Sunday, March 27, 2016

युगप्रवर्तक कवी - बा.सी.मर्ढेकर

बा.सी.मर्ढेकर एक युगप्रवर्तक कवी ...

आजच्या धकाधकीच्या दैनंदिन जीवनात यंत्रवत आयुष्यात परावर्तीत झालेलं जिणं कसं आहे हे किती तकलादू आहे, त्यात जीवनातील रसरशीतपणा हरवला आहे. जीवनातील खरी आसक्ती सरून गेली आहे अन उरली आहे ती निरस जीवन जगण्याची सक्ती. अगदी मर्मभेदक आणि परिणामकारक अशी शब्दरचना हे मर्ढेकरी काव्यवैशिष्ट्य इथेही आहे. कवितेत न वापरले जाणारे, रुढार्थाने दुर्बोध समजले गेलेले गद्याच्या अंगाने जाणारे शब्द लीलया कवितेत वापरण्यात मर्ढेकरांचा हातखंडा होता. सात दशकांपूर्वी लिहिलेल्या या कवितेत वर्णिलेली जीवनातील शुष्कता आजच्या काळात तर मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येते.

'पिपांत मेले ओल्या उंदिर; माना पडल्या, मुरगळल्याविण;
ओठांवरती ओठ मिळाले; माना पडल्या, आसक्तीविण.
गरिब बिचारे बिळांत जगले, पिपांत मेले उचकी देउन;
दिवस सांडला घाऱ्या डोळीं गात्रलिंग अन धुऊन घेउन.
जगायची पण सक्ती आहे; मरायची पण सक्ती आहे...'
ही कविता जरी वाचली तरी मनःचक्षुपुढे बा.सी.मर्ढेकरांचे नाव येतेच ! या कवितेच्या योगाने मर्ढेकरांविषयी रसिक वाचकांच्या मनात एका विशिष्ट प्रतिमेचे घट्ट नाते तयार झाले आहे.

माना मुरगळायची गरजच पडणार नाही इतक्या असहायतेने आजच्या मानवी जीवनाची दुरवस्था झाली आहे,
बा.सी.मर्ढेकर - सौंदर्य आणि साहित्य 
उंदीर जसे पिंपात मरून पडतात त्यांना मारायची गरज पडत नाही. त्यांचा पिंपातला मृत्यूही जगाच्या नजरेस पडत नाही. कारण कोण कोणाच्या खिजगणतीत नाही, त्यामुळे कुणाचे अस्तित्व असले काय अन नसले काय याचा इतरांना काही फरक पडत नाही. तद्वतच ही अवस्था सर्वच मानवी जीवांत आढळते असं खुबीने लिहिताना मर्ढेकर म्हणतात - 'गरीब बिचारे बिळांत जगले, पिंपात मेले उचकी देऊन !' प्रत्येकाचे घर - कार्यालय हे एक बिळच झाले आहे अशी सूचक उपमा इथे आहे. यापासून वाचण्यासाठी गात्रलिंग धुवून घेण्याचा निरर्थक उपायही काहीजण करून पाहतात मात्र तो कुचकामीच आहे. त्यामुळे हे जगणे इतके निरस झाले आहे की शृंगार करतानाचे ओठावरती ओठ टेकवणे ही एक निव्वळ औपचारिकता - कृत्रिमता होऊन बसली आहे. त्यात कोणतेही  आस्थेचे, प्रेमाचे रेशमी बंध उरले नसून ती जणू बेडीच होऊन गेली आहे!  

या सर्वांवर ताण म्हणजे या जीवनापासून परागंदा होण्याची मुभा कुणालाही नाही, हे जीवन असेच आहे अन ते असेच जगावे लागते. आजच्या आंग्लाळलेल्या भाषेत सांगायचे झाले तर दुसरा ऑप्शनच नाही. कारण इथे नुसती जगायची सक्ती नसून मरायची पण सक्ती आहे. केवळ आठ शब्दांच्या या दोन काव्यपंक्तीत आजच्या बेगडी जीवनाचे सार मर्ढेकर इतक्या टोकदार पद्धतीने मांडतात की आपल्याला हताश झाल्यासारखे वाटते ! वाया जाणारया या कालापव्ययाला ते 'दिवस सांडला' असं सहजगत्या लिहून जातात. या कवितेमुळे वाचकाला वास्तवाची जाण होते अन त्याचबरोबरीने कवीविषयीची एक आधुनिक कवी या अर्थाची प्रतिमा तयार होते.

