवी मिळवणारा तो पहिला अभिनेता होता. त्याला ब्रिटीश संसदेने 'बेरॉन ओलिव्हीये ऑफ ब्रिटन' हा बहुमान देऊन हाऊस ऑफ लॉर्डस या सभागृहाचे सदस्यत्व बहाल केले होते. अमेरिकन फिल्म इंस्टीट्युटने ऑल टाईम ग्रेट अभिनेत्यांच्या यादीत १४ व्या क्रमांकावर स्थान दिले आहे. लॉरेन्स ओलिव्हीयेने लीड रोल केलेल्या सिनेमाबद्दल खूप लोकांनी खूप काही लिहिले आहे.लॉरेन्सचे मेरेलिन मन्रोसोबतचे संबंधही लोकांनी चवीने चघळले होते.

लॉरेन्सच्या सर्व सिनेमात विविधता होती. त्याचा 'ए ब्रिज.. ' हा माझ्या आवडत्या सिनेमापैकी एक ! युनायटेड आर्टिस्टने १९७७ मध्ये रिलीज केलेल्या 'ए ब्रिज टू फार' या सिनेमात एक नव्हे दोन नव्हे तर चौदा सुपरस्टार होते ! रिचर्ड अटेनबरो ('गांधी'वाले) यांनी आपल्या अप्रतिम दिग्दर्शन कौशल्याने या सिनेमाला कळस चढवला होता. डर्क बोगार्ड, जेम्स कान, मायकेल केन, शोन कॉनरी, एन्थोनी हाफकीन्स, लॉरेन्स, जीन हेकमेन,हार्डी क्रुगर आणि रॉबर्ट रेडफोर्ड यांच्या भूमिका मोठ्या होत्या. दुसऱ्या महायुद्धातल्या 'ऑपरेशन मार्केट गार्डन'वर हा सिनेमा आधारित होता. जर्मन सीमांत घुसखोरी करून दोस्तराष्ट्रांनी व्याप्त हॉलंडमधील अर्न्हेमच्या पुलासह अनेक पूल ताब्यात घेऊन जर्मन बचावफौजांना भेदून त्यांना १९४४ च्या ख्रिसमसपर्यंत घेरायचे अशी ही योजना असते. मात्र ही योजना अपयशी ठरते अन एक जबरदस्त युद्धनाट्य तिथे रंगत जाते. मोहीम ठरवल्या पद्धतीने पूर्ण होत नाही मात्र तिचा हेतू पूर्णत्वास जातो. या मोहिमेचे शिल्पकार बर्नार्ड मोंटगोमेरी यांनी ब्रिटीश लेफ्टनंट जनरल फ्रेडरिक ब्राउनिंग यांना उद्देशून 'आपण ब्रिज पासून अजून खूप दूर आहोत !' असे उद्गार काढले होते. इथल्या त्यांच्या उद्गारात ब्रिज हा शब्द त्यांच्या ध्येयासाठी वापरला होता. म्हणून या सिनेमाचे नाव देखील 'ए ब्रिज टू फार' असं होतं. इथं त्याबद्दल फारसं लिहिण्यापेक्षा ही एक पाहण्याची अनुभूती आहे इतकंच सांगतो. ज्यांनी हा सिनेमा पाहिला नसेल त्यांनी आवर्जून पाहावा. एक अप्रतिम युद्धपट इतकीच याची व्याख्या नसून हॉलीवूडमधील १४ दिग्गज एका सिनेमात पाहण्याची ही एकमेवद्वितीय जुगलबंदी आहे ! एकाहून एक सरस सीन्सने भरलेला हा सिनेमा उत्कृष्ट सिनेमेटोग्राफीचं देखणं उदाहरण ठरावा…

हे सर्व आज लिहिण्यामागचे प्रयोजन लिहायचेच राहून गेले. आज लॉरेन्स ऑफ ओलिव्हीयेचा जन्मदिवस आहे. लॉरेन्स एका प्रीस्टचा लाडका पण शिस्तप्रिय मुलगा. शाळकरी वयात असताना त्याला शेक्सपिअरीयन नाटकांनी वेड लावले अन वयाच्या पंधराव्या वर्षी त्याने पहिले रंगभूमीवर पदार्पण केले. नाटक करत करत तो बर्मिगहेम रिपोर्टरी कंपनीत रुजू झाला. या दरम्यान त्याला 'ब्रॉडवे'वर आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळाली, एएफआयसाठीही त्याने काम केले. 'येलो टीकीट' या सिनेमाने त्याला हॉलीवूडचे तिकीट मिळवून दिले अन त्याच्या अभिनयाचे उत्तुंग अविष्कार तिथं घडत गेले. त्यानंतर आलेला 'फायर ओव्हर इंग्लंड' त्याला हॉट इमेज देऊन गेला अन या कळात त्याचे विव्हियन ले बरोबरचे अफेअर खूप चर्चिले गेले. त्याने तिच्याशी लग्न केले. तिच्याबरोबर त्याचा संसार दहा वर्षेच चालला, त्याने एकूण तीन लग्ने केली. दुसरं लग्न वीस वर्षे टिकलं तर त्याची तिसरी पत्नी जोन प्लोराईट हिच्याशी त्याने अखेरपर्यंत साथ निभावली. एक दशकापेक्षाही अधिक काळ त्याने कर्करोगाशी यशस्वी लढा दिला अन त्या दरम्यानही आपले काम सुरु ठेवले. १९८८ मधल्या वॉर रिक्विममध्ये त्याचे रुपेरी पडद्यावर अखेरचे दर्शन झाले व १९८९ मध्ये तो इहलोक सोडून गेला. १९३०च्या द टेम्पररी विडो पासून ते १९८८ च्या वॉर रिक्विमच्या त्याच्या मनोरंजक सफरीत ५८ वर्षांचा मोठा स्पेस आहे. त्या कालबंधातच कुठे तरी माझ्या किशोरवयीन आठवणींचे अणुरेणु विखुरले आहेत याचे एक आगळेच समाधान आहे ….

- समीर गायकवाड.
(लेखातील माहिती जालावरून संकलित केलेली आहे)