Sunday, February 14, 2016

चित्रकवी - वसंत आबाजी डहाके ....


आता डोक्यात चंद्र घेऊन उभं राहायचं विठ्ठलासारखं, कमरेवर हात ठेवून. नाही तर विष्णूसारखं पडून राहायचं पाण्यावर तरंगत. चांदणं पाझरत राहील आत आत सगळ्या नळ्यांमधून सावकाश. आपलं शरीर इथं सापडतं संतांना विठ्ठल सापडल्यासारखं.
‘टाटा मेमोरिअल हॉस्पिटल'मधून वावरताना कवी वसंत आबाजी डहाके यांना सुचेलेली ही कविता 'चित्रलपी' या काव्यसंग्रहातील आहे. या काव्यसंग्रहास साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता...
या कवितेतील कथनात्मक काव्यात मरणाची अथांग व्याकुळता आहे. कुठेही शब्दबंबाळ न होता साध्या सोप्या शब्दात मरणासन्न व्यक्तीच्या मनातील भाव त्यांनी एखाद्या चित्रासारखे रेखाटले आहेत...
डहाके सर कवितेतून आपल्यापुढे वस्तूचित्र जिवंतपणे उभे करतात म्हणून त्यांच्या काव्यसंग्रहाचे नाव अगदी सार्थ आहे - 'चित्रलिपी' ... मराठी कवितेतील हा आगळा वेगळा प्रयोग नक्कीच प्रेरणादायी आणि देखणा आहे...


कादंबरीकार, कवी आणि समीक्षक असलेले वसंत आबाजी डहाके हे सर्व महाराष्ट्राला साहित्यिक म्हणून परिचयाचे असले तरी एक वेगळा छंद त्यांनी आयुष्यभर जपला आणि तो म्हणजे चित्रकलेचा ! याची जाणीव पदोपदी त्यांच्या कवितांतून होते. त्यांच्या कविता बोलतात नव्हे तर शब्दांच्या कॅनव्हासवर अर्थगहिरे चित्र रंगवत जातात ... .....आतां मी झालोय असं एक जनावर जे छापील कागदांचा शुष्क कडबा चघळत विसरू पाहतंय कत्तलीच्या पात्याचं झगझगीत सत्य... कागदी जगातलं नियमांच्या वेष्टनातले सत्य आणि वास्तवातले सत्य यातला फरक अधोरेखित करण्यासाठी अशा अलंकारिक पंक्ती लिहिणारे डहाके त्यांच्या कवितात अडगळीत पडलेले वा कवितेसाठी उपयुक्त न समजले गेलेले शब्द वापरून त्यांचा आशय अधिक टोकदार पद्धातीने व्यक्त करताना दिसतात.
डॉ. श्रीकृष्ण राऊत यांनी चित्रलिपीच्या समीक्षा आस्वादात डहाके सरांच्या या चित्रकाव्याचे अप्रतिम रसग्रहण केले आहे ते म्हणतात - ‘चित्रलिपी’ एकाच वेळी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनावरचं खालच्या पट्टीतला सूर लावणारं समूहगीत आहे. डहाक्यांच्या सामाजिक पिंडाशी आणि त्यांच्या देवदत्त प्रवृत्तीशी ही रचना मेळ खाणारी आहे. डहाक्यांचा गेल्या चाळीसेक वर्षाचा वाङ्मयीन प्रवास तल्लख बुद्धीने सुरू आहेच पण त्याचा सूरही शांत आहे. डहाक्यांच्या बाबतीत हे नोंदवण्यासारखं आहे. दहाकेंनी मराठी कवितेवर जे बीजभाषण केलं, त्यातली त्यांची काव्यार्थाला प्राधान्य देणारी आणि सत्य हेच निक्षून बोलणारी भूमिका कुठल्याही तोतया नसलेल्या कवीला आवडून जाईल अशीच आहे.
सुदैवाने नवी किंवा नवोत्तर जाणीव मराठी वाड्मयीन पर्यावरणाला नवी नाही. मर्ढेकरांपासून जर या जाणिवेचा प्रवास सुरू झाला असं मानलं तर तिला व्यामिश्रतेचे धुमारे फुटले ते दिलीप पुरुषोत्तम चित्रे, अरुण कोलटकर, भालचंद्र नेमाडे, मनोहर ओक आदी ‘अँग्री यंगमेन’च्या भन्नाट कवितांमुळेच. डहाकेंची कविता तशी ‘अँग्री’ नाही. ती ढसाळांच्या कवितेसारखी मूर्तिभंजक नाही. ग्रेसच्या कवितेसारखी गूढ नाही. बोरकर, पाडगावकर, बापटांच्या कवितेसारखी सौंदर्यवादी नाही, विंदांच्या किंवा कुसुमाग्रजांच्या कवितेसारखी आदर्शाचा ध्यास घेणारी नाही. मग डहाकेंची कविता नेमकी कशी? चित्रलिपी’मधल्या 'बखर' या पहिल्याच कवितेला डहाकेंचा जाहीरनामा म्हणता येईल. शब्दांची मलमपट्टी नाकारून, यमकप्रासांचा रुणुझुणु नाद भिरकावून, भावनाविचारांची तकलुपी कच्ची घरं बांधण्याच्या रोमॅँटिक प्रवृत्तीला झुगारून डहाक्यांची ‘चित्रलिपी’ ठिक-या उडालेल्या मानवी अस्तित्वावर मर्मभेदी भाष्य करते. त्यांच्याच भाषेत, ‘जाड्या भरड्या गोणपाटासारखं.’ डहाके चाळीसेक वर्षांपूर्वी जोरात असलेल्या ‘लिटिल मॅगझिन’ चळवळीचे (तुतारी न फुंकणारे) एक ‘शूर शिपाई.’ प्रस्थापित अभिरुचीला शरण गेलेली आणि जाहीर कोडकौतुकाने सुस्त झालेली तुंदीलतनू संवेदनशीलता डहाकेंच्या पिढीतल्या किमान दोन डझन कवींनी नाकारली आणि कवितेची नवी पायवाट खोदली. साहित्यात नवं बांधकाम करण्यासाठी जिगर लागते. डहाक्यांनी ती दाखवली. गाणं - मी म्हणतोय गाणं या दुःखी जनावरासाठी माझ्या खांद्यावर डोकं टेकून पडलेल्या. त्यांचं दुखरं काळीज आणि ठणकणारं मस्तक शांत करणारा एखादा सूर मी शोधतो आहे जळत असलेल्या माझ्याआतड्यात...... आपण कोणासाठी जगावं आणि कोणाच्या सुखदुःखात सामील व्हावं हा ज्याच्या त्याच्या वैचारिक जडणघडणीचा प्रश्न होय. डहाकेंचा दुःखाच्या सांत्वनासाठीचा सूरदेखील अगम्य वाटत असला तरी सार्थ आहे. विजोड शब्दांचा सार्थ मिलाफ आणि त्याची आशयाशी सांगड हा डहाकेंच्या कवितांचा एक भक्कम पाया आहे. 