पुढे कवी म्हणतात ही नुसती उदासीनता नाहीये तर तिला जहरी डोळे आहेत ज्यायोगे आपली दृष्टी विखारी होऊन जाते. यामुळे दृष्टीतली सजगता लुप्त पावते अन निरर्थक रोजची तीच ती दृश्ये पाहून नजर जणू बधीर होऊन जाते. म्हणून कवी म्हणतात की, 'या नजरेला काय म्हणावे ? हे डोळे नाहीत, हे तर काचेचे लोलक आहेत !' जे नुसते पाहण्याचे काम करतात त्यातला भावार्थ लावण्याचे काम ते करत नाहीत. पण बेकलाईटीच्या सुरात कसेबसे मिलनही त्यात जमून जाते अन त्यात हे उंदीर एकदाचे न्हाऊन निघतात ! इतर अनेक क्रियांप्रमाणे ही देखील एक क्रिया समजूनच पार पाडली जाते, त्यात तादात्म्यता वगैरे फार दूरची गोष्ट झाली.

मर्ढेकरांच्या काव्यसंपदेवर अशा आधुनिक विचारप्रवण कवितांचा शिक्का मोठा असला तरी त्यांच्या इंतर आशयविषयांच्या कविता देखील तितक्याच श्रेष्ठ दर्जाच्या अन उच्च अभिरुचीच्या आस्वादक आहेत. त्यात पोक्तपणा आहे, तसेच त्यात कुठेही भाष्यकाराचा वा निरुपणकाराचा बाज नाहीये.

'उदासतेला जहरी डोळे,
काचेचे पण;
मधाळ पोळें
ओठांवरती जमलें तेंही
बेकलाइटी, बेकलाइटी!
ओठांवरती ओठ लागले;
पिपांत उंदिर न्हाले! न्हाले!… '

मर्ढेकरांनी लिहिलेल्या काव्यसंपदेवर अशा आधुनिक विचारप्रवण कवितांचा शिक्का मोठा असला तरी त्यांच्या इंतर आशयविषयांच्या कविता देखील तितक्याच श्रेष्ठ दर्जाच्या अन उच्च अभिरुचीच्या आस्वादक आहेत. त्यात पोक्तपणा आहे, तसेच त्यात कुठेही भाष्यकाराचा वा निरुपणकाराचा बाज नाहीये.

'किती तरी दिवसांत
नाही चांदण्यात गेलो
किती तरी दिवसांत
नाही नदीत डुंबलो...'
या कवितेतलं निसर्गासक्त रसिक माणसाचं चित्रण वेधक अन दिलखुलास आहे, रुक्ष शहरी भागात नोकरीनिमित्त राहावे लागते अन अशा वेळी गावाकडे जायचे मनसुबे लांबणीवर पडत जातात. मग त्या जादुई वातावरणाची अनामिक ओढ मनाला लागून राहते. या देखण्या विषयावरची ही कविता मनाला भिडून जाते. कवी आपलंच दुःख प्रकट करताहेत असं वाटू लागते. इथे सामायिक दुःखाचे प्रातिनिधिक प्रकटन पुन्हा एकदा समोर येते.

'माझी खुल्या चांदण्याची ओढ जुनीच आहे अन इथल्या वाहत्या पाण्याची
शीळ देखील त्याच आर्त ओळखीची आहे' असं मोहक वर्णन ते करतात.
निर्भय होऊन पुन्हा केव्हा तरी चांदण्यात जावे अन गांवाकाठच्या नदीत जलमय व्हावे असं कवीला राहून राहून वाटते मात्र आज परिस्थिती वेगळी आहे. आज अंतरी खुल्या चांदण्याचीच अनामिक भीती दाटून आलीय शिवाय नदीच्या प्रवाहाशी सोबत ही सौख्याची उरली नसून त्या प्रवाहाच्या आवेगाने अंगावार काटा उभा राहतोय. अशी विपरीत परिस्थिती आज निर्माण झालीय. आकाशीच्या विलोभनीय चांदण्यांची दृष्टादृष्ट तर आता कठीण गमतेय, त्यावर मनाला दिलासा देण्यासाठी निदान इथे पाऱ्याचा इलेक्ट्रिकचा बल्ब तरी आहे असं कवी उपहासाने पुढे म्हणतात. मुखी ऋचा गात नदीत अर्ध्य देऊ शकत नाही मात्र तोतरया नळाची धार तरी शिरी घेतो असं म्हणत शहरी जीवनाला जोरकस चिमटे मर्ढेकर घेतात.

