Wednesday, March 30, 2016

येणाऱ्या पिढीचा भारत ......?आपल्या देशांत मागील दोन चार वर्षांपासून एक नवा प्रघात अगदी जोमात सुरु झालाय. देशभरात कुठेही एखादा गुन्हा घडला मग तो किरकोळ चोरी - शिवीगाळ असेल वा दरोडा, खून ,बलात्कार असा गंभीर गुन्हा असला तरी काही भामट्या लोकांची टोळी त्या आरोपींचा जातधर्म आधी पाहते. त्यानंतर सोशल मिडीयावर त्याचे अतिरंजित आणि भडक वर्णन येऊ लागते. वाचणारयाचे माथे भडकावे असे मजकूर त्यात असतात. कालांतराने त्यातली हवा निघून जाते मग दुसरा गुन्हा हाती लागतो त्याचे कोलीत बनवून दुसरी टोळी कामाला लागते. हा प्रकार दोन्ही बाजूकडून अव्याहतपणे सुरु असतो. आजकाल याची व्याप्ती सर्वसमावेशक अशी झालीय.
उत्तर प्रदेशातील दादरीमधील बिसाहडा इथे अखलाख मुहंमद या इसमाची गोमांस ठेवल्याच्या संशयावरून हत्त्या झाली तेंव्हा हिंदुत्ववादी बचावाच्या पवित्र्यात होते अन एक गट याला जमेल तेव्हढी हवा देत होता.
या नंतर काही दिवसांतच मंगलोर मधील गोरक्षकदलाचे काम पाहणारया प्रशांत पुजारी याची गोळ्या घालून हत्त्या करण्यात आली यावेळी हिंदुत्ववाद्यांना चेव चढला होता तर धर्मनिरपेक्ष म्हणवून घेणारा गट शांत राहिला होता.

अखलाख मुहंमद याच्या हत्येचा निषेध करणारया लोकांपैकी अनेकांनी प्रशांत पुजारीच्या हत्येचा निषेध केला नाही तर प्रशांत पुजारीच्या हत्येचा निषेध करणाऱ्या लोकांपैकी खूप कमी लोकांनी अखलाखच्या हत्येचा निषेध केला होता!
बहुतांश हिंदू जे पुजारीच्या हत्येच्या वेळेस संतापले होते तेंव्हा त्यांना अखलाखच्या मृत्यूचा संताप का आला नाही ? ज्यांनी अखलाख मेला तेंव्हा अश्रू ढाळले त्यांनी प्रशांत पुजारी मेल्यावर शोक का व्यक्त केला नाही ?

याला काही लोक अपवाद आहेत ज्यांनी ह्या दोन्ही घटनांचा निषेध केला होता पण त्यांचे प्रमाण कमी आहे अन ही बाब देशातील विविधतेत एकता या सूत्रातील वीण उसवणारी आहे.

काही दिवसांपूर्वी दिल्लीतील डॉक्टर विकास नारंग यांची किरकोळ वादावादीतून निर्घृण हत्त्या झाली तेंव्हा इतक्या मोठ्या प्रमाणात सोशल मिडीयावर अनेक गट सक्रीय झाले. त्यांनी अनेक अफवा पसरविल्या जणू काही दिल्लीत आता धर्मयुद्ध होणार आहे की काय अशी स्थिती निर्माण केली गेली, यात झी न्यूज सारख्या नामवंत वाहिनीचा समावेश आहे! नारंग यांची हत्या घडल्यानन्तर अतिरिक्त डीसीपी मोनिका भारद्वाज यांनी सांगितले की हत्त्येच्या आरोपाखाली पकडल्या गेलेल्या ९ आरोपीपैंकी ५ हिंदू आहेत अन ४ मुस्लिम आहेत. शिवाय या ९ पैकी ४ जन अल्पवयीन आहेत. या ९ जणात एकही बांग्लादेशी नाही. दिल्ली पोलीस केंद्रसरकारच्या अखत्यारीत येते म्हणून या तपशिलाविरुद्ध फारसा आवाज उठला नाही तरीही अनेक महाभागांनी मोनीका भारद्वाज यांच्या ट्विटर अकौंटवर जाऊन शिव्यांची लाखोली वाहिली ! मात्र या काळात ज्यांनी धार्मिक विखारी जहर सोशल मिडीयावर पसरवले त्यांचे काय करायचे ? त्यांना जरा लाज वाटायला हवी की आपण काय लिहितो, काय वाचतो आणि काय फोरवर्ड करतो याचे भान असायला हवे...इतके होऊनही डॉक्टर नारंग यांच्या कुटुंबियांच्या वतीने त्यांच्या भाच्याने दिलेली प्रतिक्रिया हिंदुत्ववादी धर्माध लोकांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे...

