Wednesday, March 23, 2016

एलिझाबेथ टेलर - रिअल लाईफ 'क्वीन क्लिओपात्रा' ...

असीम सौंदर्य, दमदार अभिनय आणि मुक्त जीवनाच्या उन्मत्त आविष्काराचं एकच नाव असू शकतं ते
high voltage Elijhabeth  ...
म्हणजे एलिझाबेथ टेलर. एखाद्या अभिनेत्रीच्या वाट्याला दीर्घ आयुष्य येणं बरं नव्हे, असं म्हणतात. तरुणपण व सौंदर्याच्या खाणाखुणा पुसल्या जाणं रसिकांच्या काळजाला चिरणारं असतं. लिझच्या बाबतीत असं झालं नाही. चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांपेक्षाही तिचे निळेजांभळे डोळे रसिकांचा ठाव घेत राहिले. व्हीलचेअरवरच्या एलिझाबेथला पाहून कुणी चुकचुकलं नाही. उलट तिचं या वयात प्रेमात पडणं, लग्न आणि घटस्फोटाला सामोरं जाणं लोकांच्या अधिक लक्षात राहिलं. तिचा अभिनय २५ वर्षांपूर्वीच थांबला होता. चर्चेत असणं मात्र कायम होतं.
गेल्याच आठवड्यात नवऱ्याला उपचारांसाठी पैसे देण्याचं तिनं नाकारलं होतं, त्याची बातमी झाली. बालकलाकार ते ऑस्करविजेती अभिनेत्रीच्या या प्रवासात अभिनयापेक्षाही जास्त चर्चा झाली ती तिच्या आठवेळा लग्नांची. त्यातही रिचर्ड बर्टनबरोबर दोनदा लग्नांची. अखंड धुम्रपान, दारूच्या आहारी जाणं किंवा नैराशग्रस्त होऊन मानसोपचार घेणं, हा तिच्या आयुष्याचा भाग होता.

मध्यमवयीन एलिझाबेथ ..
 लिझचं मैत्रीला जागणं ही गोष्टही कायम चर्चेत राहिलेली. मायकल जॅक्सनबरोबरची तिची मैत्री जगजाहीर होती. नेव्हरलंड रँचमध्ये मायकलच्या होम थिटएरवर २४ तास लिझचेच चित्रपट लावलेले असत. १९८९ मध्ये तिने  मायकलच्या गाण्यातलं वकूब पाहता त्याला ' किंग ऑफ पॉप ' ही पदवी एका रॉक कॉन्सर्टमध्ये बहाल केली होती. मायकल मुलावरील लैंगिक अत्याचार प्रकरणात अडकल्यावर त्याच्यामागे खंबीरपणे उभी राहिली ती लिझच. याची परतफेड म्हणून तिच्या ६५व्या वाढदिवसाला 'एलिझाबेथ, आय लव यू' हे गाणं मायकलने सादर केलं. गायक रॉक हडसन समलैंगिक आहे कळल्यावर माजलेल्या कल्लोळातही तिने त्याच्याशी मैत्री कायम ठेवली. त्याचं एड्सने निधन झाल्यावर त्याच्या नावाने चॅरेटीही सुरू केली.

तिची आई नाटकात काम करायची. केवळ मित्राने सुचवलं म्हणून तिला ऑडिशनला नेलं होतं. लिझचा चेहरा
ऑस्करसह लिझ ..
इतका बोलका होता की मोठ्या स्टुडिओची कामं पटकन मिळाली. १९४४मध्ये आलेल्या 'नॅशनल व्हेलव्हेट'ने तिला स्टारडम मिळालं. अठराव्या वषीर् हिल्टन हॉटेल्सचे मालक निकी हिल्टनशी लग्न ही लिझच्या 'लार्जर दॅन लाइफ'ची सुरुवात होती. जेम्स डीन्सबरोबरचा 'जायंट'ने लिझने स्वत:चं असित्व दाखवलं होतं. १९६०मध्ये आलेल्या 'बटरफिल्ड ८'मध्ये रागाने आरशावर लिपस्टिकने 'नो सेल' लिहिण्यातच सारं काही आलं होतं. लिझच्या अभिनेत्री असण्यावर ऑस्करची झळाळी आली. तोवरचे चित्रपट म्हणजे तिच्या सौंदर्याला आणि मादकतेला वाव देणारे होते.