या दोन भिन्न कवितांचे रसग्रहण इथे विस्ताराने देण्याचे प्रयोजन हे की त्यातून मर्ढेकरांची विषयसंपन्नता ध्यानात यावी. मर्ढेकरांचा जीवनपट पाहिला की यामागचे कारण स्पष्ट होते.


मर्ढेकरांची कविता 
केशवसुतांनंतरचे मराठीतील एक प्रयोगशील आधुनिक कवी व मराठीतील युगप्रवर्तक कवी म्हणून ओळ्खले जाणारया बा.सी.मर्ढेकर यांचे संपूर्ण नाव बाळ सीताराम मर्ढेकर असे होते. मर्ढेकरांचे मूळ आडनाव गोसावी पण गावाच्या नावावरून 'मर्ढेकर' हे आडनाव रूढ झाले. त्यांचा जन्म सातारा जिल्यातील मर्ढे या गावी १ डिसेंबर१९०९ रोजी झाला होता. मर्ढेकरांचे प्राथमिक शिक्षण बहाद्दरपूर येथे तर माध्यमिक शिक्षण फैजपूर सावदे येथे झाले. तसेच धुळ्याच्या गरूड हायस्कूल- मध्येही त्यांचे शिक्षण झाले.  मॅट्रिकपर्यंत शिक्षण खानदेशात घेतल्यानंतर मर्ढेकर पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून बी.ए. झाले. १९२९मधे आय.सी.एस. या ब्रिटिशकालीन प्रशासकीय सेवेतील पदाची परीक्षा देण्यासाठी ते इंग्लंडला गेले. त्यात त्यांना यश आले नाही. परंतु या काळात त्यांनी युरोपातील वाङ्मयीन प्रवाहांचा जवळून अभ्यास केला. टी. एस. इलियट, जेम्स जॉइस, व्हर्जिनिया वूल्फ आदी  लेखक व क्लाइव्ह बेल, रॉजर फ्राय, हर्बर्ट रीड, जेम्स सदरलंड इत्यादी समीक्षकांचा त्यांच्यावर प्रभाव पडला. त्यांचे लेखन १९३० च्या सुमारास सुरू झाले. १९३२ला ते तिथून मायदेशी परतले.

मर्ढेकरांनी काही काळ ‘टाइम्स ऑफ़ इंडिया ’ या इंग्रजी वृत्तपत्रात सहसंपादक म्हणून काम केले होते. एलफिस्टन, ईस्माइल युसूफ, सीडनहॅम अशा महाविद्यालयाबरोबरच धारवाड आणि अहमदाबाद इथल्या सरकारी महाविद्यालयांतही त्यांनी इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून काम केले.  इ.स. १९३८ मध्ये आकाशवाणी केंद्राचे आधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती.

टाईम्स सोडल्यानंतर (१९३५) मर्ढेकरांनी पुढील तीन वर्षे प्राध्यापक म्हणून काम केले पण अघ्यापन क्षेत्रात
मर्ढेकरांचे रेडीओपर्व 
यशस्वी, लोकप्रिय प्राध्यापक अशी स्वत:ची प्रतिमा निर्माण करू शकले नाहीत. अखेर त्यांनी शिक्षणक्षेत्र सोडून द्यावयाचे ठरवले. पुण्याचा भूतकाळ मागे टाकून या काळात ते दादरच्या हिंदू कॉलनीत ‘चांदणी व्हिला’त राहत. हॅमिल यांना या गुणी विद्वानाची होत असलेली आबाळ पाहून हळहळ वाटत होती. कॉलेजमध्ये मर्ढेकरांसाठी आपल्याला काही करता आले नाही, याची रुखरुख त्यांना लागली होती. म्हणून त्यांनी ऑल इंडिया रेडिओचे प्रमुख कंट्रोलर लायोनल फिल्डन यांच्याकडे मर्ढेकरांची शिफारस करून त्यांना रेडिओमध्ये नोकरी लावून दिली. त्यांचे 'Arts and Man' हे पुस्तक इंग्लंडमधील एका प्रतिष्ठित प्रकाशन संस्थेतर्फे प्रकाशित झाले होते. त्यांचा ‘Basic English’ हा प्रदीर्घ लेख आणि त्यांनी एल्फिन्स्टोनियनच्या अंकात लिहिलेले लेख, त्यांच्या काही मराठी कविता, त्यांचा महाविद्यालयांतील विविध कार्यक्रमांतील सहभाग या सगळ्यांची माहिती हॅमिल यांच्यामार्फत फिल्डनना मिळाली होती. त्यामुळे त्यांना मर्ढेकर हे एक चांगले उमेदवार आहेत याची मनोमन खात्री होती. मर्ढेकरांचा हा रेडिओ-पर्व कालखंड १९३८ ते १९५६ असा तबब्ल अठरा वर्षांचा होता.