डहाक्यांची कविता अंतमुर्ख आहे, चिंतनशील आहे, व्याकूळ आहे, ऋजू आहे आणि तरीसुद्धा भेदक आहे. हे रसायन अनपेक्षित आहे. पुरस्कारप्राप्त ‘चित्रलिपी’ वाचताना भोवतालच्या सामाजिक, सांस्कृतिक चित्रांच्या सरळसोट नव्हे; तर वेड्यावाकड्या, गुळगुळीत नव्हे; तर खडबडीत, गोडगोड नव्हे; तर कडू-आंबट अशा तापदायक प्रतिमांचा छळवाद सुरू होतो. चित्रलिपीत समकालीन प्रतिमांचा एकच गजबजाट आहे. 'चित्रलिपी’ एकविसाव्या शतकाचं विषण्ण वास्तव आहे. डहाक्यांच्या ‘चित्रलिपी’त प्रतिमांची अफरातफर होत नाही. म्हणजे जगणं एक आणि लिहिणं दुसरंच, असं काही ते करत नाहीत. जगणं, सगळंच्या सगळं कवितेत ओतणं हे आधुनिक संवेदनशीलतेचं व्यवच्छेदक लक्षण. डहाकेंमधला कवी आणि माणूस यांची बेमालूम सरमिसळ होते.‘चित्रलिपी’ एकाच वेळी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनावरचं खालच्या पट्टीतला सूर लावणारं समूहगीत आहे. डहाक्यांच्या सामाजिक पिंडाशी आणि त्यांच्या देवदत्त प्रवृत्तीशी ही रचना मेळ खाणारी आहे. डहाक्यांचा गेल्या चाळीसेक वर्षांचा वाड्मयीन प्रवास तल्लख बुद्धीने सुरू आहेच, पण त्याचा सूरही शांत आहे. डहाक्यांच्या बाबतीत हे नोंदवण्यासारखं आहे.अबोध व्याकुळता, विश्वाच्या पसा-यात मानवाला आलेलं पोरकेपण, त्याचं तुटलंपण, माणसांतला विसंवाद, आप-पर भाव, त्यातून येणारा निर्मम व्यवहार, एकाकीपण, व्यक्ती-समष्टीचं द्वंद्व हे अस्तित्ववादी तत्त्वचिंतनाचे मुख्य खांब. डहाकेंचं गद्य लिखाण या तत्त्वचिंतनाचा हुंकार आहे. त्यांची कवितासुद्धा तशीच आहे.
मी कोंडून ठेवतोय झाडाचं गाणं माझ्या आत गच्च अलीकडे सांप्रत आजकाल, सद्य:स्थितीत ‘झाडाचं गाणं’ या त्यांच्या कवितेच्या या शेवटल्या ओळीत त्यांनी चार निरनिराळे शब्द वापरून एकच काळ (चालू काळ) अधोरेखित केलेला दिसतो. हे सकारण आहे. डहाक्यांना चालू क्षण कवितेत धरायचा आहे. किंबहुना याच एका क्षणज्योतीवर त्यांचं त्राटक सुरू आहे. डहाक्यांच्या कवितेतल्या पोपटाचा प्राण समकालीनतेमध्ये वसतो. वसंत आबाजी डहाके नावाच्या राजपुत्राला हे ठाऊक आहे.विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर आणि वसंत बापट या आनंद त्रयीने महाराष्ट्रात एकेकाळी हंगामा करून टाकला होता. या त्रयीनंतर उगवली ती चित्रे, कोलटकर, नेमाडे नावाची त्रयी. आधुनिक मराठीचं हे तापत्रय. या तापत्रयाशी डहाक्यांचं जैविक नातं. डहाके या तापत्रयी काव्यजाणिवेचे वारसदार आहेत. समुद्र नुस्ता बघत राहतो थकलेल्या डोळ्यांनी त्याच्या किनाऱ्यावरचं दंगलग्रस्त शहर. त्याच्या चष्म्यावर बाष्प दाटून आलेलं म्हणून तो चष्मा काढून हातात घेतो आणि दुखऱ्या डोळ्यांनी पाहतो शहराकडे :...... रोजच्या आयुष्यात घडणारया घटनांकडे बघण्याचा एक नवा संदर्भ ते त्यांच्या कवितांना बहाल करतात. स्वतःकडेही त्रयस्थ होऊन बघण्याची त्यांची शैली विस्मयकारक आहे. संवादी स्वरूपाच्या पंक्तीतून ते काव्यचित्र डोळ्यापुढे उभे करतात. या कवितेत दंगलग्रस्त शहराचे दुःख आहे पण समुद्राच्या नजरेतून मांडताना ते शहराचा आणि मानवी मनाचा आलेखच मांडतात. त्यांची ही आगळीवेगळी हातोटी त्यांचे असामान्यत्व सिद्ध करते. ‘चित्रलिपी’ हा काव्य संग्रह डहाकेंच्या वेदनायुक्त संवेदनशीलतेचा परिस्थितीजन्य पुरावा.साठोत्तरीच्या पिढीत मराठीत आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक अशा तीन प्रकारच्या पीडांना अभिव्यक्ती मिळत गेली. डहाक्यांची चित्रलिपी या तिन्ही पीडांना समकालीन सामाजिक परिप्रेक्ष्यामधून जोखून बघते. तिची चिकित्सा करते. हे करताना तिचा पवित्रा प्राय: हताश भाष्याचा असतो. तो घोषणाबाजी करणा-या कवीचा नसतो. कवीचे डोळे उघडे असतात तोवरच त्याच्या चेह-यावर वाचता येतात जगण्याच्या प्रतिमा. ते मिटले की काहीच उरत नाही हजारो योजनांच्या भणभण प्रदेशात ‘जगण्याच्या प्रतिमा’ या कवितेतल्या ओळींमधला तो भणभण प्रदेश. हीच जगड्व्याळ व्याकुळता. कवीला कायम छळणारी, वहाणेतल्या खडय़ासारखी टोचणारी, उद्विग्न करणारी. कवी किंवा कविता स्वयंभू नाहीत, असं सुचवताना डहाके याच कवितेत सुरुवातीला केवळ शब्दांनी झाडाचं पानसुद्धा हलत नाही, ही सार्थ खंत व्यक्त करतात.