Monday, March 28, 2016

पिकासोची 'चित्तरकथा'....


जगप्रसिद्ध चित्रकार पिकासोच्या चित्रात बरेचदा विद्रूप, कुरूप, तोडक्या -मोडक्या फ्रेमच्या, रडणाऱ्या बायका का दिसतात याचे उत्तर पाहिजे का ? स्त्रियांची अप्रतीम चित्रे काढणारया या चित्रकाराने अखेरीस पशू, पक्षी, घुबडे, विदूषक यांची चित्रे का काढली ? एका बाईलवेडया स्वभावाच्या अभिजात कलावंतावरील सिनेमाचा आस्वाद घ्यायचाय ? जगावेगळ्या अलौकिक प्रतिभावंताच्या चरित्राचा आलेख वाचायचा आहे ? तर मग अवश्य हा लेख वाचाच .....

जगभरातील कलारसिकांना पिकासो हे नाव अपरिचित नाही.पाब्लो पिकासो हा विसाव्या शतकातील एक श्रेष्ठ स्पॅनिश प्रतिभावंत. चित्रकार, शिल्पकार, रेखांचा जादुगार अफलातून कलावंत अशा विविध भूमिकांनी त्याची कारकीर्द आधुनिक कलाक्षेत्रात संस्मरणीय ठरली आहे. पिकासो हा अफाट प्रतिभेचा कलाकार होताच पण त्याचबरोबर चंचल वुमनायझर होता, राक्षसी प्रमाणात काम करणारा कष्टाळू माणूस होता, उथळ बालिश वेडापिसा प्रियकर होता, लहान मुलांच्या उत्साहानं अजब गोष्टी खेळत बसणारा खेळिया होता, अनकंडिशनल प्रेम करतात म्हणून प्राण्यांचा मायाळू होता, दोन प्रेयस्यांची स्वतःवरून होणारी भांडणं बघत मजा घेणारा क्रूर पुरुष होता. त्याला लहान मुलांची प्रचंड आवड होती. वयाच्या सत्तरीतही अतिशय उत्साही बाप होता.  पिकासोने चित्रकलेवर राज्य केलं.त्याच्या प्रतीक्षेत दरबार भरावा तसे लोक जमायचे. काही त्याला बघायला, काही त्याला भेटायला, काही त्याच्याशी बोलायला येत असत. काही विक्रेते चित्रांच्या आशेने सतत घिरटया घालत, अन पिकासोच्या विक्षिप्तपणाने भंजाळून जात..

आधुनिक (मॉडर्न) कला म्हटली, की सामान्य रसिकाला एकदम पिकासोचे नाव आठवते. इतके यश, इतकी किर्ती आणि वैयक्तिक जीवनातील इतक्या घडामोडींसह  इतके समृध्द जीवन क्वचितच कोणा कलावंताच्या वाट्याला आले असेल.खरे तर सर्वसाधारण वाचकांनाही जागतिक चित्रकला विश्वात एक दंतकथा बनून राहिलेल्या या असाधारण व्यक्तिमत्त्वाची तोंडओळख असतेच असते. अशा या लोकविलक्षण चित्रकाराचे आयुष्य रंगवणारे जॉन बर्जरलिखित प्रस्तुत पुस्तक लौकिकार्थाने पिकासोचे चरित्र नाही; परंतु ते या जगविख्यात चित्रकाराच्या जीवनातील विविध पैलूंवर प्रकाशझोत टाकते. रसाळपणे त्याची कलायात्रा उलगडत जाते. या पुस्तकाद्वारे युरोपमधले नाणावलेले कला समीक्षक असलेल्या बर्जर यांनी पिकासोच्या कारकीर्दीचा सांगोपांग वेध घेऊन त्याच्या कलाशैलीची खासियत आणि उणिवासुद्धा अत्यंत बारकाईने वाचकांपुढे मांडल्या आहेत.

