Saturday, February 13, 2016

लेफ्टनंट कर्नल ते शायर ....फैज अहमद !


रावळपिंडी कटातील आरोपींची सुनावणी सुरु होती. आरोपीच्या पिंजऱ्यात एक प्रसिद्ध लष्करी अधिकारी उभा होता. सरकारी वकिलांनी त्यांच्याकडे तिरकी नजर टाकत सवाल केला त्यावर आरोपी उत्तरला -  "सुगंध कसा पसरवला जावा याची देखील सुन्नाह आहे ( प्रेषित पैगंबरांच्या आज्ञा - सुन्नाह sunnah ) त्यामुळे तुम्ही इथे जे पसरवत आहात ते गैर आहे !" आरोपीने केलेल्या या अनपेक्षित बचावापुढे सरकारी वकील हडबडून गेले....
स्वातंत्र्यपुर्व ब्रिटीश भारतीय लष्करात कर्नल पदावरील एका मुस्लीम व्यक्तीची ही कहानी..भारत आणि पाक स्वतंत्र झाल्यावर पाक सरकारने यांना रावळपिंडी कटाचे आरोपी जाहीर करून तंब्बल २५ वर्षे तिथल्या तुरुंगात डांबले...
लष्करात असुनही कमालीच्या कवीहृदयाच्या या हळव्या माणसाचे तिथे अतोनात हाल झाले..तिथल्या तुरुंगात राहून त्यांनी शायरी केली, लेखन केले..

सहा भाषा अवगत असलेल्या या कर्नल शायरला १९६२ मध्ये तत्कालीन रशियन सरकारने लेनिन शांतता पुरस्कार दिला होता. प्रगतीशील लेखन चळवळीचे सक्रीय सदस्य होते. मात्र पाकचे पंतप्रधान लियाकत अली खानांना ते भारतीय हेर असल्याचा संशय होता. त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांचे समग्र साहित्य प्रकाशित  झाले आणि एका प्रतिभावंत शायराचा बहुआयामी परिचय जगाला झाला...
अनेक वर्षे कारावासात झिझवत ठेवल्यानंतर पाकिस्तान सरकारला पुढे उपरती झाली आणि १९९० मध्ये कर्नल फैज अहमद फैज यांना निशान- ए- पाकिस्तानचा पुरस्कार मरणोत्तर देण्यात आला !

बालपणातील शिक्षण दर्गाह-मस्जिदमध्ये घेतल्यानंतर त्यांच्या वडिलांच्या लक्षात आले की इथे फक्त इस्लामी धारणेचे शिक्षण मिळतेय, मग त्यांनी मुलाला तिथून काढून स्कॉट मिशन स्कूलमध्ये भरती केले. महाविद्यालयीन शिक्षण मरे कॉलेज ऑफ सियालकोटमध्ये केले.

लाहोरच्या जीसीयुतून फैजनी साहित्य आणि कवितेवरील प्रेमापायी कला शाखेच्या पदवीसाठी प्रवेश घेतला. इंगर्जी साहित्यातून त्यांनी मास्टर ऑफ आर्टसची पदवी मिळवली. लहानपणी अरेबिक,पर्शियन आणि उर्दू शिकलेल्या फैज अहमदनी आता इंग्रजीवर प्रभुत्व मिळवले होते. त्यांचा जन्म नारोवाल या स्वातंत्र्यपुर्व भारतातील पंजाबातल्या शहराचा असल्याने त्यांना पंजाबी जन्मतः अवगत होती ! इंग्रजी साहित्यातील  एमएची डिग्री मिळवतानाच त्यांनी अरेबिक भाषा विषयात देखील त्याच वर्षी (१९३२ मध्ये ) पदवी संपादन केली.
प्रसिद्ध भारतीय तत्ववेत्ते मानवेंद्र नाथ रॉय (एमएन रॉय) यांच्या विचारांची त्यांच्यावर मोठी छाप होती. १९४१ मध्ये अलीस फैज या ब्रिटीश नागरिकत्व असणारया कम्युनिस्ट विचारशैलीच्या देखण्या तरुणीच्या प्रेमात ते पडले आणि तिच्याशी विवाहबद्ध झाले. अलीसने नंतर पाकिस्तानी नागरिकत्व स्वीकारले होते. मात्र अलीस फैजवर देखील पाक सरकारविरुद्धच्या रावळपिंडी कटात सामील असल्याचा आरोप झाला होता. या दांपत्याला दोन मुली झाल्या सलीमा हाश्मी आणि मोनिजा हाश्मी ही त्यांची नावे. यापैंकी सलीमा हाश्मी सेक्युलर आणि अण्वस्त्रविरोधक विचार चळवळीमुळे पुढे प्रकाशझोतात आल्या होत्या...

फैज अहमद फैज आणि त्यांच्या कुटुंबियांना (मुलींसह) आजदेखील पाकिस्तानातील कर्मठ कट्टरतावादी लोक धर्मद्रोही म्हणून डिवचताना पाहायला मिळतात. आपल्याकडे जसे सेक्युलर विचारवंतांची नानाविध  उपाध्या लावून टवाळी केली जाते त्याची ही पाकिस्तानी आवृत्ती होय...