शब्दांना अवास्तव महत्त्व देणारी आनंदमिमांसा करण्यात डहाके असमर्थ ठरले. ही असमर्थता त्याच्या डीएनएमध्येच वसते. त्यांच्या रक्तपेशीचा भाग म्हणून. रोमॅँटिक कवींच्या डीएनएमध्ये उसना उत्साह दुथडी भरून वाहात होता, आहे आणि असेल. डहाक्यांची जातकुळी वेगळी.डहाक्यांची ही काव्यसाधना निर्वात पोकळीत घडली नाही. तिचे सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय संदर्भ आपल्या परिचयाचे आहेत. अशी चित्रमय अभिव्यक्ती असलेले डहाके हे पहिले चित्रकारच, मग कवी. मी उतरायचो वाघिणीच्या डब्याचीच केबिन असलेल्या लहानखु-या स्टेशनच्या मोकळ्या प्लॅटफार्मवर आणि शोधायचो ओळखीचे बैल. सावलीत विसावलेले, कडबा चघळीत असलेले. ते मला ओळखत असत की नाही कोणास ठाऊक पाठीवर हात ठेवला की थरथर तेवढी जाणवायची आणि डोळ्यात नेमकं काय आहे, याचाथांग नाही लागायचा. या कवितेतला सुस्तपणा, जीवनातला रटाळपणा अगदी चक्षुर्वैसापेक्ष आहे. कवितेतला बैल आपणही कुठे तरी पाहिल्याचा भास आपल्याला होतो. आपल्या सभोवताली दिसणाऱ्या सामान्य क्षणांमधले जीवनदायी अणुरेणू नेमके पकडतात आणि त्यांना शब्दबद्ध करतात. रोजच्या जीवनात सुखदुःखाच्या अपेक्षांपायी आपण अनेक तडजोडी करत जातो, तेंव्हा आपल्या मूळच्या स्वभावाला अनेकदा मुरड घालतो. आपला स्वाभिमान वा आपले तत्व आपण बाजूला सारतो आणि भौतिक बाबींना महत्व देतो. हे करताना आपण कुठे तरी स्वतःला फसवतो. याचे साधे शब्दांकन आपल्या चित्रमय शैलीत डहाके करतात. आरशापुढे उभे राहिले की चेहरा न दिसता वाकलेली मान अन झुकलेली पाठ दिसते असे सांगून सारया तडजोडी एका ओळीत व्यक्तवतात. चेहरा- अलीकडे आपला चेहरा बदलत चाललाय का म्हणून तो पाहतो आरशात तर दिसत नाही आरशात त्याचा चेहरा : दिसते वाकलेली मान ; झुकलेली पाठ... पावसावर अनेकांनी अनेक प्रकारच्या कविता लिहील्या, पाऊस कुणी प्रेमरसात तर कुणी करुणरसात चिंब भिजवला. पण डहाकेंच्या कवितेतला पाऊस हा देह - काया या पलीकडे जाऊन थेट आत्म्याशी संवाद करणारा आहे मात्र त्याची भाषा कमालीची गूढ आहे. त्यातली प्रतीके भयप्रद असली तरी त्यातला आपलेपणा सर्वमान्य आहे. तो कुणी नाकारू शकत नाही. पाऊस - पुन्हा पाऊस कोसळतोय शांत आणि स्थिर लयीत. रात्रभर पावसाचा हा आवाज स्त्रवत होता निद्रामय शरीरात... बाहेर पाऊस कोसळतोय. पावसाचा आवाज तुझ्या त्वचेच्या आत ऐकू येतोय... आयुष्यभर नानाविध प्रयुक्त्या करून थकून गेल्यावर गोळाबेरीज करण्याची वेळ येते तेंव्हाचे वास्तव काय असते याचे वर्णन करताना बैल या कवितेत ते लिहितात की सगळ्या अपेक्षांचे ओझे जेंव्हा असह्य होऊन जाते तेंव्हा त्या अपेक्षाच आधी गळून पडतात अन मग देह कोसळतो. पण हे कोणाला कळत नाही किंवा कुणाची समजून घ्यायची इच्छा नसते. कारण प्रत्येक जण आपापल्या स्वप्नापेक्षांच्या इमारतीत मश्गुल होऊन त्याच्या कैफात निद्रिस्त झालेला असतो. मेंदू म्हणजे एक थकून गेलेला बैल आहे. त्याच्या मानेवरचं जूं जड झाले की तो रस्त्यात कोसळून पडेल सगळ्या गाड्यासह. मला भय वाटते ते एव्हढच. स्वतचं नव्हे, स्वतःसाठीही नव्हे. त्या गाड्यात तुम्ही आहात, बिनधास्त झोपलेले. आयुष्य म्हणजे तरी काय आहे ? संन्यासीवृत्तीची अभिव्यक्ती संध्याछायेसच कशी दाटून येत असावी याचे स्तब्ध करून टाकणारे वर्णन डहाके त्यांच्या कवितेत करतात. चित्त शांत असण्यासाठीची अपरिहार्यता नेमक्या शब्दात सांगताना पाठीशी स्मशान घेऊन बसलो आहे असे सूचक विधान ते करतात. या कवितेतली रूपके फार बोलकी आहेत, त्यातून नेमका व मार्मिक आशयविस्तार होतो. पाठीशी स्मशान घेऊन - या भिंतीला पाठ टेकून मी बसलो आहे. मागे स्मशान आणि समोर समुद्र. ही एक उतरती दुपार आहे आणि सूर्य एखाद्या अधू पायाच्या घोड्यासारखा हळहळू चालतो आहे. स्वतःच्या मरणाकडे थकलेल्या श्वापदाने जावे तसे ऊन कलते आहे. असा समुद्राकडे पाहत मी बसलो आहें. माझे चित्त शांत आहे. चित्त शांत असणे ही फार मोठी मिळकत असते त्यासाठी अर्थातच किंमतही पुष्कळच मोजावी लागते.... पाठीशी स्मशान घेऊन अथांग समुद्राकडे पाहत इथे मी निवांत बसलो आहे . कवी वसंत आबाजी डहाके यांचा जन्म विदर्भातला. यवतमाळ जिल्ह्यातील बेलोरा येथे ३० मार्च १९४२ रोजी त्यांचा जन्म झाला. प्राथमिक शिक्षण बेलोरा येथे झालं. त्यानंतर त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण चंद्रपूर येथील महाविद्यालयातून झाले. तेथूनच त्यांनी बी. ए. ची डिग्री संपादन केली.