मर्ढेकरांचे लेखन हे युद्धोत्तर काळातील नव्या जाणिवा व नव्या युगाची जाणीव व्यक्त करणारे होते. मर्ढेकरांनी मराठी कवितेत आशय व अभिव्यक्ती या दोन्ही अंगानी क्रांतिकारक परिवर्तन घडवून आणले. नेहमीच्या निराश, उद्विग्न अवस्थेतील कवितांबरोबरच प्रसन्न, नितांत सुंदर अशा कविताही त्यांनी लिहिल्या. यंत्रयुगातील गतिमानतेत माणुसकी हरपत चालल्याची खंत त्यांच्या काव्यात सातत्याने व्यक्त झालीय. समीक्षालेखनाचा परिपाठ देताना त्यांनी मराठीत नवटीकेचा प्रांरभ केला.

मामा वरेरकर हे मर्ढेकरांचे ज्येष्ठ. मर्ढेकर रेडिओत रुळल्यानंतर कालांतराने कृ. द. दीक्षित रेडिओ परिवारात
बा.सी.मर्ढेकर 
आले. मर्ढेकर शिस्तीचे उत्तम अधिकारी होते. दीक्षित पत्रे लिहिणे, मसुदे तयार करणे हे आपले काम चोखपणे करत, पण त्यातही मर्ढेकर चुका काढत. पण नंतर हळूहळू दोघांत स्नेह निर्माण होत गेला. एकदा सिद्धार्थ कॉलेजमधील काही विद्यार्थी कवितेबद्दल चर्चा करण्यासाठी आणि ‘पिपांत मेले’ समजून घेण्यासाठी विनम्रपणे आले. त्यांनी मर्ढेकरांना कविता समजावून द्यावी, अशी विनंती केली. मर्ढेकरांना थेट नकारही देववेना. पण नाइलाजाने त्यांनी नकारच दिला. विद्यार्थी परत गेले. ते गेल्यावर मर्ढेकर दीक्षितांना म्हणाले, ‘माझी कविता मीच समजून द्यायची म्हणजे काय?’ आपली कविता इतरांना फारशी समजत नाही म्हणून त्यांना वाटणारी खंत या उद्गारांमागे होती. त्यानंतर खिन्न मनाने त्यांनी दीक्षितांना विचारले, ‘काहीच आशय निघत नाही का हो या कवितेतून?’ या प्रश्नात आपल्याला रसिकांपर्यंत पोहोचता येत नाही, हे कलावंताचे दु:ख होते. मर्ढेकरांनी वरून कितीही आव आणला, तरी त्यांच्या अंतर्यामी हे दु:ख असणारच!

कवी म्हणून मर्ढेकरांना मराठी वाङ्मयात युगप्रवर्तकाचं स्थान दिलं जातं. मर्ढेकरांनी मराठी कवितेत आशय व अभिव्यक्ती या दोन्ही अंगानी क्रांतिकारक परिवर्तन घडवून आणले. यंत्रयुगातील गतिमानतेत माणुसकी हरपत चालल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. मर्ढेकरांनी कवितेप्रमाणेच कलाविचार, समीक्षा, कादंबरी, नाटक या प्रांतांतही महत्त्वाचे योगदान दिले. मर्ढेकरांना संगीताची समज होती. त्यांचे रंगभूमीवरही प्रेम होते. मर्ढेकरांचे वडील व तत्कालीन नाटक मंडळांतील काही व्यक्ती यांचे येणे-जाणे असे. ‘नाटय़कला प्रवर्तक’चे भाटे व आबासाहेब मर्ढेकर यांचा स्नेह होता. मर्ढेकरांची या वातावरणामुळे नट होण्याची इच्छा होती, असे त्यांनी ‘नटश्रेष्ठ’च्या वेळी दीक्षितांना सांगितले.