वास्तविक आधुनिक कलेचे युग पिकासोच्या जन्माआधीच सुरू झाले होते. त्याच्य आधी व त्याच्य हयातीत विविध आधुनिक कलाप्रवाहांत विविध कलावंतांनी आपापल्या वैशिष्ट्यपूर्ण वाटा चोखाळून अस्सल कलासिध्दी मिळविल्या. त्यातील अनेकांकडून पिकासोने गुण व वाणही उचलले; पण त्याच्य विलक्षण व्यक्तिमत्त्वाने आणि कार्यशक्तीने त्याची कलानिर्मिती सर्वांपेक्षा आधिक प्रमाणात गाजली. लिओनार्दो दा व्हिन्सी हा कलावंत, भाष्यकार आणि शास्रज्ञही होता. मायकेल अँजेलो हा कलावंत आणि भाष्यकारही होता. पिकासोचा समकालीन पॉल क्ले कलावंत आणि भाष्यकार म्हणूनही जाणकारांमध्ये प्रसिध्द आहे. पिकासो स्वत: भाष्यकार नव्हता. तथापि त्याच्या हयातीतच त्याची कला व खाजगी जीवन यांवर जितके ग्रंथ निर्माण झाले, तितके ते कोणत्याही कलावंताच्या वाटेला आले नाहीत. आपल्या प्रदीर्घ आयुष्यात बालपणापासून ते अगदी मृत्यूपर्यत झपाटलेपणाने विलक्षण मेहनत करून अनेकविध माध्यमांमध्ये पिकासोने कलाकृती आणि कलावस्तू  यांची इतकी प्रचंड निर्मिती करून ठेवली आहे, की तिचा जगड्व्याळ व्याप पाहून कोणीही चकित होईल.

त्याच्या जीवनावरील ‘सर्वायविंग पिकासो’ हा सिनेमा त्याचे आयुष्य अगदी खुबीने समोर मांडतो. या चित्रपटाचे अतिशय देखणे परीक्षण जुई कुलकर्णी यांनी लिहिलेले आहे, " पिकासोच्या खाजगी आयुष्याबद्दल खूप काही लिहिलं गेलं आहे. पण दृश्य माध्यमाची ताकद समर्थपणे वापरून त्याच्या जीवनातील विविध पैलूंवर प्रकाश टाकताना विविध पेंटिंगची निर्मिती कशी झाली याचे हळुवार खुलासे या चित्रपटातून होत राहतात. पिकासोच्या भूमिकेत अँथनी हॉपकिन्स आणि फ्रान्स्वा जिलोच्या भूमिकेत नताशा मॅकेलहोन आहे. दोघांनीही आपल्या भूमिकेला यथार्थ न्याय दिलाय. नाझी सैनिकांची फिरकी घेणारया पिकासोपासून सिनेमा सुरु होतो...नंतर हॉटेलमधे भेटलेल्या फ्रान्स्वाला ‘मी तुझं चित्र तू जन्मायच्या आधीच काढलं होतं ‘ असं सांगून प्रभावित करतो आणि अनेक तरूण सुंदर मुलींना बोलवतो तसंच स्टुडिओत येण्याचं आमंत्रण देतो. पुढे पिकासो कडून ‘पेंटिंग शिकायला ‘ म्हणून फ्रान्स्वा तिथे जी येते ती येतच राहते.

एकदा ती पावसात भिजून येते तेव्हा पिकासो बाळासारखं तिचं डोकं पुसतो. काही काळाने ती सहजीच अनावृत्त होऊन त्याला सामोरी होते तेव्हा तिच्या मुग्ध तारुण्यसुलभ सौंदर्याने हुरळूनच जातो. काळाच्या ओघात पिकासोच्या आधीच्या सगळ्या बायकांशी तिची ओळख होते.
फ्रान्स्वाने स्वतःचे वडील, आजीच्या विरोधात जाऊन पिकासोची साथ पत्करलेली असते. प्राणी आणि किड्यांनी भरलेल्या पिकासोच्या गावातील घरात ती कैदेत असल्यागत वेडीपिशी होते. तिथून ती पळून जाण्याचा प्रयत्न करते तेव्हा पिकासो तिला पकडतो आणि सरळ चर्चमध्ये नेऊन शपथ घ्यायला लावतो की ती फक्त पिकासोवरच प्रेम करेल. तसेच ती ‘खरी स्त्री’ होण्यासाठी तिला पिकासोचं मूलही जन्माला घालावं लागेल हेही तिला पटवतो. फ्रान्स्वा विरघळून जाते. त्याच्या दोन मुलांची आई होते. फार पुढे काही वर्षांनी पिकासोला जेव्हा फ्रान्स्वा अशी शपथ घायला सांगते तेव्हा तो मात्र ते शिताफीनं  टाळतो .