त्यानंतर नागपूर येथून एम. ए. झाल्यानंतर सुरुवातीला त्यांनी एका खासगी महाविद्यालयात अध्यापन केले; आणि त्यानंतर शासकीय महाविद्यालयात मराठी विषयाचे त्यांनी अध्यापन केले. साहित्य लेखनाचा त्यांचा प्रवास काव्यलेखनापासून सुरू झाला. त्यांची पहिली कविता सत्यकथा मासिकातून छापून आली. मात्र योगभ्रष्ट ही त्यांची दीर्घकविता सत्यकथेच्या मे १९६६ च्या अंकात प्रसिद्ध झाली आणि त्या कवितेने त्यांना भरपूर प्रसिद्धी मिळवून दिली. योगभ्रष्ट, शुभवर्तमान आणि शुनःशेप हे त्यांच प्रसिद्ध झालेले कवितासंग्रह.
१९७० नंतरच्या समकालीन समाजवास्तवावर भाष्य करणारी कविता लिहिणारे प्रभावी कवी, कादंबरीकार, समीक्षक आणि विचारवंत म्हणून वसंत आबाजी डहाके यांनी मराठी साहित्यविश्‍वावर तेजस्वी मुद्रा उमटविली. पूर्वसुरींचा व्यासंग, आधुनिक मराठी वाङ्‌मयाचे प्रगल्भ आकलन आणि पृथगात्म चिंतनशील भाष्य हे त्यांच्या समीक्षात्मक लेखनाचे गुणवैशिष्ट्य आहे. स्वातंत्र्योत्तर कालखंडात भारतीय प्रजासत्ताकाची नव्याने उभारणी झाली. निराळे राजकीय आणि सांस्कृतिक वास्तव अस्तित्वात आले. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मृत्यूनंतर देश संकटग्रस्ततेच्या संक्रमणावस्थेतून गेला. डहाके यांची पिढी फसवणुकीच्या, भ्रमनिरासाच्या आणि आदर्शवादाच्या हळूहळू झालेल्या विनाशाच्या काळात स्तब्ध झाली. अस्वस्थ झाली. एकीकडे हा कमालीचा अंधार आणि दुसरीकडे मानसिक क्षितिज रुंदावतानाही या पिढीने अनुभवले. मार्टिन ल्युथर किंग, चे गेव्हारा, रेजिस डेब्रे आणि इल्विस प्रीस्ले हे विश्‍वाच्या कानाकोपऱ्यातील मोहरे विचारधनाच्या संदर्भात वसंत आबाजी डहाके यांना अनुभवता आले. राजकीय, सामाजिक वाङ्‌मयीन आणि सांस्कृतिक पर्यावरणाची उभारी डहाके यांच्या प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्त्वाला प्रेरणा देऊन गेली. विसावे शतक हे सर्वार्थाने वादळी शतक होते. विशेषतः त्याचा उत्तरार्ध जीवनमूल्यांच्या ऱ्हासाचा ठरला. या दुखऱ्या वास्तवाचे ते साक्षीदार ठरले. प्रख्यात समीक्षक डॉ. विजया राजाध्यक्ष यांनी वसंत आबाजी डहाके यांचा 'कोसळत्या शतकाचा कवी' असा उल्लेख केलेला आहे, तो अर्थपूर्ण आहे. डहाके यांनी चिंतनात्मक असे जे ललित लेखन केले ते यात्रा-अंर्तयात्रा या नावाने प्रकाशित झाले. तर अधोलोक, प्रतिबद्ध आणि मर्त्य या त्यांच्या गाजलेल्या कादंब-या. जीवनविषयक ओळख आणि त्यातील मूल्यभाव उलगडवून दाखवत डहाके यांनी समीक्षा लेखन केले आहे. कता म्हणजे काय ? कवितेविषयी, समकालिन साहित्य हे त्यांचे समीक्षात्मक ग्रंथ. तर निवडक सदानंद रेगे या ग्रंथाचे संपादन आणि प्रस्तावनाही डहाके यांचीच आहे. त्यांच्या योगभ्रष्ट या संग्रहाचा इंग्रजी अनुवादसुद्धा प्रकाशित झाला आहे.
