Tuesday, February 16, 2016

प्रेमाचे सत्य ...


करपलेली का असेना पण भाकरी हेच जिथे प्रेम असते
कासावीस भुकेची आतडी तिथ दीनवाणी हसत असतात.
भिरभिरी डोळे घेरी येऊनही दैन्याचे गाणे गात राहतात,
पोटात तिथे उपाशी काळीज गच्च पाय दुमडून राहते.
तिथली कळ पिळवटून मेंदूतल्या भुकेच्या भावनांना टोकरते .

अंधाराचे पहारेकरी उजेडीही सोबतीला असतात
चंद्रमौळीतल्या छताला सूर्य चंद्र उलटे टांगलेले असतात.
छिलून टाकते भूक रक्ताच्या गुलाबी लाल पाकळ्यांना
ओठाचे काटेही जेंव्हा वेदनेचे टोकदार भाले होऊन जातात
अगतिक काळ दाराशी तेंव्हा फाटकी झोळी घेऊन उभा असतो…


सुकलेले ओठ कसे बरे गातील जीवघेणे मिठ्ठास तराणे
पसाभर ओंजळीवर जिथे चूल विसंबते, तिथे कुठचे गाणे
रोजच्याच जगण्याची चाले लढाई तिथे प्रेमाची कब्रस्ताने
वासनेच्या चिखलात उमललेली निष्पाप म्लान फुले
हाच काय तो प्रेमाचा अस्पृश्य स्पर्श,
दंशाने त्याच्या देहाचा कापराचे बाष्प अलगद होत जाते …

जिथे भूक हेच अंतिम सत्य असते तिथे प्रेमाचे फक्त कलेवर असते..

-  समीर गायकवाड .