मग पिकासोच्या तोपर्यंतच्या सगळ्या बायका आणि त्या प्रत्येकीची कहाणी संक्षिप्त स्वरूपात  दिसू लागते. ओल्गा रशियन बॅले डान्सर होती तेव्हा तिच्या प्रेमात वेडा झालेला पिकासो दिसतो. तो ओल्गाशी लग्न करतो तिच्या इच्छेसाठी ‘बूर्ज्वा‘ आयुष्य स्वीकारून त्यात काही काळ रमतो. मारी तेरेझलाच फक्त त्याची नखं कापायची परवानगी असते. कारण ती त्याच्यावर जादूटोणा करणार नाही असा त्याचा विश्वास असतो .
डोरा मार हिला पिकासोविषयीच्या असुरक्षिततेमुळे  भास होऊ लागतात. ती वेडी होऊ लागते .‘गेर्निका ‘ हे अतिप्रसिद्ध चित्र रंगवताना मारी तेरेझ आणि डोरा मारची पिकासोवरून चक्क हाणामारी होत असते आणि पिकासो ते सरळ मस्त एन्जॉय करत असतो.
ओल्गा वेड्यासारखी फ्रान्स्वाचा पाठलाग करते तो प्रसंग या चित्रपटात आहे. मारी तेरेझ फ्रान्स्वाला बजावून सांगते की, काही झालं तरी मीच पहिली आलेय तेव्हा ती केविलवाणी वाटते. वेडसर डोरा मारचा बोटांवर चाकू मारत राहण्याचा भीषण प्रसंगही असाच आहे. या सगळ्या सीन्समधून पिकासोच्या या केविलवाण्या बायका आणि त्यांना खेळवणारा पिकासोच ठळकपणे दिसत राहतो.

या चित्रपटात पिकासोला चित्रं रंगवताना पाहणं हाही एक भन्नाट अनुभव आहे. त्याचं चित्रकलेविषयीचं अफाट तत्वज्ञान चित्रपटात त्याच्या तोंडी आहेच. चित्र काढताना पिकासो सलग नऊ दहा तास उभा राहू शकत असे. पिकासो आणि फ्रान्स्वाचं चित्र काढण्याचं शूटींग करतात तो सीनही अतिशय सुंदर आहे.
फ्रान्स्वा जिलो ही एक कणखर बाई होती. भयंकर डॉमिनेटिंग वडिलांना न जुमानणारी मुलगी होती. ती स्वतःच्या चित्रकलेशी प्रामाणिक राहिली. पिकासोच्या सगळ्या प्रेयस्यांमध्ये टिकून राहिलेली ती एकमेव होती. बाकी सगळ्या पिकासोने जणू तोडून-मोडून-फेकून दिलेल्या बाहुल्याच होत्या.

इतक्या वर्षांत फ्रान्स्वाने पिकासोकडे कधी पैसे मागितले नाहीत आणि पिकासोनेही कधी दिले नाहीत.वेळ आली तेव्हा पिकासोच्या सणसणीत थोबाडीत मारायची हिमंतही तिच्याकडे होती.
पैशाच्या बाबतीत पिकासो अत्यंत कंजूष आणि हिशोबी होता. स्वतःच्या मुलांवरही तो मोजून मापून पैसे खर्चत असे. गाडी धडकवली म्हणून प्रामाणिक मॅनेजरला झटक्यात नोकरीवरून हाकलून देत असे. “पिकासो त्याच्या मित्रांना कधी गुलामात परिवर्तित करतो ते कळत नाही” असं फ्रान्स्वा जॅकलिनला सांगते.


फ्रान्स्वा जिलो ही फक्त पिकासोची बाई म्हणून राहिली नाही. ती स्वतःचंही चित्रकलेतलं काम करत राहिली. सिरॅमिक कलेसोबत पिकासोच्या जगात जॅकलिन येते. फ्रान्स्वाची जागा आता हलते. पिकासोच्या दोन मुलांची आई झालेली असते तरी वेळीच जागी होऊन ती त्याला सोडून देते. दुसरा पुरूष शोधून लग्नही करते.पिकासोला हलवणारी फ्रान्स्वा ही पहिलीच बाई होती. फ्रान्स्वा सोडून बाकी सगळ्या बायकांना पिकासोने सोडलं किंवा रिप्लेस केलं. पिकासोला सोडून स्वतःचं वेगळं आयुष्य सुरु करून यशस्वी जगलेली फ्रान्स्वा हीच एकटी होती.