डहाके यांच्या कवितेतला मी हा मानवी समाज व्यवस्थेत ग्रासलेला निराश, एकाकी आणि दुःखी असा आहे. पराहीनता, अस्थिरता आणि भय या त्याच्या भावना स्पष्ट होऊन आपल्यापर्यंत पोहोचतात असा हा त्यांचा मी अजूनही लोकांच्या मनात रूजलेला आहे. त्यांची कविता ही उथळ नसून थोडीशी गंभीर, तत्त्वज्ञानाशी जवळीक साधणारी आहे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्या त्या काळातील पिढीची जीवनपद्धती आणि संस्कार मूल्य त्यांच्या लिखाणातून स्पष्ट दिसते.
वसंत आबाजी डहाके हे स्वतः कवी. कवी असण्याचे आत्मभान त्यांच्या व्यक्तिमत्त्वात पुरेपूर आहे, शिवाय सर्जनशील साहित्यिक म्हणून जगत असताना समकालीन समाजवास्तव, राजकीय परिस्थिती, शिक्षणविश्‍व, वाङ्‌मयीन संस्कृती आणि समग्र सांस्कृतिक पर्यावरण याविषयीचे प्रगल्भ समाजभान त्यांना आहे.
आत्मभान आणि समाजभान यांचा समतोल त्यांच्या व्यक्तिमत्त्वात असल्यामुळे त्यांच्यातील सर्जनशील प्रतिभेचा आणि त्यांच्या समीक्षा विचारातील प्रज्ञेचा कुठेही विसंवाद आढळत नाही. ते अव्वल दर्जाचे समीक्षक आहेत. "कवितेविषयी' या ग्रंथात त्यांनी सैद्धांतिकच आणि उपयोजित स्वरूपाची समीक्षा लिहिली आहे. त्यात जुन्या-नव्या कवींच्या काव्याचा परामर्श घेतलेला आहे. मराठी साहित्यात कोशकारांची संख्या मुळातच कमी होती. अशा कामासाठी लागणारा व्यासंग आणि बृहदृष्टी असलेली माणसे दुमीर्ळ झाली आहेत. अशा काळात डहाकेसरांनी संक्षिप्त मराठी वाङ्मय कोश, वाङ्मयीन संज्ञा आणि संकल्पना कोश, शालेय मराठी शब्दकोश संपादित करून भाषेसाठी मोठेच काम करून ठेवले आहे. उत्सवी समारंभांपासून दूर राहून, प्रसिद्धीच्या झोतांपासून स्वत:ला वाचवत डहाके शांतपणे संदर्भ जमविणे, त्यांची यथार्थता ताडून पाहणे, वाचन-मनन करणे, भटकणे, नोंदी करणे, इतरांनी केलेल्या नोंदी अधिक अचूक होण्यासाठी त्यांवर काम करणे, अशा कामात व्यग्र राहत असतात. डहाकेसरांबरोबर काम करणे हा एक समृद्ध अनुभव असतो, यावर प्रकल्पांसाठी त्यांचे सहायक म्हणून काम करणाऱ्यांचे एकमत आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्वही त्यांच्या शब्दांप्रमाणेच अनाक्रमक परंतु ठाम आहे. कोणत्याही विचारसरणीच्या दावणीला स्वत:ला बांधून घेणे त्यांनी नाकारलेले आहे त्यामुळेच ते मौज परिवार आणि लोकवाङ्मय गृह या दोन्ही ठिकाणी सारख्याच सहजपणे आणि विश्वासाने वावरतात. अलीकडे त्यांनी 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या छायाचित्रात्मक चरित्रग्रंथासाठी केलेले काम महत्त्वाचे ठरले आहे. गोदावरी नदीसंबंधी त्यांचे मौलिक काम सुरू आहे. साहित्य आणि संस्कृती यांचा अन्योन्य संबंध शोधत माणसाच्या जडणघडणीच्या इतिहासाचा ताळेबंद ते मांडत आहेत. विदर्भ साहित्य संघाने त्यांच्या या सा-या कर्तृत्वाचा त्यांना 'जीवनव्रती पुरस्कार' देऊन उचित गौरव केला आहे. ज्येष्ठ कवी, समीक्षक वसंत आबाजी डहाकेंची, चंद्रपूर येथे संपन्न होणाऱ्या ८५व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. ‘‘आपण कविता का लिहितो याचे नेमके उत्तर देता येत नाही. गायकाला गावेसे वाटते, चित्रकाराला चित्र काढावेसे वाटते, तसे कवीचे होत असेल, पण हे काही खरे नाही. प्रत्येकाच्या प्रेरणा वेगवेगळ्या असतील. उदाहरणार्थ, निसर्ग मला सुंदर वाटतो, परंतु बालकवींप्रमाणे किंवा महानोरांप्रमाणे मी निसर्गकविता लिहिलेली नाही. जी काही थोडी फार सृष्टी माझ्या कवितेत आलेली आहे ती खिन्न-व्याकूळ किंवा हिंस्र-अमानुष अशी आहे. यांत निसर्गसौंदर्याचा प्रत्यय नाही. सृष्टीचा (त्यात मानवी जगतही आलेच) आपल्याला कसा प्रत्यय येतो, आपण त्याला कसा प्रतिसाद देतो, आपल्याभोवतीचे