Sunday, March 13, 2016

मनोरंजांची अक्षय शिदोरी - 'शोले' !!"आओ ठाकूर, मैं जानता था की तुम जरूर आओगे !" कानात सोन्याची बाळी अडकवलेला, दाढीचे खुंट वाढलेला, शर्टच्या वरच्या दोनचार गुंड्या तशाच मोकळ्या ठेवून मळक्या कपड्यातला गब्बरसिंह आपल्या डाव्या हातावर रुमालात गोळ्यांचा पट्टा बांधून अन उजव्या हाताच्या मनगटावर पाचसहा पदरी काळा धागा गुंडाळून मुठीत धारदार तलवार सहज धरून किंचित वाकून ठाकूर बलदेवसिंहच्या दिशेने चालत जात पुटपुटतोय.
टेकड्यासारख्या आकारांच्या भल्या मोठ्या शिळांच्या चोहूबाजूने राशी लागलेल्या आहेत, त्याच्या मधोमध खंदकासारखा करड्या मातीचा सपाट पृष्ठभाग आहे. मचाणासारखे आडोसे तयार करून त्याखाली घोडे बांधून ठेवलेले आहेत, काही दोरयांवर कपडे वाळत घातलेले आहेत अन तिथल्या प्रत्येक दगडावर डाकू आपल्या बंदुका तयारीत धरून बसलेले आहेत. काही दगडांना बाज टेकून ठेवलेल्या आहेत तर काही ठिकाणी लाकडी तिवया उभ्या आहेत. कंबरेला भला मोठा पट्टा बांधून डोक्याला भडक रंगाचे फेटे गुंडाळलेले गब्बरच्या टोळीतले डाकू त्याच्यासारखेच अमानुष चेहऱ्याचे आहेत. रामगढ पासून कोसो दूर असलेल्या गब्बरच्या ह्या अड्ड्यावर आकाशी रंगाच्या सफारीच्या वेशातल्या ठाकूर बलदेवसिंहचे दोन्ही हात बेड्यांनी करकचून आवळलेले आहेत अन त्याच्या दोन्हीबाजूंनी दंडाला धरून आणि त्याच्या मागेही बंदुका ताणून धरलेले डाकू उभे आहेत. काही वेळांपूर्वीच त्याला डाकुंनी जेरबंद करून इथे आणून गब्बरच्या समोर उभे केले आहे. त्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी ठाकूरची पाण्याबाहेर असलेल्या माशासारखी तडफड सुरु आहे. हातात तलवार धरलेला गब्बर जवळ येताच ठाकूरची तडफड आणखी वाढते, बांधलेल्या अवस्थेतच तो त्याच्या अंगावर जाऊ पाहतो पण त्याला आवळून धरणाऱ्या डाकूंची पकड मगरमिठीसारखी आहे तो नुसताच जीवाचा आकांत करतो आहे. त्याची ही तडफड पाहत आपल्या सहकाऱ्यांकडे मोठ्या खुशीने बघत कुत्सितपणे हसत गब्बर उद्गारतो,"हीही हा हाहा हा कैसा फडफडा रहा है साला ! "

गब्बरचे विकृत हसणे अन चेहऱ्यावरील निर्लज्ज अविर्भाव बघून ठाकूर रागाने लालबुंद होऊन जातो. आपल्या धारदार आवाजात गब्बरला "कमीने, कुत्ते !" म्हणणारा दात ओठ खात डोळ्यातून अंगार ओकणारा ठाकूर बलदेवसिंह आता पुरता त्वेषाने उफाळून निघालाय, त्याच्या तोंडून ह्या शिव्या ऐकून अन त्याचा असह्य चडफडाट बघून गब्बरला आणखी चेव येतोय. वर मान करून गब्बर आता जोरात हसू लागलाय. गब्बर हसताना त्याच्या गोऱ्यापान गळ्याला आवळून बांधलेला काळा कडदोरा अन त्यात अडकावलेली चपटी झालेली छोटीशी मळकट पितळी पेटी त्याच्या गळ्याला आणखी घट्ट आवळताहेत पण गब्बर आपल्याच विकृत आनंदात आहे ! "दे जितनी गाली देनी है ठाकूर, जी भर के गाली दे !"

संतापलेला बेभान झालेला ठाकूर गब्बरपेक्षाही आवेशाने ओरडतो, "हरामजादे !" त्याच्या या शिव्यांनी आता गब्बरमधला सैतान जागा होतो अन तो आपल्या जरबयुक्त आवाजात त्याला सुनावतो, "चिल्लाओ और चिल्लाओ ! याद है ?, उस दिन मै चिल्ला रहा था तुम तमासा देख रहे थे l आज तुम चिल्लाओ मै तमासा देखुंगा ! " आपल्या डाव्या हाताने छातीवर हात बडवत, ठाकूर बलदेवसिंहला आणखी चिथावण्याचा प्रयत्न आता गब्बर करू लागलाय.