‘लाईफ विथ पिकासो ‘ हे पुस्तक फ्रान्स्वाने लिहिलं आणि पिकासोचे सगळे खाजगी कारनामे उघडकीस आणले. हे पुस्तक प्रसिद्ध होऊ नये म्हणून पिकासोने खूप प्रयत्न केले. पण ते प्रसिद्ध झालंच, भरपूर गाजलं आणि त्यावरच हा चित्रपटही निघाला. ‘लाईफ विथ पिकासो‘ या फ्रान्स्वाने लिहिलेल्या पुस्तकाची पहिली आवृत्ती १९६५ मध्ये अमेरिकेत ‘व्हिंटेज बुक्स’ने प्रकाशित केली, तेव्हा स्वत: पिकासो जिवंत होते. त्यानंतर १९८९ मध्ये दुसरया एका प्रकाशनाने हे पुस्तक नव्याने प्रसिद्ध केले.

ओल्गा, मारी तेरेझ, डोरा मार या सगळ्यांना पिकासोनं वेगवेगळ्या पद्धतीने उध्वस्त केलं, किंवा त्या त्याच्याकडून उध्वस्त झाल्या. फ्रेंच कायद्यामुळे घटस्फोट न घेता आल्यामुळे ओल्गा ती जिवंत असेपर्यंत मादाम पिकासो म्हणून कागदोपत्री कायम राहिली.

पिकासोच्या चित्रात बरेचदा विद्रूप, कुरूप, तोडक्या, मोडक्या, रडणाऱ्या बायका दिसतात त्या इथूनच आलेल्या आहेत. या बायकांची फक्त कीव येते. या सर्व बायका  फ्रान्स्वासारख्या खंबीरपणे का उभ्या राहू शकल्या नाहीत असं वाटत राहतं. का त्यांनी स्वतःला अशा पुरुषाच्या अधीन केलं असेल? तो एक महान कलाकार होता हे खरं पण म्हणून या बायकांनी स्वतःचं पूर्ण अस्तित्वच त्याला वाहून टाकलं. त्याच्या कलेची ही जादू होती की त्याच्या विक्षिप्त व्यक्तिमत्वाची भुरळ होती ? का फक्त त्यांच्या बाईपणाची किंवा आईपणाची कमकुवत बाजू होती. पण बाई तर फ्रान्स्वादेखील होती. ती देखील पिकासोच्या दोन मुलांची आई होतीच की.

अगदी चित्रपट जिथे संपतो तिथे फ्रान्स्वा हेच म्हणते, “मी पिकासोची ऋणीच आहे. जे काही त्याने मला दिलं त्यासाठी, मुलांसाठी आणि त्या दहा वर्षांच्या सोबतीसाठीही ज्यामुळे मी कणखर झाले. कशालाही तोंड द्यायला समर्थ झाले.”
अजब म्हणजे हे सगळं पाहून पिकासो नामक गूढ असामीविषयी कुतूहल अजून वाढतंच. ते कमी होत नाही. चित्रकार म्हणून त्याच्या  प्रतिभेचा एक स्त्रोत त्याच्या स्त्रियांमधून आला. त्याची अफाट क्रिएटिव भूक काही अपरिहार्य अवगुणांना जन्म देत असावी असा कयास बांधायला हा चित्रपट प्रवृत्त करतो.