मर्ढेकरांची ग्रंथसंपदा अतिशय समृद्ध होती ; 'शिशिरागम', 'काही कविता', 'आणखी काही कविता' हे त्यांचे काव्यसंग्रह होत. 'रात्रीचा दिवस', 'पाणी', 'तांबडी माती' या कादंबर्‍या आणि ‘सौंदर्य आणि साहित्य ’ ‘वाड्‍मयीन महात्मता ’हे समीक्षा ग्रंथ, 'नटश्रेष्ठ' हे नाटक आणि 'कर्ण', 'संगम', 'औक्षण', 'बदकांचे गुपित' या संगीतिका त्यांनी लिहिल्या आहेत. आर्ट्‌स अँड मॅन, वाङ्मयीन महात्मता, टू लेक्चर्स ऑन इस्थेटिक ऑफ लिटरेचर, सौंदर्य आणि साहित्य हे त्यांचे समीक्षापर लेखन होते.  याशिवाय मर्ढेकरांना संगीताची समज होती. त्यांचे रंगभूमीवरही प्रेम होते. मर्ढेकरांचे वडील व तत्कालीन नाटक मंडळांतील काही व्यक्ती यांचे येणे-जाणे असे. ‘नाटय़कला प्रवर्तक’चे भाटे व आबासाहेब मर्ढेकर यांचा स्नेह होता. मर्ढेकरांची या वातावरणामुळे नट होण्याची इच्छा होती, असे त्यांनी ‘नटश्रेष्ठ’च्या वेळी दीक्षितांना सांगितले. मराठी साहित्यात नवे युग निर्माण करणार्‍या 'युगप्रवर्तक' कवीचे २० मार्च १९५६ रोजी दिल्ली येथे निधन झाले.

ह्या दु:खाच्या कढईची ……
मर्ढेकरांची कविता 
'ह्या दु:खाच्या कढईची गा
अशीच देवा घडण असू दे;
जळून गेल्या लोखंडातहि
जळण्याची, पण पुन्हा, ठसू दे
कणखर शक्ती, ताकद जळकट.
मोलाची पण मलूल भक्ति
जशि कुंतीच्या लिहिली भाळी,
खिळे पाडूनी तिचे जरा ह्या
कढईच्या दे कुट्ट कपाळी
ठोकुनि पक्के, काळे, बळकट.
फुटेल उकळी, जमेल फेस,
उडून जाइल जीवन-वाफ;
तरि सांध्यांतून कढईच्या ह्या
फक्त बसावा थोडा कैफ
तव नामाचा भेसुर धुरकट.'

ही कविता आणि खाली दिलेली कविताही देवाला उद्देशून लिहिली आहे मात्र दोन्हीतले भाव अगदी भिन्न आहे, त्यांची ढब वेगळी आहे आणि आशय दोन टोकाचे आहेत. कुंतीसारखी मलूल भक्ती आपल्या कपाळी खिळे ठोकून द्यावी व जळून निस्तेज झालेल्या देहाला पुन्हा संघर्ष करण्याचे दान द्यावे असं ते देवाकडे साकडे इथे घालतात. तर खाली दिलेल्या कवितेत देवाने करुणा कृपा केली अन शेते पिकली असं भाष्य करतात ! उजाडतां जें उजाड झालें, झोपीं गेलें, मावळतां ती अभागी शेतेदेखील देवाच्या करुणेने बिचकुनि होतिल हिरवीं भातें असा आशावाद या कवितेत मांडला आहे.  'कधी लागेल गा नख तुझे माझिया गळ्याला, आणि सामर्थ्याचा स्वर माझिया गा व्यंजनाला !' अशी आर्त करुणा ते अंती भाकतात.

देवाजीने करुणा केली |
भाते पिकुनी पिवळी झाली ||
'देवाजीनें करुणा केली, सकाळ नित्याची ही आली
जणुं पायानें चित्त्याच्या अन  रस्ता झाडी झाडूवाली l
बा.सी.मर्ढेकर 
घराघरांतील चूल पेटली; चहा उकळूनी काळा झाला;
जरा चढवितां दुसरें भांडे, भातहि शिजुनी होईल पिवळा
देवाजीनें करुणा केली रोजचीच पण 'बस' हि आली
जणुं पायानें हरिणीच्या अन शिरस्तांतलीं कामें झाली
घरी परततां, भाजीवाली समोर दिसली, भरली थैली;
दो दिडक्यांचीं कडू दोडकीं  जरी पिकूनी झालीं पिवळी
उजाडतां जें उजाड झालें, झोपीं गेलें, मावळतां तें:
करील जर का करुणा देव  बिचकुनि होतिल हिरवीं भातें !……
किती पायी लागू तुझ्या किती आठवूं गा तूंते;
किती शब्द बनवूं गा अब्द अब्द मनी येते.
काय गा म्यां पामराने खरडावी बाराखडी;
आणि बोलावी उत्तरें टिनपाट वा चोमडी.
कधी लागेल गा नख तुझे माझिया गळ्याला,
आणि सामर्थ्याचा स्वर माझिया गा व्यंजनाला!'