जग आपल्यावर कोणता ठसा उमटवते यांतून आपली अभिव्यक्तीची दिशा ठरत असावी,’’ असं डहाके सर त्यांच्या कवितांच्या निर्मिती उगमाबद्दल सांगतात. १९ ६०च्या आसपास त्यांच्या कविता नियतकालिकांतून येऊ लागल्या होत्या; परंतु ‘सत्यकथे’च्या मे १९६६च्या अंकात प्रकाशित झालेल्या ‘योगभ्रष्ट ’ या दीर्घ कवितेने त्यांची खरी ओळख झाली. ती त्यांना झाली तशी त्यांच्या समकालीन वाचकांना, कवींना झाली. ‘योगभ्रष्ट ’ हे त्यांचे पहिले अधिकृत स्वरूपाचे कवितात्म विधान होते. १९६४ साली ते एम.ए.ची परीक्षा देऊन घरी आले आणि ही कविता लिहू लागले. त्या वेळचा त्यांचा, त्यांच्या पिढीचा जो कल्लोळ होता तो त्या कवितेच्या रूपाने व्यक्त झाला. स्वत:चे जगणे, वाचन आणि अवतीभवती घडत असलेल्या घटना यांचे एक रसायन त्या कवितेतून व्यक्त झाले. ही कविता ते कित्येक दिवस लिहीत होते. एक प्रकारे ती त्या वेळची त्यांची तारखा नसलेली रोजनिशी होती. उद्ध्वस्त मन:स्थितीत मी गावी परतलो, कशातच मन लागत नाही अंतरात सगळा वणवा पेटलेला अंतर्बाह्य़ उन्हाळा छातीच्या मध्यातून अंगभर ज्वाळा योगभ्रष्ट’च्या या सुरुवातीच्या ओळींतून त्या वेळची त्यांची मानसिक अवस्था लक्षात येते. ते असे मानतात की, कवीची शारीरिक, मानसिक, आत्मिक प्रस्फुरणे त्याच्या कवितेतून उमटत असतात. ती वैयक्तिक असतात, तशीच सामाजिकही असतात. आपण समाजात असतो, त्यामुळे कोणतीही वैयक्तिक घटना सामाजिक होते आणि याउलटही घडते. त्यामुळे मराठी समीक्षेत व्यक्तिगत जाणीव आणि सामाजिक जाणीव असे जे वर्गीकरण केले जाते ते त्यांना मुळीच मान्य नाही. शिवाय साहित्यात व्यक्त झालेला कोणताही अनुभव, अगदी तो खूपच खासगी असला तरी, अंतिमत: सामाजिक होतो. समाजाने निर्माण केलेली भाषा आपण स्वीकारलेली असते, तिच्यासोबतच आणि तिच्यामधूनच अनेक गोष्टी आपल्यापर्यंत चालत आलेल्या असतात. असे असूनही व्यक्ती अतार्किक वागू शकतात; विचारांच्या, वर्तनांच्या तोपर्यंतच्या नमुन्यांच्या बाहेर जाऊ शकतात. कवीदेखील भाषेच्या आणि कवितेच्या रूपबंधाच्या बाबतीत अशीच काही घडामोड करत असतात. ही घडामोड नेहमीच कवितेला समृद्ध करणारी असते असे नाही. प्रचलित विचाराच्या पलीकडे जाणारा विचार अभ्यासातून, परिश्रमातून, निदिध्यासातून आलेला असतो. अनावर आवेगी, प्रचंड उद्रेकी चित्रे काढणाऱ्या जॅकसन पोलाकच्या डोक्यात विचार आणि मनात भावना होत्याच. कविता लिहिणे म्हणजे नेमके काय करणे याचे डहाके सरांचे उत्तर वर आलेलेच आहे. ते त्यांच्या विचारांना, भावावस्थांना व्यक्त करतात. डहाके सरांच्या मते व्यक्त करणे, होणे ही माझी गरज असते. कधीकधी मला भाषेशी खेळावे असेही वाटते. अर्थात भाषा निरंग, निर्वकिार नसल्यामुळे तिच्यातून माझ्या मनोवस्था व्यक्त होतातच." ‘योगभ्रष्ट’ या संग्रहातलीच एक छोटी कविता देतो: कमळे फुलली. काळी कमळे फुलली. घोडा पळाला. काळा घोडा पळाला. चार घोडे रथाला जोडले. चार काळे घोडे काळ्या रथाला जोडले. मी हजार कमळे देवाला वाहिली. मी हजार काळी कमळे काळ्या देवाला वाहिली. दिवस मावळला. काळा दिवस मावळला मुळात ही व्याकरणाच्या पुस्तकातली वाक्ये आहेत. मी काय केले? काळी, काळा, काळे, काळ्या ही विशेषणे त्यांनी जोडून पुन्हा ती वाक्ये लिहिली. अर्थात हा नुसती भाषा-क्रीडा राहिली नाही. शेवटच्या ओळीतले प्रश्नचिन्हही अर्थपूर्ण झाले. एखादी कविता लिहून पूर्ण व्हायला बराच वेळ लागतो, तर एखादी झर्रकन लिहून होते, नंतर तिच्यात काही बदल करावा असेही वाटत नाही. पूर्वी टंकलेखन यंत्रासमोर आणि नंतर संगणकासमोर बसून मी तत्काळ कविता लिहिलेल्या आहेत. डोक्यात काही तरी चाललेलेच असते. ते कागदावर उतरण्यासाठी थांबलेले असते.
