Thursday, February 25, 2016

गाव माझे ...त्या तिथे दूर वळणावरती, शांत सुंदर गाव वसते माझे

अंधाररात्री चांदणे जिथे, फुटक्या छपरावरी निजते ते गाव माझे.

उजळूनी दाही दिशा जिथे, उंबरठ्यावरी माथा भास्कर टेकवितो,

आकाशातला देव जिथे, अंगणातल्या पारिजातकात उतरतो,

उनाड अवखळ वारा जिथे, तटतटलेल्या कंच पिकातुनी डोलतो

देव्हारयातल्या समईत जिथे, शीतल प्रकाश अल्वार झिरपतो

माय पित्यांच्या वदनी जिथे, विश्वेश्वर तृप्ततो ते गाव माझे !

त्या तिथे दूर वळणावरती, लालकाळ्या मातीचे गाव वसते माझे.

गोठ्यातल्या गाई बोलतात जिथे, माझ्या माय बहिणींशी

अंगणातली तुळस तादात्म्यते जिथे, कृष्णाच्या बासरीशी

पावसाचे पहिले जलाभिषेक जिथे, होतात देवळाच्या कळसाशी

घुमणारे पारवे अबोल होतात जिथे, रित्या विहिरीच्या तळाशी

चंद्र एकरूप होऊ पाहतो जिथे, कंदिलाच्या पाझरणारया प्रकाशाशी

पारावरचा वड जिथे, पारंब्यांच्या कानाने गप्पा ऐकतो ते गाव माझे !त्या तिथे दूर वळणावरती, दिलदार माणसांचे गाव वसते माझे,

श्रमलेली पावले थांबवून जिथे, वाटसरू देऊळी पाठ टेकतो

चावडीवरचा न्यायनिवाडा जिथे, ओलेत्या डोळ्यांचे थेंब पुसतो

तळ्याकाठी खेळणाऱ्या गोप्यांच्या चेहऱ्यावर जिथे, आनंद ओसंडतो

शाळेच्या मोडक्या फळ्यावर जिथे, सुबक अक्षरातला देश घडतो

शेत शिवारातून जिथे, कष्टकरी बळीराजा निढळाचा घाम गाळतो

ताटातला पहिला घास जिथे, मुक्या जीवाला दिला जातो ते गाव माझे !त्या तिथे दूर वळणावरती, फुलपाखरांचे अन पानाफुलाचे गाव वसते माझे,

माहेरी परतलेल्या मुली जिथे, पाणंदेतच धाय मोकलून रडतात

सासरी नांदणाऱ्या पोरीबाळी जिथे,पाणवठ्यावरी पदर डोळा लावतात

बांधावरच्या शुष्क बोरीबाभळी जिथे, बारमाही हिरव्यापिवळ्या असतात

पिक येवो न येवो जिथे, गावकुसाच्या कुशीत बियाणे रुजवतच असतात

नच बरसता आषाढमेघ जिथे, अभिषेक अश्रूंचे कोवळ्या अंकुरांना घालतात,

काळ्या मातीचा गंध जिथे, नित्यनेमाने भाळी लावतात ते गाव माझे !त्या तिथे दूर वळणावरती, जीवाभावाचे गाव वसते माझे,

जिथे नांदती सारी अलौकिक सुखे, ज्याला कशाचीच उपमा नसे !- समीर गायकवाड.