१९३५ मध्ये फैज अलिगढ मधील महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाले.
१९३७ला ते लाहोरला कुटुंबियांच्या आग्रहास्तव परत आले आणि तिथे प्राध्यापकी नोकरी स्वीकारली. १९४२ ला दुसऱ्या विश्वयुद्धाच्या काळात ब्रिटीश भारतीय लष्करात भरती झाले.तिथे त्यांना त्यांच्या शौर्यामुळे बढत्या मिळत गेल्या. १९४३ ला ते दिल्लीतल्या इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशनमध्ये सामील झाले. तिथे त्यांना १९४७ मध्ये लेफ्टनंट कर्नल पदाची बढती मिळाली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सगळे कुटुंब लाहोरला असल्याने ते भारतात येण्याचा प्रश्नच आला नाही. पण स्वातंत्र्योत्तर काळात पाक लष्कराने काश्मीरमध्ये केलेले हल्ले आणि शिरकाण यामुळे ते व्यथित झाले आणि त्यांनी लष्करातून सेवानिवृत्ती घेतली.

फैज आणि त्यांच्या पत्नीचे कम्युनिस्ट विचार आणि जोडीला त्यांचे पूर्वीचे भारताबरोबरचे लष्करी संबंध शिवाय सेक्युलर विचारसरणी यामुळे लियाकत अली खानाच्या मृत्यूशी निगडीत रावळपिंडी कटात त्यांचे नाव गोवण्यात आले त्यात त्यांना प्रदीर्घ तुरुंगवास पत्करावा लागला. नंतर मात्र त्यांना पोएट ऑफ पाकिस्तान म्हटले गेले कारण त्यांनी केलेली अभूतपूर्व अशी लाजवाब शायरी. तुरुंगात असताना त्यांना काव्य सुचत गेले आणि त्यांच्यातला हळवा माणूस बहरत गेला. एक सृजन मनाचे काव्य तिथे प्रसवत गेले....


 फैज होतेच कवी हृदयाचे. अमंगल, किळसवाणे, वाईट-साईट त्यांना काही चालायचेच नाही. फैज कधीही मोठय़ा आवाजात बोललेले नाहीत की कविता म्हणताना त्यांचा स्वर उंच झालेला नाही. अत्यंत ‘नाजूक मिजाज’ असल्याने छतावर पाल दिसली की तुरुंगातील अंथरुणाकडे न जाणारे फैजसाहेब अनेकांनी पाहिले आहेत. फैज किती नाजूक मिजाज होते, याचे आणखी उदाहरण- एकदा त्यांचा भाऊ हैदराबाद जेलमध्ये त्यांना भेटायला आला. नमाजची वेळ झाली होती म्हणून तो नमाज पढू लागला; पण हृदयविकाराने तेथेच कोसळला. त्याचे दु:ख फैज यांना इतके झाले, की त्यानंतर कितीतरी दिवस फैज यांना चक्कर येत होती. पलंगावरून उठता उठता ते पडत असत. भावाच्या स्मृतीबद्दल त्यांनी एक नौहा (शोकगीत)सुद्धा लिहिला होता.

मुझको शिकवा है मेरे भाई कि तुम जाते हुए
ले गये साथ मेरी उम्रे-गुजिस्ताँ की किताब
(माझ्या बंधुराजा, माझी एक तक्रार ऐक. तू जाताना माझ्या भूतकाळातील आयुष्याचे पुस्तकही नेलेस.)

फैज जात्याच हुशार होते. एकदा त्यांना इंग्रजीत पैकीच्या पैकीपेक्षा जास्त गुण मिळाले होते. एका विद्यार्थ्याने आक्षेप घेतल्यावर हेडमास्तर म्हणाले, ‘‘काय करू यापेक्षा जास्त गुण मी देऊ शकत नाही.’’ एकदा त्यांना त्यांच्या हेडमास्तरांनी इक्बाल यांची एक ओळ देऊन गझल लिहायला सांगितली. तसे झाल्यावर तेव्हाचा एक रुपया फैज यांना बक्षीस मिळाला होता. पुढे शायरीचा शौकच फैज यांना सारे काही देऊन गेला. फैज यांच्या ‘गुलो में रंग भरे बादे नौ-बहार चले’ ‘आये कुछ अब्र कुछ शराब आये’, ‘शामे-फिराक अब न पूछ’ वगैरे गझला मेहदी हसन, गुलाम अली, इक्बाल बानो आदिंनी गायलेल्या आहेत. पण अलीकडच्या पिढीला त्यांचा माहीत असलेला शेर म्हणजे -

दिल ना-उम्मीद तो नही, नाकाम ही तो है
लम्बी है गमकी शाम मगर शाम ही तो है
(हृदय अपयशी असेल; पण इच्छा संपलेले तर नाही ना? दु:खाची सायंकाळ प्रदीर्घ असू द्या; पण ती संध्याकाळच आहे ना? सकाळ येईलच ना केव्हातरी?)

