Monday, February 15, 2016

नसती तहान तर ....नसती तहान तर बरे झाले असते
अष्टोप्रहर वणवण पायपीटेची थबकली असती.
निवडुंगे बोटाची झाली नसती
बोडक्या मस्तकी हंडे कळशांचा भार नसता वाहावा लागला.
दुधपीते तान्हुले घरी झोळीत टाकून
रणरणत्या भुईच्या वाळवंटी नसते लागले
माझ्या माय बहिणींचे अगतिक मेळे.


नसती तहान तर नद्या,बारवे
नसते झाले खडक पाषाणी कायेचे.
कोरडयाठाक ओढ्यात करपलेल्या पानावरून
फिरला असता पाण्याचा मायओला हात,
पाठीवर चिमूरडयांच्या दप्तर राहिले असते अन
उजाड माळांची गायराने होऊन चरली असती खिल्लारे
जंगले राहिली असती, घरटयात पिढया वाढल्या असत्या

नसती तहान तर आटले नसते पाणी
बांधावरच्या मातीत पडली नसती कलेवरे
रांजणाच्या तळाशी काळीज नसते गुंतले
पाखरे उडली असती हिरव्या रानातून
अन रास लागली असती दारी भरभरून.
रानोमाळची माती रडते माझ्या
अनवाणी मायेच्या पायी पडून धाय मोकलून...

कसा शाप या तहानेने दिला, जणू तो
माझ्या मायबहिणींच्या भाळीचा अश्वत्थामाच झाला
निहंत्या आता तू एक कर, माणूस मेल्यावर त्याचे झाड कर
उन्हांतान्हात उभे कर, वीजपावसाचे तडाखे खाऊ दे
रोंरावणारया वादळाचे पीळ त्याच्या अंगाला पडू देत
उन्हे पिऊन सावली देताना सुद्धा त्याला
कापायला कोणी आले तर या शापाची आठवण येऊ देत...

- समीर गायकवाड.