Sunday, March 27, 2016

वळवाचा पाऊस....दूरवर उडणारया टिटव्यांचा टीटीवीटीव टीवचा आवाज, चिंच लिंबांच्या झाडांतून मधूनच येणारा होल्यांचा आवाज अन जोडीला सुतार पक्षाची टोकटोक इतकं सोडल्यास दूरवर कुणीच बोलत नसतं. कंटाळवाणं झालेलं निळं आकाश बगळ्यासारखं मान वाकवून मातीकडे सुकल्या ओठांनी बघत असतं. वितळत्या उन्हात आभाळाकडे तोंडे करून झाडे मुक्याने उभी असतात. झाडांची थरथरणारी सावली मागेपुढे होत असते, कवडशांचे डाव मातीत उतरवत असते. त्राण नसलेला वारा आस्ते कदम पानांच्या देठांना कुरवाळत फिरतो, पिकल्या पानांचे अश्रू सोबत घेऊन पुढे जात राहतो.

नुकतेच फुटलेले कोंब उष्म्याने कावरे बावरे होऊन गेलेले असतात. अवती भोवती थिरकणाऱ्या नाजूक फुलांच्या रंगीबेरंगी कोमल पाकळ्या एव्हाना शुद्ध हरपून गेलेल्या असतात. डोक्याचे ओझे झालेल्या माणसागत फुलांचे गुच्छ मातीच्या दिशेने लोंबकळत असतात. भिरभिरणारी फुलपाखरे हरेक फुलांची समजूत घालत त्यांना सबुरीचा सांगावा देत जलदगतीने फिरत असतात. झाडांच्या सुन्या ढोलीत कोळ्याचे बिऱ्हाड स्वतःच्याच जाळ्यात अडकून पडलेले असते अन पिंपळाच्या फांद्यांच्या गुंत्यात तरंगत असणारया घरट्यांच्या काटक्या एकेक करून हळूहळू निखळत असतात. विड्याच्या पानात कात गुंजपत्ता पडावा तसा चिंचेचा पाला गिरक्या घेत मातीवर नक्षी काढत पडत असतो.

बांधावरच्या दगडातल्या कपारीतले सरडे भर उन्हात भक्षाची वाट बघत निपचित बसून असतात, वाळलेल्या गवतातले सोनकिडे माती उकरत जमेल तितके खाली जात असतात. वडाच्या बुंध्यावरचे लालकाळे मुंगळे मात्र जगबुडी झाली तरी आम्ही जगणारच याच तोरयात आपापल्या रांगांत कामाला जुंपून असतात, समोरून येणारया प्रत्येकाला ख्याली खुशाली विचारत ते आपल्याच नादात एका तालबध्द लयीत पुढे जात असतात. बांधावरच्या बोरीबाभळी ओशाळवाण्या होऊन एकमेकींच्या फांद्याना खोटा खोटा धीर देत खेटून उभ्या असतात. पाटाच्या कडेने शिल्लक असलेल्या थोड्याशा ओलाव्यासाठी रातकिडयांचा आटापिटा सुरु असतो, रात्रीच्या गायनासाठी त्यांचा दिवसाच रियाज सुरु असतो. जवळच असणारया ताशीव दगडी विहिरीचा तळ वर आलेले असतो, त्यातल्या गाळाची आतडी कातडी दिसत असतात, विहिरीच्या माथ्यावर दबा धरून बसलेले जिद्दी बगळे त्यातल्या पानकिडयांचा शोध हळूच सूर मारून घेत असतात.

विहिरीत घुमणारया पारव्यांचा आवाज ऐकून विहिरीजवळच्या झाडाखाली बांधलेले बैल उगाच कान टवकारत असतात. आपलं रेशमी शुभ्र अंग थरथरवत उदास झालेल्या वशिंडाला झुलवत राहतात. बैलांच्या गळ्यातल्या घुंगरमाळांचा आवाज ऐकताच गोठ्यात डोळे मिटून बसलेल्या गायी किंचित जाग्या होऊन पोटात काहीही गेलेलं नसलं तरी सवयीप्रमाणे रवंथीस सुरुवात करतात. रवंथ करताना हलणाऱ्या जबड्यामुळे तिच्या शिंगावर बसलेले रानपाखरू उडून जातं अन अंगावरची चिवट गोचिडे थोडी वरखाली होतात. गायींनाही त्यांची ब-यापैकी सवय झालेली असते. सावलीतली सगळी गुरे बसल्या बसल्या मातीवर शेपटी आपटून आपली कैफियत मातीला सुनवत राहतात. माती मन लावून त्यांचे मुके बोल ऐकत राहते. खरे तर मातीला स्वप्नं पडत असते, मृदगंधात चिंब भिजणाऱ्या चराचराचे !

