Thursday, February 25, 2016

सावित्रीच्या लेकी …


भल्या पहाटेच उठून आईला कामात मदत करणाऱ्या या मुलीच असतात,
चूल पेटवण्या पासून ते पाण्याचे आधण ठेवणाऱ्या त्याच असतात,
एकीकडे उतू जाणाऱ्या दुधाकडे लक्ष देत वेणीफणी करत असतात,
आजीने मारलेल्या हाकेला ओ देत आजोबांच्या हाती पानाची चंची सरकवत असतात,
कुंकवाचा करंडा आईच्या पुढ्यात ठेवून अंगण लख्ख झाडून घेत असतात,
सकाळीच आलेला बिगारी कामाचा निरोप वडिलाना सांगताना लहान भावाला जागं करत असतात,
शेजारच्या घरून दुधाची एखादी लोटी उसनी आणताना तिथलेही काम हलके करत असतात.


अंगणात रांगोळीची वेलबुट्टी काढून आपल्या उसवलेल्या गणवेशाला,
कधी तळटिपेने तर कधी सुईदोऱ्याच्या टाक्याने दुरुस्त करत असतात.
फाटलेली पुस्तके जपून वापरतात अन बाईंडिंग केलेल्या वह्यात अभ्यासाला सामावून घेत असतात.
कामामुळे गृहपाठ अर्धाच राहील्यास तांबडफुटीच्या आधी उठून पूर्ण करतात पण कामाची तक्रार करत नसतात.
हट्ट त्या कधी करत नाहीत पण 
अंथरुणावर पडलेल्या लहानग्यांचा हट्ट पूर्ण करायची वकीली वडीलांच्या कानाशी मोका बघून करत असतात.
घरात कुठे खुट्ट झाले तर त्या सैरभैर होतात अन 
वेदना कुणालाही झाल्या तरी अश्रू मात्र यांच्याच डोळ्यात पाझरतात.

आजारी कधी त्या पडल्या तरी त्याचे स्तोम माजवत नसतात,
आपलं दुखणं आपल्याच उराशी बाळगत असतात.
आईच्या डोळ्याखालची काळी वर्तुळे अन एक झालेले वडिलांचे पाठ पोट
यांच्या नजरेतून सुटत नसते,
म्हणून त्या कधीच कशाचे गाऱ्हाणे घरी गात नसतात सारं काही मुकाटपणे सहन करत असतात.
शाळेसाठी कित्येक किलोमीटरची पायपीट करतात पण 
फाटक्या कपड्यातल्या बापापाशी सायकलचा हट्ट त्या कधी करत नसतात,
रानातल्या वासरांवर अन परसातल्या फुलांवर त्या जीव टाकतात,
साध्याच त्यांच्या आवडी असतात अन जगण्याच्या व्याख्याही त्यांच्या सोप्याच असतात

मुली असतातच मुळी सोशिक म्हणूनच की काय पंचतत्वे देखील त्यांचेच शोषण करत असतात.
चौसोपी वाड्यात वा चंद्रमौळी झोपडीत जन्मल्या असल्या तरी
त्या मायाळू मायबापांच्या समाधानी लेकी असतात.
त्या श्रीकृष्णाच्या बहिणी असतात अन भविष्य नसलेल्या भावांच्या पाठराख्या भगिनी असतात.
लंकेच्या पार्वती जरी त्या असल्या तरी दरिद्रीनारायणाच्या संसारलक्ष्मी असतात,
भार्येचं नातं निभावताना तळहाताच्या रेषा झिझेपर्यंत संसाराचे गाडे हाकत असतात.
माहेरी त्या मायबापाच्या सहस्त्रभुजा असतात तर सासरी, सगळ्यांच्या त्या आधार असतात.
सरते शेवटी त्या माता असतात, स्वतःच्या ताटातले काढून पोराबाळांच्या ओठात घालत असतात.
देव्हारयातल्या समईलाही मत्सर वाटावा असं त्या आजन्म जळत राहतात.

इतके सारे त्यांच्यात शैशवापासून सामावले असते तरी लोक त्यांना गर्भातच मारत असतात,
पण लक्षात असू द्यात त्या हरणाऱ्या नसतात कारण त्या सावित्रीच्या लेकी असतात


- समीर गायकवाड.