हॉलीवूड क्लासिक समजला जाणारा ‘क्लिओपात्रा’ हा तिच्या आयुष्यातला सर्वार्थाने महत्त्वपूर्ण सिनेमा. याच सिनेमाच्या सेटवर रिचर्ड बर्टन आणि तिच्यात वादग्रस्त प्रेमप्रकरण फुललं. त्यावेळी दोघेही विवाहित होते. सिनेमातली लिझ इतकी अप्रतिम होती की अशी क्लिओपात्रा कधी होणेच नाही. या सिनेमासाठी तिने एक कोटी डॉलर्स मानधन घेतलं होतं. पुढे रिचर्ड बरोबरच्या 'हू अफ्रेड ऑफ व्हजिर्निआ वूल्फ'मधून तिच्या वाढलेल्या वयाची आणि गंभीर अभिनयाची जाणीव झाली.

एकेकाळी लक्षावधी चित्रपटरसिकांच्या हृदयावर राज्य करणारी हॉलीवूड सम्राज्ञी एलिझाबेथ टेलर हिच्या
उतारवयातली एलिझाबेथ .....
हृदयाच्या झडपेवर शस्त्रक्रिया केली गेली तेंव्हा तिचे वय होते ७७ वर्षे !  ती हृदयविकाराबरोबरच अन्य व्याधींनी ग्रस्त होती,तेंव्हा तिला व्हीलचेअरचा आधार घ्यावा लागत आहे.यावेळी तिने तिच्या ब्लॉगवर लिहिले होते, "प्रिय मित्रांनो, वृत्तपत्रांमधून कळण्याआधीच एक माहिती मला तुम्हाला सांगायची आहे. हृदयावरील शस्त्रक्रियेसाठी मला रुग्णालयात दाखल व्हावे लागणार आहे. हृदयाची झडप दुरुस्त करण्यासाठी ओपन हार्ट सर्जरी टाळून नव्या पद्धतीने ही शस्त्रक्रिया करावी लागत आहे. ती यशस्वी झाल्यानंतर माझे हृदय सुरळीतपणे काम करू लागेल.  तुमच्या सदिच्छांचे मी स्वागतच करेन. सर्व काही सुरळीत झाल्यानंतर मी पुन्हा तुमच्या भेटीला येईनच.’’

यापूर्वीच्या २५ वर्षांच्या कालावधीत आपण शंभरावर सर्जरी केल्या असून, आता आपल्याला कोणतीही सर्जरी करायची नसल्याचे तिने यावेळी प्रांजळपणे सांगितले होते ! आजवरच्या शस्त्रक्रियांमुळे आपल्याला थकवा जाणवत आहे. आपण आतापर्यंत शंभरावर सर्जरी आपल्यावर करून घेतल्या आहेत. आता यापुढील काळात आपल्यावर कोणतीही सर्जरी करण्यात येऊ नये असे तिने आपल्या कुटुंबीयांना बजावले होते. टेलरला स्कोलिआसिस नावाचा आजारही होता तोदेखील तिने कुणापासून लपवला नव्हता अन तिला त्याच्यावरचे उपचार दिले जात होते. सौंदर्य आणि मादकता याबाबत तिने तडजोड केली नाही मात्र त्यासाठी काया पणाला लावली होती. अन हे तिने ओपन सिक्रेट ठेवले होते.

दागिन्यांची आवड 'माय लव अफेअर विथ ज्वेलरी' या पुस्तकातून लिझने लिहिली. सद्दामविरोधी कारवाया करणारे जॉर्ज बुश तिसरं महायुद्ध लादत असल्याचं सांगून ऑस्करला उपस्थित राहण्याचं तिने नाकारलंं. सतत प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या लिझच्या आयुष्यातल्या फार चर्चा न झालेल्या या गोष्टी लिझ केवळ अभिनेत्री नाही तर एक आगळं व्यक्तिमत्त्व होते, हे सांगणाऱ्या होत्या.