आता दिल्लीतच काल एक घटना घडलीय, यांत मदरशात शिक्षण घेणाऱ्या ३ मुस्लीम युवकांना काही मुलांच्या जमावाने जबर मारहाण केलीय. हा वाद देखील डॉक्टर नारंग यांच्या हत्येप्रमाणेच क्रिकेटच्या चेंडूवरून सुरु झाला होता हे विशेष ! मात्र या मुलांना मारहाण करण्यापूर्वी जय माता दी म्हणण्याची जबरदस्ती करण्यात आली होती असं दिल्ली पोलिसांच्या एफआयआर मध्ये म्हटले गेलेय. मात्र या मुलांनी प्रसिद्धीमाध्यमांत असं सांगितलं की आम्हाला भारत माता की जय म्हण असं सांगत मारहाण केलीय. आपल्या टोळक्यांच्या जोरावर दोन भिन्न धर्माच्या व्यक्तीमधील मारहाणीस हवा द्यायची अन त्याला धार्मिक रंगाचा विखार चढवायचा हा आता नित्य प्रघात झाला आहे...

या काही घटना आहेत ज्या मनाला बेचैन करून जातात. या लोकांना धार्मिक सलोखा आपसी सामंजस्य नष्ट करायचे आहे, त्यासाठी ते वारंवार अशा घटनांच्या शोधात असतात. मात्र या दुष्टचक्रात इतर सामान्य माणसे गुरफटतात. या सर्वांचा परिणाम असा होऊ लागला आहे की बहुतांश लोक मनातील धार्मिक कडवटतेमुळे एकमेकाकडे संशयाने पाहू लागले आहेत....

मात्र अजूनही सारे संपले नाही, अजूनही आपली विविधतेतील एकता टिकून राहू शकते त्यासाठी हवीय निष्पक्ष निरपेक्ष वृत्ती !

माणसाने आधी हिंदू असू नये, आधी मुसलमान असू नये, आधी शीख वा ख्रिश्चन असू नये तर आधी त्याने भारतीय असावे. प्रत्येकाने आपला धर्म आपल्या घराच्या उंबरठ्याच्याआड ठेवला तरी हा सारा मामला सहज सुटू शकतो. पण हे करणार कोण कारण जवळजवळ सर्वच राजकीय पक्षांना या धार्मिक टोळ्या हव्यात कारण धर्मांधतेच्या तव्यावर राजकीय पोळी सहज शेकता येते, लोकभावना सहज भडकावता येतात, कमी खर्चातला हा सोपा उपाय सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या छुप्या अजेंड्यात अग्रस्थानी ठेवला आहे ही आपल्या देशाची सद्यस्थितीतली मोठी शोकांतिका म्हणावी लागेल ...

येणारया पिढीसाठी आपण भारताचे कोणते चित्र त्यांच्या पुढ्यात ठेवणार आहोत याचा प्रश्न अंतर्मनाला विचारला तरी आपल्या विचारातले दोष आपल्याला कळतील...

- समीर गायकवाड.

(सूचना - किमान या पोस्टवर तरी कुणाच्याही जातधर्मावर टीका करू नये )