मर्ढेकरांची काव्यलक्षणे बत्तीसगुणी आहेत त्यात अंजन कांचन ते असत्य भंजन असे विविधतेचे काव्य तरंग जाणवत राहतात. अल्वार अल्लड अवखळ तरुणीचे लोभस वर्णनही ते तितक्याच तन्मयतेने करतात ज्या तन्मयतेने ते आम्ल मनीचे जाऊ दे असं मागणं मागतात !
'पोरसवदा होतीस
बा.सी.मर्ढेकर - यशवंत मनोहर 
कालपरवा पावेतो;
होता पायांतही वारा
कालपरवा पावेतो.
आज टपोरले पोट
जैशी मोगरीची कळी;
पडे कुशीतून पायीं
छोट्या जीवाची साखळी.
पोरसवदा होतीस
कालपरवा पावेतो;
थांब उद्याचे माऊली
तीर्थ पायाचे घेईतों!'

आपल्याला धैर्य, नम्रता हवीय. निहंत्याच्या वाणीतला सूर हवाय, तप्त पोलादासम लवचिकता बुद्धीत येऊ दे, मीपण गळून पडावे अन भावनेच्या हिंदोळ्यावर न झुलता त्यात तर्कांचे प्रमाण येऊ दे, मनातले मरगळीचे आम्ल निघून जाऊ दे असं क्षितिजापार जाणारं त्यांचं मागणं देवापाशी आहे.
'भंगू दे काठिण्य माझे
आम्ल जाउ दे मनीचे
भंगू दे काठीण्य माझे - बा.सी,मर्ढेकर 
येऊ दे वाणीत माझ्या
सूर तुझ्या आवडीचे
धैर्य दे अन नम्रता दे
पाहण्या जे जे पहाणे
वाकू दे बुध्दीस माझ्या
तप्त पोलादाप्रमाणे
जाऊ दे ‘कार्पण्य’ ‘मी’ चे
दे धरु सर्वांस पोटी
भावनेला येऊ देगा
शास्त्र काट्याची कसोटी..'