सौंदर्यसम्राज्ञी  एलिझाबेथ टेलर ...
 हॉलीवूडचा रूपेरी पडदा एकेकाळी आपल्या सौंदर्याने झळाळून टाकणारी ही रूपगर्विता एलिझाबेथ टेलर कॅलिफोर्नियातील तिच्या राहत्या घरी २०११ मध्ये आजच्या दिवशी म्हणजे २३ मार्च रोजी निवर्तली होती. तिच्या मृत्यूनंतर दोनच वर्षात तिच्या या घराची विक्री झाली होती. १९८१ च्या सुमारास तिने हे घर विकत घेतले होते. या घरात पाच शयनगृहे, अलिशान स्नानगृहे, धबधबा असलेले तलाव होता. ८७ लाख डॉलर हे या घराचे प्राथमिक मूल्य सांगितले जात होतं यावरून लिझच्या श्रीमंतीची कल्पना यावी ! एलिझाबेथ टेलर आयुष्याच्या अखेरीस याच घरात रहात होती त्यामुळे या घराला भावनिक महत्त्वही होते. लिझच्या ख्रिस्तोफर वाइल्डिंग या मुलाने तिची आठवण सांगताना लिहिले आहे की, 'या घरात ईस्टरच्या पार्टीला मोठा जल्लोष असे. लिझचा बाहेरच्या जगाशी फारसा संपर्क नव्हता आणि अखेरच्या काळात ती आपल्याच विश्वात दंग असे.
मेट्रो-गोल्डविन-मेयर कंपनीच्या चित्रपटांतून बालकलाकार म्हणून चित्रपटक्षेत्रात पदार्पण केलेली टेलर
एलिझाबेथ बालपणी ..
हॉलिवुडाच्या सुवर्णकाळातली अतिशय यशस्वी अभिनेत्री ठरली. कारकिर्दीत अनेक पुरस्कार व मानसन्मान कमवलेली आणि वैशिष्ट्यपूर्ण असे निळे डोळे असलेली टेलर अप्रतिम लावण्य, उच्च राहणीमानामुळे प्रकाशझोतात राहिली. एलिझाबेथ टेलरने 'जायंट', 'कॅट आॅन अ हाॅट टिन रूफ', 'क्लिओपात्रा', 'नॅशनल वेलवेट' यासारख्या गाजलेल्या चित्रपटात भूमिका केल्या होत्या. 'बटरफिल्ड ८' आणि 'हू इज अफ्रेड आॅफ व्हर्जिनीया वूल्फ' या चित्रपटातील अभिनयासाठी तिला आॅस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

मधल्या काळात विल्यम पॉवले ज्यु. या आपल्या पहिल्या प्रियकराला एलिझाबेथ टेलरने लिहिलेल्या प्रेमपत्रांचाही लिलाव झाला. एलिझाबेथ ही चित्रपटसृष्टीत येण्याआधीचे हे प्रेमप्रकरण होते आणि ते जेमतेम वर्षभर टिकले. या ऑनलाइन लिलावात साठ पत्रे विकली गेली. लिलावाची अंतिम बोली ४७ हजार डॉलर एवढी झाली.या लिलावांवरून लिझची चाह्त्यांमधील क्रेझ ध्यानात येते.