पिकासो स्पेनमध्ये मलागा या छोट्याशा गावी जन्मला (१८८१). त्याचे वडिल रूईथ ब्लास्को हे कलाशिक्षक होते. वयाच्या दहाव्या वर्षीच उगवत्या काळातील प्रतिभावंत कलाकार म्हणून लोक त्याच्याकडे पाहू लागले. बार्सिलोना येथे वडील ज्या कलासंस्थेत शिक्षकी करीत तिथे तो दाखल झाला आणि सर्वप्रथम गुण मिळवून उत्तीर्ण झाला. नंतर पुढे तो श्रीमंत चुलत्याच्या आश्रयाने माद्रिद येथिल ‘रॉयल अकॅडमी’मध्ये दाखल झाला. पण शिक्षक आणि मित्र यांच्याशी बिनसल्याने त्याला तेथून निघावे लागले. चुलत्याचा आश्रयही तुटला. आजार, प्रेम, मैत्री जुळणे व तुटणे असे अनुभव घेत, कठीण परिस्थितीशी झगडत तो पॅरिस, बार्सिलोना, मॅलागा या दरम्यान फिरत होता. १९०४ साली गर्टूड स्टइन आणि तिचा भाऊ यांनी त्याच्या कलेला पहिला प्रतिसाद दिला. येथपर्यत त्याचे जिवन हलाखीचे होते. ह्याची साक्ष या काळातील त्याच्या ‘नीलकालखंड’ (ब्ल्यू पीरीअड १९०१-०४) या नावाने ओळखल्या जाणार्‍या चित्रांतून मिळते. नंतरच्या दोन वर्षात त्याच्य जिवनाचा रंग पालटला. चित्रांत गुलाबी रंगाने अंग धरले. हा ‘गुलाबी कालखंड’ (रोझ पीरीअड १९०५) होय. तथापी १९०७ साली त्याने Les Demoiselles d’ Avignon हे घनवादी (क्युबिक) चित्र रंगविले आणि तेथून त्याच्या यशाची चढती कमान सुरू झाली व ती अखेरपर्यत चढतीच राहीली. एप्रिल १९७३ मध्ये तो फ्रान्समध्ये निधन पावला. परंतु या स्पॅनिश कलाकाराने आजही जुन्या व नव्या पिढीतील कलाकारांचे जग व्यापले आहे. त्याची चित्रशैली पुन:पुन्हा अभ्यासण्याचा, त्याचा रसास्वाद घेण्याचा मोह जगाला आवरलेला नाही.

पिकासो जेंव्हा स्पेनहून फ्रान्सला गेला तेंव्हाच त्याच्यातील चित्रकार खरया अर्थाने जागा झाला; बहरलासुद्धा. परंतु अभ्यासकांच्या मते, प्रत्यक्षात मात्र तो कला व कलाकारांना प्रोत्साहन देण्याचा लौकिक असलेल्या फ्रान्समध्ये एकटा, एकलकोंडा झाला होता. अर्थात, त्या वेळी त्याने चितारलेली तैलचित्रे मात्र विसाव्या शतकाच्या प्रारंभी (१९०२-१९०७) खूपच चर्चिली गेली. पुढे १९११ मध्ये जगाने पिकासोच्या तैलचित्रांना मान्यता दिली. तत्पूर्वी १९०७ च्या आसपास पिकासोने चित्रकलेत ‘क्युबिझम’ प्रकार सुरू केला. या कलाप्रकाराला युरोपमध्ये चालना मिळत गेली. पिकासो या शैलीचा जनक मानला गेला. पुढे या ‘क्युबिझम’चा प्रभाव संगीत-शिल्प आणि वास्तुकलेवरही जाणवू लागला.