जळून गेलेली पिके अजूनही उभी असतात, काही झालं तरी आडवं व्हायचं नाही. मोडले तरी चालेल पण कधीच वाकायचे नाही हेच जणू ते शिकवत असतात. काळपट, तेलकट झालेली जुंधळ्याची ताटं ताठकळत उभी असतात, जणू दिनवाण्या मुद्रेने ताठ बाण्याचं महत्व उनाड वाऱ्याला सांगत असतात. उलुन गेलेल्या भुसभुशीत मातीत गवताचे पिवळट मळके कोंब माना टाकून पडलेले असतात. भरकटलेल्या वाऱ्यावर उडत आलेला पानगळीचा वाळका पाचोळा अंग चोरून ढेकळाच्या तळाशी दडलेला असतो. कोंदटलेल्या दिशांनी येणारा वारा भकास माळावर येताच त्याला गर्मीने धाप लागलेली असते. मोठाल्या खडकात तो अडखळून जातो. तर शिवारसमृद्धीच्या पत्त्याची माहिती देताना चकवा झाल्यागत एखादी वावटळ स्वतःलाच उडवून देते. वावटळीत उडालेल्या धुरळ्यात मातीची स्वप्नेही कैद असतात, वावटळ उंच गेली की मातीच्या स्वप्नाचे दुःख आभाळाला कळते अन त्याच्या मनात कराल घालमेल सुरु होते. दूरवर पांगलेले ढग एकत्र येऊन बंड करतात, सौदामिनी संगं आली तर तिच्यासवे नाहीतर तिला सोडून ते मेघदुंदुभी वाजवू लागतात. आभाळातले सगळे मायेचे पूत गोळा होतात, डबडबलेल्या डोळ्यांचे काळेसावळे मेघ गोळा होताच त्यांच्या अश्रूंच्या धारा तहानलेल्या वसुंधरेवर वेड्यावाकड्या कोसळू लागतात, बेभान होऊन नभातून पाझरू लागतात. मेघातून येणारा प्रत्येक थेंब मातीच्या कणाकणाला गोंजारत तिच्या कुशीत शिरतो अन आपल्या कुशीतला प्रत्येक थेंब माती तृप्ततेने विरघळवत राहते.

चंद्रमौळी घरातला बळीराजा धावतच बाहेर येतो, सुरकुतल्या चेहरयाने आभाळाकडं बघत घामेजले हात जोडतो अन वळवाच्या पहिल्या पावसाच्या सरी ओंजळीत साठवतो. वळवाचे ते थेंब जीवदान देऊन जातात मातीला, मातीतल्या कोंबांना, कोंबातल्या उर्मीला, घरट्यातल्या पिलांना, पडवीतल्या वासरांना, पिकातल्या अखेरच्या धुगधुगीला, सुकलेल्या पानांना, कोमेजल्या फुलांना, तारवटल्या फांद्यांना अन विस्कटल्या धन्याला !

वळवाच्या पावसाने पिकत काहीच नसते, त्यातून उत्पन्न काहीच घटतही नाही अन वाढतही नाही, त्यातून पिके जोमात येतात असंही नाही. मात्र वळवाचा पाऊस जिद्द जिवंत ठेवतो अन हरत आलेली बाजी हाती आणून देतो. वळवाचा पाऊस, स्वप्नं बघण्याची उमेद जिंवंत ठेवतो हा त्याचा सर्वात मोठा गुण आहे. कडक उन्हाच्या झळांमुळे यंदाच्या वळवाच्या पावसाची ओढ जास्ती आतुरतेने लागून राहिली होती, कालपरवा ती पुरी झाली पण पावसाने पार कणाच मोडला, तरीही मातीचा हा पूत अजूनही तिच्यासाठी झिजायला आसुसलेलाच आहे.....

- समीर गायकवाड