लिझ लग्नाच्या बोहल्यावर ...
 लिझ ही ब्रिटनमध्ये जन्मलेली अमेरिकन होती अभिनेत्री होती. तिने सात पुरुषांसोबत आठ वेळा लग्न केले होते. तिने १९५० मध्ये वयाच्या १८ व्या वर्षीच पहिल्यादा कोनरॅड निक्की हिल्टनसोबत लग्न केले होते. जे फक्त नऊ महिन्यात लग्न तुटले. एलिझाबेथ टेलरने दुसरे लग्न फेब्रुवारी, १९५२ मध्ये मायकल विल्डिंगसोबत केले जो तिच्यापेक्षा २० वर्षांनी मोठा होता. जानेवारी, १९५७ मध्ये एलिझाबेथने विल्डिंगसोबत घटस्फोट घेतला व पुढच्याच महिन्यात फेब्रुवारीत मायकल टोडसोबत लग्नाच्या आणाभाका घेतल्या. १२ मे १९५९ रोजी तिने एडी फीशरसोबत लग्न केले जे मार्च १९६४ पर्यंत टिकले. त्याच महिन्यातील १५ मार्चला एलिझाबेथ टेलरने रिचर्ड बुर्टनसोबत लग्न केले जे तब्बल दहा वर्षे टिकले. अखेर जून १९७४ मध्ये तो दोघे विभक्त झाले व घटस्फोटही घेतला. या काळात सोळा महिने वेगळे राहिल्यानंतर एलिझाबेथ टेलरने पुन्हा एकदा रिचर्डसोबत दुस-यांदा लग्न केले. रिचर्डसोबतचे हे दुसरे लग्न जुलै १९७६ पर्यंत टिकले. डिसेंबर,१९७६ मध्ये तिने जॉन वार्नरसोबत लग्न केले. हे लग्न नोव्हेंबर, १९८२ पर्यंत टिकले. एलिझाबेथने शेवटचे लग्न लॅरी फॉर्टेंस्की यांच्यासोबत ऑक्टोबर, १९९१ मध्ये केले. पाच वर्षानंतर लॅरीसोबत तिने घटस्फोट घेतला. त्यानंतर मात्र तिने लग्न केले नाही.

या आठ लग्नांच्या काळात एलिझाबेथ टेलरला वेगवेगळ्या पुरुषांपासून चार मुले झाली. एलिझाबेथला दहा नातू आणि १४ पणतू झाले होते.
बीबीसीवर एलिझाबेथ टेलरचा एक कार्यक्रम सुरु होता त्यात ती काही तरुण-तरुणींना प्रश्न विचारत होती. तिने
लिझ - रिअल लाईफ क्लिओपात्रा .. 
एक प्रश्न विचारला, ‘रॉनेल नंबर फाइव्ह’ हे पर्फ्यूम कधी लावतात?’ गंमत म्हणजे बीबीसीच्या त्या कार्यक्रमातल्या गौरांगनांना याचे उत्तर माहीत नव्हतं. ‘हाजमोला कधी घ्यावं?’ याचं उत्तर द्यावं त्या सहजतेने तिने म्हटलं, ‘रात्री झोपताना’!  एलिझाबेथ ही रसिक होती तिला सौंदर्यासक्ती होती, तिला सुगंधाने झपाटले जात असे. याचे कारण ती श्रीमंत होती, तिला आठ श्रीमंत नवरे होते, तिची लाईफ स्टाईल हाय प्रोफाईल होती हे नसून ती मुळचीच संपन्न अभिरुची व सौदर्यवेडी होती, जोडीला तिचे स्वतःचे आरसपानी सौदर्य अन उत्तुंग प्रतिभा यांनी तिच्यावर गारुड केले होते. क्लिओपात्रा या इजिप्तशियन सौंदर्यवती राणीने दोन महापुरुषांना वश केलं होतं. एक ज्युलिएस सिझर, दुसरा मार्क अँटोनी! ती पर्फ्यूमचा प्रचंड वापर करायची. ती तिच्या बोटीच्या शिडांवर अत्तर शिंपडायची. त्यामुळे ती किनाऱ्यावर उतरण्यापूर्वी ती आल्याची वर्दी त्या पर्फ्यूमचा वारा द्यायचा. वाऱ्याने तो सुगंध किनाऱ्यावर पोचलेला असायचा. सुगंधी रसिकतेचा हा कडेलोट असावा. क्लिओपात्राचे पात्र पडदयावर साकारणारी लिझ वैयक्तिक आयुष्यात देखील क्लिओपात्राची लाईफ खरया अर्थाने जगत होती असं म्हणणे वावगे ठरणार नाही.....

निळ्याजांभळ्या डोळ्याच्या एलिझाबेथचे माझ्या किशोरवयात पाहिलेले सिनेमे पाहताना अजूनही मी हरखून जातो अन मनाच्या पटलावरील 'रुपेरी पडदा' कधी तिच्या सुगंधाने भारला जातो काही कळत नाही......

- समीर गायकवाड.