‘१९४२ अ लव्ह स्टोरी’ चित्रपटात ‘ए सफर बहुत ही कठीन मगर’ या गीतापूर्वी हा शेर आपण ऐकला आहे. विशेष म्हणजे १९४२ मध्येच फैजसाहेब सैन्यात भरती झाले होते. ते १९४७ पर्यंत. पुढे पाकिस्तान सरकारने तुरुंगात टाकल्यावर ते लिहू लागले -

मता ए लौहो-कलम छिन गयी,
तो क्या गम है
कि खूने-दिल में डुबोली है उँगलियाँ मैने
जबाँ पै मुहर लगी है तो क्या, कि रखदी है
हर एक हलक-ए-जंजीर में जबाँ मैने
(माझ्या हातातील कागद-पेन हिसकावून घेतले तर त्यात काय दु:ख? मी माझी बोटं रक्तात बुडवून ठेवली आहेत. आता रक्तानेच कविता लिहीन. माझ्या बोलण्यावर बंदी आणली आहे. पण बंदी आणणार्‍यांना माहिती नाही की माझी वाणी मला घातलेल्या प्रत्येक बेडीत मी ठेवली आहे.)

उर्दूतील तरक्कीपसंद (सुधारणावादी) शायरीचे फैज पाईक होते. त्यात त्यांचे स्थान फार वरचे आहे. असर लखनवी यांनी म्हटले आहे की, फैज यांची शायरी एकेक पायर्‍या चढत शिखरावर गेली. त्यांच्या कल्पनेने कलेचे मोती उधळले आणि कोवळ्या भावनांना त्यांनी एक खास उंची दिली. फैज यांचे वडील अफगाणिस्तानमधील राजमहालात भाषांतरची नोकरी करीत. पुढे ते हॅमिल्टन नावाच्या मैत्रिणीच्या प्रेमाखातर इंग्लंडला गेले व केंब्रिजमध्ये शिकले. फैजसुद्धा एका मैत्रिणीच्या (एलिस जॉर्जच्या) प्रेमात पडले व तिच्याशी लग्न करते झाले. (त्या दोघांची पत्रे वाचण्यासारखी आहेत.) फैज यांना तुरुंगात जावे लागले आणि त्यांच्या वडिलांनाही अफगाणमध्ये हेरगिरीच्या खोट्या आरोपामुळे जावे लागले होते.

हमपर तुम्हारी चाह का इल्जाम ही तो है
दुश्नाम तो नही है यह इकराम ही तो है
(तुझी इच्छा केल्याचा आमच्यावरील ठपका म्हणजे काही शिवी नाही. तो गौरव आहे. सन्मान आहे.)
बज्मे-खयाल में तेरे हुस्न की शमा जल गयी
दर्द का चाँद बुझ गया, हिज्र की रात ढल गयी
(माझ्या कल्पनेच्या मैफिलीत तुझ्या सौंदर्याच्या मेणबत्तीचा उजेड पडला आणि दु:खाचा चंद्र विझून गेला, विरहाची रात निघून गेली)
मेरी किस्मत से खेलनेवाले
मुझको किस्मत से बेखबर कर दे
(माझ्या नशिबाशी खेळणार्‍या प्रिये, मला नशीब आहे याचाच विसर पडू दे.)

- असे उत्तमोत्तम शेर लिहिणार्‍या फैज अहमद फैज या कवीचा आज जन्मदिवस आहे. ज्यांना चांगले वाईट कळते, सकल मानवजातीच्या कल्याणासाठी ज्यांचे मन झुरते अशा कवीपैकी एक फैज अहमद होते. त्यामुळे ते पाकिस्तानी की आणखी कुणी अशा वादात न पडता मी त्यांच्यातला भला माणूस पाहतो अन त्यांच्या लाजवाब शायरीला सलाम करतो ....


शेवटी आणखी एक माहिती सांगावी वाटते की १९८४ मध्ये मृत्यू होण्याआधी काही दिवस फैज अहमद फैज यांचे नाव १९८४च्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकित झाले होते..जगातील अनेक भाषांत त्यांच्या कविता अनुवादित केल्या गेल्या व विविध विद्यापीठात जगभरात अभ्यासाला ठेवल्या गेल्या..आपल्या दिलीपकुमारांचे ते आवडते कवी होते  पंकज उधास यांनी दस्तखत हा संपूर्णतः फैज अहमद यांच्या गझलांचा अल्बम काढला होता नर्गिस, सुनील दत्त, यासिर अराफात, मुजफ्फर अली ते गुलजार अशी विविध स्तरावरची त्यांची आपल्याकडच्या चाहत्यांची यादी आहे...मीही त्यातलाच एक, माणुसकी आणि कवितेवर प्रेम करणारा....


-  समीर गायकवाड.


संदर्भ :- फैज अहमद फैज, उर्दू पोएट ऑफ सोशल रिएलिजम- एस्टले ड्रायलेंड.

माय जेलमेट - जफरउल्लाह पोश्नी, दि डॉन.
शायरीचे संदर्भ ;-  फैज अहमद - बस्तिक प्रदीप निफाडकर.