मर्ढेकरांचा "गणपत वाणी' हे खरे म्हणजे एक मनुष्य स्वभावाचे प्रतीक आहे. किराणा मालाचे पिढीजात दुकान पेठेत थाटलेला, रोजच्या गिऱ्हाईकाशी जिव्हाळ्याचे नाते जोपासलेला, पुड्याच्या दोऱ्याने गुंडाळलेल्या कागदात गूळ-मीठमिरची बांधून देणारा, रोख हिशेब चुकता करण्याचा हठ्ठ न धरता नेहेमीच्या गिऱ्हाईकाला उधारीवर माल देणारा, आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा पारंपारिक किरकोळ दुकानदार मर्ढेकरांनी प्रातिनिधिक स्वरूपात आपल्या कवितेत नेऊन बसवला आणि त्याचे बारसे केले "गणपत वाणी'. दुर्बोधतेचा शिक्का रचनेवर बसलेला असल्याने "नवकवितेचे प्रर्वतक' गणल्या गेलेल्या मर्ढेकरांच्या कवितेच्या वाटेला फ़ारसे कोणी सहसा जात नाहीत. असे असले तरीही मर्ढेकरांचा "गणपत वाणी' कधी ना कधी, कोठे ना कोठे भेटलेला असतो. निदानपक्षी शालेय जीवनात मराठीच्या क्रमिक पुस्तकात तरी "गणपत वाण्या'शी गाठ झालेली असतेच असते. बाळपणीचे मैत्र टिकावू असते. त्यामुळे, अगदी संपूर्ण कविता जरी नाही तरी त्या कवितेचे एखादे दुसरे कडवे आजही आठवणारे कितीतरी सापडतील. कर्तृत्वाचे इमले मनातल्या मनातच बांधणारा, परंतु त्या मनोरथांना प्रयत्नाची साथ व्यवहारात यत्किंंचितही न देणारा तो कृतिशून्य "गणपत वाणी' एक दिवस मर्ढेकरांच्याच शब्दांत सांगावयाचे तर "बापडा बिडी पिता पिताना मरून गेला...' खंगलेल्या दुकानाच्या जागेवर एकही माडी न बांधताच मर्र्ढेकरांच्या कवितेतील "गणपत वाणी' मनातले इमले आपल्या चिवट प्रयत्नांनी भुईवर प्रत्यक्षात उठवण्याच्या खटाटोपात गुंतलेेले ठायी ठायी दिसतील. कष्टांची पराकाष्ठा करणे त्यांना भागच आहे. आजकाल मॉलच्या गदारोळात असे दुकानदार दिसणे दुरापास्त आहे मात्र विरळ लोकवस्ती अथवा ग्रामीण भागात असे किराणा दुकानदार ज्यांना वाणी असं संबोधले जाते ते अजूनही आपले अस्तित्व टिकवून आहेत. बिडी पिऊन झाल्यावर ती भिरकावून देताना गणपत वाणी कशी लकेर घ्यायचा उजवा डोळा अन डावी भुवई उडवत तो मनात कसे इमले रचायचा याचे समर्थ चित्र आपल्यापुढे मर्ढेकर उभे करतात. या कवितेत अप्रतिम चित्रदर्शी शैली आहे. तुकोबांची गाथा वाचत तो कसा पडून राहायचा वा तिळाचे नाहीतर खोबरेल तेल विकून तेलकट हाताने कळकट हिशोब कसे कोळत राहायचा हे वाचताना आपल्या डोळ्यापुढे गणपत वाणी तरळत राहतो. काळपट तेलकट टोपी, मळकट सदरा - पायजमा अशा वेशातला एक छोटीशी टपरीवजा दुकानदारी चालवणारा हा वाणी आपल्या स्मृतींच्या कप्प्यात कुठे तरी दडून बसलेला असतो तो अलगद बाहेर येतो. त्याच्या दुकानात गोणपाटावर अंथरलेली ती विटकरी रंगाची विटून गेलेली सतरंजी अन तक्क्या वा लोडाच्या ऐवजी पाठ टेकावयास उशास असणारे धान्याचे पोते ! त्याच्या आडोशास असणारा तेला- तुपाचा दर्प, अन अशा गंधयुक्त दर्पयुक्त जागेतले त्याचे झोपणे ! याचे वर्णन करून मर्ढेकर म्हणतात की, त्याने कष्ट करताना हाडाची काडे केली अन कष्ट करतच तो बिडी पितानाच मरून गेला. कवितेच्या शेवटी तिरकसपणे मर्ढेकर लिहितात की जन्मांधाला एक मागता देव दोन डोळे देतो (मात्र त्याची त्याला काहीही उपयुक्तता वा मूल्य माहित नसते, तो जीवनाकडे तसाच पाहत राहतो अन नीरस एककल्ली आयुष्य जगत राहतो)

गणपत वाणी बिडी पिताना चावायाचा नुसतीच काडी;
गणपत वाणी बिडी पिताना - बा.सी. मर्ढेकर 
म्हणायचा अन मनाशीच की या जागेवर बांधिन माडी;
मिचकावुनि मग उजवा डोळा आणि उडवुनी डावी भिवयी,
भिरकावुनि ती तशीच ध्यायचा लकेर बेचव जैसा गवयी.
गि~हाईकाची कदर राखणे; जिरे, धणे अन धान्यें गळित,
खोबरेल अन तेल तिळीचे विकून बसणे हिशेब कोळित;
स्वप्नांवरती धूर सांडणे क्वचित बिडीचा वा पणतीचा
मिणमिण जळत्या; आणि लेटणे वाचित गाथा श्रीतुकयाचा.
गोणपटावर विटकररंगी सतरंजी अन उशास पोते;
आडोशाला वास तुपाचा; असे झोपणे माहित होते.
काडे गणपत वाण्याने ज्या हाडांची ही ऐशी केली
दुकानातल्या जमीनीस ती सदैव रुतली आणिक रुतली.
काड्या गणपत वाण्याने ज्या चावुनि चावुनि फेकुन दिधल्या,
दुकानांतल्या जमीनीस त्या सदैव रुतल्या आणिक रुतल्या.
गणपत वाणी बिडी बापडा पितांपितांना मरून गेला;
एक मागता डोळे दोन देव देतसे जन्मांधाला!

मर्ढेकरांच्या कवितेत अर्थविविधता शब्दनिवडीतून न बदलता त्याच्या चपखल वापरातून समृद्ध होते. 'पृथ्वीची तिरडी जळो देवा भली !!' या पंक्तीत तिरडी आणि फुले यांचे प्रचलित अर्थ लोप पावतात अन त्याजागी अनपेक्षित अर्थ प्राप्त होतो. एरव्ही याच पृथ्वीचे कौतुकाच्या अनुषंगाने ते वर्णन करतात. 'सरणावरती सरण लागले, जिवंत आशा पडे उताणी’ असं ते अगदी सहज लिहून जातात. पण त्यात किती मोठा अर्थ दडला आहे हे कळण्यासाठी पुढच्या पंक्ती वाचल्या नाहीत तरी अर्थ वा आशय बाधित होत नाही. ‘डोळे हे फिल्मी गडे, खोकुनी मज पाहू नका’ असं अलौकिक विडंबन लिहिताना वास्तवाचे भान सहजगत्या आणून देतात.