एव्हढे बोलून गब्बर झर्रकन मागे वळतो आणि इकडे तिकडे बघत सांभाला सांगतो की, "है सांभा, उस रोज कचहरीमें ऐसा ताप मुझको ! ऐसा ताप मुझको !" आपल्याला ठाकूरने जेंव्हा कैद केले होते तेंव्हा फार मोठे अत्याचार केल्याच्या अविर्भावात गब्बर त्याच्या साथीदारांना त्या दिवशीच्या घटनेची माहिती देऊ लागलाय अन इकडे ठाकुरची धडपड चालूच आहे.

"अवसर मिलता तो वही हरामजादेका टेटवा दबा देता l मगर करता क्या ? चार चार पुलिसवाले पकडे हुये थे, हाथ में हथकडी, पैरोंमें बेडी ! ...याद हैं ?" ठाकूरकडे बघत मोठ्या जोशात गब्बर आता त्यालाच प्रतिप्रश्न करू लागलाय जणू काही अन्याय ठाकूरवर झाला नसून गब्बरवरच झाला आहे असा त्याचा सगळा रोख आहे.

"याद हैं ?" असा प्रश्न करत आपल्या बुटांचा आवाज करत गब्बर ठाकूरच्या जवळ जाऊन उभा राहतो अन हातातल्या तलवारीचे पाते ठाकूरच्या छातीवर हलकेच उलटे फिरवत त्याला विचारतो, " कोई आखरी ख्वाईस है, तुम्हारी ठाकूर ?" गब्बरची ही हरामखोरी पाहून क्रुद्ध झालेला ठाकूर त्याच्या तोंडावर जोरात थुकतो अन सगळा आवेश एकवटून बांधलेल्या हातानेच समोर उभ्या असलेल्या गब्बरला एक ठोसा लगावतो. ठाकूरने सर्व ताकदीनिशी लगावलेल्या ठोशाने गब्बर भेलकांडतो तो थेट मागे असलेल्या दगडावर जाऊन पडतो. दगडावर पडल्या पडल्या तो ठाकूरकडे बघत आपला निर्णय बदलतो.

"अभी तक बहुत जान बाकी है तेरे हाथो में l " गब्बरच्या डोक्यात काय चालले आहे याचा अंदाज न आलेला ठाकूर अजूनही प्राणांतिक धडपड करतो आहे, त्याला धरून उभे असलेल्या आपल्या सहकारयांकडे बघत बघत गब्बर हुकुम सोडतो की, "बांध दो साले को !"

ठाकूरला आता फरफटत ओढत दोन दगडी खांबांच्या मध्ये आणून उभे केले जातंय अन समोर उभा असलेला गब्बर आपल्या डाव्या हाताच्या मनगटावर आवळून बांधलेला गोळ्यांचा पट्टा हाताला झटका देऊन भिरकावून देतो अन तलवार घेऊन शेजारी उभ्या असलेल्या त्याच्या सहकाऱ्याला इशारा करतो तसा तो आपल्या हातातली तलवार गब्बरच्या दुसऱ्या हातात ठेवतो. आता गब्बरच्या दोन्ही हातात धारदार नंग्या तलवारी आहेत तर त्याच्या समोरच्या ठाकूरची ससेहोलपट सुरुच आहे, त्याच्या हाताच्या बेड्या काढून आता त्याचे दोन्ही हात वरच्या दिशेने ताणून दगडी खांबात ठोकलेल्या, खळखळा आवाज करणारया साखळदंडाला बेडयांनी बांधेलेले आहेत.

"अब मै तुझे जानसे नही मारुंगा, वो हाल करके छोडूंगा की, दुनिया थुकेगी तुझपर !" असं म्हणत दोन्ही हातात तलवारी घेतलेला गब्बर ठाकूरच्या पाठीमागे येऊन उभा राहतो. गब्बरचे सगळे सहकारी डाकू आता गंभीर मुद्रेने त्याच्याकडे लक्ष देऊन आहेत, तिथेच उघड्यावर पेटवलेल्या चुलींमधला धूर हवेत पसरत जाऊ लागलाय आणि पार्श्वभूमीवर कानात गरम शिसे ओतावे तसे भोंगा वाजणारे पार्श्वसंगीत घुमते आहे, रोरावणाऱ्या वाऱ्याचा आवाज देखील आता खूप मोठा वाटू लागला आहे.