पाखरांचा थवा हलकेच उतरावा तसे हे होते, की कुणी तरी गोळीबार केल्यामुळे पटापट पाखरे खाली कोसळावीत तसे होते हे सांगता येत नाही. तरीदेखील आपण कविता का लिहितो याचे नेमके उत्तर देता येत नाही. गायकाला गावेसे वाटते, चित्रकाराला चित्र काढावेसे वाटते, तसे कवीचे होत असेल, पण हे काही खरे नाही. प्रत्येकाच्या प्रेरणा वेगवेगळ्या असतील. उदाहरणार्थ, निसर्ग डहाकेंना सुंदर वाटतो. झाडे, फुले, पाने, नद्या, डोंगर, पाऊस, बर्फाच्छादित शिखरे. सुंदर दृश्ये पाहताना त्यांनाही आनंद होतो; परंतु बालकवींप्रमाणे किंवा महानोरांप्रमाणे त्यांनी निसर्गकविता लिहिलेली नाही. जी काही थोडी फार सृष्टी त्यांच्या कवितेत आलेली आहे ती खिन्न-व्याकूळ किंवा हिंस्त्र -अमानुष अशी आहे. या सृष्टीत दगडी गुलाब आहेत, पिकलेल्या केसांचा घोगरा सूर्य आहे, ठरीव बाराखडीत कूकणारी पाखरे आहेत, जंगली बलासारखा चंद्र आहे, समुद्र एखाद्या रक्ताळलेल्या घोडय़ासारखा आहे. यांत निसर्गसौंदर्याचा प्रत्यय नाही; परंतु कलासृष्टीत अशा प्रतिमा येत असतात. व्हिन्सेंट वॉन गॉगची पिळवटलेली झाडे, कोसळून खाली पडेल असे तारकाखचित आकाश प्रसिद्धच आहे. सृष्टीचा (त्यात मानवी जगतही आलेच) आपल्याला कसा प्रत्यय येतो, आपण त्याला कसा प्रतिसाद देतो, आपल्याभोवतीचे जग आपल्यावर कोणता ठसा उमटवते यातून आपली अभिव्यक्तीची दिशा ठरत असावी. त्यात काही संस्कारांची भर पडत असावी- साहित्यकृती, पेंटिंग्ज, चित्रपट, तत्त्वज्ञान इत्यादी. डहाकेंना आपल्याभोवतीचे मानवी जग सतत समजून घ्यावे असे वाटत असल्यामुळे वर्तमानपत्रे, राजकीय-आíथक विश्लेषणे, चळवळींची माहिती यांचीही भर पडते. हे सगळे संस्कार होत असताना त्यांना लिहावेसे वाटते. लिहिणे ही त्यांच्या बौद्धिक आणि भावनिक क्रियांची निष्पत्ती आहे. लिहिणे या क्रियेत आपण एकटेच असतो. इतर बहुतेक क्रियांमध्ये इतरांचा सहभाग असतो. पेंटिंग करताना एकटेपणा असतो; परंतु भित्तिचित्रासारखे मोठे काम करताना सहकारी असतात. शिल्पकृती घडवतानाही असे एकटेपण असते, मात्र शिल्पसमूह घडवताना विविध सहायक असतात. नाटक, चित्रपट या गोष्टी तर समूहाशिवाय अशक्यच आहेत. सादरीकरणाच्या कलांमध्ये सतत रसिकांची उपस्थिती गृहीत धरली जाते. लिहिणे या क्रियेत तुम्ही असता, समोर कागद किंवा संगणकाचा पडदा असतो. लिहिणे ही या प्रकारे अत्यंत एकाकीपणात घडणारी कृती आहे. त्यामुळे कदाचित कविलोक समूहाला किंवा आपल्याला उद्देशून बोलत असतात. काही वेळा मीच्या ऐवजी तूचा प्रयोग केला जातो.
डहाके सर त्यांच्या चित्रकला आणि कविता या दोहोंच्या प्रतिभेचा सुवर्णमध्य साधतात. ते म्हणतात की, "दुसरे इतर सर्व साहित्य/कला प्रकार वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असतात, तर कविता आत्यंतिक रीतीने आत्मनिष्ठ असते. (चित्रकलेत एक्स्प्रेशनिस्ट आणि इम्प्रेशनिस्ट कलावंतांच्या चित्रांमधून त्यांच्या मनोवस्था व्यक्त झालेल्या आहेत.) मला जेव्हा हे जाणवले तेव्हा अस्वस्थपणे मी आतल्या आत प्रतिकार करू लागलो. आत्मचरित्र जितके पुसता येईल तेवढे पुसायचे, निखळ वस्तुनिष्ठ अनुभव व्यक्त करायचा, त्यासाठी अकाव्यात्म, गद्यानुसरण करणारी भाषा वापरायची असे मी मनात ठरवू लागलो. असा प्रयत्न पूर्णपणे यशस्वी होणे शक्यच नव्हते. त्यामुळे माझ्या कवितांमधील मीमधून, स्वमधून आत्मचरित्रात्मक अंश डोकावतात. भाऊ समर्थ, प्रभाकर कोलते, नितीन दादरावाला यांच्या चित्रांमध्ये वरच्या रंगस्तराखाली आणखी अनेक रंगांचे स्तर लपलेले आहेत असे जाणवते, तसाच हा काहीसा प्रकार. अर्थात पेंटिंगसारखी कविता अमूर्तनाकडे जाऊ शकत नाही. " भाषेत सतत वास्तवाचा निर्देश होत राहतो. भाषेच्या साहाय्याने भ्रामक वास्तव रचता येते. कल्पनारम्य वास्तव निर्माण करता येते. एखादी रचना अनेक अर्थच्छटा व्यक्त करू शकते; परंतु संपूर्णपणे अर्थमुक्त होऊ शकत नाही. तिच्यात कवीची वृत्ती, दृष्टी भिनलेली असते. एखाद्या कवीची जगण्याची वृत्ती कशी आहे, त्याची जीवनाविषयीची दृष्टी काय आहे यांवर त्याची कविता काय स्वरूपाची असेल हे ठरते. बोरकर, पाडगावकर यांना आनंदयात्री म्हटले जाते. मर्ढेकरांना निराश मानवतावादी, तर मुक्तिबोधांना आशावादी मानवतावादी. ही वर्णने तंतोतंत खरी असतील असे नाही. त्यांच्या कवितांवरून वाचकांना तसे वाटते. काही कवींचा दृष्टिकोन द्वंद्वात्मक असू शकेल, मात्र डहाकेंचा तसा नाहीये. कविता सुचते म्हणजे नेमके काय होते या प्रश्नाचे उत्तर अवघड आहे. कविता आतल्या आत असतातच. त्या बाहेर यायच्या असतात. एखादा शब्द, एखादी प्रतिमा, एखादे दृश्य, एखादे वाक्य अशी काही निमित्ते असतात. शिवाय सारखे काहीना काही मनात साचत चाललेले असते. डहाके सरांच्या मते वाचकांचा पत्रव्यवहार ही कविता तर सरळ सरळ वर्तमानपत्रातल्या वाचकांच्या पत्रव्यवहारातून सुचली. प्रतिवादी ही कविता महाविद्यालयातल्या एका प्राध्यापकाच्या वर्तनावरून सुचली. त्यांच्या बाह्य़त: विक्षिप्त वागण्यामधून डहाकेंना राजकीय दृष्टीने स्किझोफ्रेनिया झालेल्या नागरिकाचे दर्शन झाले. काळा राजकुमार ही कविता पॉल क्लीच्या चित्रावरून सुचली. नारायणराव पेशवे यांच्याविषयीच्या कविता खाडिलकरांचे भाऊबंदकी नाटक शिकवताना त्यांना सुचत गेल्या. बलाचा मृत्यूमधला बल एका संध्याकाळी शिरजगाव बंड येथे रस्त्यात दिसला. अशी काही निमित्ते झाली. लहान आकाराच्या कविता लवकर लिहून होतात, दीर्घ कवितांना अधिक वेळ लागतो. दिवसच्या दिवस त्यात जात असतात. ओस झाल्या दिशा, सर्वत्र पसरलेली मुळं, योगभ्रष्ट, काळा राजकुमार, अदृष्टाचं काव्यशास्त्र, कावळे, प्रश्न, पातं आणि अलीकडची आख्यान- या सरळ सरळ दीर्घ रचना आहेत. त्या मनात येण्याची आणि कागदावर उतरण्याची प्रक्रिया त्यांच्यासाठी जरा वेळ घेणारीच ठरली.