‘दवांत आलीस भल्या पहाटी’ यातला प्रेमभाव रेखाटणारे मर्ढेकर आणि ‘पंक्चरलेल्या रबरी रात्री गुरगुरवावी रबरी कुत्री!’ मर्ढेकर एकच आहेत का असा प्रश्न पडावा अशा दोन विरुद्ध टोकाच्या कविता समर्थपणे त्यांनी लिहिल्यात.'पोटातील स्निग्ध भाव नैसर्गिक, ज्या न वाव वितळतील विष्ठेमधी, आपणा तमा न !!' ही कविता वेगळाच परिणाम साधते कारण यात शब्द रूढ अर्थाने न वापरता ते निषिद्ध मानलेल्या भावनांच्या मुक्त प्रकटीकरणासाठी पाहिजे तसे वाकवले आहेत. इथल्या स्निग्धतेचा गालावरल्या स्निग्धतेशी तसूभरही संबंध ते येऊ देत नाहीत.

कुठला शब्द वापरला तर त्याचे काय परिणाम होतील याचे दृकश्राव्य परिमाण मर्ढेकरांइतके मराठी काव्यात
मर्ढेकरांची कविता - सांस्कृतिक समीक्षा ...
अन्य साहित्यिकास क्वचित ज्ञात असतील. उदाहरणार्थ त्यांच्या या काव्यपंक्ती - “कणा मोडला निश्चलतेचा,ह्या पालीच्या आवाजाने;' पुढे ते लिहितात - 'धम्मम सरणं” कुणी बोलले पाषाणातील बुद्ध-मिषाने' एकमेकाशी दुरान्वयानेही मेळ न खाणारया शब्दांची नेमकी निवड चकित करणारी आहे. अर्थाचे अनेक पदर एकाच धाग्यात बांधणे हे कठीण काम ते सहजतेने करतात. 'फसफसून येतो सोड्यावरती गार’ ह्या काव्यात्मक नसलेल्या ओळीला जोडून ते लगेच हळवे होऊन पुढे लिहितात ‘हा तुषारकेसर फेस-गेंद अलवार’ ! आहे की नाही कमालीची शब्दपकड ! कोणता शब्द कोणत्या अर्थाने कुठे वापरायचा याचे त्यांचे तन्त्र धक्कादायक, विस्मयकारक अन अथांग अर्थाचे असे. तरीही त्यांच्यातल्या प्रतिभावंताचे पाय मातीचेच राहिले. कारण स्वतःच्या काव्यविषयी ते म्हणतात -
“अहो शब्दराजे ऐका l लाज सेवकाची राखा l
नाही तरी वरती काखा l आहेत ह्या l"

इतक्या आशयघन कविता लिहूनही त्यांच्यावर काही समीक्षक दुर्बोधतेचा- अगम्यतेचा आरोप करतात तेंव्हा वाईट वाटते. मर्ढेकरांच्या कवितेतील कोणत्याही दोन पंक्ती स्वतंत्र समजून वाचल्या तरी त्यात आशय अन अर्थ आढळतो. सोने एक किलो असो वा कणभर असो त्याची लकाकी अन गुणधर्म सारखेच असतात हे प्रमाण मर्ढेकरांच्या कवितांना तंतोतंत लागू पडते. त्यांनी प्रस्थापित कृत्रिमतेला, तकलादू काव्य आशयांना मुळासकट हलवले अन गुलछबू विश्वात अडकलेल्या मराठी कवितेस मुक्त करून तिच्यावर नवनवे विषय - आशय यांची अनोखी सजावट केली. मर्ढेकरांच्या कवितांचा पुढचा टप्पा म्हणून कवी ग्रेस यांच्या कवितांकडे पाहता येईल. ग्रेस आणि मर्ढेकर या दोन्ही दिग्गजांच्या कविता आजही मराठी काव्यात मानाचे आणि रसिकमान्यतेचे अढळस्थान मिळवून आहेत. ही बाब दुर्बोधतेचा आरोप अभिजाततेने खोडून काढण्यास पुरेशी आहे !

- समीर गायकवाड.