"बहुत जान है तेरे हाथोमें, ये हाथ लगाम पकडकर घोडेपे बिठा देते है..., बहुत जान है तेरे हाथो में ! " आपल्या हातातील तलवारी ठाकूरच्या खांद्यावरून अलगद फिरवत गब्बर छद्मी आवाजात, नाटकी ढंगात त्याला विचारतो, "याद है ठाकूर, क्या कहे थे तुम ? ये हाथ नही, फांसी का फंदा हैं !"
"देख, फंदा खुल गया !…खुल गया फंदा !!… बहुत जान हैं हांथोमे !" गब्बरने आता हातातल्या तलवारींचे पाते ठाकूरच्या खांदयावर टेकवलेले आहे.
"ये हाथ हमको दे ठाकूर, ये हाथ हमको दे ठाकूर !" असं पुटपुटणारया गब्बरच्या डोक्यात काय चालले आहे याचा पत्ता लागलेला ठाकूर अजूनही घाबरलेला नाही मात्र तो 'नही नही' असं मान हलवून खुणावतोय. गब्बरचा आवाज आता टिपेला पोहोचला आहे अन त्याने त्वेषाने हात आकाशाकडे उंचावले आहेत अन तो वेगाने हात खाली घेऊन येतोय, काही घटिकाभरात आता आपले हात विलग होणार याचा अंदाज आलेला ठाकूर जोराने आरोळी मारतो आणि त्याच्या आरोळीत आपला आवाज मिसळत गब्बर आपल्या हातातल्या तलवारी खाली खेचतो !

तो दिवस जणू आजही ठाकूरच्या थिजलेल्या डोळ्यात जसाच्या तसा तरळत असल्यागत ठाकूरच्या अंगावरची शाल वारयाच्या हब्क्याने उडून पडते अन हताश चेहऱ्याच्या ठाकूर बलदेवसिंहच्या तोंडून एक सुस्कारा बाहेर पडतो. त्याचे दोन्ही हात खांद्यापासून कलम केलेले आहेत हे बघून समोर उभे असलेले जय आणि विरू अगदी हैराण होऊन गेले आहेत, हे दृश्य पाहणाऱ्या बसंतीच्या चेहऱ्यावर वेदनेची एक रेष तरळून जाते, ठाकूरची छोटी बहु मात्र या सगळ्या प्रकाराने सद्गदित झालीय, तर बाजूलाच उभा असलेला रामलाल दिग्मूढ झालाय ! एका पडक्या कौलारू घराच्या पडवीत पांढऱ्या शुभ्र वस्त्रातला ठाकूर अगदी असहाय्य अवस्थेत उभा आहे अन भोवताली उभ्या असणारया सगळ्यांच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसतो आहे. ठाकूरची छोटी बहु जय आणि वीरूकडे रागाने एक कटाक्ष टाकते, त्या सरशी ते दोघे माना खाली करतात. मोकळ्या कपाळाची पांढऱ्या साडीतली छोटी बहु त्या दोघांकडे काही क्षण रागाने पाहते आणि ठाकूरच्या मागे पडलेली त्याची राखाडी रंगाची शाल उचलून त्याच्या खांद्यावर घालते.

आपल्या धाकटया सुनेने खांदयावर शाल घालताच ठाकूर त्या घराच्या पडवीतून बाहेर पडतो आणि समोर खाली मान घालून उभ्या असलेल्या जय - वीरू कडे अन आजुबाजूला उभ्या असणाऱ्या गावकऱ्यांकडे एक खिन्न नजर टाकतो अन गर्दीतून वाट काढत सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव वाचत पुढे जाऊ लागतो. दुपारची उन्हे कलली आहेत, अन मस्जिदीकडच्या रस्त्याने ठाकूर बलदेवसिंह खाली मान घालून एकटाच पाठमोरा जाताना दिसतो अन सिनेमागृहात बसलेले प्रेक्षकदेखील हताश होऊन ठाकूरच्या वेदनासंघर्षात सामील होऊन सुस्कारे सोडतात …….

जेंव्हा कधीही मी 'शोले' पाहतो तेंव्हा त्यातली सर्व पात्रे नव्याने समोर आल्यासारखी येत राहतात अन दैनंदिन जीवनातल्या हातघाईने हिरावून नेलेला निखळ मनोरंजनाचा आनंद नव्या जोमाने मिळवून देतात… 'शोले' ही माझ्यासाठी मनोरंजनाची न संपणारी अशी शिदोरी आहे की जिची चव पिढ्यानपिढ्या टिकून राहील … कितीही वेळा पाहिला तरी तृप्तीचे तेच अपूर्व समाधान देणारा 'शोले' हा चिरंतन सिनेमा आहे असं म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही...

आज दुपारी 'झी सिनेमा'वर 'शोले' लागला अन रविवार सत्कारणी लागल्याची जाणिव झाली ….

- समीर गायकवाड

No comments:

Post a Comment