वयाच्या १९व्या वर्षी पिकासो पहिल्यांदा घर सोडून काही दिवसांसाठी स्पेनहून पॅरिसला गेला. ही घटना १९०० ची. त्याला पॅरिस शहर व फ्रान्स हा देश खूपच आवडला.१९०४ मध्ये तो कायमच्या वास्तव्यासाठी फ्रान्सला परतला. त्याचे चरित्रकार लेखक जॉन बर्जर यांच्यानुसार मात्र १९३४ नंतर पिकासो पुन्हा कधीच स्पेनला गेला नाही. स्वत:च्या छोट्याशा कलाजगतात गुरफटून गेला... एखाद्या निर्वासितासारखा !'द सक्सेस अँड फेल्युअर ऑफ पिकासो' मध्ये लेखक जॉन बर्जर यांनी पिकासोसंदर्भात ‘निर्वासित’ हा शब्द अनेकदा वापरला आहे, जणू काही पिकासोने स्वत:ला स्पेनमधून हद्दपार केले होते, फ्रान्समधील वास्तव्यासाठी. पिकासोला पुस्तकात एका ठिकाणी लेखक ‘वेडा’ असे संबोधतो. ‘जीनियस’ असा दर्जा देतो. ‘सर्वात महान कलाकार’, ‘कम्युनिस्ट’ असेही म्हणतो. चार्ली चॅप्लिन या असामान्य कलाकाराशी त्याची तुलना करताना म्हणतो, चॅप्लिनच्या कलेनेच चॅप्लिनला खुजे बनवले. परंतु पिकासोबद्दल बर्जर म्हणतो की, 'पिकासोची कला पिकासोच्या भव्यदिव्य व्यक्तिमत्त्वापुढे खूपच थिटी दिसते !' एका जागी पिकासोचा हा समीक्षक म्हणतो की, 'पिकासोजवळ सगळे होते; पण रंगवण्याचे विषय (सब्जेक्ट्स) खूपच कमी होते.'
लेखक पुढे स्पष्ट करतो की, पिकासोने स्वत: ओढवून घेतलेला एकटेपणा त्याच्या कलेवर विपरीत परिणाम करून गेला. त्याला लोकांकडून प्रशंसा भरपूर मिळाली, तो स्वत: खूपच सृजनशील होता; परंतु त्याच्या चित्रांमध्ये नवनवीन विषय काही येऊ शकले नाहीत. १९०२ ते १९०७ किंवा तो काळ सोडला तर त्याच्या करिअरमध्ये वेगळेपणा म्हणून विशेष काहीच नाही, असे धाडसी भाष्यही लेखकाने या पुस्तकाद्वारे केले आहे.

हे पुस्तक चित्रकलेमध्ये विशेष रस नसणार्‍यांसाठी क्लिष्ट ठरू शकेल. परंतु चित्रकलेच्या विद्यार्थिवर्गासाठी, कलाशिक्षक आणि अभ्यासकांसाठी कमालीचे वाचनीय आणि संग्राह्य आहे. एकूणच पिकासोच्या मध्यमवर्गीय वडीलांनी अचानक पेंटिंग करणे सोडून सगळे साहित्य १४ वर्षांच्या मुलाला देऊन का टाकले ? पिकासोने स्पेन का सोडले ? फ्रान्सच्या कला चळवळीचा मोठा तारा म्हणून पिकासो उदयास कसा आला ? तो घनवादाचा (क्युबिझम) जनक कसा ठरला ? जगातला सर्वाधिक मूल्य असलेला चित्रकार कसा बनला ? कलारसिकाला सतावणारया अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या पुस्तकातून मिळतातच ; पण पिकासोच्या संदर्भातली अनेकांना पडलेली कोडी, त्याच्या व्यक्तिमत्त्वाभोवतीचे गूढ वलय भेदण्यातही पुस्तकाचा लेखक यशस्वी ठरला आहे.

आयुष्याच्या अखेरीस मात्र या जगातील आजच्या प्रेरणांपेक्षाही त्याला आदिमानवी वृत्तीची ओढ लागली. त्याचा कलाविष्कार आदिमानवी गुणवत्तेने बहरून आला. पशू, पक्षी, घुबडे, विदूषक या विषयांत तो बुडून गेला. मिनोटॉर (नृवृषभ), सेंटॉर (हयग्रीव) या ग्रीक अलौकिक पौराणिक प्राण्यांमधील पाशवी शक्तीचा ठाव त्याने आपल्या रेखनांतून आणि शिल्पांतून घेतला. सर्कशीतील कसरती आणि बैलझोंबी या जीवनमरणाशी मुकाबला करणार्‍या स्पॅनिश लोकांच्या आवडत्या खेळांचे त्यासा बालपणापासून आकर्षण होते, हे त्याच्या चित्रांवरून दिसते. आयुष्याच्या अखेरीस मृत्स्नाशिल्पावर त्याने रंगविलेली या विषयावरील चित्रे रेषात्मक चैतन्याने अजोड ठरणारी आहेत. वयाच्या ब्याण्णव्या वर्षी पिकासोचे फ्रान्समधील मॉगीन्स या गावा हृदयविकाराने निधन झाले आणि त्याच्या मृत्यूने विसाव्या शतकातील खळबळजनक पिकासोपर्व संपले.

चित्रकला आणि शिल्पकला या कलेच्या दोन प्रांतातील साधकांचा देव समजला जाणारया पिकासोची ही चित्तरकथा बरीचशी रोमहर्षक, प्रेरणादायी आहे आणि काहीशी विमनस्क अशीही आहे...

- समीर गायकवाड.