डहाके आपल्या दीर्घकवितेबद्दल लिहितात की, "तिचा पस मोठा असतो, त्या लिहून झाल्यावर बरे वाटायला पाहिजे होते; परंतु काही तरी राहून गेल्याची, अपूर्णतेची जाणीव नेहमीच होते. आपल्याला येणारे अनुभव हे गद्य वा काव्यात्म नसतात. ते अनुकूल-प्रतिकूल, सुखदु:खात्म, हवेहवेसे किंवा नकोनकोसे असतात. हे अनुभवदेखील वेगवेगळ्या पातळ्यांवरचे असतात. बसची किंवा कुठल्याही गोष्टीची वाट पाहाणे यांतही वेगवेगळ्या परी असतात, मग अन्य अनुभवांविषयी आपण कल्पना करू शकतो. भय, लज्जा, शोक, किळस हे गडद अनुभव असतात. आल्हादक, आनंददायक अनुभवही असतात. संगीत ऐकताना, पेंटिंग पाहताना होणारा आनंद. समाजातल्या जवळच्या, दूरच्या व्यक्तींच्या वागण्यातून मिळणारा आनंद. कधी चिडचिडेपणाचाही अनुभव आपण घेतच असतो. या सगळ्यांमधून कवितेचे द्रव्य साचत जाते. मग ते कोणत्या तरी प्रतिमेतून शब्दरूप घेते. एकदा उत्तराखंडमध्ये वाटचाल करत असताना रस्ता खचला, दरड कोसळली. मागे जाता येत नव्हते, पुढेही. मग त्या रस्त्यावरच्या बटाटय़ांची पोती साठवलेल्या एका खोपटात आश्रय घेतला. जवळच यमुना नदी होती. पूल होता. त्या पुलावर बसून किती तरी वेळ आम्ही ट्रेकर्स गप्पा करीत होतो. केव्हा तरी सगळेच बोलायचे थांबले. रिमझिम पाऊस पडत होता. खालच्या नदीच्या पाण्याचा आवाज. आसमंतात केवळ पाण्याचा आवाज, बाकी काही नाही. अनुभव अगदी साधाच होता, पण हा एक विलक्षण अनुभव आहे असे वाटले होते. काही काळाने मी कविता लिहिली. त्यात म्हटले होते: यमुनेवरच्या पुलावर मध्यरात्री आम्ही ऐकतो हजारो वर्षांपासून वाहणारं भूत-वर्तमान-भविष्याचं गाणं वरचं शुष्क कवच गळत जातं आणि आम्ही लांबवत नेलेला याच जन्मातला पुनर्जन्म होतो साक्षात मी लिहितो. लिहिणे हे माझे काम आहे असे मला वाटते किंवा ती माझी सवय आहे किंवा गरज आहे. कवी, लेखक, कलावंत आपल्या आतून तंतू काढून कोळ्याप्रमाणे निर्मितीचे जाळे निर्माण करतात. त्यात कधी तरी परम अर्थ गवसेल याची ते वाट पाहात असतात असे रूपक मला आत्ता सुचले! ते असो. देकार्तने, मी विचार करतो म्हणून मी आहे असे म्हटले होते. अस्तित्ववाद्यांच्या मते, मी आहे म्हणून मी विचार करतो. मी म्हणतो, मी आहे म्हणून मी कविता लिहितो आणि मी कविता लिहितो म्हणून मी आहे. हे दुसरे वाक्य अधिक बरोबर आहे. कविता लिहिणे किंवा एकूण लिहिणे थांबले तरी मी कदाचित असेनच, पण ते असणे म्हणजे काय असणे आहे! "
मराठी साहित्यातील एक प्रयोगशील कवी, कादंबरीकार आणि विचक्षण समीक्षक म्हणून वसंत आबाजी डहाके ओळखले जातात. आधुनिक जीवनातील पोरकेपणा, असंबद्धता, त्यातील भयावहता अशा गोष्टींचा आविष्कार डहाक्यांनी आपल्या कविता - कादंबर्‍यांतून केले. जीवनविषयक जाणिवांचे अंत: सूत्र हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य. डहाके यांनी कवितेच्या रूपांतही अनेक प्रयोग केले . कवितेत कथनात्म , नाट्यात्म रुपांचाही कौशल्यपूर्ण वापर केला. योगभ्रष्ट हा त्यांचा पहिला कवितासंग्रह. त्यानंतर शुभ वर्तन, शुन : शेप, चित्रलिपी हे कवितासंग्रह, अधोलोक, प्रतिबद्ध आणि मर्त्य ह्या कादंबर्‍या , यात्रा- अंतर्यात्रा हा ललित-लेखसंग्रह असे साहित्य प्रसिद्ध झाले. डहाकेंना राज्यपुरस्कार तसेच 'गंगाधर गाडगीळ पुरस्कार' मिळाला आहे. डहाके सरांना उदंड दीर्घायुष्य लाभावे आणि त्यांच्या नवनावोन्मेशशाली समृद्ध लेखणीने 
मराठी साहित्य अधिकाधिक प्रगल्भ व शब्दवैभवसंपन्न होत जावे ...

- समीर गायकवाड .