Friday, February 12, 2016

सत्यकथा गायीच्या अगाध मायेची ....सूड, बदला आणि संताप या भावना फक्त मनुष्य प्राण्यात शिगोशिग भरलेल्या असतात का ? कधी कधी त्या इतर प्राण्यात देखील आढळून येतात, मात्र जिद्दीने तेवत राहिलेला वर्षानुवर्षाचा सुडाग्नी मनुष्यात जास्त दिसून येतो. मात्र गायी सारख्या शांत जीवात ही भावना दाटून आली तर ....


कर्नाटकातील उत्तरकन्नड जिल्ह्यामध्ये सिरसी नावाचे एक छोटेसे कसबे आहे. या गावात चार वर्षापूर्वी KA-31F 857 या नंबरच्या बसखाली एक छोटेसे वासरू चिरडून मृत्युमुखी पडले.

काही तासांत त्या वासराची आई त्या बसस्थानकानजीक आपल्या वासराला शोधत हजर झाली. तिच्या लक्षात आले की आपले वासरू या जगात नाही. त्या गायीने ज्या बसखाली आपले वासरू मरण पावले ती बस ध्यानात ठेवली आणि तिच्याशी बदल्याचे वैर सुरु केले...


आपले वासरू जिथे मृत्युमुखी पडले त्या जागेवर ही गाय येऊन बसते,ती बसला लांबूनच ओळखते बस जवळ आली की तिच्या आडवे जाते. बसपुढे जाऊन बसते, कधीकधी बसला शिंगे मारते...लोक गोळा होतात तिला बाबापुता करून बाजूला करतात. बस ड्रायव्हरने कंटाळून रस्ता बदलून पाहिला, गाडीचा रंग बदलून पाहिला पण काही निष्पन्न झाले नाही. गायीने बस बरोबर ओळखली आणि आपला बदल्याचा सिलसिला चालूच ठेवला...अशा रंगाच्या वा अशा धाटणीच्या इतर बसेसना ही गाय काहीच करत नाही. आता बस जवळ येण्याआधीच आजूबाजूचे लोक तिचे लक्ष वळवण्याचा प्रयत्न करतात, बस ड्रायव्हर देखील तिला जीव लावतात अन रस्त्यावरची सगळीच माणसे तिच्या या अपार मायेने शहारून उठतात, जवळ जाऊन तिला समजावण्याचा प्रयत्न करतात....आपल्या बछडयाचा विरह ती अजूनही सहन करू शकत नाही, 'ती' बस दिसली की गाय सैरभैर होते. तिचे डोळे पाझरतात, जमलेल्या बायका डोळ्याना पदर लावून आईच्या अगाध मायेला अश्रुवाटे मोकळे करतात...

जगातले सर्वात मोठे दैवत आईच आहे...आईच्या मायेची सर येईल अशी कोणतीही माया वा प्रेम जगात नाही, भले मग ती आई मनुष्य असो वा इतर प्राणिजात असो ....

आई ती आईच .... रस्त्यावरील अपघातात आपले वासरू वा आई गमावलेले असे किती मुके जीव आपल्या काळजात अशी धग घेऊन जगत असतील हा प्रश्न मला बेचैन करून जातो...

- समीर गायकवाड.

No comments:

Post a Comment